१ कोकिलाव्रत :
हे व्रत आषाढ पौर्णिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत करतात. यामुळे मुख्यतः स्त्रियांना सात जन्मपर्यंत सुत, सौभाग्य, संपत्ती प्राप्त होतात. व्रतविधी असा या पौर्णिमे दिवशी सांयकांळी स्नान करुन 'मी ब्रह्मचर्य पाळून कोकिलाव्रत करीन' अशी कामना करावी. त्यानंतर श्रावण कृ. प्रतिपदेस नद, नदी, नाला, ओढा, झरा, विहीर, तलाव, सरोवर अगर आड यावर
'मम धनधान्यादिसहित सौभाग्यप्राप्तये शिवतुष्टये च कोकिलाव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प करुन भिजवून वाटलेल्या आवळ्यांत सुगंधयुक्त तिळाचे तेल मिसळून ते चोळून स्नान करावे. पुढे आठ दिवसपर्यंत याप्रमाणे स्नान झाल्यावर पिठाची कोकिळा तयार करुन गंध, फुले, फळे, धूप, दीप व तिळातांदळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखावावा आणि 'तिलस्नेहे ' या मंत्राने प्रार्थना करावी. याप्रमाणे श्रावण पौर्णिमेपर्यंत करून समाप्तीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात मृत्तिकेची कोकिळा करून तिला सुवर्णाचे पंख, रत्नाचे डोळे लावावेत आणि वस्त्रालंकारांनी विभूषित करून सासरा, सासू, ज्योतिषी , पुरोहित अगर कथावाचक याला ती भेट द्यावी. यायोगे स्त्री इहलोकी सुख भोगून शेवटी शिवलोकात जाते. या व्रतात पार्वतीचे कोकिळेच्या रूपात पूजन केले जाते.
२ गुरुपौर्णिमा :
आषाढ पौर्णिमेस 'गुरुपौर्णिमा' किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. व्यास महर्षी हे शंकराचार्यांच्या रुपाने पुन्हा अवतीर्ण झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेव्हा संन्यासी लोक त्या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात. शिष्यही त्या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करतात. पूजेचा विधी असा-
स्नानादी नित्यकर्मे आटोपून
'गुरुपरंपरासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये'
असा संकल्प करतात. एक धूत वस्त्र पुढे अंथरुन त्यावर पूर्वेकडून पश्चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा गंधाने बारा रेघा काढतात. तेच व्यासपीठ होय. मग ब्रह्मा, परापराशक्ती, व्यास, शुकदेव गौडपाद, गोविंदस्वामी व शंकराचार्य यांचे त्या व्यासपीठावर आवाहन करुन त्यांची षोडशोपचारे पूजा करतात याच दिवशी दीक्षागुरु व मातापिता यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे.
तामीळ प्रदेशात ही व्यासपूजा ज्येष्ठ पौर्णिमेस करतात. कुंभकोणम व शृंगेरी ही दक्षिण भारतातली शंकराचार्यांची प्रसिद्ध पीठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव होतो. गुरुपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु मानलेले आहे. ज्ञानाचा उगम व्यासापासून होतो, अशी भारतीयांची धारणा आहे.
३ वायुघारिणी पौर्णिमा :
आषाढ शु. १५ दिवशी सूर्यास्ताच्या वेळी गणेशादी देवतांचे पूजन करुन शंखाच्या अग्रभागी तूलिकापुष्प (रुई) लावून उभे धरतात व वार्याच्या दिशेवरून शुभाशुभ ठरवतात. अक्षय्य तृतीयेप्रमाणे या दिवशीदेखील धान्य, प्रख्यात व्यक्ती यांची तुला करून वेगवेगळ्या पिशव्यांत ठेवतात व दुसरे दिवशी पुन्हा होणार्या वजनानुसार तेजामंदी वर्तवितात.
४ विश्वदेव पूजन :
आषाढ पौर्णिमेला जर पूर्वाषाढा नक्षत्र असेल तर दहा विश्वदेवांचे पूजन करतात. त्यामुळे ते प्रसन्न होतात.
५ शिवशयनव्रत :
आषाढ पौर्णिमेला भगवान शिव जटाजूट व्यवस्थेच्या विचारात सिंहाच्या कातड्यावर झोपतात, म्हणून त्या दिवशी पूर्वविद्धा पौर्णिमा असताना शिवपूजन करून रुद्रव्रत करतात व त्यामुळे शिवलोक प्राप्त होतो.