श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय चौथा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगुरु दक्षिणामूर्तयेनमः । जयजय पूर्णानंदा सर्वेशा । दत्तत्रेयरुपी श्रीजगन्निवासा । सदानंदा चिद्विलासा । ह्रदयाभिरामा अखिलेश अमळा ॥१॥

जयजय सदगुरु गुणगंभीरा । ब्रह्मानंद सौख्य समुद्रा । सदानंदा कल्याण विहारा । कल्याण कारका जगदगुरु ॥२॥

पूर्णब्रह्मा पूर्णअवतारा । नारायणा निर्विकारा । निज जनमानस चकोरचंद्रा । आनंदकंदा पूर्णनंदा ॥३॥

जय शिवमनाभिराम शिवरामा । चित्तचालका भक्तकाम कल्पद्रुमा । निजयोगीजन मनविश्रामा । राजयोगातीता श्रीरामा ॥४॥

ह्रदयांकुर चिद्विलासा स्वयंमेवा । सच्चिदानंदा श्रीकेशवा । तूं सकळ देवतांचे होसी अवतार ठेवा । सहजानंदा दिगंबरा ॥५॥

जे शरण येती तुझिया पदी । तयांची निवारुनि आधीव्याधी । सुखे देसी सहज समाधी । पूर्णानंदा परात्परा ॥६॥

तुझी कृपा जरी घडे । पांगुळ मेरुशिखरी चढे । मुका शास्त्रपढे । ऐसे पवाडे गुरुवर्या ॥७॥

आता तुझे चरित्राचे कथन । पुढे करवावे संपूर्ण । पूर्णानंद स्वानंदघन । वाचाचालका करुणार्णवा ॥८॥

तृतीय अध्यायी देखा । पूर्णानंद सेवितसे समाधीसुखा । आता सावध करिती श्रीदेशिका । स्वानंद स्तवन करतील ॥९॥

ते परिसिजे कृपाकरुन । कृपा सागरचि श्रोते आपण । आपण दयाळु पूर्ण । स्वानंद चित्ते अवधानिजे ॥१०॥

पाहुनि पूर्णानंदाचा समाधि सोहळा । ब्रह्मानंद बोले अरे स्वानंद पुतळा । सावध होई स्नेहाळा । नेत्र उघडी सत्वर ॥११॥

ऐसे म्हणता सदगुरुमाय । नेत्र उघडिले शिष्य चिन्मय । वंदुनि श्रीगुरुंचे पाय । वारंवार विनवितसे ॥१२॥

जयजय श्रीसदगुरुराया । दत्तात्रेयरुपा चिन्मया । सदानंद स्वानंद निलया । स्वानंदकंदा जगदगुरु ॥१३॥

ह्रदयविरामा अखिलेश अमळा । गुणगंभीर चिदघन पुतळा । ब्रह्मानंदा परम मंगळा । मंगलदायका तुज नमो ॥१४॥

सहजानंद कल्याण कारका । पूर्णानंदा चित्तचालका । ब्रह्मानंदा ब्रह्मांडनायका । अंतरात्मा तुज नमो ॥१५॥

तुझीया चरणावरुन । जिवीचे करावे लिंबलोण । तरी जीवशिव ऐसे बोलणे । उरले नाही तव पायी ॥१६॥

पायी दीधला सहज थारा । चुकविल्या माझ्या येरझारा । बैसविलेती स्वानंद मंदिरा । कृपा करुनि निज बोधिये ॥१७॥

अभिनव स्वामीची पादमहिमा । आगम्य अगोचर निरुपमा । दिनासी दाखवुनि निजधामा । स्वानंद सागरी बुडविले ॥१८॥

आता आपुल्या उपकारा । उत्तीर्ण केवी होऊ दातारा । चित्तचालका सदगुरु माहेरा । तुझी महिमा तूचि जाणे ॥१९॥

आपण नित्यरुपी सुवर्ण । मी केवळ अनित्य नग जाण । नगाचेनि नामरुप हरुन । सुवर्णी चिती मज त्वा केले ॥२०॥

आपण स्वानंदबोध समुद्र । मी उदभवल्यात्मक त्यात लहरा । उडवुनी उपाधिवारा । समुद्रचि केले स्वामिया ॥२१॥

कळल्या सत्य चिन्मय दोर । त्यासी केवी मानु विखार । तुटल्या भुतादि विकार । चिन्मात्रमीचि का न म्हणू ॥२२॥

निरखुन स्वधिष्ठान स्थाणु । तस्कर त्यासी केवी म्हणू । संपूर्ण सन्मात्र असे जाणु । जाणपण म्हणे ही न साहे ॥२३॥

साह्य असता आपुले पाय । केवळ चिदानंद चिन्मय । आंम्हा कळिकाळाचे भय । काय आहे स्वामीया ॥२४॥

स्वामींचे नेणो पादमहात्म्य । नमनी सरिसे हरिले भ्रम । भ्रम म्हणावयाचेही विभ्रम । जिरोनि गेले निजउगमी ॥२५॥

उगमी जिरता मी पण । राहील सहज तूं तूझे एकलेपण । मी तू पणाविण जाण । निजरुपी मीठी मज पडली ॥२६॥

पडता निजरुप मीठी । तुटली चिदचिद गाठी । दाटली ब्रह्मांत्म सृष्टी । आटले समूळ भवजळ ॥२७॥

आटता समूळ भवजळ । भरला संपूर्ण चिज्जळ । न दिसे कांही काळवेळ । स्वानंद बोधातळी समरसे ॥२८॥

स्वामी आता हेचि द्यावे । ग्रासुनि सर्व देहाहंभावे । स्वरुप होऊनि स्वरुपीच राहावे । आपुली कृपा कटाक्ष ॥२९॥

ऐसे ऐकता स्वानंदस्तवन । स्वामी होऊनि हर्षायमान । आलिंगुनी शिष्यालागुन । बोलिले काय ते ऐका ॥३०॥

अरे बाळा पूर्णानंद पुतळा । काय वर्णू तुझीये भाग्याला । तुचि भोगिसी स्वानंद सोहळा । निजानंदा निजतान्हया ॥३१॥

पूर्णानंद ऐसे नामाभिधान । स्वामीनी ठेविले निजकृपेने । तधिपासून पूर्णानंद नाम जाण । प्रसिध्द जाले याजगी ॥३२॥

आता कांही जीवीचे गुज । ऐक सांगतो म्या तुज । निजबोधी असता सहज । इंद्रिय व्यवहारा तूं करी ॥३३॥

नटानी अनेक सोंग धरिता । न भुले आपणासी सर्वथा । तेवी निजसमाधी न मोडिता । सहज व्यवहार होतसे ॥३४॥

कनकाचे होता भूषण । कांहीच न मोडे सुवर्णपण । तेवी गुणधर्मी वर्तती जाण । न पडे न्यून निजस्थिती ॥३५॥

पुढे तुमचेनि मिसे । उध्दार होणे जगा असे । भविष्यही जाणून ऐसे । सांगणे प्राप्त मजलागी ॥३६॥

ऐसे बोलता सदगुरुरावो । त्यास दाटला सात्विक भावो । स्तंभ खेदादि स्वभावो । प्रेमाश्रु भरले त्याकाळी ॥३७॥

मस्तक ठेविले चरण कमळी । प्रेमोदकेने अभिषेकिली । उभे राहिले बध्दांजुळी । आज्ञा प्रभूची ममशिरी ॥३८॥

याप्रकारे करिता विज्ञापना । सांडुन संपूर्ण कल्पना । राहाते जाहले सन्निधाना । स्वानंद सेवा करितची ॥३९॥

दीक्षित स्वामीचे आज्ञेवरुन । जाऊन आले गोकूळ वृंदावन । राहून षण्मास त्याच पट्टण । स्वामीस काय विज्ञापीति ॥४०॥

