हंसदासाचरण - हंसदासाची आचरणरीति

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


हंसगुरुचा जो उपदेशी । विरक्ति ज्ञान नव्हे मानसी । तेणें पूर्ववत आचरावें गृहस्थाश्रमासी । परी तरणोपाय चिंतावा ॥१॥

जो हंसगुरुचा मंत्र घ्यावा । त्याची अखंड घडावी सेवा । तनमनधनेंसी अर्पण करावा । मीपणा चरणीं ॥२॥

गुरुसदनीं राहणें न घडतां । निजाश्रमींच असावें तत्वतां । तयाचे आचरणाची वार्ता । बोलिजे कांहींसी ॥३॥

जें जें जया विभागासी आलें । विहित कर्म जें शास्त्रीं बोलिलें । तितुकें अगत्य पाहिजे केलें । नित्य नैमित्तिक ॥४॥

परी फलेच्छा किमपि न करावी । सांग करुन गुरुचरण अर्पावी । तेणें कर्मे ह्रदयशुध्दि व्हावी । परमार्थ आकळावा ॥५॥

गुरुमंत्राचें पुरश्वरण । संपतां हवन आणि संतर्पण । अनुकूल नसतां जपचि करण । दशांश दशांश ॥६॥

प्रतिदिनीं जप तेरा शतें । रुद्राक्षमालेनें कीजे निवांते । न्यासध्यानादि आदिअंते । सहित आसनविधि ॥७॥

प्रात :स्नान जालिया करावें । नातरी माध्यान्ही कर्म सारावें । स्वस्वकर्मादि धर्म संपादावे । पंचमहायज्ञादि ॥८॥

अतिथिपूजन सहस्त्र कामें त्यागून । आणि दिधलें पाहिजे तयासी भोजन । यथाशक्ति तया गौरवून । मार्गस्थ करावें ॥९॥

गुरुतीर्थ न घेतां अन्न ग्रहण । कदाहि करुं नये जाण । जो जो भोग घ्यावा आधीं अर्पण । हंसगुरुंसी करावा ॥१०॥

सर्वदा सत्संगचि असावा । दु :संग अघवाचि त्यागावा । प्रतिदिनीं सत्वगुण वाढवावा । रजतम निर्दाळुनी ॥११॥

पूर्ववतचि वस्त्राभरण । परी हंसदासाचें असावें चिन्ह । भस्मचर्चन आडवें गंधलेपन । कंठीं रुद्राक्षमाला ॥१२॥

मुख्य उपासना हंसगुरु । अंगीं उपासावे निर्विकारु । नातरी सर्वभूती असावा आदरु । सर्व गुरु म्हणोनी ॥१३॥

आपणापरिस जे श्रेष्ठजन । तया असावें अनन्य शरण । असती जे जे आपणासमान । त्यासी मित्रत्व असावें ॥१४॥

जे कां कनिष्ठ आपणाहुनी । ते संरक्षावें संकटापासुनी । सर्वांची दया अंत :करणीं । स्वकीयपरी असावी ॥१५॥

हेचि भूतदया सर्वाची । वार्ताचि नसावी द्वेषाची । सर्वत्रीं सख्यभाव हाचि । कवणे काळीं भलतिया ॥१६॥

दत्तशिवराममूर्ति । यांचें पूजन घडावें यथारीती । आणि ग्रामदेवताचे दर्शनाप्रति । प्रतिदिनीं जावें ॥१७॥

हंसमठीं अगत्य जावें । परी रिक्तहस्तें दर्शन न घ्यावें । हंसदास दीक्षित ते असावे । वंद्य गृहस्थासी ॥१८॥

एकांती मानसपूजा करावी । अथवा मननशक्ति आदरावी । संतसंगश्रवणीं प्रीति असावी । अध्यात्मविद्येची ॥१९॥

सदगुरुसेवन तरी अगत्य । वाणीसी भजन हंसगुरुचें नित्य । सदा विचारावें नित्यानित्य । मनेंकडोनी ॥२०॥

साधुसंत हंसदास । अथवा भलते संप्रदायी परमार्थास । दीक्षेसहित आले जरी आश्रमास । ते पूजावें गुरुरुपें ॥२१॥

संन्यासी जरी आले घरासी । तरी ते पूजावें अतिसायासी । तडीतापडी ब्राह्मणादि सर्वांसी । विमुख न व्हावें ॥२२॥

दुर्गुण अवघेच पालटावें । उत्तम गुण ते शिकत जावें । अन्य पाषांडी न पडावें । अथवा दांभिक जनीं ॥२३॥

नित्य नेम कांहीं असावा । परमार्थसाधनाचा अभ्यास करावा । आळसाचा थारा बळेंचि मोडावा । असावें सावधान ॥२४॥

जयंत्या पुण्यतिथि अघवे । संस्थानीं होतां तेथें सादर व्हावें । अथवा यथाशक्ति सदनीं करावें । नातरी निराहार ॥२५॥

शनिवारीं निराहार करावा । उपोषणचि कीजे अथवा । एकादशीशिवरात्रीचा असावा । आदर अंतरीं ॥२६॥

आतां उपजीवनेचा प्रकार । जो जो जयाचा पूर्व व्यापार । तो तोचि करावा निर्धार । यथायुक्त रीती ॥२७॥

परी व्यापारीं जें होईल उत्पन्न । त्यांत दशमांश काढावा धर्मालागुन । नवहिस्से वेचावें प्रपंचाकारण । जे जे विहित अपेक्षा ॥२८॥

दशमांश जो असे निघाला । तो लावावा देवब्राह्मणाला । परी नवस सायास जो धर्म घडला । तो यांत मेळवूं नये ॥२९॥

देउळें दीपमाळा मठ मठिका । आणि तृप्त करावें याचका । उत्साव महोत्साव जो निका । आणि सदावर्ते ॥३०॥

अन्नपानादि सत्रें घालावी । दरिद्रियांचे दरिद्रे हरावी । धर्म लग्न मौंजी करावी । सोडवावें अडलिया ॥३१॥

द्रव्यवंतें बहुत केलें । निर्द्रव्यें अल्पचि दिधलें । परि ते समानचि होतसे वहिले । बळें भावार्थाच्या ॥३२॥

भावेविण कांहीं करितां । व्यर्थच जातसे तत्वतां । तस्मात होईल तें भावार्थबळें होतां । प्रिय होय हंसगुरुसीं ॥३३॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । हंसदासाचरण निगुती । पंचम प्रकरणीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP