सिद्धारुढस्वामी - प्रकरण २५

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


द्रुतविलंबित

मदविवर्जित भक्त करुनियां । सहज तारिसि तूं मुददातया ॥

कुमददायक या धन संपदे । सदय आरुढ नासुनि मुक्ति दे ॥४९॥

नंतर मोहरमचा सण आला - तेव्हा काही पुंड एका लाकडावर अवधूतास बसवून , इकडून तिकडे , तिकडून इकडे नाचवीत प्रत्येक दुकानापुढे पैसा मागत पैसा मिळाल्यावर खाली उतरवून फराळ करवून पाणी पाजवून पुनः पहिल्याप्रमाणे फिरवीत . याप्रमाणे सबंध दिवस आणि रात्र घालविली . काठीवर बसल्यामुळे मांड्या पोटर्‍या वगैर दुखू लागल्या , फिरविण्यास सुद्धा येईनात . तेव्हा त्याच मशिदीत पडून राहून म्हणतात देवाने हा एका जागी उपकारच केला . कारण फिरण्याने मनाला विक्षेप झाला होता , तो एका जागी बसल्यामुळे जाऊन निर्विकल्प समाधीस उत्तम झाले . या प्रमाणे काही दिवस गेल्यावर तेथेही मुले येऊ लागली . तेव्हा त्यांच्याबरोबर चेंडू , इटीदांडू , भोवरा फिरविणे , पतंग करुन उडविणे , व दुसर्‍यास तयार करुन देणे , यात कालक्रमणा करीत असता ही गोष्ट पुष्कळ मुलांस समजल्यामुळे ती तेथे जमू लागली .

ही हकीकत समजल्यावर तुळजापा नावाचा एक भाविक गृहस्थ येऊन स्वामींचे दर्शन घेऊन म्हणाला की या महात्म्याचे , दर्शन , नमन , स्पर्श , सेवा , सत्कार करणार्‍याचे जन्म सफळ होतील असे मनात आणून मुलांना म्हणाला की याला खेळत खेळत आमच्या गल्लीकडे आणल्यास तुम्हाला फुटाणे व गूळ देईन , तेव्हा दहावीस मुलांनी चेंडूचा खेळ सुरु करुन अवधूताला बोलावून त्याला मध्ये घालून त्या गल्लीकडे पळत , चेंडू फेकीत , तुळजापाच्या घराजवळ नेले . तेव्हा त्याने बाहेर येऊन या राजयोग्याला हात धरुन घरात आणून एका खोलीत बसवून दरवाजा लावला व कबूल केल्याप्रमाणे मुलांना फुटाणे वगैरे दिले . नंतर गल्लीतील काही भक्तांना बोलावून स्वामींना बाहेर आणून क्षौर करवून अभ्यंग स्नान घालून उत्तम पक्वान्नाचे जेवण घालून निजविले . नंतर दररोज रात्री सर्व भक्त जमून सर्वजण अधिकाराप्रमाणे पश्नोत्तरे करीत , भजन पूजन वगैरे चाले . अशा रीतीने काही दिवस गेले . पुढे पुष्कळ लोक दर्शनास येऊ लागले .

नंतर अवधूत तुळजापाला म्हणू लागले की आपल्या मनास येईल , त्याप्रमाणे आकाशात उडणार्‍या पक्ष्यास पिंजर्‍यात घातल्याप्रमाणे मला ह्या घरात बंदीखान्यात घातले आहे , तेव्हा माझे मन इथे रमत नाही म्हणून मला त्या मशिदीत पोचीव . असे म्हणताच त्याना तेथे नेऊन पोचविले . नंतर ब्राह्मण , वकील , मामलेदार , फौजदार वगैरे गृहस्थ ह्या माहात्म्याची हकीकत ऐकून रात्री त्याच्या दर्शनास जाऊ लागले . ते ऐकून प्रथम ज्यानी पीडा दिली होती , तेही तेथे येऊ लागले . घरात बायका मुलास रोग वगैरे झाल्यास अवधूतास बोलावून नेऊन डोक्यावर हात ठेवून येऊ लागले . याप्रमाणे काही दिवस तेथे काळक्रमणा केली .

पुढे काही दिवसांनी अठरा पगड जातीचे लोक जमून आपआपली जात श्रेष्ठ व आपआपला वर्णाश्रम धर्म श्रेष्ठ म्हणून स्वामीपुढे वादविवाद करु लागले ; तेव्हा स्वामी म्हणाले ; सर्वाचा देव एकच दोन नाहीत , ह्या देवाचे गावास जावयाचे असल्यास अनेक मार्गानी जाता येते . पुष्कळ रस्ते एकाच गावास जातात , त्याप्रमाणे देवाचे करुणासाध्य सर्व जातीला एकच आहे . तथास्तू . असे म्हणून सर्व लोक स्वामीस नमस्कार करुन आपआपल्या घरी गेले .

याप्रमाणे काही दिवस गेल्यावर पुनः गावातील भक्त लोकांनी तुम्ही जाऊ नका , आम्हासारख्या पापी लोकांना नित्य दर्शन देऊन आमचा उद्धार करावा , असे म्हणताच स्वामी म्हणाले , ह्या प्रांताला पुढे दुष्काळ पडावयाचा आहे व तुम्हाला अन्नाचे तापत्रय येईल . ते मला पहावणार नाही . तेव्हा एक पाहिजे म्हणून त्याने त्यास विचारले . तेव्हा ईश्वराचा क्षोभ कोणाकडूनही निवारण होणार नाही ; नळ , हरिश्चंद्र , रामचंद्र , धर्मराज वगैरे महापुरुष व मोठमोठे राजे यांनाही तो निवारण करिता आला नाही ; आमच्यासारख्याकडून काय होणार ! ! आम्ही स्वच्छंदाने वाटेल तिकडे फिरणारे , आम्हाला तीनही लोक सारखेच . असे म्हणून ते निर्विकल्प समाधीत राहिले व जमलेले सर्व लोक आपापले घरी गेले , तेव्हा सिद्धारुढ तोरवीकडे चालते झाले .

मालिनी

श्रुति मति नयनाला तूं न हो ज्ञात बा गा ।

म्हणउनि करिती हे भक्त चिंता बहू गा ॥

परि श्रुति उपदेशा देउनी या जनाला ।

अरुढ यति असे हें नाम घेसी स्वताला ॥५०॥

पंचचामर

शिवस्वरुप घेऊनीच मन्मथास जाळिसी ।

परी मना न जाळिलेंस तूं म्हणून जन्मसी ।

तुला स्वरुपविस्मृती नसे परी जना असे ।

मनास जाळ आरुढा करी न जन्म येईसे ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP