|
न. गांवांतील बारा बतनदारांना अथवा हक्कदार कारुंना शेतांवर त्यांच्या हक्काबद्दल गांवकर्यानीं नेमून दिलेला धान्याचा , बागाइताच्या उत्पन्नाचा वांटा ; गांवकर्यांच्या गरजा भागविण्यासाठीं कारुंना कुणब्याकडून मेहनताना म्हणून मिळणारा पिकाचा वंशपरंपरागत वांटा . ( कांहीं ठिकाणीं ) पाटील कुळकर्णी इ० गांवच्या पिढीजात कामगारांचा हक्काचा वांटा . वरील बारा वतनें :- कांहीं महारबलुतीं ( मुसलमानी व मराठी राज्यांत मिळणारीं ):- सितादेवी किंवा उभ्या उसाचा भाग . वेशीवरची देणगी . शिमगीपौर्णिमेस होळीचा नैवेद्य . बेंदूर - आषाढी पौर्णिमेला धान्य . हातशेकणें = गुर्हाळावरील भट्टीचें बलुतें . मृत जनावरांचे अवशेष . घरट्टक्का . दफनाचे खड्डे खणण्याचे पैसे . खळ्यावरील दाणे . पेवाच्या तळाचे दाणे . इ० - अस्पृ ३७ . येश जय प्रताप कीर्ति । हे अयोध्येचीं बलुतीं । - वेसीस्व ६ . ६३ . [ का . बल = उजवा + कुड = देणें ; बलुता = उजव्या हाताचा हक्क म्हणून देणें ] बलुतेदार , बलोतेदार , बलुत्या , बलोत्या , बलुलौता , बलोलौता - पु . बलुत्यावर हक्क असणारा गांवचा वतनदार ; सरकारी कामगार पाटील , कुळकर्णी इ० कांहून हे भिन्न असून बारा आहेत :- १ सुतार , २ लोहार , ३ महार , ४ मांग ( ही पहिली किंवा थोरली कांस किंवा वळ . यांपैकीं तिघांचा धान्याचे चार पाचुंदे किंवा कणसासह २० पेढ्यांवर हक्क आहे व महाराचा ८ पाचुंद्यांवर हक्क आहे ), ५ कुंभार , ६ चांभार , ७ परीट , ८ न्हावी , ( ही दुसरी किंवा मधली कास किंवा वळ . या प्रत्येकाचा तीन पाचुंद्यावर हक्क आहे . ), ९ भट , १० मुलाणा , ११ गुरव , १२ कोळी ( ही तिसरी किंवा धाकटी कास किंवा वळ . या प्रत्येकास दोन पाचुंदे मिळतात ). याप्रमाणें पुढील बारा बलुते आहेत :- तेली , तांबोळी , साळी , माळी , जंगम , कळावंत , डवर्या , ठाकर , घडशी , तराळ , सोनार , चौगुला . हेहि हक्कदार आहेत ( मात्र यांचा हक्क ठराविक नाहीं ). कांहीं ठिकाणीं पुढीलप्रमाणें बलुतेदार आढळतात :- पाटील , कुळकर्णी , चौधरी , पोतदार , देशपांड्या , न्हावी , परीट , गुरव , सुतार , कुंभार , वेसकर , जोशी , यांत सुतार , लोहार , चांभार , कुंभार ही पहिली कास . न्हावी , परीट , कोळी , गुरव ही मधली कास आणि भट , मुलाणा , सोनार , मांग ही तिसरी कास होय . कोंकणांतील बलुतेदार यांहून थोडेसे निराळे आहेत ; इंदापूर परगण्यांतील बलुतेदार पुढीलप्रमाणें आढळतात :- पहिली कास - सुतार , लोहार , चांभार , महार . दुसरी कास - परीट , कुंभार , न्हावी , मांग . तिसरी कास - सोनार , मुलाणा , गुरव , जोशी , कोळी , रामोशी . एकूण १४ . पंढरपूर प्रांतांतील बलुतेदार :- थोरली वळ - महार , सुतार , लोहार , चांभार , मधली वळ - परीट , कुंभार , न्हावी , मांग . धाकटी वळ - कुळकर्णी , जोशी , गुरव , पोतदार . ग्रॅंटडफ याच्या मतानें - सुतार , लोहार , चांभार , मांग , कुंभार , न्हावी , परीट , गुरव , जोशी , भाट , मुलाणा हे बलुतेदार व सोनार , जंगम , शिंपी , कोळी , तराळ , वेसकर , माळी , डवर्यागोसावी , घडशी , रामोशी , तेली , तांबोळी , गोंधळी हे अलुतेदार आहेत . पुष्कळ जागीं महारास पहिल्या , दुसर्या किंवा तिसर्या वळींत धरतात . हल्लीं आढळणारे अलुतेदार किंवा नारु :- सोनार , मांग , शिंपी , भट , गोंधळी , कोरगू , कोतवाल , तराळ हे आहेत . तथापि अलुतेदार व बलुतेदार हे निरनिराळ्या जिल्ह्यांत वेगवेगळे आहेत ; त्यामुळें त्यांची एकवाक्यता होणें कठिण . वरील कास म्हणजे , गांव ही गाय असून तिचें पीक ही कास होय ; आणि बलुतेदार ही या गाईच्या कासेला पिणारीं वासरें . अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां । आणि प्राणु हा बलौता । म्हणोनि जागे । - ज्ञा १३ . ३४ . [ सं . बली + अपत्य = बलुत्या ? ]
|