सिद्धारुढस्वामी - प्रकरण ४

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


पंचचामर

परीस स्पर्श होय तोंच लोह स्वर्ण होतसे ।

गुरु , जनास लोह कल्पुनी सुबोध देतसे ॥

जई शिवें सुबोध वाक्य हा परीस येउनी ।

तईच जाय जीव लोह ब्रह्मस्वर्ण होउनी ॥६॥

पुढे काही दिवसांनी श्रीवीरभद्रस्वामी , गुरुशांतप्पाला व देव मल्लम्माला जवळ बसवून घेऊन कूडलसंगम देवाच्या वचनापैकी वैराग्यप्रकरणाचा बोध करीत असता ‘ भूमी सपाट होईल , मेरु पतन पावेल , आकाशादि पचमहाभूतांचा नाश होईल , स्वर्गादिलोक लोकांतराचा प्रलय होईल , ’ असे आहे तरी ह्या भूलोकांतच ? हे मूढ लोक असून हा देह मीच असे समजून भ्रांत मनाने सुख मिळेल म्हणून खटपट करितात . हे सांगितलेले वचन ऐकून सिद्ध गुरुला म्हणाले , पूर्ण आकाश कसे नाश पावते ते सांगा . तेव्हा गुरु म्हणाले , जाणत्या गुरुकडून समजून घे . तेव्हा बरे तर मी जाणत्या गुरुचा तपास करीन असे म्हणून दुसर्‍या दिवशी सिद्ध गुरुचा शोध करण्याकरिता प्रवासास निघाले . तेव्हा त्यांचे अत्यंत आवडते असे सोम व भीम या नावाचे मित्र होते . ते त्याजकडे येऊन म्हणाले की हे महात्म्या तू एवढ्या लहान वयात कसा बाहेर पडतोस ! तेव्हा सिद्ध म्हणतो ; जर सर्व तार्किक मिथ्या आहे तर हे शरीर असेपर्यंतच नित्यवस्तूचा शोध केला पाहिजे नाहीतर मनुष्य जन्म मिळून व्यर्थ होय . या करिता बाळपणातच सर्वसंगपरित्याग करुन गुरुचा शोध केला पाहिजे . कारण पुढे यौवनकालात कामक्रोध हे रिपू येऊन , नित्यवस्तूचे ज्ञान होऊ देत नाहीत . तसेच वृद्धापकाळीही ज्ञान होत नाही . कारण मन भ्रांत होऊन स्मरण रहात नाही - याकरिता आताच गुरुचा तपास करण्याकरिता , प्रवासास निघावयाचे आहे . असे आहे तर आम्ही दोघेही तुझ्याबरोबर येतो , असे ते म्हणाले . सिद्ध म्हणाला , ठीक आहे चला ; नंतर तीन कोसांवर असलेल्या एका गावी ते तिघेजण गेले . दोनप्रहर झाल्यावर , भीम व सोम यांना भूक लागली व ते म्हणाले , या गावात आम्हाला जेवावयास कोण घालील ? तेव्हा सिद्ध म्हणाले , तुम्हास षड्रसान्न भोजन पाहिजे , परमात्म्याचे ध्यानाची वगैरे गोडी नाही . तुम्ही परमात्म्याचे ध्यान करा . म्हणजे तहान -भूक नाहीशी होऊन , माझ्याप्रमाणे तुम्हाला शांतिसुख मिळेल . या माझ्या शांतिसुखाचा अनुभव तुम्हांला नसल्यामुळे , तुम्ही अन्नाची इच्छा करिता ! ते दोघे म्हणाले , बरे . बरे तू सांगितलेले आम्हाला समजत नाही . भुकेच्या वेळी अन्न मिळाले तरच शांती होऊन प्राण रहातील ; कारण ‘ अन्नमय प्राण ’ अशी पाराशरश्रुती आहे ; व प्राणद्वारा मनः -शांती , नंतर ध्यान , ज्ञान वगैरे होतात . सिद्ध म्हणाले , इतके तात्त्विकज्ञान असून शिवाचे ध्यान करणे का विसरता ? भुकेच्या अग्निस्थानी मन असल्यामुळे असे दुःख होते . हा ताप सहज दूर होणारा नव्हे ; याकरिता ह्याचा पालट करण्याला ध्यान हेच साधन होय . अन्नादी उपायांनी एक घटकाभर मात्र शांती येते . पूर्णताप -शांती होत नाही . पण ध्यानाने त्रिकाल -तापशांती होईल . कशी ती पहा . ध्यान करणारा प्राणी रेचक , पूरक , ह्या नाडीकडे लक्ष न देता आनंदनाडीत कुंभकाचा समावेश करुन प्राण्याचे चलन करीत नाही , प्राणाचे चलन झाल्याशिवाय अग्नीची वृद्धी होत नाही . तो वृद्धी पावला नाही तर क्षुधातृषादीताप अन्नावाचून शमतात . हा क्षुधातृषादीताप नाहीसा झाल्यावर मनाच्या आधिव्याधि नाहीशा होतात . ह्या आधि , व्याधी नाहीशा झाल्यावर मनाच्या आधिव्याधी नाहीशा होतात . ह्या आधि , व्याधी नाहीशा झाल्यावर पुष्टी , तुष्टी कांती ह्या स्थूलदेहाला व शांती मनाला प्राप्त होतात . हे मर्म न समजल्यामुळे भुकेने शरीर कळवळते . हे योग्य नाही . ह्या प्रमाणे उपदेशाने भरलेले सिद्धाचे भाषण ऐकून असे आहे तर आपण दुसरे गावास जाऊ असे ते म्हणाले . सिद्ध म्हणाले नळदुर्गास जाऊ , अथवा सदाशिव पेठेस जाऊ ? भीम म्हणाला नळदुर्ग दूर आहे . सदाशिव पेठेसच जाऊ . दोन कोस चालत जाऊन ते सदाशिव पेठेस गेले . वाटेने दमल्यामुळे सोम व भीम विसावा घेण्याकरिता वृषभेश्वराच्या देवळात बसले व सिद्ध हे नंदिकेश्वरावर बसले . इतक्यात पुजारी पूजा करण्याकरिता आला व सात वर्षाचे पोर देवावर बसलेले पाहून त्याला फार राग आला . आणि म्हणाला . अरे , तुझी भक्ती काय पाण्यात बुडाली काय , काय झाले तरी काय ? हे ऐकून न भीता वीज गडगडली तरी आकाश जसे शांत रहाते तसे किंवा युद्धाचा दणदणाट चालला असता पृथ्वी जशी शांत रहाते तसे शांतपणे सिद्ध म्हणाले . माझी भक्ती पाण्यात बुडाली नाही तर देवावरच ठेविली आहे . हे भाषण ऐकून पुजारी फार रागावला व तू टीचभर नाहीस तर देवावर बसून आणखी गोष्ट सांगतोस . तुला लाज वाटते ? सिद्ध म्हणाले बाबा तूच सांग की बसणारा मोठा की बसविणारा मोठा ? ह्या वाक्याला काय उत्तर द्यावे हे न समजल्यामुळे त्याने गावात जाऊन काही मनुष्यांना बोलावून आणिले . तेही त्या मूर्ख पुजार्‍याप्रमाणेच रागावले व त्या पैकी एकजण त्या मुलास मारावयास गेला . तो त्याचा हात चौकटीस आपटून त्यातून रक्त निघू लागले . नंतर त्यापैकी एकाने त्या मुलाला विचारिले तू देवावर का बसलास ? मूर्ख लोक स्थावर बुद्धीने पूजा करितात . म्हणून त्यांना पुण्य लागत नाही ! या करिता मी त्याची प्राण -प्रतिष्ठा करतो . हे ऐकून हे बोलणे सामान्य नव्हे . महावाक्य केवळ मंत्र असे समजून सर्वजण चकित झाले व मोठ्या भक्तिभावाने नमस्कार करुन मंगलस्नान घालून पूजा करुन त्यांनी त्याचा आदर सत्कार केला . नंतर जातेवेळी त्यांना उपदेश केला की , स्थावरपूजेपेक्षा महात्म्याची पूजा श्रेष्ठ आहे कारण परमात्म्याचे मुखच महात्म्याचे मुख होय . म्हणून महात्म्याच्या मुखावाचून परमात्म्याचे शांतीला दुसरे द्वार नाही . हे कशावरुन म्हणाल , तर गर्भाच्या शांतीला आईचे मुख हेच द्वार आहे . दुसरे नाही ; त्याप्रमाणेच हे समजा . नंतर तो गृहस्थ मी आजपर्यंत बसवेश्वराची पूजा केली त्याचे हे फळ असे मानून धन्य झाला .

आर्या

अज्ञान पिशाच्चाने संसारीं मूढ फार त्रासविले ।

सद्वोधामृतमंत्रें सिद्ध गुरुनेंच त्यांस सोडविले ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP