ज्याप्रमाणें वेदांचें अध्ययन करणारा किंवा जप करणारा सदां सर्वदां त्यांतच गढुन जाऊन स्वप्नांत सुद्धां आपला आभ्यास करितो, त्याप्रमाणें ब्रह्मोपासकानेंही त्यांतच सदां सर्वदां असावें ॥८१॥
शि०- स्वप्नांत देखील ती भावना कशी होते ? गु०- दुसर्या विरोधी विषयांचे चिंतन मध्यें न आणतां एक सारखी त्याचीच भावना केली ह्मणजे ती भावना स्वप्नांत देखील राहते ह्माचा अनुभव सर्वत्रांना आहे. ॥८२॥
शि०- निरंतर भावनेस प्रारब्ध आड येत नाही काय ? गु०- ज्या मनुष्यास मोक्षाची आस्था अत्यंत आहे त्यास प्रारब्धाचा भोग न सुटतांही ब्रह्माचिंतन करणें शक्य आहे यांत संशय नाही यास दृष्टांत व्यसनीं पुरुषाचा ॥८३॥
ज्या व्यभिचारिणींचें चित्त परपुरुषावर जडले ती घरचा काम धंदा करीत असुनही तें परसंगरसायन आंतन एक सारखी चाखीत असते. ॥८४॥
शि०- मग तिचें घरचें काम कसे होतें ? गु०- त्या आस्वादनांत घरचें काम नाहीं रहात नाहीं; पण सरासरी चालतें ॥८५॥
आतां कुलीन स्त्री जशी घरच्या कामांत लक्ष्य ठेवुन काम करिते तसें मात्र तिला करितां यावयाचें नाहीं ॥८६॥
त्याप्रमाणें ध्यानैकनिष्ठ पुरुषाचा संसार सरासरी वेठीनें चालतो पण तत्त्ववेत्याची गोष्ट तशी नाहीं. व्यवहारास आणि ज्ञानास विरोध मुळींच नसलामुले त्याचा व्यवहार यथास्थित चालतो. ॥८७॥
कारण सर्व प्रपंच मायामय आहे आणि चैतन्यरुपी आत्मा खरा आहे, असा बोध झाल्यावर त्याला व्यवहाराचा अडथळा मुळींच नाहीं. ॥८८॥
शि०- ज्ञान्यास हा प्रसंग अगदीं खोटा आहे असा निश्चय झाल्यावर व्यवहार कसा घडावा ? गु०- व्यवहार करण्याला त्याची जी मुख्य साधनें आहेत तीं असलीं ह्मणले झालें त्याला ह्मणेज प्रपंच खरा आहे आत्मा जड आहे ही भ्रांतीच असली पाहिजे असें नाहीं ॥८९॥
शि०- तींमुख्य साधनें कोणती ? गुं०- मन, वाणी शरीर आणि दुसरे बाह्म विषय हीच व्यवहारांची मुख्य साधनें तीं ह्मणजे ज्ञान होतांच तत्त्वज्ञ पुरुषांची नाहींशी होतात असं कांहीं नाहीं. मग व्यवहाराला हरकत कोणची ? ॥९०॥
शि०- तत्त्ववेत्याला मनाचा निरोध करावा लागतो. मग त्याचा व्यवहारा कसा चालावा ? गु०- ही तुझी गैरसमजुत आहे तसा जो निरोध करणारा आहे तो तत्त्ववेत्ताच नव्हे तो ध्यातां असेंम्हटलें पाहिजे अरे घटजाणणाराला बुद्धिचें मर्द्दन केलें पाहिजे काय ? तसें करणारा आह्माला तर कोठें आढळत नाहीं ॥९१॥
एकदां प्रत्यय आल्यानें जर घट समजतो तर एकदां प्रत्यय आल्यानें स्वप्रकाश आत्माही तसाच समजला पाहिजे ॥९२॥
शि०- एथे आत्मा स्वप्रकाश म्हनुन जें म्हटलें त्यांचें प्रयोजन कांहीं दिसत नाहीं. कारण तो जरी स्वप्रकाश असला, तरी त्यास बुद्धिनें व्यापल्यावाचुन त्याचें ज्ञानच होणें नाहीं. आणि बुद्धि तर क्षणोक्षणीं नाश पावणाई आहे ह्माणुन तिची पुनः पुनः ब्रह्माचेठायीं स्थापना केलीच पाहिजे. व ती स्थापना निरोधावांचुन होत नाही. गु०- ही सर्व शंका घटज्ञानालाही लागु आहे. ॥९३॥
शि०- ती घटज्ञानाला कशी लागु होईल ? कारण घटज्ञान जरी क्षणीक असलेंतरी एकदां हा घट असा निश्चय झाल्यावर त्या ज्ञानाचा पाहिजे तेव्हां व्यवहार करितां येतो. म्हणुन तेथें चित्तस्थैर्याची गरज नाहीं. गु०- जशी घटपक्षीं त्याची गरज नाहीं तशी आत्मज्ञान झाल्यावरही चित्तस्थैर्याची गरज नाहीं. ॥९४॥
कारण एकदां आत्मा असा आहे असा निश्चय झाल्यावर पाहिजे तेव्हा त्याचें ध्यान करण्याला मनन करण्याला व वर्णन करण्याला तत्त्ववेत्याला येतें ॥९५॥
शि०- तत्त्ववेत्ताही उपासकाप्रमाणें आत्मज्ञानांत निमग्र असतां त्याला जगाची विस्मृत्ति पडण्याचा संभव आहे गु०- विस्मृती पडेना बापडी. पडली तरी ती ध्यानापासुन पडते ज्ञानापसुन पडत नाहीं. इतकेंच आमचें म्हणणे आहे.॥९६॥
शि०- एकुन तर तत्त्ववेत्यालाही ब्रह्मध्यान करावें लागतें ? गु०- त्यानें तेंकेलेच पाहिजे असं कांहीं नाहीं तें त्यानें पाहिजे असल्यास करावें कारणमोक्षप्राप्ति ज्ञानापासुनच होते असा वेदाचा डंका वाजत आहे. ॥९७॥
शि०- तत्त्ववेत्ता जर ब्रह्माध्यान सोडील तर त्याची प्रवृत्ति बाहेर प्रपंचाकडे होईल गु०- होईना बापडी तशा प्रवृत्तीनें तत्त्ववेत्याचें काय जातें ? ॥९८॥
शि०- तशी प्रवृत्ति झाल्यास अतिप्रसंगाची ज्ञान्यास भीति आहे गु०- अरे त्याला प्रसंग असेल तर अतिप्रंसंग, प्रथम तूं प्रसंग ह्मणजे काय हें मला सांग. शि०- शास्त्राप्रमाणें वागणें गु०- तें तत्त्ववेत्याला मुळींच लागु नाहीं ॥९९॥
कारण, ज्याला मी अमुक वर्णातला मी अमुक आश्रमी, मी तरुण मी वृद्ध असा आभिमान आहे त्यालाच कायते विधिनिषेध. पण तत्त्ववेत्याचा तर असा निश्चय असतो कीं हे वर्णाश्रमादिक देहाचेठायीं मायेनें कल्पित केले आहेत त्याचा संपर्क बोध रुप अत्म्याला मुळींच लागत नाही. ॥१००-१०१॥