श्रीम्हाळसाकांतायैनमः । जयजय श्रीपूर्णानंदा । भक्तवत्सला स्वानंदकंदा । स्मरण करिता मतिमंदा । त्याचे मती प्रकाशक तूं होसी ॥१॥
चौवेदा न कळे तुझी गती । सहा शास्त्राचि मति खुंटती । अठराही हिंपुटी होती । गुण वर्णिता जगदीशा ॥२॥
जगाची घडी मोडी । तव मायेची परवडी । तीसही नातुडे तुझी प्रौढी । माया नियंता सर्वसाक्षी ॥३॥
तुझा अनुग्रह ज्या जीवासी घडे । त्याचे जीवित्व उडुनि शिवत्व जोडे । शेवटी जीव शिवपणही उडे । ब्रह्म होऊनि तो नांदे ॥४॥
ब्रह्म जाला म्हणण्या साद ग्रासुन । ते होय सच्चिदानंद घन । ऐसे तुझे विंदाण । सहजानंदा अंतरंगा ॥५॥
सकळ रंगातील तूं श्रीरंग । सदा झळकसी ब्रह्मतरंग । तुझे चरित्र अभंग । पुढे बोलवी श्रीसदगुरु ॥६॥
चतुर्थाध्यायी शेवटी । मणिकर्णिकेच्या घाटी । पूर्णानंदाच्या भेटी । रामभटजीस पै जाली ॥७॥
आता लक्ष्मी -नारायणाची ऐक्यता । ते परिसावी स्वानंद कथा । श्रवणमात्रे स्वानंदता । प्राप्त असे सर्वासी ॥८॥
पूर्णानंदा सहित ब्रह्मानंद । भोजन करुन स्वानंद । येताच मुमुक्षुवृंद । पुराण प्रारंभी सूत्रभाष्य ॥९॥
सुत्र भाष्याचे पुराण । पूर्णानंद मुखे करुन । ब्रह्मानंद ऐकता पुर्ण । पूर्णानंद होतसे ॥१०॥
श्रीमंत जेवी नवरत्नमाळा । घालुनी निजपुत्र गळा । त्याचा अलंकार सोहळा । स्वानंद हे निजदृष्टी ॥११॥
तेवी सदगुरु । चिद्विलास भाषार्थ रत्नाचे मांदारु । पूर्णानंद हस्ते अतिहर्षु । उघडुनी चिदरत्न काढितसे ॥१२॥
त्यातील ते नवरत्न हार । नवरत्न ते नवविध प्रकार । का हा घालवी भाविक नर । निजभाग्य श्रवणार्थ जे येती ॥१३॥
ते पुराणरस आनंदघन । अध्यात्म तेथील वृक्ष जाणा । प्रश्नोत्तराचे शाखा पूर्ण । डोलताती स्वच्छंदे ॥१४॥
भक्तीच्या अनेक लता । श्रध्देचि पुष्पी सुगंधता । बोध वास सुटता । निर्विकार आमोद दुमदुमी ॥१५॥
विवेक तेथील माळी । अनेक वृत्तीच्या बांधोन आळी । शांतीजळ फिरवितो कोमळी । फुटती मोर विचाराच्या ॥१६॥
ऐसीये येथील वृक्षावरी । मुमुक्षु निरंतरी । गुंजारव करिती परोपरी । स्वानंद सुखा लागीये ॥१७॥
त्या वृक्षाची ब्रह्मफळे । इंद्रियास करुनी वेगळे । जिज्ञासू सेवूनिया भाग्य बळे । अजरा अमर पै होती ॥१८॥
सुमने सूमने सुमनहार । सत्शीष्य गुंफुनी स्वानंदकर । अर्पिती ते सदगुरु माहेर । ऐसा सोहळा तेथीचा ॥१९॥
ऐसे नित्य अध्यात्म निरोपण । स्वामी ऐकती त्याच्या मुखे करुन । ऐकती इतरही भाविक जन । दयाळु समर्थ श्रीगुरु ॥२०॥
विकल्प न द्यावे श्रोता । सदगुरु आपण समर्थ असता । शिष्यमुखे वेदांत कथा । आपण कांही ऐकती ॥२१॥
श्रीसदगुरु ब्रह्माग्नीकुंड । शिष्य सुमेधीनी समिधा उदंड । अन्योन्य भावाची धारा अखंड । उडवा प्रदीप्त पै होती ॥२२॥
सदगुरु ब्रह्मानंद समुद्र । पूर्णानंद पूर्णिमेचा चंद्र । पाहताच उल्ल्हास थोर । चढत जाती अतिशय ॥२३॥
अभिनव तेथील आनंद । उडाला समूळ भेदाभेद । ब्रह्मानंद तेचि पूर्णानंद । गुरुशिष्य भाव मग कैचे ॥२४॥
पूर्ण प्रत्येक चैतन्याची मात । उडाली जेथे आद्यंत । स्वानंद स्वरुप सदोदीत । भेद कांही दिसेना ॥२५॥
ऐसे स्वानंद भरित पूर्णानंद । पाहुनी स्वामी ब्रह्मानंद । देऊनी आपुले निजपद । आपणचि करुनी ठेवीले ॥२६॥
यास्तव गुरुकरवि प्रबोध । शिष्याने ऐकावा स्वानंद । ऐसे नसता भेदाभेद । शिष्यमुखे कीर्तन करवितसे ॥२७॥
ऐसे होत असता पुराण । देहाहंक्रती समूळ ग्रासुन । दोघेही स्वनंदभरित होऊन । समाधिस्त पै होती ॥२८॥
तेथे अक्षेप उत्तराचे बोल । कांहीच न राहील । बोलचि झाले अबोल । अबोल बोलणे केवी घडे ॥२९॥
इतर श्रोतेहि हीच स्थिती । तदनुसारचि होती । विसरुनि सर्व अहंकृती । निजानंद सागरी बुडताती ॥३०॥
ऐसिये पुराणोत्तर काळी । भले भले ऐसे देवोनि आरोळी । सदगुरु साक्षात चंद्रमौळी । निज शिष्याते आलिंगी ॥३१॥
ऐसे आनंदाचे आनंद । ग्रासुनि समूळ द्वंदाद्वंद । ब्रह्मानंद पूर्णानंद । स्वानंदे डुलती स्वानंदी ॥३२॥
तेथील गुरुशिष्यपण । जेवी गंगासागरी समुद्र जाण । देह असताही भिन्न । अद्वय असती निजबोधे ॥३३॥
ऐसे होता तीन प्रहर । नित्य होतसे स्वानंद गजर । यायोगे श्रवणार्थी नर । चुकविती आपुले येरझारा ॥३४॥
त्याकाळी भटजी आणि ग्रहस्थ । तेथे पातले पूर्णानंदार्थ । पाहुनि तेथील विचारार्थ । तटस्थ होऊनि बैसती ॥३५॥
देखूनी तो गुरुशिष्य सोहळा । म्हणती हे नव्हे मानवी लीळा । प्रत्यक्ष सच्चिदानंद पुतळा । मनाविण गती देही दिसती ॥३६॥
ग्रहस्थ म्हणे हो द्विजवरा । कांही न चले आमुच्या विचारा । जेवी समोर ब्राह्मणाचे देव्हारा । श्वान प्रवेशु नव्हे कीं ॥३७॥
आम्ही केवळ विषयासक्त । ते निजबोध अनासक्त । सकळ विषयी विरक्त । तरि योग केवी घडले हे ॥३८॥
आम्हा पूर्णानंद प्राप्ती । दुर्लभचि दिसती । विनविता याचे प्रती । आज्ञा काय होते कीं ॥३९॥
ऐसे बोलती एकमेका । करिती कल्पना अनेका । सायंकाळ होता देखा । श्रवणार्थी जाती निजघरा ॥४०॥
हे दोघे तैसेचि बसती । वारंवार स्वामीसी अवलोकिती । काय आज्ञा करितील आम्हाप्रती । ऐसी इच्छा करुनी मनी ॥४१॥
लोक जाताच जिकडील तिकडे । स्वामी अवलोकिती याजकडे । म्हणती तुम्ही कोण कोणी कडले । येणे जाहले ते सांगा ॥४२॥
येरु होऊनी अती सुलीन । स्वामीस घालिती लोटांगण । उठूनि करिती विज्ञापन । काय ते ऐका भाविक हो ॥४३॥
आम्ही असतो दक्षीणदेशी । विनंती करतो स्वामीसी । ते परिसोनि मानसी । मनोरथ पूर्ण करावे ॥४४॥
भटजी बोले स्वामी लागुन । आपुला शिष्य हा नारायण । आमुचा बंधुपुत्र जाण । यास्तव आम्ही पै आलो ॥४५॥
याची स्त्री पतिव्रता । कंठी ठेविली प्राण याच्या करिता । अन्नादि विषय करुनि वर्जिता । व्रतस्थ होवोनि पै बसली ॥४६॥
शिवालली अश्वत्थ नारायणा । नित्य करुनी सहस्त्र प्रदक्षिणा । एकान्नही स्वल्प घेवोनिया । अनुष्ठाना याकारणे मांडिले ॥४७॥
ती सकळ स्त्रियांची स्वामिनी । बत्तीस लक्षण लक्षणी । प्रत्यक्ष लक्ष्मीच या जनी । नारायणा कारणे तप करीति ॥४८॥
हरिद्रा कुंकुम मात्र भाळी । मंगलस्नानादि वर्ज केली । या प्रकार करुनी ते बाळी । बैसली असे याकारणी ॥४९॥
तिचे मातापिता सभाग्य भारी । तिसी प्राप्त होता ऋतु निर्धारी । मज जाचिती नानापरी । निघोनि आलो यास्तव ॥५०॥
ऐसे ऐकता त्याचे वचन । स्वामी आवेशले निजमना । हे काय रे वर्तमान नारायणा । म्हणोनि क्रोधे नेत्र उघडिले ॥५१॥
पादुका आपुले भिरकाऊन । मारिताच त्याचे भाळी लागुन । रक्त निघताच जाण । स्ववस्त्रे पुशी लागेवेगे ॥५२॥
यतियानी पाहु नये रक्ता । ऐसे जाणूनि सदभक्त । लागवेगे पुशी रक्त । धर्मशास्त्राचिया आधारे ॥५३॥
पाहताच शिष्याचे लक्षण । कळवळले श्रीगुरुचे मन । हा जीवीचा जिव्हाळा म्हणून । प्रेमाश्रु भरले गुरुडोळा ॥५४॥
मी असता त्रिकाळ ज्ञानी । लौकिकार्थ केली हे करणी । तो त्रिकर्ण पूर्वक माझे चरणी । गुंतलासे सर्वस्वे ॥५५॥
लोकास पाहता वरपांग । वेगळे दिसते याचे अंग । अद्वये पाहता अंगांग । ग्रासूनि मीच भरलासे ॥५६॥
ऐसी कृपा उपजता मनी । दृढ आलिंगिले कवळोनी । स्वानंद मीठी पडता क्षणी । पूर्णानंद भरले दशदिशा ॥५७॥
स्वानंदे सदगुरु माऊली । हात फिरवी त्याचे मुखावरुनी । बोलिले काय मधुर वचनी । ऐका भाविक सज्जनहो ॥५८॥
अरे पूर्णानंद आनंदमूर्ती । अगाध की रे तुझी कीर्ती । संपूर्ण पाहता या जगती । तुज ऐसा प्रेमळ दिसेना ॥५९॥
सदभक्ताचे हेचि लक्षण । सर्वस्व असता अनुकूल पूर्ण । सकळ विषयी उदासीन । अनित्य पाहती नेती सुख ॥६०॥
परंतु तुझ्या स्त्रीयेची मात । पडताच माझे श्रवणात । ती लक्ष्मीच साक्षात । ऐसे मजला गमतसे ॥६१॥
ती पतिव्रता शिरोमणी । जरी क्षोभता मनी । मजसहित तुज लागोनी । भस्म करावयाचे सामर्थ्य ॥६२॥
आता न करता अनुमान । येथुनी करावे प्रयाण । ऐसे ऐकता गुरुवचन । निचेतन पडला भूवरी ॥६३॥
त्यावेळी त्यास ऐसे गमले । पर्वत काय वरते कोसळले । किंवा महाअग्नीत लोटले । अवचित कुणी येऊनी ॥६४॥
मग सावध करुनी गुरुराये । पोटी धरिले स्वानंद निलये । येरु नेत्र उघडुनी काये । विज्ञापना ते करीतसे ॥६५॥
जय जय सदगुरु उदारा । परमानंदा परात्परा । कारुण्यसिंधु करुणाकरा । इतुके निष्ठुर का मज ॥६६॥
आपण सदगुरु मायबाप । मज सांभाळीता असता त्रिताप । आधी शांतवूनि ते ताप । मागुती त्यात का लोटिता ॥६७॥
मज दंशीता अहं विखार । स्वामी गारुडी होऊनी निर्धार । उतरवून विष दुर्धर । मागुती सर्पमुखी का देता ॥६८॥
कामक्रोधादि वैरी । मज जाच करिती परोपरी । आपणचि वारुनि जाच भारी । पुनरपि त्याहाती का देता ॥६९॥
पंच विषया पासुनी करुनी मुक्त । मागुती लोटिता का त्यात । मी केवळ परदेशी अनाथ । ते विषय विष केवी सोसू ॥७०॥
निजपदी देऊनिया थारा । मागुती लोटिता का माघारा । मी आपुले द्वारीचा कुत्रा । वारिता कैसा मी जाऊ ॥७१॥
समुद्र वारिता तरंग । समुद्र भरला की अंगांग । तेचि असता बाह्यतरंग । अंगांग वियोग केवी घडे ॥७२॥
सुवर्ण नगासी करिता वेगळा । न दिसताही सूवर्णकळा । सकळा पासून वेगळा । कदाकाळी घडेना ॥७३॥
मृत्तिका त्यागता घट । मृत्तिकाच दिसे घटीचे पाटपोट । त्यासी वेगळेपणाची खटपट । कैसी घडेल स्वामिया ॥७४॥
अग्नी त्यागेल दाहकत्व । जळ वारेल शितत्व । आत्म्यास घडेल अन्यत्व । तरीच वियोग घाले प्रभूचरण ॥७५॥
आधीच माझे तनमनधन । स्वामी चरणी जाहले अर्पण । जाल म्हणण्यासहि ग्रासुन । अभंग पादुकी मी रमलो ॥७६॥
ऐकता व्यतिरेकान्वय स्तवन । सदगुरु सप्रेमे आलिंगुन । बैसवोनि आपुले सन्निधान । प्रबोध काय केले पै ॥७७॥
अरे पूर्णानंदा पूर्ण ज्ञानी । ठाऊक असता तुला तुझी कीर्ति । ही प्राकृत लोकाचे वाहिणी । आंगी आपुले का आणतोसी ॥७८॥
पूर्वीचे कृष्णादि अवतार । ते काय न दाविले अवतार चरित्र । स्वरुपी न पडता विसर अणुमात्र । स्वानंदलीळा करितसे ॥७९॥
आता मी कोण आहे सांग । भ्रमसी का पाहुनी वरपांग । संपूर्ण विश्वाचा अंतरंग । तूंची कीरे शिष्यराया ॥८०॥
स्थूलादि देह चतुष्टय । त्यास साक्षी तूं निर्भय । जाग्रतादि अवस्थेसही निश्चय । तूच की रे साक्षी होसी ॥८१॥
विश्व तैजसादि अभिमानी । नेत्र कंठादि चौस्थानी । द्रष्टा कोण तुज वाचोनी । आहे सांग मजलागी ॥८२॥
रज सत्व तमादि हे गुण । अकार उकारादि मात्रा जाण । त्या सकळासही अधिष्ठान । तूच की रे चिन्मुर्ती ॥८३॥
स्थूल प्रविविक्तादि भोगवृंदा । तुज नाही रे स्वानंदकंदा । इतुकीयासि साक्ष तू निर्द्वंदा । निजानंद निर्मळा ॥८४॥
तेथील विराटादि देहास । आणि उत्पत्यादि अवस्थेस । अभिमानी जे ब्रह्मादिकास । तूची पाहसी निर्गुणा ॥८५॥
सूर्यचंद्र कैसाल कैवल्य । या स्थानास जाणता तू निरामय । गुण मात्रातीत तू निश्चय । निजानंदा परेशा ॥८६॥
पंच प्रलयाचे तुज नसे भय । निजानंद तू निज निश्चय । संपूर्ण देवास तुझे अभय । मायाचक्रचालका ॥८७॥
तुज नाही शबलद्वय । उपाधी रहित तू चिन्मय । सकळास तूझेच आश्रय । सच्चिदानंदा चिन्मया ॥८८॥
जीव शिवातीत शिव । स्वयंज्योती स्वयमेव । ब्रह्मादिकास तुझा प्रभाव । ठाऊक नसे सर्वथा ॥८९॥
तू व्यापून व्यापका । सर्वसाक्षी सकळा प्रकाशका । निर्द्वंद्व निष्कलंका । नित्यरुपा सर्वेश्वरा ॥९०॥
तू मनोवाचा अगोचर । तुझे स्वरुपास नाही पार । मायानियंता परात्पर । स्वानंदकंदा सर्वसाक्षी ॥९१॥
तू ऐसा असता सनातन । तुज काय रे संसार बंधन । तूं कारणक्रिया विरहित जाण । कर्तृत्वबाधा तुज नाही ॥९२॥
सहज प्रारब्धी कलेवर भोगिता । सहजची तूं अससी जाणता । जे सहजी सहज होत असता । तेथील बाधा तुज काय ॥९३॥
अतिथीचे परिराहता निजघरा । निजबोधास कांहीच न लागे वारा । वृत्तीविना होता व्येव्हारा । त्यात तूं केवी लिंपसी ॥९४॥
तू सत्य नारायण । तदव्यापी चित्छक्ती तुझी जाण । तुम्ही उभयता अवतारी पूर्ण । लोकोध्दारा कारणे ॥९५॥
पुढे पुढे तुमचे उदरी । जन्मेल कोणी पुरुष अवतारी । तेणे संपूर्ण चराचरी । प्रख्यात अपार होईल ॥९६॥
इतुके असता भविष्य ज्ञान । हे काय रे तुझे बोलणं । आता शीघ्र करावे गमन । मजला चित्ती चिंतीत ॥९७॥
हे ऐकताच गुरु प्रबोध । कांही न बोलता जाहले स्तब्ध । स्तब्ध होताच पूर्णानंद । भटजीस स्वामी आज्ञापिती ॥९८॥
स्वदेशास तुमचे प्रयाण । कधीचे आहे सांगावे आपण । मी याचे जायाचे प्रयत्न । शीघ्रचि जाण करवितो ॥९९॥
एक मासाचे अगोदर । सांगावे हो द्विजवर । पूर्णानंदासही निर्धार । पाठवीन तुमच्या समागमे ॥१००॥
हा माझ्या जीवीचे जीवन । यास सोडून राहता क्षण । ते युगयुगा समान जाण । वाटत असे द्विजवरा ॥१०१॥
ऐकोनि वचन ब्रह्मानंद । भटजीस जाहला आनंद । ग्रहस्थास बोले पूर्णानंद । प्राप्त जाहला आम्हासी ॥१०२॥
यास्तव आमुचे येथ येणे । तेणे प्राप्त जाहली या प्रभूची चरणे । आता करावे प्रयाण आपणे । शीघ्र आपुले देशासी ॥१०३॥
यापरी एकमेका बोलून । वंदून महाराजांचे चरण । सत्वर निघाले तेथोन । पातले आपुले बिर्हाडा ॥१०४॥
ऐसे कांही एक दिवस होता । करु प्रयाणाची सिध्दता । स्वामीसी विज्ञापिती तत्वता । करिते जाले त्याकाळी ॥१०५॥
आपुले कृपे करुन । यात्रा जाहली संपूर्ण । स्वदेशा करावे प्रयाण । हेची इच्छा स्वामीया ॥१०६॥
एक मासानंतर । प्रयाण करणे निर्धार । आपण सदगुरु उदार । नारायणा पाठवावे ॥१०७॥
संदीपनास श्रीकृष्ण करुनी वंदन । निघता जो शीण जाहला मुनीलागुन । तैशाचि प्रकारे ब्रह्मानंदा लागुन । याचे खेद पै वाटे ॥१०८॥
पूर्णानंद आधीच उदास । कांही चिंता नसे त्यास । जावे सत्वर देशास । हर्ष कांही न वाटे ॥१०९॥
स्वामी आपणचि होवोन । इतर शिष्यवर्गा सांगोन । मेळऊनी सहस्त्रधन । याचे स्वाधीन पै केले ॥११०॥
त्याची कावडादिकाची चिंता । स्वामीसीच तत्वता । करऊनी सर्व सिध्दता । भटजीस काय आज्ञापिती ॥१११॥
पूर्णानंदाची प्रयाण सिध्दता । जाहली जाणावी आता । आपण कधी जाता । ते सांगावे मजलागी ॥११२॥
येरु म्हणे मुहूर्त उदिया । उत्तम आहे जी स्वामीया । आपुली कृपा होताच स्वामीया । पूर्णानंदासह प्रयाण करितो जी ॥११३॥
लक्ष्मीनारायणाची ऐक्यता । सत्वर करावी हा हेत धरोनी चित्ता । तातडी करितसे त्यांचा चुलता । प्रयाणासी ते काळी ॥११४॥
प्राकृत लोका कारण । वेगळे दिसती लक्ष्मीनारायण । वस्तुतः ते प्रकृती पुरुष जाण । वियोग त्यासी केवी घडे ॥११५॥
दीप आणि ज्योती । मुक्तिका आणि कांती । तेवी नारायण आणि लक्ष्मीसती । कल्पांती भिन्न नव्हेचि ॥११६॥
असो दुसरे दिवशी प्रातःकाळी । द्विजवर पातला स्वामी जवळी । वंदन करुनी चरणकमळी । नारायणासी पाठवा म्हणतसे ॥११७॥
स्वामींनी पूर्णानंदास बोलावून । तीर्थाची कावडी स्वहस्ते देऊन । बोले शीघ्र करावे प्रयाण । स्वानंदकंदा निजसख्या ॥११८॥
कावड घेवोनि पूर्णानंद । मस्तक ठेविले गुरुचरणारविंद । बोलिले काय स्वामी ब्रह्मानंद । सत्वर येईरे प्रेमळा ॥११९॥
ह्रदयी ठेवोनि गुरुचरण कमळे । पुढे टाकिली पाऊले । पाऊला पाऊली ब्रह्मानंद भरले । प्रेमाश्रु चालिले शिष्य डोळा ॥१२०॥
कन्या सासुरी जाता । परतुनी पाहे मातापिता । तेवी पूर्णानंद तत्वता । परतुनी पाहती सदगुरुशी ॥१२१॥
पुढे ठेविता चार पाऊले । सदगुरुनाथ काय बोले । कैसा रे गुरुभक्त भले । गुरुदक्षिणा न देता जातोसी ॥१२२॥
ऐसे वचन पडता कानी । त्यासी हर्ष न समाये गगनी । गुरुदक्षिणास्तव स्वामी चरणी । राहणे होईल की मजलागी ॥१२३॥
फिरुन तेव्हा पूर्णानंद । दृढ धरिले गुरुचरणारविंद । बोलिले काय स्वानंदकंद । सदगुरुलागी ते काळी ॥१२४॥
जयजय सदगुरु स्वानंद निलया । माझे मस्तक पडो आपुल्या पाया । कुरवंडी करीन संपूर्ण काया । आपुल्या चरणांगुष्ठावरुनी ॥१२५॥
धन्य धन्य माझे जीणे । आपणचि दया करुन । हरित सकल कल्मषा जाण । चरणी थारा पै दिधला ॥१२६॥
आता द्यावी गुरुदक्षिणा जाण । ही स्वामींची आज्ञा प्रमाण । आधीच आणिले तनमनधन । देणेघेणे मज कैचे ॥१२७॥
आपण दिल्हे जे धन । ते गेले अंगांगी जिरोन । देण्या घेण्यासही ग्रास करुन । निजधन होवोनि पै ठेले ॥१२८॥
आता घ्यावे हेचि दक्षिणा । हा पिंड पडो आपुल्ल्या चरणा । यावाचुनि कांही दिसेना । अर्पणास्तव स्वामीया ॥१२९॥
