गुडधेनुदान
एक दान. हे माघ किंवा चैत्र मासाच्या शु. तृतीयेस करतात. याचा विधी असा - शेणाने सारवलेल्या भूमीवर दर्भ अंथरतात. त्यावर कृष्णाजिन पसरतात. चार भार गुळ घेऊन त्याची वासरासह धेनू बनवितात. त्यांच्या कानांच्या जागी शिंप, पायांच्या जागी उसाची कांडी, डोळ्यांच्या जागी मुक्ताफळे, शेपटीच्या जागी रेशमी वस्त्रे इ. बसवितात व तिची पूजा करून तिचे दान देतात.
फल - सर्व पापनाश.
* गुडलवणदान
माघ शु. तृतीयेला गूळ व लवण यांचे दान करावे. म्हणजे गुळाने देवी व मिठाने प्रभू प्रसन्न होतात.
* रसकल्याणिनी
एक तिथीव्रत. माघ शु. तृतीयेला या व्रताचा प्रारंभ करतात. दुर्गा (ललिता) ही या व्रताची देवता होय. या व्रताचा विधी असा - प्रथम दुर्गेला मधाने व चंदनाने स्नान घालावे. नंतर त्या मूर्तीच्या उजव्या अंगाची पूजा प्रथम, नंतर डाव्या अंगाची पूजा करावी. देवीच्या निरनिराळ्या नावांनी उजव्या पायापासून मस्तकापर्यंत प्रत्येक अवयवाला नमस्कार करावा. माघापासून पुढे प्रत्येक महिन्याला मीठ, गूळ, साखर, मध, पाणक, जिरक, दही, दूध, तूप, मर्जिका, धणे यांपैकी एकेक जिन्नस वर्ज्य करावा. महिन्याच्या शेवटी वर्ज्य केलेला पदार्थ एक पात्र भरून ब्राह्मणास दान द्यावा. उद्यापनाच्या वेळी गौरीची आंगठ्याएवढी सोन्याची मूर्ती आलंकृत करून दान द्यावी.
फल - पापमुक्तता, दु:ख व रोग यांचे निवारण.