आज्ञा झालिया स्वदेश । जाण्याचा करितो उद्देश । स्वामी बोलिले काय त्यास । ते ऐकावे स्वानंदे ॥४१॥

आपण करावे प्रयाण । समागमे न न्यावे नारायण । संपूर्ण जाले पाहिजे अध्ययन । यास्तव येथे ठेविजे ॥४२॥

वेदांतह्रदयी यथावत । पूर्णबिंबी परिपूर्त । विज्ञानातीत गुरुपदांत । न साधेल अवस्थांशी ॥४३॥

ऐकता ऐसे स्वामींचे वचन । दीक्षित पुसे पुत्रा लागून । महाराजांची आज्ञा या प्रमाण । तुमचे मनोगत सांगावे ॥४४॥

पूर्णानंद बोले पित्यासी । आम्हासी राहणे स्वामीपाशी । यावाचुनी माझे मनासी । कांहीच सुख वाटेना ॥४५॥

महाराजांचे चरण सोडून । कदापि न निघे येथून । आपण करावे प्रयाण । देशाकडे सत्वर ॥४६॥

पुत्राचा पाहुनि निग्रह । दीक्षित कांहीच न करी आग्रह । तेथुन निघाले अतिशीघ्र । येऊनि पोचले स्वग्रामा ॥४७॥

भेटुनी बंधुसी जाण । सांगितले सकळ वर्तमान । उरकून समाराधन । प्रयाण केले सुनेकडे ॥४८॥

येऊन तेव्हां उंबळास । संपूर्ण वर्तमान बोलती त्यास । सांगतात तेथील लोकास । हर्ष न माये निजचित्ती ॥४९॥

दीक्षित बोले ग्रहस्थास । प्राप्त जाहली अनायास । हा रमला सदानन्द चरणास । ब्रह्मानंद गुरुचे दयेने ॥५०॥

ब्रह्मानंद अवतारी पूर्ण । त्याचे घडता चरण दर्शन । पूर्णानंद नाम । नारायणासी तारिले ॥५१॥

तुमचे जा माता समान । कोणी न दिसे ब्राह्मण । वेद आणि षडदर्शन । पारंगत जयासी ॥५२॥

ज्ञानी जेवी याज्ञवल्की । बुध्दिस पहावे ब्रहस्पतीच की । वैराग्य बळे सदासुखी । स्थिती त्याची काय वर्णू ॥५३॥

किती म्हणून वर्णावे गुण । भेटी अंती वानाल आपण । आमुचे कुळी ध्वजापूर्ण । लाविली त्यानी निज दैवे ॥५४॥

ऐकताच ऐसी सुखवार्ता । आनंद न समाये त्या ग्रहस्था । लक्ष्मी आणि तिची माता । आनंद सागरी बुडाली ॥५५॥

ग्रहस्थ म्हणे हो दीक्षिता । ऐकताच याचे वर्तमानता । आमुचे नेत्र फुटताती आता । केव्हा पाहीन या डोळा ॥५६॥

येरु म्हणे श्रीगुरुची आज्ञा । तेच प्रमाण त्यासी सूज्ञा । त्याच्या आज्ञेस अवज्ञा । कदा काळी करेचिना ॥५७॥

वेदांत होताच साचार । इकडे येईल सत्वर । त्या व्यतिरिक्त निर्धार । तो काही न येची ॥५८॥

त्या वेदांताचेही ग्राह्यास । काहीच नाही सायास । परंतु श्रीगुरुंचे आज्ञेस । वाट पहात राहिला ॥५९॥

या प्रकारे बोलुनि त्यासी । परतुन गेले ग्रामासी । वार्धक्यही त्यासी । प्राप्त झाले त्याकाळी ॥६०॥

कांही एक दिवस लोटता जाण । गमन केले वैकुंठ भुवन । त्याची स्त्री जानकी नाम जाण । तीही सहगमन पै केले ॥६१॥

हे आद्यंत वास्तव्य । नारायणास लिहिले पितृव्य । त्यांनी त्याचे सकळ कर्तव्य । गयेमाजी उरकिले ॥६२॥

नारायण विचारी मानसी । आता जावे स्वदेशासी । तरी गळा पडेल मज फाशी । संसाराचे मजलागी ॥६३॥

या संसार पाशातुन । काढीत असता श्रीगुरु आपण । पुनरपि तिकडे जाऊन । कोण दुःख भोगावे ॥६४॥

श्रीगुरुचे चरणास विन्मुख । होता केवी घडेल हे सुख । त्याचे चरणा वाचून हरिख । दुसरे कांही दिसेना ॥६५॥

पूर्वीचे अनेक भगवदभक्त । पूर्णज्ञानी सदा विरक्त । श्रीगुरुभजना व्यतिरिक्त । निजपदासी नाही चालले ॥६६॥

ऐसे विचारुनी चित्ती । स्वामीस काय करी विनंती । मातापिता जाले विश्रांती । आंम्ही निश्चिंत पै जालो ॥६७॥

आता स्वदेशाकडे प्रयाण । करण्याचे नाही कारण । आपुले चरणीच राहीन । त्याविना दुसरे नसेचि ॥६८॥

स्वामी बोले त्यजला । आणखी कोणीही आहे तुजला । येरु म्हणे कोण्हीच मजला । नाही देशा माझारी ॥६९॥

गुरुस बोलता वचन असत्य । परम प्रमादच सत्य । परंतु प्रपंच अनित्य । अनित्याचे दोषतरी काय ॥७०॥

त्या दिवसाचे मोठे लोक । याचे लग्नाची मातहि एक । त्याचे मातापिता देख । नाही सांगितले स्वामीला ॥७१॥

पूर्णनंद आधिच उदासी । त्यावर शरण गेले स्वामीसी । आपुले संसार गोष्टीसी । बोलावयाची सहज वीट ॥७२॥

स्वामींचे चरणी मस्तक । ठेवुनि बोले तो पुण्यश्लोक । दासाच्या चित्ती वासना एक । ते स्वामींनी तृप्त करावे ॥७३॥

या देहास आपुले पाय । विमुख कदा न होय । यावजन्म सेवेतचि जाय । ऐसा उपाय घडावा ॥७४॥

यदर्थ मजला चतुर्थाश्रम । द्यावे सदगुरु कैवल्यधाम । यावाचुनि कांही विराम । चित्ती माझ्या दिसेना ॥७५॥

ऐकातच ऐसी मात । काय बोले सदगुरुनाथ अजुनी तू बाळ अनाथ । तुजला इच्छा हे काय ॥७६॥

येरु म्हणे निजसुखाचे सुख । हे मजला परम हरिख । यावाचुनी विषयसुख । विषा प्रमाणे दिसताहे ॥७७॥

आता कांहीच न करिता आग्रह । करावे दासासी कृपा अनुग्रह । आपण सच्चिदानंद विग्रह । असता मजला काय भय ॥७८॥

सदगुरु चिदघन पुतळा । जाणुनि पुढील भविष्याला । बोले काय त्या शिष्याला । ऐकावे ते सज्जन हो ॥७९॥

अरे पूर्णानंदा पुण्यवंता । काय सांगावी तुझी निश्चयता । अद्यापि षोडश वर्षे प्राप्तता । तुज नाहीरे जाले कीं ॥८०॥

भूवरी कामाचा चपेटाभारी । थोरथोरासी दारोदारी । फिरवुनि वागविले निर्धारी । हे काय तुज कळेना ॥८१॥

असुनी वय तुझे लहान । ठाऊक नाही तारुण्यपण । तारुण्यासी जिंकल्या वाचुन । इच्छा ऐसी निरर्थक ॥८२॥

बाळपणाचे वैराग्य । किंवा नाशिवंत हे सौभाग्य । क्षय रोगीयाचे आरोग्य । स्थिरता कदापि मानू नये ॥८३॥

आधी बारा वर्षे गुरुसेवा । याप्रकार तुजला घडावा । तेव्हा पासुन मनोभावा । आश्रम देता येईल ॥८४॥

ऐकता ऐसे वचनामृत । जे अमूर्त ते मूर्तीमंत । त्याचे चित्त विश्रांत । होऊनि राहिला त्याकाळी ॥८५॥

टाकुनी सकळ संशय । लक्षुनी श्रीगुरुचे पाय । श्रीगुरु दास्यविषयी निर्भय । होऊनि सेवा करितसे ॥८६॥

इकडील काय समाचार । ते ऐकावे सादर । लक्ष्मी असता माहेर । ऋतु तिजला प्राप्त जाली ॥८७॥

होताच तिजला ऋतु प्राप्त । मातापिता होऊनि चिंताक्रांत । बोलाऊनि रामभट्टास । काय बोलते जाले पै ॥८८॥

तुंम्ही आमुचे पुरोहित । ऐसा जाणोनि निश्चित । कन्या दिधली तुमचे मुलाते । त्याचे फळ भोगितो ॥८९॥

त्याचे मायबाप जरी असते । ते काशीस जात होते । समाजाकडून त्याते । आणित होते या देशी ॥९०॥

तुम्हीं असून त्याचे चुलता । कांहीच नाही त्याची चिंता । या मुलीची ही अवस्था । कवणापुढे सांगावी ॥९१॥

तुम्हासी पुरोहिताचे अगत्य । जरी असेल सत्य । ती त्या बाळानिमित्य । काशीस प्रयाण करावे ॥९२॥

त्याचे कांही एक वर्तमान । न कळता नव्हे समाधान । यास्तव तुम्ही जाऊन । त्यास सत्वर आणावे ॥९३॥

आता लक्ष्मीची स्थिती काय । लक्ष ठेऊनि त्याचिये पाय । त्याचेचि ध्यास धरुनि ह्रदय । आन वैभवा त्यागिले ॥९४॥

वेशीबाहेर असता शिवालय । अश्वत्थ नारायणही निश्चय । इच्छुनि आपुला मनोदय । सहस्त्र प्रदक्षिणा पै करितसे ॥९५॥

सौभाग्यदायक वृषभध्वज । लक्ष्मीनारायणच वृक्षराज । देतील मनोरथ सहज । भावूक ऐसे पूजिती ॥९६॥

सेवुनि नित्य एकान्न । त्यागुनि मंगळस्नान । हरिद्रा कुंकुम मात्र लावुन । कंठगत प्राण बैसली ॥९७॥

पाहता दृष्टी स्वये आपण । सांगावे ऐसे नाही जाण । या सूनेस्तव तरी आपण । प्रयाण आता करावे ॥९८॥

ऐकता त्यांचे निष्ठुर वचन । रामभट्ट निघाले तेथुन । आपले निज ग्रामास येऊन । काय करित पै जाले ॥९९॥

महागावीचे एक ग्रहस्थ । परम भाविक गुरुभक्त । ते दीक्षितांचे अनुग्रहीत । कुलकर्णी तेथीचे जाणावे ॥१००॥

त्याजला हे वर्तमान । सांगताच रामभट्टानं । त्यासी म्हणे महायात्रा लागुन । आंम्हा जाणे निश्चय ॥१०१॥

आपण निघावे आंम्हा बरोबर । हुडकून आणु गुरुपुत्र । ऐसे बोलोनि अभयोत्तर । प्रयाण सिध्दता पै केली ॥१०२॥

भटजी त्याज बरोबर । येऊनि पोचले काशीपुर । ग्रहस्था समवेत एक घर । पाहुनी राहिले काशीत ॥१०३॥

भटजी बोले ग्रहस्थराया । कैसा भेटेल माझा तानया । करावे कोणत्या उपाया । सांगा मजला सत्वर ॥१०४॥

भटजी आणि ग्रहस्थ । हुडकिती नगरात । परि ठिकाणा कोणता । पत्ता कांही लागेना ॥१०५॥

ज्यावेळेस निघाला नारायण । आपुला देश सोडून । त्यावेळी नऊ वर्षाचा जाण । सांगे भटजी ग्रहस्थासी ॥१०६॥

अलिकडे सहा वर्षे । लोटली त्या बाळास । निघाले स्मश्रुकेश । ओळख कांही पडेना ॥१०७॥

ऐसे हुडकिता षण्मास । त्रास आले भटजीस । जाऊनि विश्वनाथ देवळास । प्रार्थना करी सदभावे ॥१०८॥

जय विश्वनाथा विश्वंभरा । विरुपाक्षा त्रिपुर संहारा । भक्तवत्सला भवानीवरा । भयमोचना भवांतका ॥१०९॥

निजजन मानस रंजना । निरुपमा निरामय निर्गुणा । निर्विकारा दुरित भंजना । जगन्निवासा श्रीशंकरा ॥११०॥

कर्पुरगौरा कैलासवासा । करुणाकरा चिदविलासा । सच्चिदानंद नित्यभासा । निलकंठ दयाळा ॥१११॥

त्रिताप शमना त्रिंबका । स्वानंदसार आनंद तारका । दुःख मोचका चित्तचालका । कारुण्यसिंधु विश्वात्मका ॥११२॥

विश्वजनका विश्वद्वारा । व्याळभूषणा त्रिशूलधारा । सहजानंदा दिगंबरा । अंतरात्मा जगदगुरु ॥११३॥

ऐसे स्तऊन मनात । निजुन राहिले देउळात । स्वप्नी प्रगटुन विश्वनाथ । सांगितले काय अवधारा ॥११४॥

उदयिक मणिकर्णिका घाटी । सहज होईल पुत्रभेटी । मग ब्रह्मानंद लुटी । पुर्णानंद लुटावे ॥११५॥

ऐसा होता दृष्टांत । भटजी झाले आनंद भरित । कोणाही हे न सांगती मात । मणि कर्णिकेसी पातले ॥११६॥

जेथे असे मणिकर्णिकेचा घाट । तेचि स्थळी पूर्णनंद भेट । यावाचूनि नुसती खटपट । जाणुनि तेथे पै आले ॥११७॥

जेथे असे मणिकर्णिकेचा रोध । तेथे न मिळे पूर्णानंद बोध । ऐसा चित्ती करुनी शोध । मणि कर्णिकेशी पातले ॥११८॥

ते दिवशी ब्रह्मानंद स्वामीशी । कोणी सांगितले भिक्षेसी । स्नानार्थ मणिकर्णिकेसी । सहज आले यतिराज ॥११९॥

स्वामी पादुका शाठी घेऊन । येत जाहले नारायण । प्रथम छाटी धुवून । नित्यकर्म आरंभी ॥१२०॥

मग स्वामी करुनी स्नान । नारायण ऐसे नाम घेऊन । बोलाविताच त्यालागुन । यांनी मनी समजले ॥१२१॥

लवकर आटोपी स्नानसंध्या । सत्वर म्हणून क्रमांध्या । ते वाट पहात असतील सध्या । यास्तव त्वरा तू करी ॥१२२॥

बोलुनि ऐसे ब्रह्मानंद । पुढे निघाले निजानंदकंद । मग नारायण पूर्णानंद । काय करते पै जाले ॥१२३॥

आधी करुनि क्रम पारायण । मग ब्रह्मयज्ञ पितर तर्पण । तर्पणि पितराचे नाम ऐकून । भटजीस खचित वाटला ॥१२४॥

हा जरी नारायण न होता । माझे पूर्वजाचे नाव हा न घेता । खचित माझ्या बंधुसुता । संशय यात दिसेना ॥१२५॥

कृपा करिताच गौरी रमण । का न भेटे नारायण । स्मरण मात्र निजपद जाण । देणार ऐसा शंकर ॥१२६॥

निश्चयेच मानुनी मनी । कारे नारायण म्हणूनी । बोलते जाहले तया लागुनि । अति उल्ल्हासे ते वेळी ॥१२७॥

कारे मजकडे पाहिनासी । कांहीच मजशी बोलेनासी । इतुका कठोर का जाहलाशी । गोष्ट करीरे निज तान्हया ॥१२८॥

ऐकातच ऐसे वचन । पाहे तेव्हा फिरोन । म्हणे हा कोण मज लागुन । मम देशभाषा बोलतसे ॥१२९॥

क्षणिक होऊनि विस्मित । मनी ओळखे निज चुलते । ओळखताच निश्चित । नेतील मजला स्वदेशी ॥१३०॥

आता न देता यासी खूण । कैसेहि जावे चुकवून । तरीच मजला कल्याण । अढळ राहणे गुरुपदी ॥१३१॥

जळा वेगळा करिता मीन । तळमळती जेव्हा जळा वाचून । तेवी वियोग श्रीगुरुंचा जाण । क्षणैक न साहे त्या भक्ता ॥१३२॥

अधिकारी गुरुभक्ताचे लक्षण । सर्वस्व अर्पूनि तनमनधन । अवस्थात्रयी निजगुरुंचे ध्यान । हेची आवडे सर्वदा ॥१३३॥

यास्तव पूर्णानंदराया । सोडूनि सदगुरुंचे पाया । स्वदेशाकडे जावया । मागेपुढे पहातसे ॥१३४॥

पितृव्यास तेव्हां बोले काय । नारायण कोठील काय । ब्रह्मानंदांचा मी शिष्य होय । नारायण सर्वथा मी नोहे ॥१३५॥

बोलता चुकूनी ऐसे बोले । येरु म्हणे हे तुझे काय बोल । ऐसे ठकविता मज वहिले । मी कदापि ठकेना ॥१३६॥

माझे पूर्वजांचे नांव । घेऊन केलेसी तूं पितृतर्पण । जरी न होसी नारायण । हे नांव कारे वदले त्वां ॥१३७॥

कृपा करुनी श्रीविश्वनाथे । भेट करविले मजला तूं ते । आता सोडून तुज पुत्राते । मी कदापिही न जाये ॥१३८॥

पितृव्य ऐसे बोलता । तेथुनी उठिला न बोलता । स्वामींचे मठाकडे जात असता । यांनी त्यामागेच निघाले ॥१३९॥

ब्रह्मानंदांचे मठी जाता त्याने । यांनीही देखिले दुरुन । खूण ठेऊन ठाव ठिकाण । परतुनि आले बिर्‍हाडा ॥१४०॥

येताच भटजी हास्यवदन । काय बोले ग्रहस्थ आपण । काहो पुतण्याचे दर्शन । जाले ऐसे वाटतसे ॥१४१॥

येरु बोले सांब दयेने । भेट मात्र जाहली जाणे । परंतु उडवून दिले त्याने । पत्ताच कांही देईना ॥१४२॥

ऐकूनि ऐसे हर्षमीन । भटजीस काय बोलती जाण । उठावे त्वरित आपण । भोजन आधी करावे ॥१४३॥

होताच तीन प्रहर । तुंम्ही आम्ही जाऊ तेथवर । भेटूनि तेथील योगीश्वर । हुडकुन काढू गुरुपुत्रा ॥१४४॥

पुढील प्रसंगी निरुपण । लक्ष्मीस भेटतील नारायण । पूर्णावतारी चैतन्यघन । ते परिसावे स्वानंदे ॥१४५॥

हे चरित्र भागीरथी । श्रवणस्नाने पातक हरिती । शेवटी सायुज्य मुक्ती । प्राप्त असे भावार्थिचे ॥१४६॥

हे चरित्र पूर्णानंद । श्रोते तुम्ही सदानंद । नमन मात्र सहजानंद । देणे आपण सहज असे ॥१४७॥

पुढील कथेचे निरोपण । करावे दया करुन । आपुले चरणी मस्तक ठेऊन । नमन करितसे हनुमदात्मज ॥१४८॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । त्या सूखाचे सुखसूत्र । चतुर्थोध्याय गोड हा ॥१४९॥

श्रीगुरुनाथार्पण मस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP