सिद्धारुढस्वामी - प्रकरण ५

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


वसंततिलका

तो कल्पवृक्ष भजकां फळ कल्पितां दे ।

ती कामधेनु फल इच्छित कामुका दे ॥

चिंतामणी फल हि चिंतनकास देई ।

स्वानंद सौख्य गुरुसिद्ध अनिच्छ देई ॥८॥

तेथून निघाल्यावर पुढील गावास जातेवेळी एका कोसावरच दिवस मावळला . तेव्हा भीम भिऊ लागला व आता काय करावे ! आम्हाला तू कोठे घेऊन जातोस ? असे म्हणाला . तेव्हा सिद्ध म्हणाले , दुःख करु नकोस . देव आहे , तो ज्या मार्गाने नेईल त्या मार्गाने जाऊ . इतक्यात सोमाच्या पायात काटा मोडला . हा कोण त्रास ! मी तुझ्याबरोबर आलो नसतो तर बरे ; आलो , आता उपाय नाही . इतक्यात अंधार पडला व थोडासा पाऊसही पडला ; आणि त्यांना मार्गात एक देऊळ दिसले . त्याचा रस्ता सोडून ते दुसरे बाजूस गाव होता , त्या बाजूस वळले . तिकडे रानडुकरे व रानातले इतर प्राणी ओरडत होते . त्यांच्या कलकलाटाने मुले आधीच गर्भगळित झाली होती ; इतक्यात सोमाचा पाय निसटून तो खाली पडला . तेव्हा सिद्ध म्हणाले , तुम्ही गुरुकृपा करुन घेण्याकरिता बाहेर पडला , पण त्याला विसरुन देहभावाकडेच लक्ष देऊ लागला , यामुळे हे दुःख होत आहे . हे देहभावाचे दुःख आता एक घटकेत नाहीसे होईल , असे समजा . कारण ही भ्रांती फार जन्मांच्या प्रवाहाने वहात आली आहे व ही भ्रांती जन्मप्रवाह संपेपर्यंत राहणार . यामुळेच त्रिकालबाधा होते . ह्या भ्रांतीचा नाश होण्याकरिता उपाय केला पाहिजे . पण गुरुचा शोध करण्याकरिता निघालेल्या आम्हास अंतर्यामी असलेल्या गुरुदेवाने हे दुःख उत्पन्न केले कारण आम्हांला देहाचा मोह सुटावा व वैराग्य उत्पन्न व्हावे म्हणून ही संकट येतात . ही जर आम्ही सहन केली नाहीत , तर अंतर्यामी असलेला गुरुदेव आमचे सत्य पहाण्याकरिता दुःखकारक जन्म देऊन परिहार करील . जे आरंभी दुःखदायक असते , ते परिणामी सुखकारक होते . जे प्रथम सुखदायक असते , ते अंती दुःखदायक होते . ते कसे ते पहा . विषय प्रथम सुखदायक असतात . पण शेवटी मरणाच्यावेळी दुःखदायक होतात ; व विषयांबद्दलचे वैराग्य प्रथम दुःखदायक असते , पण शेवटी जन्ममरण चुकवून ब्रह्मानंद देणारे होते . असे सांगितल्यानंतर मुले म्हणाली , तू केलेला उपदेश बहिर्मुख असलेल्या आम्हाला योग्य नव्हे . अंतर्मुख झालेल्या जितेद्रिय महात्म्याला उपयोगी आहे . आता या गावात जाण्याचा रस्ता आम्हाला दाखीव . सिद्ध म्हणाला , तुमचा देव गावच काय ? असे असेल तर हा गाव पहा . असे म्हणून एक दिवा दाखविला , व ते त्या दिव्याच्या धोरणाने जाऊ लागले . थोड्या अंतरावर गावाबाहेरचे एक पडके देवालय दिसले . तेथे जाऊन ते बसले ; इतक्यात जोराचा पाऊस पडू लागला व देवळाचा काही भाग पडल्याचा आवाज झाला . तो ऐकून सोम म्हणाला , असल्या पडक्या ठिकाणी आम्हाला का घेऊन आलास ? आम्ही जिवंत राहू की नाही याचा भरंवसा वाटत नाही . हे ऐकून सिद्ध म्हणाले गाव पाहिजे म्हणाला ; गाव मिळाले . तरी सुख नाहीच ! थोडीशी इच्छा पुरती झाली , तरी मनुष्याला सुख होत नाही ; कारण मन आणखी दुसरीकडे जाते , ते थांबविण्याचा उपाय करावा . ही गोष्ट होईपर्यंत अपरात्र झाली ; नंतर पाऊस थांबला . तेव्हा , त्या दोघांना फार भूक लागली होती व आता काय करावे या विवंचनेत ते आहेत . इतक्यात भीम म्हणाला , आता भिक्षेला जाऊ . सोमाने त्याला अनुमोदन दिले व चांगला उपाय काढलास असे म्हणाला . सिद्ध स्वस्थ निजले ; तेव्हा आपण दोघेच जाऊ , असा विचार करुन ते गावात शिरले . कुत्री भुंकून आंगावर येऊ लागली ; तेव्हा पळत पळत ते एका छपरात दडून राहिले . तो घरचा मालक उठला व म्हणाला , अरे चोरांनो ! काल माझे म्हशीचे रेडकू चोरुन नेलेत व आज काय नुकसान करावयाचा तुमचा इरादा आहे ? तेव्हा ते म्हणाले , आम्ही चोर नव्हे दादा ; भिकारी आहो . आम्हाला काही तरी अन्न घाला . तेव्हा तुम्हाला कपाळमोक्ष भिक्षा घालतो , असे म्हणून , मालक सोटा आणावयास आत गेला . तेव्हा ते दोघेही पळून दुसर्‍या गल्लीत गेले ; इतक्यात समोरुन दोन गस्तवाले धावत आले व ह्यांना धरुन म्हणाले , आमच्या गावाचा नाश करणारे हेच दिसतात . लहान मुलाप्रमाणे आहेत , पण ह्यांच्या मागे कोणीतरी मोठा मनुष्य असेल . असे म्हणून त्यांना चावडीस चला म्हणजे तुम्हास योग्य प्रायश्चित मिळेल असे म्हणाले . ते ऐकताच दोघेही आम्ही तसली कामे करणारे नाही , बाबा तू मुलाबाळाचा असशील , आम्हावर दया कर , आम्हाला थोडेसे अन्न दे . असे म्हणाले . तेव्हा एक गस्ती म्हणाला , तुमच्या अंगावर चांगली वस्त्रे दिसतात मग भीक का मागता ! तेव्हां मुले म्हणाली , आम्ही वाट चुकलो महाराज . तेव्हा तळवार म्हणाला , आता अपरात्री गावात न फिरता त्या पडक्या देवळात जाऊन निजा व सकाळी चालते व्हा . त्यांना सोडले तर पुरे असे झाले होते . लागलेच ते सिद्धाजवळ आले व त्यांनी झालेले वर्तमान त्याला कळविले . तेव्हा सिद्ध म्हणाला , अरेरे , तुम्हास फार दुःख झाले . तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवीत नाही व अन्नाची इच्छा करिता त्यामुळे तुम्हाला अन्न तर मिळत नाही , पण दुःख मात्र मिळते . ‘ न मागे तयाची रमा होय दासी ’ हे ध्यानात ठेवा , मी शिवध्यानतत्पर असल्यामुळे तुम्ही जाताच एका पुजार्‍याने देवाला नैवेद्य आणून ठेविला . तो नैवेद्य घेऊन मी तुमची वाट पहात बसलो आहे . नंतर त्या दोघांनी कपाळ बडवून घेऊन ‘ त्राहि त्राहि ’ म्हणून प्रायश्चित घेतल्यावर सिद्धाने त्याला देवापुढील नैवेद्य दाखविला . मग तिघांनीही पड्रसान्न सात्त्विक आहार घेतल्यावर तेथेच खोज्यात असलेले पाणी पिऊन ते निजले . त्या वेळी भीम म्हणाला , घरुन येऊन फार दिवस झाले . सोमही म्हणाला , मला घरी जावेसे वाटते . तेव्हा सिद्धाने सांगितले , तुमची मने गुरुचा शोध करण्यास तयार झाली नाहीत . याकरिता तुम्ही घरी जा . तेव्हा ते दोघेही परत फिरले व तू गुरुशोधनाच्या अधिकारास योग्य आहेस , त्याचा तपास करुन धन्य हो , असा आशीर्वाद देऊन चालते झाले .

मालिनी

कुणि जन तुज नेत्रीं पाहुनी धन्य झाले ।

कुणि पदकमलांते आठवूनी निमाले ॥

पुलकित तनु झाले स्वस्वरुपा बघून ।

स्मरण नच डरे तै द्वैत भ्रांती हरुन ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP