सिद्धारुढस्वामी - प्रकरण २६

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


शार्दूलविक्रीडित

श्रीमन्नित्यनिरंजना निरघनिर्द्वद्वा सदानंदजी ।

व्योमाकार० अमंदमानसनिवासा मोह दूरवी अजी ।

कामातीत कलादि दूर विलसा चिन्मूर्ति तूं गा खरा ॥

प्रेमें चित्त सदा प्रकाशित करा हे सिद्ध योगीश्वरा ॥५२॥

तेथून निघून वाटेत भिक्षा मागत , गुराख्याबरोबर खेळ ज्याप्रमाणे सात भूमिका साधणारे योगी पहिली भूमिका मिळाल्यावर पुढील भूमिकेस जातात त्याप्रमाणे मधली पुष्कळ गावे पाहून पुढील गावी गेले . इतक्यात हिवाळा सुरु झाला . तेव्हा ज्याप्रमाणे ध्यानयोगाच्या बलाने पुष्कळ दिवसाचे पाप नाहीसे होते , त्याप्रमाणे नद्या , तळी , विहिरी वगैरे जलसंचयातील पाणी आटून गेले .

पुढे प्रारब्ध कर्माप्रमाणे , कर्मजनित देहाला प्राप्त झालेली सुखदुःखे अनुभवीत आपण असंग राहून जीवन्मुक्त सुख मिळवून जमखिंडी जवळच्या सिद्धापुर गावी आले . तेथे एक हटयोगी असा एक जंगम आपल्याला सहस्त्र जंगमांची अर्चा करावयाची आहे . तेवढे द्रव्य दिल्यास मी माझी ही स्थिती सोडीन असे म्हणून हात जमिनीवर टेकून पाय वर करुन राहिला होता . त्याला उपाशी ठेवून आपण कसे जेवावे असे म्हणून गावातले प्रमुख लोक गावाबाहेर त्याच्या भोवती जमले होते . त्याचा वहिदृष्टीचा अभिप्राय पाहून स्वामी भक्तांस म्हणाले की , त्याचे समाधान मी करितो . मग तुजकडून सहस्त्र जंगमाची अर्चा करवितो असे अवधूतांनी त्यास नमस्कार करुन सांगितले . व त्या भक्तांनीही त्यास नमस्कार घातला . मग गजम ( उलटे उभे रहाणे ) सोडून तो जंगम स्वामीजवळ आला व बसला . तेव्हा स्वामी त्याला म्हणाले जंगम जगभर आहेत , तू कोणत्या जंगमास जेवावयास घालणार ? किंवा काही मात्र जंगम आहेत ! जंगम षडूर्मिरहित आहेत म्हणतोस किंवा सहित आहेत म्हणतोस ? सहित म्हणशील तर ते पूजेला अयोग्य आहेत , व रहित म्हणशील तर नित्य तृष्त , शिवस्वरुप अशांना पूजा , नैवेद्य वगैरे काय करावयाचा आहे ? असे विचारताच त्याचे तोंड बंद झाले . तेव्हा तू दांभिकपणा दाखवून मर्यादेचा भंग केलास असे अवधूत उद्वेगाने त्यास म्हणाले . हे ऐकून जंगमाचे मन चकित झाले . स्वामीनी थोडे दूध व साखर आणवून त्या जंगमास पाजवून त्याला तृप्त करुन पाठविले व बाकीच्या लोकासही गावात परत पाठवून स्वतः ब्रह्मभावना धरुन वाटेने लागलेली गावे पहात पहात यादवाडास आले . अवधूत रुपाने गावात फिरत असता एका बाईच्या दारात भिक्षा मागण्याच्या निमित्ताने उभे राहिले . तिने आंबाड्याची भाजी भाकरीला लावून ती भाकरी वाढली . तेव्हा अवधूत म्हणाले , सर्व भागाला भाजी लागली नाही . तेव्हा हा कोणी खुळा असेल असे समजून तीच भाजी सर्व भाकरीस लावून दिली , तेव्हा भाकरी कोठून मोडावी ; मोडावयास भाकरीच नाही असे स्वामी म्हणाले . तेव्हा ती बाई हासतच घरात गेली . स्वामीही हासत हासत ब्रह्मानंदी लीन होऊन अल्लमया नावाच्या प्रसिद्ध पुराणिकाच्या घरी गेले .

अवधूताची उन्मत्त चर्या पाहून पुराणिक म्हणाले , हा पापी आहे . ह्याला आत सोडू नका . तेव्हा बळजबरीने ते आत घुसले . तेथे पुराणिक बोवा आपल्या श्रोत्यांस चनबसवेश्वर पुराणापैकी काही भागाचा अर्थ सांगत होते . ईश्वराच्या पंचवीस लीलींपैकी अंधकासुराची कथा चालली होती . त्यात उपमा अलंकाराचा एक प्रसंग आला तो असा . की - ( स्मरनसोक्कातेने यसदु दोंदु , मामरं शंकर निदि होळ ) यांत हत्ती व झाड याचा उपमान उपमेय भाव आहे , आणि मधु व मित्र या नांवाच्या दोन पक्ष्यांचे त्या झाडावर भाषण चालले आहे . त्यापैकी मधूच्या भाषणात विद्युल्लता हा शब्द आला आहे , हा विद्युल्लता शब्द झाडाला लागू आहे किंवा हत्तीला लागू आहे असे अवधूतांनी विचारले . तेव्हा ते निरुत्तर झाले . हा विद्युल्लता शब्द झाडाला लाविला तर स्थावर स्थिती रहाणार नाही व हत्तीला लाविला तर - इतक्यात पुराणिक म्हणाले हा खुळा नव्हे ही व्यक्ती निराळी आहे . असे म्हणून क्षणभर शांत राहून , पुराणिकबोवा म्हणाले , असे आहे तर हे महाभागा , ही विद्युल्लतेची उपमा कोठे दिली तर चांगली दिसेल ? तेदृहा महात्मे म्हणाले पिपिलिकेपासून हत्तीपर्यंत सर्वचर प्राण्याचे शरीरातील वृत्तिदर्पणात प्रतिबिंबित असलेला जो चिदाभास त्याला विद्युल्लता उपमेय लागते .

कसे म्हणाल तर ऐका - जशी वीज मेघाग्नीपासून उत्पन्न होऊन भू लोकातील वस्तू क्षणमात्र दाखवून लागलीच तिचे आश्रयभूत जो मेघाग्नी त्यात ऐक्य होते . तसे कूटस्थाजवळ कल्पित असलेल्या बुद्धीत चिदाभास प्रतिबिंबित होऊन चवदा अधिदेवतांनी भासणारे चौदा भौक्तिक अध्यात्म योगाने चिदाभास बहिर त्रिपुटी भासमान होताच त्याच्या आश्रयाखाली असलेल्या कूटस्थ संवित्तामध्ये ऐक्य होतो . म्हणून चिदाभासाला विद्युल्लता हे उपमान द्यावे हे योग्य आहे . दुसर्‍याला देणे अयोग्य आहे . असे सांगून अवधूतांनी आपल्या हाती असलेली भाकरी पुराणाच्या पोथीवर ठेविली . पुराणिकांनी तो महाप्रसाद मानून ती डोक्यावर ठेवून घेतली व पूर्वी तिरस्कारिलेल्या चुकीकरिता मी महापापी असे म्हणून प्रायश्चित घेऊन नंतर मी धन्य , मी धन्य झालो म्हणून पुराणिकबोवा हात जोडून ब्रह्मनिष्ठ अशा गुरुंच्या चरणारविंदी नमस्कार करुन म्हणाला की , मी काशीस जातो , परवानगी असावी . अवधूत म्हणाले , काशीला गेलेले परत येत नाहीत ! तू का जातोस ? मी जातो खरा ; अवश्य जा , पुनः माघारी येऊ नको ! असा त्याला आशीर्वाद दिला . पुढे काकतालीय न्यायाने अवधूतांनी सांगितल्याप्रमाणे पुराणिक काशीतच मरण पावले .

नंतर अवधूत बाजार सोडून पुढे चालू लागले तो किल्ल्याजवळ येईपर्यंत रात्र झाली व अंधार पडला . तिकडून जमादार शिपायाला घेऊन येत होते व चोराचा तपास चालला होता . इतक्यात त्यांनी अवधूताला पाहिले व कोण म्हणून विचारिले . हे काही बोलेनात . तेव्हा हाच चोर असे समजून शिपायाकडून त्याला मारविले . इतक्यात दैववशात दोन गृहस्थ तेथे येऊन सांगू लागले की , हा भिक्षुक आहे याला मारु नका , तेव्हा त्यांनी त्याला सोडून दिले , व गावाबाहेर हाकून देण्यास सांगितले . शिपायांनी ही तसेच केले . पुढे अवधूत अर्धामैल गेल्यावर मारुतीच्या एका ओसाड देवळात जाऊन पडले . इतक्यात अवधूताला जमादाराने मारिले हे पुराणिकांसह सर्व भक्तांना समजले . तेव्हा ते तपाल करी करीत तिकडे गेले . अवधूत आपल्याशीच विचार करीत होते की अशा प्रकारचे दुःख बल्लारीस झाले होते पण त्या पेक्षा हे कमी आहे . ती गोष्ट अशी की , कौल बाजारात चित्तुर हणमंत शट्टी यांच्या दारात हे भिक्षेसाठी उभे राहिले तेव्हा दरवाजा राखणारा शिपाई बडेसाब याने तू कोण असे त्यांना विचारिले . सिद्धारुढ काही बोलले नाहीत . या करिता परवा एका सावकाराच्या घरी दरवडा घातला व आज ह्या सावकाराचे घराची टेहळणी करितोस काय ? असे म्हणून पाचवे पायरीवर असलेल्या अवधूताला त्याने लाथ मारुन खाली ढकलून दिले . रक्त निघण्यासारखी जखम गुढघ्याला झाली व सर्वांग खरचटले . त्या मानाने आजचे दुःख काहीच नाही . इतक्यात गावचे बरेच लोक जमले व ते सर्वजण प्रार्थना करु लागले की , गावात चला . अवधूतांनी पुनः परत येण्याचे नाकारिले तेव्हा लोकांनी तेथेच भोजनाचे ताट आणून त्यांना जेवावयास घातले व शेष प्रसाद सर्वांनी ग्रहण करुन ती रात्र तेथेच ब्रह्मभावनेत आनंदात घालवून सकाळी सर्व गावात निघून गेले व अवधूत पुढे चालते झाले .

शिखरिणी

जयाच्या अंताते करु न शकती काल जन ही ।

सदा जो पूर्णत्वे सुखमय रमे लोकह्रदयी ॥

मतीपासूनी तू दूर अससि ऐसें समजुनी ।

ठसों सिद्धारुढा अचल तव मूर्ती मम मनी ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP