यद्वन्नद्योंऽबुधिसमरसाः सागरत्वं ह्यव्याप्ताः ।
तद्वज्जीवो लयपरिगतः सामरस्यैकभूतः ।
भेदा - तीतं लयपरिगतं सच्चिदानंदरुप्म ।
निस्त्रैगुण्ये पथि विचारतां को विधिः को निषेधः ॥५॥
सांडुनी दोन्ही कुळें । अवचिती सकळ जळें । नाना सरिता मेळविले । उदधीमाजी ॥२२१॥
तेथें सरितांचे भेद । जाउनी जळचि एकविध । होऊनियां पद । सिंधूचें भोगिती ॥२२॥
तैसा नानाभूत ठसा । कां भिन्न भिन्न जीवदशा । आणुनी समरसा । सामरस्य करिती ॥२३॥
प्रथम गुरुवाक्यासरिसा । बाणला हा ठसा । तरी कळिकाळाचा घसा । निमटिला तेणें ॥२४॥
गुरुवाक्यप्राप्ती । बोधलें चित्त नराहे स्थिती । तरी तें अनुभूती । वाढतें कीजे ॥२५॥
तेथें लाऊनियां वृत्ती । करित जाइजे आवृत्ती । जंव हे देहस्थिती । निःशेष विरे ॥२६॥
जें वृत्ति आवृत्ति करिते । तेंचि हारपे तेथें । मग पाहे सभोंवतें । तंव अभेद जालें ॥२७॥
कनकबीज सेवणें कैसा । नसतेंचि बासे मानसा । तोचि सावध होये जैसा । तैसें झालें ॥२८॥
ज्यासी दिग्भ्रम पडे । तो पूर्व ह्नणे पश्चिमेकडे । तोचि उमजोनि पुढें । निजपंथीं लागे ॥२९॥
हेंही जरी नये हातां । तरी आणिक येक भेदातीतां । सर्वभूतीं निजात्मता । अखंड पहावी ॥२३०॥
जें दृष्टी वरपडे । ते आत्मस्थिती रोकडे । लाऊनि मागेंपुढे । आपणासहित ॥३१॥
जेवीं घटा सबाह्य आकाश । तेवीं सर्वभूतीं परेश । पहावा सावकाश । अनन्यप्रीती ॥३२॥
आकाशेंसी घटुरिता । करितां नकरवे सर्वथा । तेवीं भूतासी निजात्मता । सांडितां नये ॥३३॥
या उघडिया वृत्ति पाहतां । भेदू न दिसे सर्वथा । मन संकल्पा आंतौता । अभेद आत्माचि भासे ॥३४॥
या अभेद आत्मा सौरसें । भेदाची वाट पुसे । मग भेदातीत उल्हासे । स्वानंदोदधि ॥३५॥
तेणें आनंद भोग आमुपें । देहीं ज्ञान सोहं हारपे । मग सच्चिदानंद स्वरुपें । होउनि ठाके ॥३६॥
तेव्हां सच्चिदानंदज्ञान । त्रैपदा अधिष्ठान । होउनी आपण । उल्हासतु असे ॥३७॥
ज्या सुखासी नाहीं मर्यादा । दुःख रिघों न लाहे कदां । त्या सुखाचिया आनंदा । आनंदविता आपण ॥३८॥
एवं सच्चिदानंदू । या त्रैपदीं अभेदू । होउनि एकविधू । नांदतु असे ॥३९॥
गोड आणि शीतळ । जैसें एक गंगाजळ । तेवीं सच्चिदानंद केवळ । त्रैपदी येकु ॥२४०॥
ऐसा सच्चिदानंदपदीं । त्यासी प्राप्त त्रिगुणक्षयव्याधी । असेचिना मा बाधी । केवीं हें घडे ॥४१॥
ज्या त्रैगुणा क्षयव्याधी । जालें तें क्षया आधीं । असतांच विधिनिषेधीं । विषय पीडीं ॥४२॥
जें व्याधिचेनिसन्निपातें । उमरडुनी विचारांहातें । वासनावनीं भ्रमतें । सैरावैरा ॥४३॥
कामिनी कुचागीं पडत । विषयकर्दमीं बुडत । स्वर्गकामाचें टेंक चढत निसरोनी पडे ॥४४॥
ते व्याधीचेनि उफाडा । देता सत्कथेचा काढा । श्रवणमुखीचिया अतिदाढा । दांतखिळ पडे ॥४५॥
ते व्याधीचेंनि त्रिगुणतापें । तापलीं जल्पती कोपें । ‘ मी माझें ’ येणें संकल्पे । वोसणताती ॥४६॥
करितां उपचार आपमती । जेवीं उत्कृष्ट होये पुढती । यालागीं सेविजेती । अक्षर रसज्ञ ॥४७॥
तो आचार्य धन्वंतरीं । ज्याची दृष्टी नीरुज करी । तोवांचूनि चराचरीं । उपचारितां नाहीं ॥४८॥
तेणें ब्रह्मरस अर्धमात्रा । दाखवितां क्षयाचा थारा । मोडूनियां शरीरा । अक्षय केलें ॥४९॥
त्यासी दृढतेचें पथ्य । लाविलें सीत सत्य । तेणें रोगाचे विगत । निःशेष जालें ॥२५०॥
मग सर्व धातूंच्या ठाई । ब्रह्मरसु कोंदला पाही । यावरी देहीं विदेही । जालें कार्य ॥५१॥
तेव्हां उठणें कां बैसणें । निद्रा ना जागणें । भोगणें अभोगणें । दोन्ही नाहीं ॥५२॥
तेथें क्रिया ना कर्म । अधर्म ना धर्म । वर्ण ना आश्रम । सहजस्थिती ॥५३॥
तया अकुळ ना कुळ । निर्मूळ ना मूळ । कृश ना स्थूळ । विकाररहित ॥५४॥
मग आकार ना शून्य । बोल ना मौन्य । आपणचि सनातन । चिदब्रह्म जाला ॥५५॥
तयासी कवण विधि । सांगों काय निषेधी । जेणें ठाकूनियां बुद्धी । ब्रह्म जाला ॥५६॥