सिद्धारुढस्वामी - प्रकरण ३

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


पंचचामर

कुमार साच मंदहास्य उज्ज्वलीत बाल हा ।

उपासना करी कृपा कटाक्ष मंत्रयुक्त हा ॥

सुभाषणा करुनि बालकांसि तोषवीत हा ।

जनांस तोच रक्षुं मोह दंभ वारुनी महा ॥४॥

पुढे थोड्या दिवसांनी सिद्धाने मुलांना सांगितले की , ह्या भीमाच्या बागेत जांभळे पडलेली असतात ती खावयास जाऊ . तेव्हा मुलांना संतोष झाला . सिद्ध सर्वांच्या पुढे मोठ्या झपाट्याने जाऊ लागला मुले त्याच्याबरोबर पळू लागली . तरी तो सर्वांच्या पुढेच ! तेव्हा एकजण म्हणाला , अर , तुला काय वारा वश झाला की काय ? किंवा तू मनोवेगाने जातोस काय ? आहे तरी काय मला सांग . सिद्ध म्हणाला , तुम्ही वायूचे उपासक असता तर तुम्हाला शीघ्रगमनाचे सामर्थ्य आले असते , किंवा मन स्वाधीन ठेवणार्‍या देवाचे ध्यान मनाच्या वेगापेक्षा त्वरित गमनसामर्थ्य देईल . असे त्याचे बोलणे ऐकून मुले म्हणाली की , तुला तसे सामर्थ्य आहे खरे ! पण आम्ही तुझ्यासारखी शक्ती कशी मिळवावी ? याकरिता सावकाश चल . इतक्यात ती बागेजवळ पोचली आणि तेथे पडलेली जांभळे वेचून खाऊ लागली . इतक्यात सिद्धाने विचार केला की हे मायेने मोहित झाले आहेत , ह्याची भ्रांती घालविण्याकरिता एखादी मौज करावी . म्हणून त्याने एक जांभूळ हातात घेऊन खाली फेकले ; तो तेथे जांभुळाची मोठी रास झाली . तो पाहून सिद्धाच्या कृतीचे त्यांना आश्चर्य वाटले व त्यांनी ती जांभळे यथास्थित खाल्ली व पाहिजे तितकी आपल्या धोतरात बांधून घेतली ; आणि म्हणाली ही रास कोणी केली ? आम्ही आलो तेव्हा येथे काही नव्हते . तेव्हा हा परमेश्वराचा महिमा . दुसरे काय ?

इतक्यात सिद्ध म्हणाला , तुम्ही ही फळांची रास पाहून वाटेल तितकी खाल्ली , पाहिजे तितकी बांधून घेतली . पण ही रास कोणी दिली त्या सर्व जगदव्यापक ईश्वराचे उपकार मानलेत काय ? त्याचे उपकार कसे फेडाल ? तेव्हा मुले म्हणाली तर मग ही फळे इथेच टाकून जाऊ ? सिद्ध म्हणाला फळे मात्र टाकता पण देवाने दिलेले डोळे कसे टाकाल ! एक वेळ नेत्र झाकता येतील पण देहासंबंधी सर्व अवयवांचा अभिमान सोडणे फार कठीण आहे . म्हणून अभिमान सोडाल तर सहजच सर्व त्यागाचे फळ मिळल . पण त्याग करावयाचा म्हटले तर देवाचे ध्यान केले पाहिजे व मग आत्मज्ञान झाल्यावर अभिमान त्याग होईल . इतर उपायांनी होणार नाही . आता आणखी जांभळे पाहिजेत काय ? तेव्हा मुले म्हणाली - आनंद झाला . नंतर सर्वजण निघाले तो वाटेत एक साप मेल्यासारखा पडला होता . तो पाहून मुले भयभीत होऊन पळू लागली ; पण सिद्ध म्हणू लागला की , हे काय ? हे मन आदिकरुन सर्व शरीर ईश्वराचे अवयव होतात ; म्हणून तुम्हास वरचेवर उपदेश करीत असता ईश्वराचे भूषण असलेला हा साप पाहून भयग्रस्त होऊन कोठवर पळाल . देव सर्व दिशांकडे सर्व प्राण्यांत भरला आहे , असे म्हणून लागलेच मुलांना आपल्याजवळ बोलावून धैर्य देऊन म्हणाला - या सर्पाला तुम्ही भिऊ नका . कारण साक्षात ईश्वराच्या जटामुकटाचा अलंकार असा हा सर्प आमच्या भक्तीची परीक्षा पहाण्याकरिताच निर्जीव माणसासारखा पडून आमचा विश्वास कसा आहे हे पहात असेल . या करिता हा देवच असे समजून याला नमस्कार करा . म्हणजे हा सजीव होऊन वाट सोडून जाईल . असा उपदेश ऐकिल्यावर मुले सिद्धाच्या वाक्यावर विश्वास ठेवून हात जोडून उभी राहिली . तेव्हा तो सर्प जिवंत होऊन रस्ता सोडून निघून गेला ! ते पाहून मुलांना फार आनंद झाला व मोठमोठ्याने ‘ ॐ नमः शिवाय ’ असा मंत्रघोष ती करु लागली . तो मंत्रघोष ऐकून गावातील लोक येऊन विचारु लागले तेव्हां मुलांनी सर्व वृत्तांत त्यांना सांगितला . तेव्हा आश्वर्यमोहित होऊन ते लोक ह्या सिद्धाची पूजा केल्यास सार्थक होईल असा विश्वास धरुन , साष्टांग नमस्कार घालून सिद्धाचा जयजयकार करीत घराकडे गेले .

भुगंगप्रयात

सदा सर्वसाक्षी सदा सर्वकर्ता । सदा सर्वव्यापी असे सर्वज्ञाता ।

सदातर्क्य जो हा पुनः सर्वभोगी । ह्रदब्जीं वसो तो गुरु सिद्ध योगी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP