* कजरी तृतीया
भाद्रपद वद्य तृतीयेस उत्तर प्रदेशातल्या स्त्रिया कजरीची पूजा करतात. या दिवशी गहू, चणे व तांदूळ यांच्या पिठात तूप, साखर वगैरे घालून त्याचे गोड पदार्थ बनवितात. म्हणून या व्रताला हे लोक सातुडी (सत्तू = पीठ ) तीज किंवा सतवा वीज असे म्हणतात.
उ. प्रदेशात या दिवशी स्त्रिया झाडाला झूले टांगतात व त्यावर झोके घेत कजरीची गीते गातात.
* बृहद्गौरीव्रत
एक काम्य स्त्रीव्रत. भाद्रपद वद्य तृतीया ही व्रताची तिथी होय. याचा विधी असा - फळाफुलांनी युक्त असा बृहती (रिंगणी) चा वेल मुळासकट आणून तो वेळूच्या वेदीत पुरतात. त्याच्यापुढे पंचसूत्री दोरा ठेवतात. मग रात्री चंद्रोदय झाल्यानंतर पाच सुवासिनींसह त्या वेलाला गौरी मानून, त्याची पूजा करतात. पूजेनंतर तो दोरा गळ्यात बांधून चंद्राची पूजा करतात. त्याला कणकेच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात. त्यांतले अर्धे लाडू ब्राह्मणाला देतात. तसेच, कणकेची रिंगणी एवढी फळे करून त्याची वायने देतात.
पाच वर्षे उद्यापन करून त्याचे उद्यापन करतात. त्यावेळी चौसष्ट बियांनी युक्त असे रिंगणीएवढे सुवर्णफल तयार करून ते गौरीला अर्पण करतात. ब्राह्मण-सुवासिनींना भोजन घालतात.
फल - अपत्यप्राप्ती.