परिसोनि शिष्य वचन । सद्योग बोलिले श्रीगुरु आपण । त्या गुरुदक्षिणेची खूण । सांगतो आता मी तुज ॥१३०॥
तुझे वियोगाची खंती । दृढ जडली माझे चित्ती । त्याची होय विश्रांती । हेचि दक्षिणा मज देई ॥१३१॥
तरी ऐके माझा अभिप्राय । दो वर्षातुनी एकदा भेट होय । या वाचुनी शिष्यराय । मागणे नाही मजकाही ॥१३२॥
तू कांही देसी संपादून धन । ते मनी आधीच त्यागीले पूर्ण । सम्यक त्यास करुन । मी जालो जाण संन्यासी ॥१३३॥
ऐकताच गुरुराज वचन आगळे । प्रेमोदके भरले शिष्य डोळे । करी घेवोनिया गंगाजळे । प्रतिज्ञा करुनी सोडिले ॥१३४॥
मजला अर्धही क्षण । अंतरता स्वामीचरण । ते युगासमान । जातो स्वामी गुरुराया ॥१३५॥
आज्ञेसि न करिता अव्हेर । मी निघालो जी निर्धार । गुरुचरणा वाचुनि संसार । काय मजला सुख वाटे ॥१३६॥
याच देहात असता प्राण । दोवर्षांती येथे येईन । चरणामृताचे पान करुन । अजरामर होईन मी ॥१३७॥
ऐकता ऐसी प्रतिज्ञाभाक । गुरु बोलिले होवोनि हरिख । पाहता या भूलोकी देख । तुजसारिखा प्रेमळ आन नाही ॥१३८॥
धन्य ही तुझी गुरुभक्ती । जाण हे चारी मुक्ति । दासी होवोनि ओळगती । तुजपाशी रे शिष्यराया ॥१३९॥
तुझे होता कृपावलोकन । निज भाग्ये येती तुला शरण । त्याजला होईल ब्रह्मज्ञान । सकळ वैभव भोगिता ॥१४०॥
ऐसा आशिर्वाद करुन पूर्ण । मस्तकी हस्त ठेविले जाण । पुनरपि पूर्णानंद वंदून । प्रयाण करिते पै जाले ॥१४१॥
होताच तीन प्रहर । नित्यवत पातले भाविक नर । बोले त्यासी काय उत्तर । सदगुरुराज दयाळू ॥१४२॥
उपनिषद रत्नाची कोठडी । नित्य पूर्णानंद बालक उघडी । आज चिदगंगेची घेऊनी कावडी । स्वदेशा प्रयाण तो केला ॥१४३॥
तो परमार्थ वनीचा माळी । श्रुत्यर्थ लताची वेचुनी कळी । त्याची मीळणी करुनि आगळी । तुमच्या गळा घालित होता ॥१४४॥
ब्रह्मानंद समुद्र अखंड । ते आहेत स्वानंदकंद । न देखता नयनी पूर्णानंद । उचंबळेना भाविक हो ॥१४५॥
न देखता पूर्णानंद बाळ । फुटताती की हो दोन्ही डोळे । तो माझा निज डोळाच होय डोळे । तान्हया माझीच मूर्ती ॥१४६॥
अनुभव त्याचे काय सांगावे । आपणा माजी विश्व पाहे । विश्वी पाहता आपण निश्चये । ऐसी त्यासी वृत्ती बाणली ॥१४७॥
यापरि त्याचे गुणवर्णन । आपणचि भाषार्णव करुन मंथन । सारार्थ रत्न जाण । देते जाले अधिकारिया ॥१४८॥
इकडे पूर्णानंद भक्ता । पदोपदी जात जाता । सदगुरुकृपा आठऊनि चित्ता । मार्गक्रमणा करीतसे ॥१४९॥
वाट क्रमुनी दोन मास । पितृव्यासह महागावास । येऊनी पोचले क्षेमेहर्ष । तेथील कुलकर्णी सहित पै ॥१५०॥
घरी उरकिता समाराधन । पितृव्य काय बोले पुत्रालागुन । तुम्ही करावे प्रयाण । उंबळाकडे स्वानंदे ॥१५१॥
मी पत्र देतो लिहून । पुढे करावे गमन । आठ दिवसानंतर जाण । मीही येऊन पोहचतो ॥१५२॥
तुज करिता कंठी प्राणा । ठेवोनि बैसली ती सुलक्षणा । न करिता कांही अनुमाना । जावे सत्वर पुत्रराया ॥१५३॥
ऐकता वडिलांची वचनोक्ति । ते मानले त्याचे वृत्ती । प्रवृत्ती निवृत्तीस सदगती । स्वानुभव राज्येरोकडे लाभ ॥१५४॥
निघे समागमे घेऊन कावड । ज्याची वृत्ती ब्रह्मानंदी निबिड । पुढे चालता तया वैराग्य सुखाड । स्वानंद भजना उभवोनि ॥१५५॥
निघाले तेथुन एकले एक । ज्याचे अनुभव एकानेक । अनेकी पाहता येकी येक । ऐसे अद्वय सिंधु ते ॥१५६॥
वाट क्रमण करोनि पातले तेथ । जेथे शिवालय आणि अश्वत्थ । कावड घेवोनि समर्थ । बसून राहिले ते काळी ॥१५७॥
यांचे आधीच ती लक्ष्मी सती । प्रदक्षिणा तेथ करीत होती । दृष्टी पडताच स्वानंदमूर्ती । विचार मनी मांडिली ॥१५८॥
विचार न घडता सारासार । स्वरुपी प्राप्त नव्हे साचार । ऐसे जाणून निजनिर्धार । विचारांशी ती प्रवर्तली ते मायी ॥१५९॥
मनी म्हणे हा ब्राह्मण कोण आहे । तीर्थ कावडीही जवळ दिसताहे । मनी उपजती निरवयव स्नेहे । पाहता यास याकाळी ॥१६०॥
वय पाहता दिसे वर्ष षोडष । कांती पाहता रविपरिस विशेष । असेल ब्राह्मण निर्दोष । स्वामी माझा प्राणनाथ ॥१६१॥
ऐसे प्रदक्षिणा प्रदक्षिणी । विचार करी चिदघन खाणी । चित्त ठेवोनि हरिहरचरणी । स्तवन करीतसे सप्रेमे ॥१६२॥
जय गौरी रमणा कमळावरा । त्रिपुरसुंदरा मुर संहारा । मदनांतका लक्ष्मी विहारा । मंगलदायका तुज नमो ॥१६३॥
कैलासपते कारुण्यसिंधु । भवमोचका दीनबंधु । स्मरणे तोडिसी भवबंधू । भक्तवत्सला तुज नमो ॥१६४॥
भुजंग भूषणा भुजंग शयना । भाल लोचना कल्मष हरणा । सच्चिदानंद स्वानंद सदना । श्रीहरिहरा तुज नमो ॥१६५॥
कर्पुरधवला शांताकारा । निलकंठा कनकांबरा । निरंजनेशा शामसुंदरा । मनोरथकारका तुज नमो ॥१६६॥
विश्वरुपा विश्वभंरा । श्रीनिवासा जगदोध्दारा । सहजानंदा श्रीदिगंबरा । मनोब्जभृंगा तुज नमो ॥१६७॥
यापरि स्तवोनि मनी । म्हणे ती पतिव्रता शिरोमणी । जरी तुष्टतील हरिहर मज लागोनी । हाच निश्चयो पती होईल माझा ॥१६८॥
करिता घालीत प्रदक्षिणा । लक्ष लाविले त्याच्या चरणा । सहस्त्र होताचि प्रदक्षिणा । उत्तरपूजा पै केली ॥१६९॥
प्रदक्षिणा करिता वेळे । पूर्णानंदेही ओळखिले । पितृव्यानी जे खूण सांगितले । ते अगदी असे इजपाशी ॥१७०॥
सती ऐसी ओळखून मनी । कावडीस टेका देऊनी । पाय आपुले लांब करुनी । सहज बैसोनि राहिले ॥१७१॥
मग इने समीप येऊन । साष्टांग नमन करुन । दोन्ही कर संपुट जोडोन । विज्ञापना करी काय ॥१७२॥
स्वामी आपुले येणे कोठून । सांगावेजी कृपा करुन । आपुले वास्तव्य ग्राम कोण । तेही दया करुन सांगावे ॥१७३॥
येरु म्हणे आलो काशीहून । पुढे जाणे रामेश्वरा लागुन । मार्ग क्रमिता इथे येणे । सहज झाले जाणावे ॥१७४॥
पुनरपि वंदून पाय । विनंती करी लक्ष्मी माय । पांथीकचि आपण निश्चये । पूर्वील वास्तव्य कोठील ॥१७५॥
स्वग्राम आणि नामाभिधान । ते ऐकावे ऐसे इच्छिते मन । तरी संपूर्ण कृपा करुन । सांगून तृप्त करावे ॥१७६॥
हरिखून बोले द्विजराव । आमुचा ग्राम महागाव । हा देहास नारायण नाव । लोक बोलिती निर्धारे ॥१७७॥
तिम्मण दीक्षित पिता । जानकी ती माझी माता । ऐसे या देहाचा योग तत्वता । पुढे काय सांगावे ॥१७८॥
श्रवणी पडता ऐसे वचनी । मरणा काली संजीवनी । मुखी घातले देवानी । ऐसे गमले तिजलागी ॥१७९॥
ऐकता नाव नारायण । सासुश्वसुराचे नाव श्रवण । कानी पडता चित्तालागुन । हर्ष सर्वथा न समाये ॥१८०॥
अष्टभाव दाटले अंगी । स्वानंद भरला अंगोअंगी । पूर्णानंद प्राप्तीचे तरंगी । आंगा ग्रासून रंगली ॥१८१॥
देहभाव नाही उरला । दाहीदिशा पूर्णानंदी दाटल्या । बोलबोलासी विसर पडल्या । अबोल स्थिती पै उमलली ॥१८२॥
त्यावेळचा एक दृष्टांत । ऐकावे भाविक जन वृत्तांत । चित्रांगद भेटता सीमंतिनी नितांत । पाताळातूनी येऊन ॥१८३॥
तिजला तेव्हा जे सुख झाले । त्यापरिस हे अधिक तरळले । देहाहंकृती संपूर्ण ग्रासिले । तन्मय जाली पाहताची ॥१८४॥
अहं रावण वधून आत्माराम । शांती सीतेस भेटता हर्ष परम । भेटता पूर्णानंद पूर्णकाम । तेवी लक्ष्मीस पै जाले ॥१८५॥
नारायणाच्या वियोग नळी । तपीली होती लक्ष्मी बाळी । प्राप्त होताचि चरणांबुज निश्चळी । स्वानंदे निवाली सर्वांगे ॥१८६॥
पुनरपि ठेवोनि मस्तक । बोले काय होवोनि निःशंक । आजि आपुले उद्दिष्ट देख । माझ्या पित्यासी प्राप्त व्हावे ॥१८७॥
आपुल्या पंक्तिचा लाभ घडे । संपूर्ण त्याचे पातक झडे । ब्रह्मज्ञान होय रोकडे । ऐसा महिमा प्रभुपायी ॥१८८॥
आपुले चरणी सकळ तीर्थ । आपुले दर्शनी परमार्थ । ऐसा जाणुनी श्रुत्यर्थ । ब्राह्मणा पुजितो पिता माझा ॥१८९॥
आपण रहावे क्षणभरी । मी आता जाते निजघरी । जाऊनि पाठवते झडकरी । पित्यासी आपुले दर्शनासी ॥१९०॥
आपण मात्र जाऊ नये । हीच विनंती आपुले पायी । तथापि जाता निश्चयी । विश्वनाथाची शपथ असे ॥१९१॥
ऐसे वचनोक्ति जाळी । पसरिता ते स्वानंद बाळी । सापडला त्या काळी । ती निघाली निजगृहा ॥१९२॥
विकसिता तिचे नेत्रपद्म । भ्रमर होवोनि द्विजोत्तम । गुंतुन मकरंद परम । सेविती जाली ते वेळी ॥१९३॥
यापरी गुंतवून त्यास । घरी येवोनि काय बोले मातेस । ते पुढील प्रसंगी कथा सुरस । स्वानंद मने परिसावे ॥१९४॥
लक्ष्मीचा बोल ऐकता । देऊळा येईल तिचा पिता । स्वानंदे भेटून जामाता । मिरवित नेई स्वगृहा ॥१९५॥
तुमचे ह्रदय देऊळात । आत्मा नारायण उदित । शांती लक्ष्मीसह विराजित । पूर्णानंदे करोनिया ॥१९६॥
हे चरित्र पूर्णानंदराय । पूर्णानंद भरलासे सबाह्य । श्रवण मात्रे सदा जय । ऐसा निश्चय वर असे ॥१९७॥
इच्छितील जे चौ पुरुषार्थ । प्राप्त होईल यथार्थ । येथील वक्ता सदगुरुनाथ । काय नवल त्यालागी ॥१९८॥
लक्ष्मी नारायण ऐक्य कथा । सदभावे ऐकविता । वियोग असेल बंधुसूता । सहज होय भेट त्यासी ॥१९९॥
पतिव्रतेस पती वियोग । तीसही घडता श्रवणचांग । पती भेटेल अविलंब योग । हा वर असे या ग्रंथा ॥२००॥
ज्या जीवास स्वस्वरुप वियोग । त्या स्वरुपची येथे मुळी ब्रह्मतरंग । ऐसा नवल सदगुरु श्रीरंग । हा वियोग हरण्या काय आश्चर्य ॥२०१॥
यास मानू नये असत्य चित्ती । सदभावे पहावे प्रचिती । भाव सरिसे सदगुरु निश्चिती । प्राप्त करुनी देईल ॥२०२॥
या सदगुरुस आठविता चित्ती । अप्राप्त ते होय प्राप्ती । सदा पावे विश्रांती । विश्रांती कारण सदगुरु ॥२०३॥
त्या सदगुरुचरणी मस्तक ठेऊनी । हनुमदात्मज विनवी श्रोते लागुनी । सदगुरुरुप सहजानंद आपण । आपुले चरित्र पुढे वदवावे ॥२०४॥
या चरित्राचे वक्ता वदविता । पूर्णानंदचि स्वये तत्वता । पूर्णानंद ऐसे म्हणता । पूर्णानंद करी सर्वासी ॥२०५॥
इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे सुखाचे सुखसूत्र । पंचमोध्याय गोड हा ॥२०६॥