श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय तिसरा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्योनमः ॥ जयजय पूर्णानंद जगदोध्दारा । कल्याणकारका कल्याण विहारा । सच्चिदानंदा सर्वेश्वरा । मायाचक्र चालका ॥१॥

चित्त चालका चैतन्यघना । भवगज विदारक पंचानना । दुरित काननभंजना । लक्ष्मीवरा दयाळा ॥२॥

तुझे स्मरण दिवाकर । उदय होता ह्रदयमंदिर । अज्ञान तमाचा होय संहार । अगाध महिमा गुरुवर्या ॥३॥

गुरु म्हणूनी जो करी उच्चारा । सप्रेम होतसे दर्शन तया मुक्तद्वारा । चुकवून त्यांच्या येरझारा । निजपदी थारा तूं तया देसी ॥४॥

ऐसी तुझी अगाध करणी । तूं रिघूनि माझिया निजवाणी । तुझे चरित्र तुवा वाखाणी । सहजानंद अभिराम ॥५॥

द्वितीयाध्याया अंती । नारायण सांगे ग्रहस्थाप्रती । हाच आमुचा पिता निश्चिती । सत्य आपण ओळखावे ॥६॥

आता पुढील कथे लागुन । द्यावे आपण अवधान । आपुली कथा आपण । ऐकावे ते संतश्रोते हो ॥७॥

ग्रहस्थ म्हणे बाळा गुण गंभीरा । का करितोसी इतुकी त्वरा । हर्षयुक्त भेटवीन तुमच्या पितरा । वास्तव्य आधी पाहुनी ॥८॥

येरु म्हणे तीर्थ आपुले गंगाजळ । आमुचे तीर्थ त्यांचे चरणकमळ । याजकरिता उतावीळ । वंदून पवित्र मी होईन ॥९॥

आपण परोपकारीय शिखामणी । पुण्यवंता माजी अग्रगणी । आपुलीया कृपे कारणी । आणले मजला येथवरी ॥१०॥

पुढे आपुल्या आज्ञेप्रमाणे । वर्तन मज बाळालागुन । आज्ञे व्यतिरिक्त जाण । पुढे पाऊल न ठेवू ॥११॥

ऐकता ऐसे विनय वचन । फार संतोषीती प्रन्नवदन । आपणही दीक्षिता जवळ जावोन । साष्टांग नमन पै केले ॥१२॥

मग काय प्रार्थना करीत । आपण वेदो नारायण साक्षात । येऊनि आमुचे मंदिरात । पवित्र आता करावे ॥१३॥

आपुले कुटुंब कवणे स्थळी । आहेत बोलवावे याकाळी । पुजुनि श्रेष्ठ तुमचे चरणकमळी । कांही विज्ञापना करीतसो ॥१४॥

मग बोलावुनि दीक्षित पत्नी । षोडषोपचार पूजा करुनी । वस्त्रभरणादि समर्पूनी । नारायणासी भेटविले ॥१५॥

पुत्राची होता भेटी । आनंद न समाये त्यांचे पोटी । पूर्णानंद दाटली दृष्टी । ऐसे झाले त्याकाळी ॥१६॥

बाळासी पोटी धरुन । उभयता पुसती सकळ वर्तमान । येरु सांगती सांकेतपूर्ण । परमानंद पै जाहाले ॥१७॥

त्या उभयतांच्या सन्निधानी । स्तवन करी ग्रहस्थ आपणी । तुमचे कुळी अवतार पूर्णी । पुत्र होवोनि हा जन्मला ॥१८॥

हा नारायण तेजोराशी । बाळ कोण म्हणतील यासी । याची कीर्ति देशोदेशी । होईल पुढे विशेषी । वाढत जाईल श्रेष्ठत्वी ॥१९॥

हा अवतारी पुरुष पूर्ण । लोका तारावया कारण । मानवी वेष धरुन । अवतरलेती तवग्रही ॥२०॥

या बाळाचा राजयोगे करुन । सदा घडतसे सतश्रवण । याच्या वियोगाचे दुःख जाण । आंम्हास कैसे साहवेल ॥२१॥

ऐकताच ऐसे वचन । मग काय बोलिले नारायण । तव ममतेचे जाळीत पूर्ण । सापडोनि मी राहीन म्हणे ॥२२॥

आपणास सोडूनी क्षणभरी । मी कदा न राहे निजघरी । ऐसे बोलुनि मधुरोत्तरी । ग्रहस्थास फार संतोषविले ॥२३॥

दीक्षित निघाले तेथूनी । समागमे घेऊन नारायणी । आले आपुले ठिकाणी । जेथे ब्रह्मानंद नांदतसे ॥२४॥

ब्रह्मानंद स्वामींचे चरणी । वंदिताच होय पापाची धुणी । नारायणासी आणूनी । घातलेसे दीक्षिते चरणकमळी ॥२५॥

पाहताच ब्रह्मानंद चरण । ब्रह्मानंदे दाटला नारायण । म्हणे जन्मांतरीचे सुकृत पूर्ण । फळले आजि वाटतसे ॥२६॥

नेणो पूर्वी केला काय स्वधर्म । ब्रह्मार्पण बुध्दी सत्कर्म । तरीच या चरणाचा लाभ परम । प्राप्त जाहला या काळी ॥२७॥

ऐकता ऐसी मंजुळ वाणी । स्वामीस वाटले हा सदभक्त खाणी । सब्दधनाचा होईल धणी । अधिकारी पूर्ण दिसतो हा ॥२८॥

हा जन्मांतरीचा योगभ्रष्ट । यासि प्रबोधता नलगती कष्ट । ऐसे आनंदे बोलिले यथेष्ट । स्वामीनि बैसविले आपणा जवळी ॥२९॥

वरदकरे कुरवाळुनी त्यावेळी । कृपांकनि पुसती समाचार सगळी । मार्गी कष्टलासि बहुकाळी । स्वानंदे थापटीती पाठ त्याची ॥३०॥

लौकिक रीति ऐसी असे । परि गुरुकृपा लाभली विशेषे । ज्ञान होणे दुर्लभ मानवदशे । आशिर्वादिली प्रेमभरे ॥३१॥

ऐसे गोंजारुनि नारायणास । अनुग्रह आधि कृपा विशेष । पाहुनि अवतारी पुरुष । उपजले चित्ती स्वामीचे करुणा रसांशी ॥३२॥

किंवा साक्षात्कार आधि विज्ञान । आनंद आधि समाधान । कीर्ति आधि उदारपण । तेवी कृपा विशेष बाळावरी ॥३३॥

हर्षोन पुसे तया लागुन । काय काय जाले अध्यायन । येरु म्हणे ग्रंथत्रय जाण । आपुले कृपेने पै जाले ॥३४॥

मठा समीप वेदशाळा संपन्न । बोलविला तेथील ब्राह्मण । ज्ञानविज्ञानी श्रेष्ट व्युत्पन्न । अध्ययनांशी संपूर्ण सांगावे ॥३५॥

होताच स्वामीची आज्ञा । द्विज बोलिला वचनीय प्रतिज्ञा । म्हणे हा दिसतो विवेक संपन्नसूज्ञा । अती योग्यत्वी दशग्रंथी होईल की ॥३६॥

तदनुसार षण्मासात । प्राप्त जाहाले दशग्रंथी पूर्णपूत । अश्वमेध पर्यंत श्रौत । तेही जाहाले त्यालागी ॥३७॥

होताच अध्ययनी संपूर्ण । स्वामीस वाटला हा ज्ञानांशी संपन्न । पुढील अध्ययन यालागुन । शास्त्राभ्यासी प्रबोधावे ॥३८॥

जरी जाहला वेदपाठक । अर्थाविण नुसती ठकठक । शास्त्रावीण हा बाळक । श्रुत्यार्थ मर्मा केवी उमजेल ॥३९॥

नुसतेची पठणीय वेद । न जाईल हा भेदाभेद । वाढेल येणे संशयी छंद । स्वानंदांशा मुकेल कीं ॥४०॥

तरी आधी सांगावे व्याकरणे । कळावया तयासी शब्दांची परिनिबंधन । नंतर इतरही दर्शने । सांगता येईल पुढिल्या लक्षणी ॥४१॥

आधी वंदुनि श्रीगुरुनाथ । स्वामी प्रारंभिले व्याकरण व्यापूर्ता । प्रथमारंभी पंचश्लोकाते । लिहून दीधले ते दिवशी ॥४२॥

पांच घटकेत पंचश्लोक । पाठ केले ते पुण्यश्लोक । दुसरे दिवशी दशश्लोक । तदनुसार पाठ केले ॥४३॥

याप्रमाणे मास त्रयात । शास्त्र झाले व्याकरण संपूर्त । मानवी लोकास हे मात । आश्चर्य फार पै जाले ॥४४॥

आधीच हाती प्रकाश । त्यावरी गुरुकृपा विशेष । याप्रकारे विद्याप्राप्त होण्यास । सायास काही पडेना ॥४५॥

गुरुकृपेची ऐसी खूण । मूढालागी होतसे आत्मज्ञान । मास त्रयात व्याकरण । होण्यास कांही नवल नसे पाही ॥४६॥

संपूर्ण होताच व्याकरण । ब्रह्मसभेसी जातसे नारायण । सभेस प्रसंगे करुन ब्राह्मण । निरुत्तर करी शास्त्रबळे ॥४७॥

मग समस्त मिळोन ब्राह्मण । म्हणती हा बाळ कोणाचे कवण । आंम्हा समस्ता लागोन । मानभंग करतो हा सभेमाजी ॥४८॥

यासी वेद आणि श्रौतशास्त्र । आंम्हा लोकासी एकचि शास्त्र । प्रसंगी तो तिनी माजी विचित्र । या बाळास कोण जिंकील ॥४९॥

अवघे मिळूनी एकामेळी । पातले स्वामिचिया जवळी । आपण कोठोनि हा शिष्य आणिलाये स्थळी । सांगा स्वामी आंम्हालागी ॥५०॥

स्वामी बोले ब्राह्मणाते । यानी काय केला अपराधाते । ते सांगावे आम्हाते । तरी शिक्षा करु त्यासी ॥५१॥

येरु म्हणे अपराध काये । हा बाळ फार विचित्र होये । शब्द जडणी काढून शास्त्र विषये । निरुत्तर करितो आम्हासी ॥५२॥

आम्ही इतुके वयोवृध्द होऊन । भितो या बाळा लागुन । हे आपुले कृपेच्या आशिर्वादी परिपूर्ण । उभारोनि आला वाराणशी ॥५३॥

आता या बाळासी अवरावे आपण । तरीच आंम्हा लोकांचे कल्याण । नाही तरी हा बाळ आंम्हा जाण । मान सर्वथा न राखील ॥५४॥

मग आनंदोनी ब्रह्मानंद । काय बोले सच्चिदानंद कंद । तुम्हीं स्वस्थपणि राहावे जी ब्रह्मवृंद । प्रबोधू यासी यथावत कीं ॥५५॥

मनी विचारी श्रीगुरुस्वामी । अभ्यासी चढत चालिला हा यशोभिध्येयी । सदगुरु बोधेविणा लीनता वृत्तीशी त्यानांही । विज्ञान वैभवी आवरावे ॥५६॥

वेदांत शास्त्रीय बोधेवीण । कदापि न होय स्थिर मन । अंगी विरक्ति उपासनी तीरभिमान । आंतरी कल्पांतीही न बिंबे ॥५७॥

सकळ देवामजि उमानाथ । किंवा पुराणामाजि भागवत । तेवी शास्त्रामाजी वेदांत । समाधानार्थी कारण पै ॥५८॥

तव बाळास समीप बैसऊनी । चिन्मुद्रे हस्त मस्तकी ठेवोनी । सांप्रदाय क्रमांग विज्ञान निगमनि । अनुग्रहिले पूर्णत्वीय विधियांशी ॥५९॥

कृष्णाशी उपदेशीला सांदीपन । किंवा रामचंद्राशी वसिष्ठे प्रबोधिला विज्ञान । तेवी नारायणाशी स्वामींनी वरश्रिये कृपापूर्ण । ब्रह्मोपदेशी दीक्षिले ॥६०॥

अनुग्रह मात्रेचि पूर्णब्रह्मपदी । ब्रह्मणी परब्रह्मण्याची सिध्दी । उन्मळोनि पडला वासना द्वंद्वी । विश्वी विश्वंभरत्व साकारले श्रीये ॥६१॥

तेणे आंदिमाया अज्ञानता मावळली । विज्ञानातीत गुरुकृपा ओळली । सहजस्फूर्त परब्रह्मैक्य ह्रदयी बिंबलि । गुरुप्रसाद परिमळले ॥६२॥

जो स्वरुपी अनंत नारायण । गुरुकृपे विश्वभंरत्वी परिलेण । शब्दवर्णनी उदयले मौनची परिपूर्ण । तेणे श्रीगुरुचरणी साष्टांगिले ॥६३॥

गुरुशिष्य ऐक्यत्वी सुलीन । चित्त स्वरुपी झाले लीन । गुरुशिष्यपणाचे भान । उपडोन गेले तात्काळ ॥६४॥

ब्रह्मादिक देव सकळीक । इच्छिती तीहे परमानंदीय स्वानंदसुख । होताचि वरदहस्त मस्तिकी सम्यक । प्राप्त झाले त्यालागी ॥६५॥

नारायणी बोध ब्रह्मानंद । होताच स्वानंदकंद । ब्रह्मांतरी पूर्णानंद । दाटूनी गेला ते वेळी ॥६६॥

ऐसे सहज समाधिसुख । सेवीत बसले स्वानंदी हरिख । इंद्रियादि धर्मे मुरडोनि अतंर्मुख । गुरु आज्ञेअर्पित जीवनी धर्मवाहि ॥६७॥

श्रवणेंद्रियाचा धर्म ऐकणे । त्वचेने स्पर्श नेत्री रुप पाहणे । सर्वहि गुरुस्वरुप ब्रह्मार्पणे । शिवस्वरुप गुरुचरणानुभवी ॥६८॥

रसनेनी षड्ररस चाखणे । घ्राणेंद्रियी गंध सेवणे । रसीगंधी स्वानंद प्रबोधने । भरला उन्मुक्त गुरुचरणी ॥६९॥

ज्ञानेंद्रियाची ऐसी गती । मग कर्मेंद्रियासी कोण पुसती । सांडुनि आपुल्या पूर्वस्थिती । ब्रह्मानंद सागरी निमज्जिले ॥७०॥

अवस्थात्रयी निजबोधे पूर्ण । होता तुरिर्याहि स्वरुपी लीन । सच्चिदानंदमय संपूर्णघना । गुरुचरणी उन्मनी परिल्याले ॥७१॥

यापरि समाधी लवलीन गुरुकृपेसाधी । अंतर्बाह्य परमैक्यत्व गुरुबोधी । अक्षरी अक्षय्यत्व प्रबोधनिधी । क्रपा परिमळी ओथंबली ॥७२॥

तयाच्या स्वरुपी भेद । वेदा न करवे कृपेधुंद । व्यासादिकासी परमानंद । तयादर्शनी विसावली ॥७३॥

यापरि गुरुबोधाक्षरी । नारायण बिंबला तारकाद्वय अधिकारी । वरःपूत निमग्न आंतरी । चरणारविंदी निमग्न ॥७४॥

धन्य ति गुरुकृपा संपादिली । धन्य असे तयांची माऊली । जिने ऐश्या पुत्र प्रसवली । गुरुभक्त शिरोमणी या जगी ॥७५॥

धन्य असे त्याचे वंशज । धन्य असे त्याचे कुळांश शुध्द । धन्य असे त्याच्या देशी उमज । गुरुभक्त जेथे विराजे ॥७६॥

धन्य त्याची कमायी । धन्य म्हणावे त्याची गतिग्वाही । ज्याची वृत्ति रंगली गुरुपायी । अनन्य योग सर्वस्वी ॥७७॥

नर जन्माचे हेच फळ । सप्रेम वरुनी गुरुपद कमळ । भ्रमर होऊन चिरकाळ । गुंजारव करितसे ॥७८॥

प्राप्त होता नरजन्म । शरण रिघावे सोडून संभ्रम । संपादुनी गुरुकृपा परम । चुकवावे आपुल्या येरझारा ॥७९॥

येर्‍हवी नरजन्मासी आले । गुरुपद समुद्री नाही बुडाले । चिदरत्नास मुकले । व्यर्थ गमाविले नरजन्म ते ॥८०॥

तरीच नर जन्मा यावे । सदगुरुसी शरण रिघावे । स्वरुपासी ओळखावे । गुरुकृपा संपादून ॥८१॥

धन्य माझा दिगंबरु । न करिता निर्धारु । मस्तकी ठेवितो अभयकरु । मज पाप्यासी स्वानंदी ॥८२॥

मी अपराधामाजी शिरोमणी । मी केवळ पापाची खाणी । ऐश्यासी निजचरणी । थारा का दिधला तोचि जाणे ॥८३॥

हे चरित्र सहज समाधि । तुंम्ही श्रोते सेविता विशुध्दि । अनन्य भाव तुमचे पादारविंदी । भ्रमर होतसे हनुमदात्मज ॥८४॥

तुम्ही दयाळु पूर्ण । पूर्णकृपा करुन । पुढील कथेचे निरोपण । स्वनंदयुक्त करवावे ॥८५॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसुत्र । तृतीयोध्याय गोड हा ॥८६॥

श्रीगुरुदेव दत्तात्रेय चरणार विन्दार्पर्णमस्तु ॥ श्रीरामजयराम ॥ श्रीरस्तु ॥ ओवी संख्या ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP