* दारिद्र्यहर षष्ठी
माघ शु. षष्ठीला या व्रताचा आरंभ करून प्रत्येक षष्ठीला एकभुक्त, नक्त, अयाचित अथवा उपवास करून ब्राह्मणभोजन घालावे आणि वाटीत दूध, तूप, भात आणि साखर घालून प्रत्येक षष्ठीला वर्षभर दान करावे म्हणजे त्याच्या कुळावरील दारिद्र्य दूर होईल
* नंदादी विधी
माघ शु. षष्ठीला येणार्या रविवारला 'नंदा' असे म्हणतात. या दिवशी नक्त करून सूर्यमुर्तीला तुपाने स्नान घालणे आणि अगस्तीची फुले वाहून त्याची पूजा करणे असा विधी आहे. उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणांना घारग्याचे भोजन घालतात.
फल - दु:ख व दारिद्र्य यांचा नाश; धन, सुख, संतती व सूर्यलोक यांची प्राप्ती.
* मंदारषष्ठी
हे व्रत तीन दिवसाचे आहे. यासाठी माघ शु. पंचमी दिवशी संपूर्ण कामनारहित होऊन, जितेंद्रिय राहून एकभुक्त, तेही थोडेसे खाऊन राहावे. षष्ठी दिवशी प्रात:स्नानादि नित्यकर्मे केल्यानंतर ब्राह्मणांची आज्ञा घेऊन व्रत करावे व रात्री फक्त मंदारपुष्प भक्षण करून उपवास करावा. त्याप्रमाणे सप्तमी दिवशी सकाळी ब्राह्मणपूजन करून मंदार (रुई) -वृक्षाची आठ फुले आणावीत व तांब्याच्या पात्रात तिळांचे अष्टदल कमळ काढावे. त्याच्या प्रत्येक पाकळीवर एकएक फूल ठेवावे व मध्यभागी सोन्याची सूर्यमूर्ती स्थापावी आणि
'भास्कराय नम:'
म्हणून पूर्व दिशेकडील,
'सूर्याय नम:'
म्हणून अग्नेयेकडील,
सूर्याय नम:'
म्हणून दक्षिणेकडील,
'यज्ञेशाय नम:'
म्हणून नैऋत्येकडील,
'वसुधाम्ने नम:'
म्हणुन पश्चिमेकडील,
'चंडभानवे नम:'
म्हणुन वायव्येकडील,
'कृष्णाय नम:'
म्हणुन उत्तरेकडील आणि
'श्रीकृष्णाय नम:'
म्हणून ईशान्येकडील अर्क-पुष्पांची स्थापना आणि पूजा करावी. आणि कमल-मध्यातील सूर्यदेवाची 'सूर्याय नम:' म्हणून पूजा करावी. तेल आणि मीठवर्जित भोजन करावे. याप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक महिनेच्या महिने प्रत्येक सप्तमीला वर्षपर्यंत व्रत करून समाप्ती दिवशी घटावर लाल सूर्यमूर्ती स्थापन करून पूजा करावी. व
'नमो मंदारनाथाय मंदारभवनाय च ।
त्वं के तारयस्वास्मानस्मात् संसारसागरात्'
अशी प्रार्थना करून सूर्यमूर्ती विद्वान ब्राह्मणाला दान द्यावी. यामुळे सर्व पापांचा नाश होऊन स्वर्गप्राप्ती होते.