* आरोग्यव्रत
भाद्रपद व प्रतिपदेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत प्रतिदिनी कमलांनी अनिरुद्धमुर्तिची पूजा करावी. उद्यापनाच्या आधी तीन दिवस उपवास, होम करावा व ब्राह्मणभोजन घालावे.
फल - आरोग्य व सौंदर्य यांचा लाभ.
* महालय
मनुष्यमात्रावर देव-ऋण, ऋषि-ऋण आणि पितृ-ऋण अशी तीन ऋणे असतात, असे शास्त्रात सांगितले आहे. यांपैकी पितृऋण आपण श्राद्ध करून फेडीत असतो. कारण ज्या मातापित्यांनी आयुरारोग्याच्या आणि सुखसौभाग्याच्या अभिवृद्धीसाठी अपार कष्ट घेतले, त्यांच्या ऋणामधून अल्पांशाने तरी मुक्त होण्याचा आपण प्रयत्न नाही केला, तर आपण जन्माला येऊन व्यर्थ होय. त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी फार खर्च येतो, असेही नाही. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मृत्युतिथीला सर्वांस सहज प्राप्त होणार्या जल, तीळ, तांदूळ, कुश (दर्भ) आणि पुष्प एवढ्या साधनांनी त्यांचे श्राद्ध घालावयाचे, गोग्रास वाढावयाचा आणि यथाशक्ती एक तीन, पाच ब्राह्मणांना भोजन घालावयाचे, एवढे केल्याने आपल्या वरचा पितृऋणभार हलका होतो. म्हणून अशा सहजसाध्य होणार्या गोष्टीची आपण उपेक्षा करू नये. यासाठी ज्या महिन्याच्या त्या तिथीस आपल्या मातापितरांचा मृत्यू झाला असेल, त्या महिन्याच्या त्या तिथीस श्राद्धदी कर्म करणे, शिवाय भाद्रपद व. पक्षात (महालय पक्षात ) सुद्ध त्याच तिथीला श्राद्ध, तर्पण, गोग्रास आणि ब्राह्मणभोजनादी करणे अथवा करविणे आवश्यक आहे. हे श्राद्ध, पितृत्रयी - पिता, पितामह, प्रपितामह; मातृत्रयी - माता, पितामही, प्रपितामही, सापत्नमाता, मातामह, मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही, मातृपितामही, मातृपतिपामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य, मातुल, बंधू, आत्या, मावशी, बहीण, पितृव्य - पुत्र, जावई, बहिणीचा मुलगा, सासरा, सासू, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या उद्देशाने करायचे असते. असे केल्याने मातापितरांच्या मृत्युतिथीला मध्यान्हसमयी मुलाने पुन्हा स्नान करून श्राद्धादी कर्म करावे आणि ब्राह्मणभोजन घालून स्वत: भोजन करावे. ज्या स्त्रिला पुत्र नाही, तिने आपल्या पतीचे श्राद्ध त्या तिथीला स्वत: केले तरी चालते. भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत सोळा दिवस पितृतर्पण आणि तिथीच्या दिवशी श्राद्ध अवश्य करावे. याप्रमाणे केल्याने 'पितृव्रत' यथासांग पूर्ण होते.
या पक्षात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीय माणसांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे
'यावद् वृश्चिकदर्शनम्
म्हणजे सूर्य वृश्चिकराशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला केला तरी चालतो. महालयासाठी आप्तेष्टांनाही भोजनाचे निमंत्रण द्यावे.