हंसदासाचरण - वरप्रार्थना

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


जय जय सदगुरु परमहंसा । तुझा चरणांबुज रंजवी मानसा । तुझीच आज्ञा परंपराविलासा । जाली ती त्वांचि सिध्दी नेली ॥१॥

आपणचि आज्ञा केली लेंकुरा । आपणचि शेवटा नेतसे त्वरा । मज श्रम कोणता हो असे खरा । ज्याचा तो अंगें सादर ॥२॥

आरंभीच पडिलें की शेवटा गेलें । अथवा मध्येंच त्रुटित जालें । हे गुरुचें असे गुरुनेंचि केलें । तरी मज हर्षविषाद केवी ॥३॥

तरी आम्हांसी दीना तारावया । उपाय रचिला असे सदगुरुराया । हा आल्हाद असे जाला मना यया तो नावरेचि मज ॥४॥

म्हणोनिच गातों नाचतों स्वानंदें । ब्रह्मांड दुमदुमिलें माझिये छंदें । सर्व भाविकां आटाहास्यें वेवादें । गर्जोंनि बोलवितों ॥५॥

यारे यारे गुरुमाय वोळली । मोक्षरुप ज्ञानाची पोही घातली । चरणीं रत होऊनि यातना चुकवावी वहिली । जन्ममृत्यूची ॥६॥

उत्तमाधिकारिया ज्ञानप्राप्ति । मध्यमासी श्रवणादि साधनसंपत्ति । आणि कनिष्ठ अधिकारियाही मार्ग लाविती । भावार्थबळें ॥७॥

कोण उपासना कोण निष्कर्मता । कोण भजन पूजन सेवन तत्वतां । कोणत्याही उपायें अंत :करणशुध्दता । होय हो निश्चयेंसी ॥८॥

हंसचरित्रें पध्दति परंपरा । हंसरायें सिध्दीसी नेली त्वरा । या रीती हंसदासें चालावें निर्धारा । तोही मार्ग कथोनि ठेविला ॥९॥

आतां यारे यारे जे गुरुचे नंदन । अहो तुम्ही आम्ही सर्वही मिळून । श्रीहंसगुरुंसी मागूं वरदान । जगदुद्वारास्तव ॥१०॥

मग सर्व हंसदास बध्दांजलि । सदगुरुसन्मुख उभे ठेली । सर्व मंडळी प्रार्थू लागली । जय जय सदगुरु म्हणोनी ॥११॥

नरदेहासी जे आले । परमार्थपंथा लागों वहिले । नवसाचे देवां त्यागून वहिलें । गुरुचरणीं रतावें ॥१२॥

गुरुचरणीं जे रत असती । त्यांची अधिकाधिक वाढो प्रीति । व्यभिचार नव्हे कल्पांतीं । योषाजारापरी ॥१३॥

अन्यशास्त्रीं प्रीति न जडो । एक वेदांतचि आवडो । पाषांड मतींही न सांपडो । अधिकारेविण ॥१४॥

अनधिकारिया अधिकार यावा । अधिकारी श्रवणीं नित्य नवा । श्रवणमननीं ब्रह्मानुभवा । पावो साधक ॥१५॥

बध्द ते अंतरीं प्रस्तावे । मुमुक्षुत्व तयासी सहज यावें । मुमुक्षु साधना तत्पर व्हावें । साधकत्वदशें ॥१६॥

साधकींही त्रिपुटी खंडोन । परब्रह्मीं व्हावें अभिन्न । निजांगेंचि वस्तुतंत्र होउन । जीवन्मुक्ति येचि देहीं ॥१७॥

असो भजन पूजन उपासना । जे अखंड रत गुरुसेवना । तयाचिये शुध्द अंत :करणा । ह्रदयशुध्दि व्हावी ॥१८॥

श्रवणमननें मीमाझेंपण । गळावा देहबुध्दीचा अभिमान । कामक्रोधाचें तो व्यर्थ छळण । मुळींच तुटावें ॥१९॥

कर्तृत्व भोक्तृत्वहि सरावें । पापपुण्यासी नातळावें । भवभयापासून सर्व सुटावें । अज्ञान नासोनी ॥२०॥

अनुभविता भिन्न न पडावा । द्वैताचा उमसच न व्हावा । अखंडैकरसीं समरसावा । साधकत्वही त्यागुन ॥२१॥

ऐसी प्रार्थना ऐकून श्रीगुरु । बोलते जाले हंस करुणाकरु । मनकामना पुरतील सत्वरु । जे जे इच्छित असती ॥२२॥

वरदान गुरुचें ऐसें । साष्टांग घातिलें र्हसदासें । निश्चयचि करुन मानसें । प्रतिज्ञोत्तर बोलती ॥२३॥

कायावाचामनप्राण । गुरुचरणीं केलें अर्पण । आतां प्रलय जाला जरी पूर्ण । तरी अन्यथा नव्हे ॥२४॥

आम्ही सदगुरुंचे धरिले पाय । आतां आम्हांसी कोणतें भय । उद्वरुं नुद्वरुं हा संशय । आम्हां सहसा असेना ॥२५॥

अभिन्न स्वरुपचि आमुचा । संप्रदाय असे हंसदासाचा । उपास्य तरी सदगुरु साचा । ब्रह्मांडमठीं ॥२६॥

याहीवरी मुख्य प्राण मारुती । साह्य असे आम्हां साधकांप्रति । हंस राम प्रणवात्मक निश्चिती । ज्ञप्तिसीतेसहित ॥२७॥

ऐसा हंसदासाचा शुध्द स्वार्थ गगनीं उंचावला परमार्थ । आतां कांहींच उरला नाहीं अर्थ । कृतकृत्य जाहलों ॥२८॥

आकाश हें तुटोनि पडो । कीं पृथ्वी अवघी जळीं बुडो । परी सदगुरुचरणां न विघडो । तिहीही काळीं ॥२९॥

ऐसा निर्धार हंसदासाचा । हंसचरणींच असे साचा मातेविण । चिमणिये बाळाचा । हेत दुजा नाहीं ॥३०॥

सत्राशें शालिवाहन शक । वरुते एकुणहत्तराधिक । संवत्सर प्लवंगनामक । पौर्णिमा श्रावणी ॥३१॥

ते दिवसीं हंसगुरुपध्दति । हंसकृपें हंसें नेली समाप्ती । हंसदास श्रवणमननें पावती । शुध्द परमार्थ ॥३२॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । हंसदासाचरण निगुती । अष्टम प्रकरणीं ॥८॥

एकंदर ओ . सं . २८० .

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP