हंसदासाचरण - तंत्रसाधक

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


आतां श्रोते सावधान । तया हंसदासाचें लक्षण । हंसपध्दतिनामाचें प्रयोजन । पूर्व प्रकरणीं बोलिलें ॥१॥

जो हंसप्रसादें हंसचि जाला । अभिन्न दृढापरोक्षत्व लाधला । त्रिपुटीत्यागें ब्रह्मत्व पावला । ब्रह्मविदत्वही त्यागुनी ॥२॥

कर्तृतंत्रता मुळीं असावी । तरीच नामरुपाची उठाठेवी । निजांगें ब्रह्म जो गोसावी । तो हंसरुपचि ॥३॥

तयासीही हंसदास म्हणूं नये । हंसरुपचि जाले स्वयें । तयासी अमुक हा क्रिया उपाय । बोले कवणु ॥४॥

तो जें करील तोचि विधि । न करील तेंचि तो स्वयें निषेधि । तयासी अमुक हे स्थापी कोण बुध्दि । श्रुतिही नेम करीना ॥५॥

हे असो तो निजांगें हंस । नेमचि न करी कोणी तयास । परी कर्तृतंत्र जो साधक हंसदास । तयाही क्रिया नलगे ॥६॥

मीमाझें कर्तेभोक्तेपण । हें तरी नि :शेष गेलें निपटून । त्रिपुटी मात्र उरलें ध्येयध्यान । कर्तृतंत्ररुपें ॥७॥

तेणें हंसदासें स्वे़च्छा विचरावें । यथाजात रुप सहज धरावें । प्राप्त विषय तेचि भोगावें । हर्ष विषाद त्या कैचा ॥८॥

स्वेच्छा फिरावें तेणें । हाही नेमु न कीजे कोणें । जैसें प्रारब्ध कीं स्वीकारिलें मनें । तें तें आचरो सुखें ॥९॥

ज्ञान पावोन गृहस्थाश्रमीं । असोन आचरो यथाविधि कर्मी । अथवा अधर्म अन्यथा विकर्मी । कीं अकर्मीं वर्तो ॥१०॥

उपासनाचि करी दृढमती । अर्चन भजन कीर्तनादि भक्ति । अथवा हें सर्व त्यागुनि सहजगती । मूढा ऐसा फिरो ॥११॥

अथवा योग कां करीना सर्वथा । अथवा समानरुप का न होती अवस्था । कीं उल्लंघूनि सर्व वेवस्था । होईना कां भ्रष्ट ॥१२॥

वेदपाठ का नामभजन । अथवा सांगेना कां पुराण । अथवा व्यवहारी कीं दृढ मौन । इच्छे ऐसें करो ॥१३॥

ब्रह्मचर्य किंवा वनवास । कीं सर्वत्यागें करो संन्यास । अथवा उल्लंघून सवाश्रमांस । अजात अवर्ण होवो ॥१४॥

अखंड गुरुसेवाचि करो । कीं आज्ञा घेवोनि भुविं विचरो । श्रवण असो कीं मनन विवरो । अखंड ध्यान जयासी ॥१५॥

त्रिपुटीरुप कर्तृतंत्रता । जरी उरली असेल भिन्नता । ते आपणचि गळेल स्वतां । वस्तुतंत्र होय ॥१६॥

अंबा जेवी अढिये लाविला । पिकतांचि देंठापासुनि सुटला । तेवी कर्तृतंत्रता सोडी तयाला । वस्तुतंत्रता स्वयें होय ॥१७॥

तयासी कोण ताचि नेम नलगे । अवघीं मायिकाची सोंगें । येणें रीती बोलिली प्रसंगें साधकहंसदासरीति ॥१८॥

आतां जया मुमुक्षूसी श्रवण मनन । अथवा संशय जरी किंचित उत्पन्न । तेणें करावें गुरुपादसेवन । कायिक वाचिक मानसिक ॥१९॥

सदगुरुहंसापरतें दैवत । दुजें नाहीं नाहीं गा निश्चित । कर्मधर्मादिहि सर्व विहित । नलगे नलगे तयासी ॥२०॥

गुरुसेवा तेचि त्याचें कर्म । गुरुआज्ञा तोचि त्याचा धर्म । गुरुध्यानचि तयाचा नेम । गुरुभजन तोचि वेदपाठ ॥२१॥

गुरुपूजा तेचि अर्चन । गुरुतीर्थ तेचि तीर्थाटण । गुरुरुप पाहे हेंचि अभ्यसन । योगादिकांचें ॥२२॥

देह सदगुरुपदीं वाहिला । तरी मीमाझें कोठें असे तयाला । सेवन करितांचि पापपुण्याला । तिळपात्र दिधलें ॥२३॥

ऐसा अनन्यरुप शिष्य पाहोनी । गुरु कृपा करिती कळवळोनी । अपरोक्षज्ञान समाधानी । दासचि हंस होय ॥२४॥

श्रवण मनन अभ्यासद्वारां । उरोंचि नेदिती अहंकारा । कर्तृत्वभोक्तृत्व तुटे एकसरा । आणि त्रिपुटीहि गळे ॥२५॥

अभिन्न ब्रह्म अंगें होतां । हंसरुपचि जाला अवचिता । तेथें नामरुप हे पाहतां । उरली कोठोनी ॥२६॥

एवं साधक अथवामुमुक्षूसी । खरी ह्रदयशुध्दि असे जयासी । कर्मउपासनादिकीं तयासी । पडणेंचि नको ॥२७॥

याविण जे भाविक जन । सदगुरुपदीं श्रध्दाहीन । तयासी पाहिजे उपासन । नित्यनियमरुपें ॥२८॥

त्यासही गुरुसेवा पाहिजे । गुरुमुखें मंत्रादि लाहिजे । त्या पुरश्वरणादि पाविजे । ह्रदयशुध्दि ॥२९॥

तया भाविकाचें आचरण । नित्यनियमादि अनुष्ठान । यथामति बाळ चिमण । बोलेल पुढें ॥३०॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । हंसदासाचरण निगुती । द्वितीय प्रकरणीं ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP