हंसदासाचरण - हंसदासाचें लक्षण

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


जय जय सदगुरु सच्चिदानंदा । सर्वसातिशया परमास्पदा । भक्तकामकृपावरदा मोक्षपाणि ॥१॥

आपणचि वर्णन कीजे अपुलें । म्हणोनि चिमणें बाळ पोसणें घेतलें । यथामति सिध्दतें बोलाविलें । निजपध्दतीसी ॥२॥

आदि नारायणं अंतीं नारायण । मध्येंहि दुजा असे कवण । तथापि नामें जरी भिन्न भिन्न । परी हंसगुरु एकचि ॥३॥

एक दिवा दश ठाणयेसी । लावितां काय भिन्न म्हणावें त्यासी । अथवा एक साक्षी उद्रवनी वृत्तीसी । पुढें दशधा जाला ॥४॥

परी जाणता तो एकचि रुप । तेथें भेद नसे किमपि अल्प । त्याच रीती एक कीं अमुप । सदगुरुनाथ एक ॥५॥

आदिनारायण हंस ब्रह्मा । वसिष्ठ हंसगुरु रामनामा । समर्थ उध्दव अनुक्रमा । माधवहंस आठवे ॥६॥

रुद्रारामहंस नववे । नागनाथमहाराज दहावे । लक्ष्मणहंस तेचि जाणावें । अकरावे प्रसिध्द ॥७॥

बारावे हंस नारायण । व्यक्ति जरी अकरा भिन्न भिन्न । परी स्फूर्ति मात्र बारावें जें लक्षण । तें सर्वत्रीं सारिखें ॥८॥

जैशा व्यक्ति वेगळाल्या दिसती । तैशाचि भिन्न आचरणाच्या रीती । परी अभिन्न ज्ञानाची स्थिति । एकरुप असे ॥९॥

असो प्रथम अष्टकापासून । सात अष्टकापर्यंत कथन । चरित्राचें जालें भिन्न भिन्न । यथायोग्यमति ॥१०॥

हंसआज्ञा कीं अष्ट अष्टकें करी । त्यांत सात जाले हंसानुकारी । आतां आठविया अष्टकीं निर्धारी । काय बोलूं कळेना ॥११॥

तंव सदगुरु म्हणती कां गा उगला । क्रियापध्दति बोले वहिला । हंस गुरुच्या दास्यत्वा जो लागला । तया हंसदासाची ॥१२॥

तेणें कैसें कैसें वर्तावें । कोणे कोणे परी अभ्यासावें । कायिक वाचिक मानसिक अघवें । बोलोनि दावी ॥१३॥

ऐसी आज्ञा होता क्षणीं । मिया साष्टांग नमिलें चरणीं । सावध ऐका हो आतां येथोनी । सर्व क्रिया बोलिजे ॥१४॥

हे आज्ञाचि असे समर्थांची । वाणी नव्हे माझे पदरिची । जैसी वेदाज्ञा मानोनि साची । तंवि ऐकोनि आचरा ॥१५॥

जो सदगुरुहंसाचा उपदेशी । हंसदास हें अभिधान त्यासी । तयाचें आचरण सांगोनि मजसी । बोलविती हंसगुरु ॥१६॥

परी हंसदास यासी अभिधान । नाम ठेविलें काय म्हणोन । हेंचि ऐका आधीं प्रयोजन । क्रियाचरण मग बोलूं ॥१७॥

मीहि असे हंसदास । हंसदासांसी सांगतो सायास । आचरतील जे धरुन विश्वास । ते हंसाज्ञें हंस होती ॥१८॥

आतां हंस हेचि निजगुरु । हाचि ऐका अधिकारु । तया गुरुदास्यत्वा जो तत्परु । तो हंसदास ॥१९॥

मूळीं आदिनारायण जे स्फूर्ति । उठती जाली अहंब्रह्म -प्रतीति । तेचि निवडून पाहतां यथामति । सोहं हा अनुभव ॥२०॥

ते सोहं स्फूर्तिच पंचविध । प्रणव नाम तयासी शुध्द । त्या प्रणवापासून वर्ण मात्र सिध्द । वेदही नाम त्याचें ॥२१॥

पुढें सोहं हंस तत्वमसि । गुरुचि गुरुरुप बोलती शिष्यासी । तस्मात हंस नाम हें श्रीगुरुसी । जगदुद्वारा ठेवी श्रुति ॥२२॥

मुख्य आदिनारायणचि हंसरुप । वेदाज्ञाहि हंसस्वरुप । वर्णोच्चारही होती अमूप । एका हंसापासून ॥२३॥

तोचि परंपरा -ओघ चालिला । तस्मात हंसचि म्हणावें त्याला । परी ओळखी व्हावया भेद केला । चतुर्विध प्रकारें ॥२४॥

स्वरुप आनंद प्रकाश चैतन्य । हंससंप्रदाय जाले अन्य अन्य । त्यांत स्वरुप संप्रदाय हा सामान्य । सर्वत्रीं सारिखा ॥२५॥

यासि हंससंप्रदायही म्हणावें । परी आजपर्यंत प्रगट नव्हे । रामदास्यत्व बोलती अवघे । गुरुसीही रामदास ॥२६॥

गुरुसी दासशब्दाचें उच्चारण । हें योग्य नव्हे शिष्यालागुन । तस्माद्वंसगुरु समर्थ सज्जन । आणि आपण हंसदास ॥२७॥

आणि आदिनारायणचि हंस जाला । अंगें व्यक्ति धरुनि प्रगटला । तया हंसगुरुपासुनि बोध चालिला यास्तव हंसगुरुमालिका ॥२८॥

आमुचा निजगुरु नारायणहंस । अंतरबाह्य असे कीं परमहंस । तयाचे किंकर आम्ही हंसदास । हंससंप्रदायी ॥१९॥

सदगुरुलक्ष्मणहंसाचा । उपदेशी नारापणहंस साचा । आठउ स्फुरला आदिनारायणाचा । सोहं हंस तो हंसगुरु ॥३०॥

हंसोपदेशें हंसचि जाला । तरी दुसरें नाम कासया तयाला । पुढें दत्तात्रेय हंस प्रगटला । तेणें केला अढळहंस ॥३१॥

त्यापुढें हंसदीक्षा घेतली । तरी व्यक्तिहि दुजी नाहीं उरली । शंकरहंसांची वेदांत शैली । प्रगटली हंस म्हणोनी ॥३२॥

एवं समर्थहंस आणि दत्तात्रेय । आणि तिसरे ते शंकराचार्य । या तिहींचा नारायणहंसीं अन्वय । संगम जाला ॥३३॥

अध्यात्म तेचि समर्थ सज्जन । कारण कीं मुख्य गुरु -उपदेशा हे पूर्ण । शंकरहंस आश्रम व्याख्यान । रुप म्हणोनि अधिभूत ॥३४॥

सर्व संप्रदायासी आचार्य । श्री अवधूतहंस दत्तात्रेय । तेचि अधिदैवत यथान्वय । हंससंप्रदाया ॥३५॥

तस्मात आम्ही एक हंसदास । हंसचरणीं अमुचा विश्वास । सदगुरुहंसेंचि चिमणें बाळास । दास्य कृपेनें दिधलें ॥३६॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । हंसादासाचरण निगुती । प्रथम प्रकरणीं ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP