शुकाष्टक - श्लोक ७

श्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.


कार्याकार्ये किमपि सततं नैव कर्तुत्वमस्ति ।

जीवन्मुक्तः स्थितिरिह मृतो दग्धवस्त्रा - वभासः ।

एवं देहे प्रविलयगते तिष्ठ - मानो विमुक्तो ।

निस्त्रैगुण्ये पथि विचारतां को विधिः को निषेधः ॥७॥

ऐसिया ब्रह्मयुक्ता । कार्याकार्यकर्तव्यता । करणें नाहीं सर्वथा । कवणे काळीं ॥९७॥

सर्व कर्में देहीं । निपजती परी कर्ता नाहीं । कर्मी ब्रह्म पाहीं । स्फुरत प्रतीति ॥९८॥

त्या स्वात्मप्रतीतीप्रमाणें । तेणें जें जें कर्म करणें । तें कर्मचि ब्रह्मपणें । उभें ठाके ॥९९॥

जळावरी लहरी । चंचळ निश्चळ कर्म करी । तेथें कर्मकर्त्यामाझारीं । जळचि जैसें ॥३००॥

एवं आत्मप्रतीति । वेगळे नुरेचि कर्मस्थिती । यालागीं करुनि अकर्तृत्वी । बैसणे नित्य ॥१॥

उगवलिया रजनीकार । भरितें उलथे सागर । अमृत सेविती चकोर । सोमकांत द्रवती ॥२॥

कुमुदें विकसती । संतप्त विश्रांती । इतकें करुनि रजनीपती । अकर्ता स्वयें ॥३॥

तेवीं सकळ इंद्रिय वृत्ती । आत्मसत्ता प्रवर्तती । तर्‍ही कर्तृत्वमस्ति । आत्म्याप्रती असेना ॥४॥

ऐसिया पूर्ण प्रतीति । ठेली कर्माकर्म गती । ह्नणोनि कर्तृत्वमस्ति । नाही तया ॥५॥

दिसे एकदेशी देही । परी तो व्यापकु सर्व पाही । जो कूटस्थाच्या ठाईं । सनातनू जाला ॥६॥

घटीं दिसे घटाकाश । परी तेंचि सर्व दिवशी सावकाश । तेवीं एकदेशीं दिसे वास । परी तोचि सर्व देशीं निवासी ॥७॥

यालागीं तो जीवन्मुक्तु । देहीं असोनि देहातीतु । देखण्यामाजी दिसतु । राहे देही ॥८॥

प्रदीप्त वस्त्रांची घडी । दिसे परी आगि रोकडी । तया देह हे गोष्टी कुडी । देखें मिथ्या ॥९॥

तैसा ब्रह्मा वेगळा न होता । वर्ते ब्रह्माचिया सत्ता । ह्नणोनि जीवन्मुक्तता । बोलाची आख्या ॥३१०॥

जैसा खैराचा खुंटू । जळोनि दिसे लखलखीत निटु । परी पुर्विल्या ऐसा हळुवटु । नधरवे हातीं ॥११॥

यापरी देहातीतु । होऊनी देहीं तिष्ठतु । तोचि जीवन्मुक्त । मुक्तीवरीलकळसु ॥१२॥

त्या त्रिगुण मोहनी । जो जाळितु स्नेह सुरालागुनी । विधिनिषेध घूम करुनी । धरठल्या बुद्धी ॥१३॥

ज्या ज्वाळाच्या शिखा । करपविती सत्यलोकनायका । मा इंद्रादि जीवाचा लेखा । कवण पां ॥१४॥

ऐसिया त्रिगुणअनिळा । देहात्मकाष्ठाचा जिव्हाळा । तो तोडुनी जाळावया ज्वाळा । पुढें इंधन नाहीं ॥१५॥

मग तो जेथील तेथें । त्रासिला कूटस्थवातें । तयावरी अवचितें । स्वानंदमेघ वरुषे ॥१६॥

तेव्हां त्रिगुणताप जाये । विधिनिषेध धूम्र राहे । मग सुशीतळ प्रकट होये । चिदानंद बोलावा ॥१७॥

ज्याचेनि उल्हासें । मनबुद्धी उल्हासे । तो उल्हासुचि दिसतुसे । बुद्धी आणि दृष्टी ॥१८॥

उल्हासु जाणिजे स्पर्शे । त्रिगुण गेलिया दृष्टी दिसे । त्या वेगळा भासे ऐसे । नुरचि उरी ॥१९॥

ऐसिया उर्वरिता । चित्त नाहीं मा कैची चिन्ता । स्वदेही परिपूर्णता । विश्वंभर जाला ॥३२०॥

तेथ इष्ट ना अनिष्ट । नीच ना श्रेष्ठ । गुप्त ना प्रकट । स्वतः सिद्ध जाला ॥२१॥

तया भेद ना अभेद । मंत्र ना छंद । स्वदेहीं गोविंद । सदोदित जाला ॥२२॥

सांडूनि त्रिगुण बुद्धी । तया कैंचा निषेध विधि । ब्रह्मराणिवेच्या राजबिदीं । विचरतु जो ॥२३॥

तया आपपर दोन्ही । वक्ताळ गेली मावळोनी । मीचि कोण हें जनीं वनी । नाठवे वेगळें ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP