श्रीगणेशायनमः ।
जयजय पूर्णानंदा पूर्णब्रह्मा । पूर्णावतारा भक्तकाम कल्पद्रुमा । अगम अगोचर निगमागमा । अप्तकामा सर्वेशा ॥१॥
देहेंद्रियाचा तू चालक । शशि आदित्य प्रकाशक । स्वप्रकाश तू निष्कलंक । नित्यरुपा निरंजना ॥२॥
चौविद्या चौसष्टी कला । त्यासही न कळे तुझी लीला । ऐसा तू निजानंद कल्लोळा । सच्चिदानंदा सर्वसाक्षी ॥३॥
तुज म्हणता सच्चिदानंद । हेही बोलणे दिसे विनोद । शब्दातीत तू अद्वयानंद । आनंदकारका दयाळा ॥४॥
तुझे नाम तो पूर्णानंद । तुज ध्यानी ह्रदयारविंद । त्या भक्ता देसी स्वानंदपद । स्वानंदकंदा श्रीदिगंबरा ॥५॥
चतुर्दश अध्याय अंती । राजमणी स्वामींची गुरुभक्ति । ते ऐकिले सप्रेम चित्ती । कृपा करुन श्रोते तुम्ही ॥६॥
आता पुढील कथेचे अनुसंधान । शिवरामस्वामी केशवस्वामींचे दर्शन । होईल ते स्वानंदे करुन । परिसावेजी कृपा कटाक्षे ॥७॥
कल्याणी असता शिवराम देशिक । इच्छुक प्रभूचे हस्तमस्तक । शरण येती भाविक लोक । अनुग्रह मात्रे ते तरती ॥८॥
आणखी अनेक साधुसंत । जे भगवदभक्त अति विरक्त । तेही ऐकून किर्ती अदभूत । दर्शना येती प्रभूच्या ॥९॥
विजापूराहून येता जाण । गोदूबाई आदि प्रार्थून । करते जाले लग्न । शिवराम प्रभूचे अति हर्षे ॥१०॥
ते तरी केवळ अवतारी । त्यास इच्छा नसे निर्धारी । परंतु लौकिकार्थ परोपरी । चरित्र दाविती स्वानंदे ॥११॥
प्रभूचे करिती दोन लग्न । त्या दोघी भार्यांचे नामाभिधान । ते ऐकावे स्वानंद केतन । ते आदी शक्ती साचार ॥१२॥
स्वानुभूती ती पार्वती । निजशांती ती कावेरी सती । ऐसी दोघी भार्या निश्चिती । प्रभूचे असती प्रसिध्द ॥१३॥
ऐश्या कुटुंबासह वर्तमान । निजकल्याणी असता पूर्ण । ही वार्ता केशवस्वामी ऐकून । दर्शन इच्छिती प्रभूचे ॥१४॥
तरी केशवस्वामी कोठील कोण । त्याचे करितो निरुपण । ते भागानगरीचे राहणार जाण । संतशिरोमणी ज्ञानमूर्ती ॥१५॥
ते केवळ असे व्यापारी । गजांतलक्ष्मी ज्यांचे घरी । केशवपंत ऐसे नामाभिधारी । लोकरुढी पै असे ॥१६॥
ते तानाशा बादशहाचे चाकर । संपूर्ण सैन्याचा अधिपती निर्धार । बादशहा त्याचा करुनी आदर । ठेविला असे निजजवळी ॥१७॥
त्याचे आज्ञानुसार वर्तती सकळ सैन्य । त्याचे वचनी बादशहासी सवा वाहती । प्रपंच करताही ते धन्य । वृत्ती ज्याची निजबोधी ॥१८॥
बहुरुप्याचे परी । ते वर्तती निज संसारी । संसारबाधा तिळभरी । त्यास नसे सर्वस्वी ॥१९॥
ज्याची वृत्ती स्वरुपी बुडे । ज्यासी ब्रह्मानंदीसुख जोडे । त्यास हे संसार बापुडे । होईल काय बाधकत्व ॥२०॥
ज्यासी सर्वाभूती भगवतभाव । निज देहादिकांचा दृश्यभाव । ते मानवी दिसता हे श्री केशव । केशवस्वामी या परीचे ॥२१॥
जयाच्या पद्य रचनेचे घडता श्रवण । अज्ञानाचे होय निरसन । सम्यक होय विज्ञान । ज्ञानघन ते चिन्मूर्ती ॥२२॥
प्रभूचे दर्शनाची इच्छा मनी । परि आपणास जाता नये म्हणूनी । स्वारी आदि सिध्द करुनी । कारकूनास पाठविले कल्याणा ॥२३॥
स्वहस्ते लिहून विनंती पत्रिका । ते देऊन कारकूनाचे हस्तिका । त्यातील वास्तव्य देखा । ते परिसावे मतीतार्थ ॥२४॥
जय जयाजी शिवरामराया । कल्याणकारका कल्याणनिलया । हे मस्तक अर्पावे तवपाया । हे चि इच्छा ममचित्ती ॥२५॥
मीच यावे चरणापासी । परी तो पडलो भवपाशी । यास्तव विज्ञापना सेवेसी । आपणचि कृपया दर्शन देणे ॥२६॥
आपण केवळ कृपाळु । आपण केवळ दयाळु । कवळूनी चरणकमळु । कृतार्थ होईन सर्वस्वे ॥२७॥
जगाचा करावया उध्दारा । यास्तव श्रीप्रभूचा अवतार । कृपा करुनी येऊन मम मंदिरा । पवित्र करावे जी गुरुवर्या ॥२८॥
कृपा पूर्वक येऊन । जरी कराल श्रीचरण दर्शन । तरी प्रपंची जीवन होईल धन्य । कृपा वरिय श्रीचरणे ॥२९॥
आपुले चरणाचे दर्शन घडे । स्वानंद सुखांशी परमार्थ रोकडे । अज्ञानाचे धुल्लारा उडे । ऐसे पवाडे प्रभूपायी ॥३०॥
ऐसे अनेक विनययुक्त वचन । पत्रिकेत करोन लेखन । पाठविते जाले कल्याणास जाण । अति सप्रेमे त्याकाळी ॥३१॥
साधूची पाहूनी प्रेमपत्रिका । विज्ञानघनी प्रभू समर्थ देखा । स्वानंदयुक्त उकलोनि पत्रिका । पाहते जाले ते वेळी ॥३२॥
परिसता लेखनातील वर्तमान । आनंदले प्रभूचे निज अंतःकरण । कारकूनही आज्ञा वचन । प्रसन्नपणी आज्ञापिती ॥३३॥
मग कांही एक लोटता दिन । कारकूनाच्या विनंती वरुन । सिध्द करुनी प्रयाण । निघते झाले स्वलीळी ॥३४॥
पूजा घेत ग्रामोग्रामी । निघाले श्रीशिवराम स्वामी । ही वार्ता ऐकता केशवस्वामी । सामारोही धावती सप्रेमे ॥३५॥
स्वामी आले याचे वर्तमान । बादशहाप्रती श्रुत करुन । समागमे संपूर्ण सैन्य घेऊन । सामोरा धावती प्रभूच्या ॥३६॥
स्वामीस सुखासनी बैसऊन । आपण पायी चालतसे सैन्य घेऊन । फार उत्साहे मिरवित नेले जाण । आणते झाले निजघरा ॥३७॥
स्वामी आलियाचे सुख । त्यास ब्रह्मांडी न माये देख । प्रभूचे पायी ठेऊनी निजमस्तक । वारंवार समुखा न्याहाळितसे ॥३८॥
प्रभूचे मुख न्याहाळिता वेळी । ब्रह्मानंदे त्याची चित्तवृत्ती मुरली । बोल बोलासी विसर पडली । अबोल स्थितीत विराले ॥३९॥
मनी म्हणतसे या जगी मी धन्य । माझे प्रारब्ध नोहे सामान्य । अमूर्त जे प्रत्यक्ष चैतन्य । त्या म्या पाहिले मूर्तिमंत ॥४०॥
ही द्वादश वर्षाचे मूर्ती । अगाध असे याची किर्ती । याचे दर्शनमात्रे ब्रह्मानंद स्फूर्ती । संपूर्ण होतसे सहज मज ॥४१॥
या मूर्तीची सावळी आकृती । पाहता माझे धणी न पुरती । धन्य माय याची त्रिजगती । ऐसा पुत्र प्रसवली ॥४२॥
हे तरी दिसे मानवी वेषे । परि मानवी नव्हे साक्षात जगदीशे । जे स्वयंज्योति स्वप्रकाशे । तोची मूर्तीमंत अवतरले ॥४३॥
ऐसा विचार करुनी मनी । वारंवार अवलोकिती मुख तरणी । सप्रेम मिठी चरणी घालुनी । स्तवन करिती परोपरी ॥४४॥
आपण साक्षात चंद्रमौळी । अवतरुनी या भूतळी । कृपा कटाक्षे भाविक मंडळी । सहज उध्दरिसी प्रभूराया ॥४५॥
माझे जन्मांतरीचे सुकृत अमुप । आज जालेसे फलद्रुप । तरीच पाहिले हे स्वरुप । सच्चिदानंद अद्वये ॥४६॥
आपण निर्गुण निराकार । दिसत असता साकार । करावया जगाचा उध्दार । अमूर्त पूर्ण अवतरले ॥४७॥
आपणास पाहता दृष्टी । पूर्णानंदी दाटली वृत्ती । भेदभावाची जाली ताटातुटी । पुष्टी चढली निजसुखाशी ॥४८॥
निजसुखाचे ते सुख । निज विश्रांतीचे विश्रांती देख । कल्याणकारी भाविक लोक । कल्याण कारका कल्याणार्णवा ॥४९॥
यापरि ऐकता पंताचे स्तोत्र । प्रभू देतसे प्रत्युत्तर । तुम्ही असता वाचे परता परात्पर । हे वक्तृत्व कुसरी तुम्हा काये ॥५०॥
तुजमज माजी तूचि पूर्ण । सबाह्य असता परिपूर्ण । हे का मांडिले स्वस्ति वाचन । स्वानंदकंदा ज्ञानमूर्ति ॥५१॥
तुज म्हणता ज्ञानसंपन्न । तुझे वयी नसता ज्ञानाज्ञान । ज्ञान विज्ञानातीत तू चिदघन । चिन्मयरुपा सर्वात्मा ॥५२॥
तू असता अद्वयानंद । कांहीच नसे तुजमज भेद । हे का मांडिले स्तवनी विनोद । हेची नवल पै दिसती ॥५३॥
यापरी प्रभूचे प्रबोध वचन । पंताचे श्रवणी पडताच जाण । प्रभुचरणी मिठी घालुन । स्वानंद लुटती सर्वस्वे ॥५४॥
त्या एकमेका पडता मिठी । ब्रह्मानंदी दाटली स्वरुप सृष्टी । भेदाभेदाची झाली तुटी । अद्वयसागरी बुडती पै ॥५५॥
दोघे सेविती समाधीसुख । दोघे डोलती अती हरिख । त्या उभयतांची स्थिती पाहता देख । लोकास आश्चर्य पै वाटे ॥५६॥
लोकास पाहता दिसती दोघे । दिसे सांब किंवा श्रीरंगे । जे भक्तवत्सल भवभंगे । मानवी रुपी विराजती ॥५७॥
मानवी दिसताहे त्यांचे शरीर । ते मानवी नव्हे साचार । करावया जगदोध्दार । मानवीरुपी अवतरले ॥५८॥
एकास सोडूनी एक । वेगळे न राहती क्षणभरी देख । ते उभयता अद्वयचि सम्यक । मूर्ती पाहता भेद न दिसे ॥५९॥
ऐसे तेथील आनंद । संपूर्ण ग्रासले भेदाभेद । उभयता सेविती अद्वयानंद । अद्वय सिंधुच ते दोघे ॥६०॥
ते एकमेकांचे घालुनी अंकित । करते जाले कवित्व निश्चित । ती पद्यरचना ऐकता साधुसंत । स्वानंद लुटति लुटताती आनंदे ॥६१॥
प्रभूचे सेवेसी पंत तत्पर । होऊन राहता साचार । विसरले पूर्ण राजद्वार । कारभार त्याना मग कैचा ॥६२॥
ऐसे होता दोन चार दिन । बादशहा पुसतसे इतरासी प्रश्न । केशवपंत दरबारी जाण । नये याचे कारण काय असे ॥६३॥
लोक बोलती बोलणार । त्यांचे घरी आले साधु महाथोर । यास्तव त्यांचे येणे निर्धार । सहज जाले नसतील ॥६४॥
साधु म्हणजे काय । बादशहा ऐसे पुसतो निश्चय । लोक म्हणती ते अवलिया होय । अवलियास म्हणती साधुपुरुष ॥६५॥
परंतु न पुसे परिचारका लागुन । ते अवलिया कोठील कोण । वर्तमान हे संपूर्ण । पुसून यावे पंतास ॥६६॥
पंत सांगती सविस्तर । बादशहा म्हणे त्या साधुस येथवर । मी पाहीन निर्धार । आणा आमुच्या घरासी ॥६७॥
ही वार्ता यथावत । दिल्हे असे साधुसंत । त्या संताचे ऐक्यनाम निश्चित । हुसेनशावली प्रसिध्द ॥६८॥
ते कथा वर्णावी सविस्तर । तरी ग्रंथ वाढेल निर्धार । यास्तव न करिता विस्तार । मतीतार्थ मी बोलिलो ॥६९॥
ते बादशहा असे अति विरक्त । साधु सेवेसी अति आसक्त । प्रभु दर्शनाचे करुनी निमित्त । पंतास बोलिती अत्यादरे ॥७०॥
पंत बोले बादशहा लागोन । त्यास काही इच्छा नसे जाण । ते पूर्णानंद चिदघन । सर्वथा दर्शना न येनी ॥७१॥
ऐकता ऐसे निर्वाण वचन । बादशहा आपण सिध्द होऊन । पंताचे घरास येऊन । चरणी लागतो प्रभूच्या ॥७२॥
तेव्हा रत्नखचित अलंकार । एक सहस्त्र होन आणि मोहोर । नाना प्रकारचे वस्त्र । प्रभ पुढती समर्पिती ॥७३॥
कल्याणाचे दहा गाव । जागीर देतो प्रभूस्तव । ऐसे म्हणता शिवराव । बोले काय त्यालागी ॥७४॥
तू आम्हा देशी जागीर । तरी ती गावे असे धर्तीवर । आमुचे जागीर चराचर । नेमिलासे श्रीहरीनी ॥७५॥
तुमचे जागीरासी असे अदि अंती । आमचे जागीरीस नाश नसे कल्पांती । ती आज अव्यय आम्हां प्रती । जागीर नेमिले श्रीसदगुरुनी ॥७६॥
आम्ही केवळ फकीर लोक । आमुचे जागीर भिक्षा प्रमुख । त्याविना कांही आणिक । आम्हासी नसे जी बादशहा ॥७७॥
ऐसे ऐकता वचन उदास । आश्चर्य वाटले बादशहास । पुनरपि वंदूनी प्रभूस । जाता जाला स्वस्थळी ॥७८॥
कांही एक दिवस होता जाण । प्रभू निघाले तेथून । तेव्हा केशवस्वामी आपण । देतसे प्रभूसी द्रव्य अपार ॥७९॥
सुवर्ण -रुप्याची उपकरणे । घडूऊन देतसे नूतने । वस्तुवहाया चार उष्ट्र पूर्णे । देते जाले समागमी ॥८०॥
अमुल्य वस्त्रा भरण । अर्पूनी प्रभूचे चरण । जाते समयी लोटांगण । वारंवार करीतसे ते पंत ॥८१॥
धन्य ही भगवंताची जोडी । अगाध त्यांची लीला परखडी । वियोग त्यांचा कधिच न पडी । ते उभयता नित्य एक स्वरुपी ॥८२॥
एक मजलपर्यंत । येतसे प्रभूसी बोळवत । आपुले सैन्यासहित । वंदुन जातसे माघारी ॥८३॥
ऐसे वर्ष दोन वर्षास । प्रभूस बोलावून आणिती हर्ष । लीला करिती चिद्विलास । ते उभयताही आनंदे ॥८४॥
भागानगरीहुनी येऊन । वंदिले पूर्णानंद चरण । लक्ष्मीसही वंदिता जाण । हर्षायमान पै होती ॥८५॥
यापरी लीला विशेष । दाविती हे अवतारी पुरुष । धन्यधन्य त्याच्या मातेस । ऐसा पुत्र प्रसवली ॥८६॥
ऐसे कल्याणी रहात असता । एक पत्र आले अवचिता । ते पत्र कोणाचे तत्वता । ते परिसावे सप्रेमे ॥८७॥
निगडीकर रंगनाथ । ते श्रीरंगची मूर्तिमंत । ज्ञान ज्याचे अत्यादभूत । संतराज शिरोमणी ॥८८॥
ते सहज पूर्ण निजानंद स्वामींचे वरिय । शिवरामाच्या भेटीची इच्छा होय । भक्ताकरे धाडिले आमंत्रण निश्चय । अतीव प्रेम आमोदी ॥८९॥
त्यांची आमंत्रण पत्र येताच जाण । प्रभूही पूर्णानंदास प्रार्थून । सिध्द केले प्रयाण । रंगनाथाच्या दर्शनार्थी ॥९०॥
रंगनाथ स्वामी पूर्णाधिकारी । निजानंदांचे अभयकर ज्यांचे शिरी । त्यांची पद्यरचना ऐकता निर्धारी । ज्ञान होय अपरोक्ष ॥९१॥
ते केवळ ज्ञानसिंधु । त्यांचे स्मरणमात्रे हरे भवबंधु । ज्यांचे कवित्व ऐकता ब्रह्मानंदु । सहजी सहज होतसे ॥९२॥
ऐसे ते संतशिरोमणी । ब्रह्मनिष्ठेची चिदरत्नखाणी । त्यांची पत्रिका येताक्षणी । सिध्द जाले जावया ॥९३॥
संत दर्शनाचा लाभ परम । जाणोनि ऐसे लोकोत्तम । निघती त्वरित प्रभु समागम । सप्रेमयुक्त ते काळी ॥९४॥
पंचशतादी भक्तगण अनेक । तया विधिचे परिचारक । समागमे प्रभूच्या देख । असती सदानंद सांप्रदायी ॥९५॥
समागमे भारवाही पांच उष्ट्र । सदैव असती निरंतर । इतुकेही वैभव असता निर्धार । वृत्ती ज्यांची लीन निजबोधी ॥९६॥
असता इतुके वैभवयुक्त । ते आंतरी केवळ अतिविरक्त । कोण्याही विषयी नसे आसक्त । अनासक्त भिक्षावृत्ती ॥९७॥
ऐसे समुदायासह वर्तमान । निगडी ग्रमासी येऊन । ग्रामाबाहेरील शुध्द उपवन । राहते जाले त्याकाळी ॥९८॥
उपवनी करुन भोजना । मग जावे साधुदर्शना । ऐसे मनी करुनी योजना । राहाते झाले उपवनी ॥९९॥
भोजन होताची जाणा । मंचकी पहुडले सहजपणा । सत्छिष्य लक्षुनी गुरुचरणा । पाय चुरिती भक्तगणी ॥१००॥
प्रभू आले उपवनी । ही वार्ता पडली साधुश्रवणी । लगबगीनि निघाले तेच क्षणी । गुरुबंधुच्या दर्शनार्थी ॥१०१॥
साधु येताच उपवनी । वैभव त्यांचे पाहती नयनी । विस्मित होतसे अंतःकरणी । हे काय वैभव गुरुसेवका ॥१०२॥
ज्यांचे पद्यार्थ ऐकता हरिख । अज्ञानास ज्ञान होतसे देख । ते पद्यार्थ केवळ वैराग्य कारक । तरी हे वैभव केवी साजे ॥१०३॥
ज्याचे कीर्तनी डुलतसे श्रीरंग । ज्याचे कीर्तनी होतसे भवभंग । ज्याचे कीर्तनी भक्तितरंग । उठतसे लहरी प्रेमभरी ॥१०४॥
हे तो केवळ प्रेममूर्ती । अगाध असे ज्याची कीर्ती । तरी यास हे वैभव न शोभे निश्चिती । कदाकाळी साजेना ॥१०५॥
जैसे बोले तैंसेचि चाले । हेची साधुजनाचे भूषण वहिले । याविणा संग्रह व्यर्थ वाहिले । फोल जीवन दिसतसे ॥१०६॥
यापरी कल्पना करुनी मनी । ते साधु सेवाभावी निज अंतःकर्णी । काय केले ते उपवनी । ते ऐकावे सज्जन हो ॥१०७॥
त्याचे वैभव पाहुनी वरपांग । साधू कोपूनी सर्वांग । प्रभू जवळी येऊन लागवेग । लत्ताप्रहार करीतसे ॥१०८॥
ह्रदयी पडता साधुचे पाय । काय केले ते प्रभूवर्य । निजह्रदयी कवळूनी ते पाय । सप्रेम करितसे पद्यरचना ॥१०९॥
त्या पदाचा गर्भीतार्थ । बोलितो मी यथावत । ते ऐकताची शुध्दजीवन उदित । सप्रेमे गुरुबोध संवाही ॥११०॥
धन्य दिवस आज वर्णूकाय । देखिले म्या साधूचे पाय । ते पाहिल्याने सुख न समाय । ब्रह्मांडगर्भी ठायांशी ॥१११॥
आळशावरी जेवी गंगा । निजछंद वाहे त्रितापभंगा । तेवी तुमचे दर्शन पै गा । उध्दरती जगास सत्यत्वी ॥११२॥
सर्व मंगळ आज जाले । सकळवृत पर्व आम्हा घडले । सार्ध कोटी त्रयतीर्थ फळ लाधले । पातक माझे हरले सर्व ॥११३॥
ऐका शिवराम बोला । पूर्णहरि रंगे डोला । यापरि उभयतांचे जीवन अभंगा । अंकित घालुनी पद बोलतसे ॥११४॥
मुखी चालीलेसे कवित्व लहर । सर्वांग सुटलासे प्रेम पाझर । नयनी चालिलासे स्वानंद नीर । प्रभूरायासी ते काळी ॥११५॥
रंगनाथाचा क्रोध तात्काळी । प्रभूच्या गुरुभक्तित मुरली । देहाहंकृतीही समूळ ग्रासिली । सहजानंदी सर्वस्वे ॥११६॥
सहजानंदी हरवली चित्तवृत्ती । लत्ता प्रहाराची नांही खंती । अगाध असे प्रभूची ख्याती । शांति ज्याची उभरोनि वाहे ॥११७॥
पूर्ण प्रशांत सिंधु । बंध विदारक दीनबंधु । पूर्णानंद दायक स्वानंदकंदु । प्रभू माझा शिवराम ॥११८॥
या शिवरामाचे नामस्मरण । अखंड घडो मज पामरा लागोन । स्मरणमात्र भवबंधन । हरेल माझे सर्वस्वी ॥११९॥
हिच प्रार्थना वेळोवेळी । करितसे मी गुरुचरण कमळी । गुरु तो साक्षात चंद्रमौळी । स्वामी माझा दिगंबरु ॥१२०॥
असो प्रभूस पाहता सप्रेमयुक्त । रंगनाथ विचार करी निजमनात । मी लत्ताप्रहार करिताही निश्चित । मनी खेद काही नसेची ॥१२१॥
यांचा इतर पाहता वैभव । मजला मनी जाहला क्रोध असंभव । आंतरंग नेणता दुस्वभाव । अयोग्य करणी मी केली ॥१२२॥
सर्वत्र देखती निर्धार । म्या केला लत्ताप्रहार । त्याचे काही क्रोधांकुर । ज्यांच्या आंतरी नसेची ॥१२३॥
अगाध असे याची शांती । अगाध याची स्थिती । अगाध याची किर्ती । हे अवतार पुरुष भूतळी ॥१२४॥
ज्यास श्री रुक्मिणीवर । प्रसाद दिधले सुमनहार । हे ऐकत असताही निर्धार । विषम परीक्षा केली मी ॥१२५॥
रुक्मीणीपंता सारखे । ज्याचे कीर्तनी हरिखे । सप्रेम डुलत असती देखे । जाणोनही दुमार्गा करणी केली मी ॥१२६॥
हे पूर्णानंद समुद्रीचे दिव्यरत्न । हे द्वय वैराग नगरीचे अमृतपूर्ण । हे माझे स्वसुखाचे परम निदान जाण । सुखमयचि निर्मळ प्रेममूर्ती ॥१२७॥
याचे कवित्व पुष्पवल्लीचे परिमळ । फाकले असे भूमंडळ । त्या आमोदे संतमंडळ । गुंजारव करिती स्वानंदे ॥१२८॥
हे ऐसे संतशिरोमणी । यांची महिमा कोण वाखाणी । प्रत्यक्ष शंकरचि या जनी । जग तारणास्तव अवतरले ॥१२९॥
यांचे नाव असे शिवराम । याचे नामी हरे भ्रम । हे तो केवळ कैवल्यधाम । धन्य माझा गुरुबंधु ॥१३०॥
याचे पाहुन वैभव थोर । मी कांहीच न करिता विचार । यास केलो लत्ताप्रहार । हे काय संभ्रम मजला पडले असे ॥१३१॥
ऐसे अनुताप युक्त मनी । प्रभूसी आलिंगिले कवळुनी । प्रेमोदकेने अभिषेक करुनी । बोले काय त्या काळी ॥१३२॥
जय जयाजी शिवरामराया । कल्याणवासिया कल्याण निलया । तुमची महिमा नेणोनिया । ऐसी कृती मी केली ॥१३३॥
ज्यासी पूजावे अतिआदरे । ज्याचे गुण वर्णावे सादर । ते टाकोनि मी केला लत्ताप्रहारे । हा अपराध क्षमा पै कीजे ॥१३४॥
यापरि रंगनाथाची वचनमाला । सप्रेमयुक्त पडली प्रभुच्या गळा । बोले काय तो स्वानंद पुतळा । ते परिसावे अत्यादरे ॥१३५॥
जय जयाजी रंगनाथा । आपुले अभयकर असो माझा माथा । आपले दर्शनमात्रे मी कृतार्थता । सहज पावलो या लोकी ॥१३६॥
मी तो केवळ पापराशी । मी तो केवळ आळशी । चरणस्पर्श घडता देहासी । सहज पवित्र मी जाहलो ॥१३७॥
काय वर्णावे पहा वैभव । ते पाय नव्हे स्वस्वरुपाचे साठव । ते आठवही ग्रासुन सर्वस्व । स्वरुपीच रमविले मजलागी ॥१३८॥
यापरी स्वामींची पहा महिमा । अगम्य अगोचर निगमागमा । सहज वंदिती निजधामा । नेसी दयाळा ज्ञानसिंधू ॥१३९॥
आपुले दर्शनाची इच्छा हरिख । सदा करिती ब्रह्मादिक । त्यासही दुर्लभ देख । ते पाय पाहिलो सर्वस्वे ॥१४०॥
जन्मजन्मांतरीचे सुकृत सकळ । मजला प्राप्त झाले सफळ । तरीच पाहिलो ही चरणकमळ । अलभ्य लाभ मज जाले ॥१४१॥
आपुले पायी सकळ तीर्थ । आपुले पायी परमार्थ । आपुले दर्शनी कृतार्थ । ऐसे वदती वेदचारी ॥१४२॥
चौवेदास नकळे तव महिमा । सप्रेम कवळून तव पादपद्मा । कृतार्थ जालो मी शिवरामा । ज्ञानसागरा रंगमूर्ती ॥१४३॥
यापरी प्रभूचे वचन तरंग । रंगनाथास चढता सर्वांग । सप्रेमयुक्त निजांग । भेटते जाले प्रभूसी ॥१४४॥
ऐसे एकमेका पडली मिठी । भेदजळाची जाली आटी । उभयता अद्वयानंदासी लुटी । परमानंदी निमग्न एकपणे ॥१४५॥
उभयताचे नेत्रद्वारा । चालील्या प्रेमांबुधारा । त्यांच्या दर्शनमात्रे येरझारा । तुटेल सर्व लोकांचे ॥१४६॥
उभयता एकमेका धरुनी हात । सकळ समुदाया समवेत । येते जाले नगरात । हर्षयुक्त ते काळी ॥१४७॥
प्रभु आले निगडी ग्रामी । ही वार्ता फाकली ग्रामोग्रामी । भाविक लोक प्रभूपादपद्मी । शरण येती सप्रेमे ॥१४८॥
त्या देशाचे फार लोक । प्रभूचे घडती हस्तमस्तक । सहज चुकविती पथ देख । जन्म मरणाचे सर्वस्वे ॥१४९॥
यापरी एकमेकासी । त्या ग्रामी राहिले अतिहर्षी । ते उभयताही चिद्विलासी । सहजानंदी तरंगती ॥१५०॥
ते उभयतांची सुगमसुख । ते अवलोकिती भाविक लोक । त्यासही प्राप्त असे परलोक । संतसंग महिमा यापरी ॥१५१॥
नगर जनाचे हे सार्थक । साधुसंताचे व्हावे पाईक । स्वर्गीचेही सकळ लोक । दर्शन इच्छिती साधूंचे ॥१५२॥
साधू समागमा समान । कलियुगी नसे आन साधन । त्यांचे संग करिता जाण । सहजानंदसुख पावे ॥१५३॥
असो रंगनाथस्वामी । आहेर अर्पिती सप्रेमी । स्वानंदे पुसनी शिवराम स्वामी । निघते जाले ते काळी ॥१५४॥
चौ कोसा पर्यंत । रंगनाथ आले बोळवित । ते उभयतांचे प्रेम अदभूत । संतराज शिरोमणी ॥१५५॥
यापरी रंगनाथांचे घेऊन दर्शन । परतुन आले कल्याण पट्टण । पूर्णानंदांचे वंदून चरण । राहते जाहले अतिहर्षे ॥१५६॥
कल्याणी असे सदानंद । कल्याणी विराजे सहजानंद । यास्तव महाराज पूर्णानंद । कल्याणी राहिले प्रभूसहित ॥१५७॥
कल्याण ते गुरुक्षेत्र । सकळ क्षेत्रामाजी पवित्र । ब्रह्मानंद आज्ञा करिती निर्धार । हा काळ पावेतो पै राहिले ॥१५८॥
ब्रह्मानंदांचे राहणे काशीस । कल्याण पूर्णानंदांचे गुरुक्षेत्र कैस । तरी या आक्षेपाचे उत्तर सुरस । पुढील प्रसंगी अवधारा ॥१५९॥
हे ग्रंथ संतांचे माहेर । येथे वसे पूर्णानंद शिवरामेश्वर । श्रवणद्वारे जे भेटती अत्यादर । पूर्णानंद प्राप्ती तयालागी ॥१६०॥
सहजानंद दिगंबरस्वामी । माझे मस्तक पडो त्याचे पादपद्मी । हनुमदात्मजास तुम्ही । हेच वर द्यावे संतश्रोते ॥१६१॥
इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । पंचदशोध्याय गोड हा ॥१६२॥
श्रीपूर्णानंद शिवरामार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