शुकाष्टक - श्लोक १

श्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.


श्रीशुक उवाचः

भेदाभेदौ सपदि गलितौ पुण्यपापे विशीर्णे ।

मायामोहौ क्षयमधिगतौ नष्टसंदेहवृत्तिः ।

शब्दातीतं त्रिगुणरहितं प्राप्य तत्त्वावबोधं ।

निस्त्रैगुण्ये पथि विचारतां को विधिः को निषेधः ॥१॥

जो पोखाब्धीचा पूर्णचंद्र । जो ज्ञानियांचा नरेंद्र । तो शुक्र नरेंद्र । आपुलिया स्थिती बोलिला ॥२२॥

ब्रह्मास्थितीची नव्हाळी । तेणें स्वस्वरुप न्याहाळी । त्या अनुभवाची उकळी । नसंठेचि श्रीशुका ॥२३॥

घालेपणाचे ढेंकर । जेवीं देती जेवणार । तेवीं आनंदाचे उदगार । अनिर्वाच्य वदवी ॥२४॥

ह्नणे भेदाभेद दोन्ही । हारपले जयापासूनी । मार्गु अमार्गु मनीं नयनीं । न संपडे दोहींचा ॥२५॥

तरी अखंड भेदू कैसा । अभेदाचा कवण ठसा । दोहीवेगळीं दशा । कीं लक्षण ते ॥२५॥

तंतू एक शेवटवरी । पई दिसे वेगळाल्या हारी । गणितां येती लक्षावरी । तो पटत्वभेदू ॥२७॥

दिपू येकू कळिके असे । तिमिर दृष्टीं अनेक दिसे । ऐसें नसतेंचि जें भासे । वस्तूच्या ठायीं ॥२८॥

गुळाची गौरी । गुळचि आवेवांभीतरीं । हें नेणोनी न्याहारीं । गुळचि देखा ॥२९॥

जैसें मिथ्या मृगांभ जनीं । भासे प्रत्यक्ष नयनीं । तें साच मानलें मनीं । ह्नणोनी दुर्भेदू ॥३०॥

तरावया मृगजळाचे गंगेंसी । जो नाव करुं धांवे दांगासी । तो तरणोपाव त्यासी । कीं वृथा श्रमू ॥३१॥

ऐसें अखंडाचे ठायीं । भ्रांती मन भ्रमले पाही । मग देखे भिन्नाभिन्न कांहीं । तोचि भेदू ॥३२॥

आपुलिया एकपणा विसरे । स्वप्नीचिया निद्राभरें । देखें अनेकत्वाचें मोहिरें । भोगी जीव ॥३३॥

आपुला नित्य स्वभावो । नेणोनि जो वर्ते भावो । तोचि या निर्वाहो । भेदवाक्या ॥३४॥

दृश्य प्रभव आघवा । मावळोनि ये प्रकृतिस्वभावा । जैसे काश्मिराचिया देवा । घृतमार्जन ॥३५॥

घृतामाजीं काश्मीरलिंग । घृतीं घृतरुप दिसे चांग । तर्‍ही तें कोरडें आंग । खडखडित ॥३६॥

ऐशिये प्रकृतीचिये खोपें । जर्‍ही भूतक्रिया लोपे । परी भेदाचें जाउपें । तैसा जीवचि ॥३७॥

ऐसे नासती भूतक्रिया भेद । तें तंव नव्हे अभेद । आतां मावळले जेथें भेदाभेद । तेहि ऐका ॥३८॥

‘ समस्त ब्रह्म ’ हे ज्ञप्ति । सोहं या अभेदवृत्ती । तेहि मावळोनी स्फूर्ती । मज जें उरे ॥३९॥

अविद्याभेद सबळ । विद्याभेद सकळ । दोन्ही जाउनी केवळ । भेदातीत ॥४०॥

जेव्हां भेटुचि नाहीं । तेव्हां अभेद तें कायी । परी चिन्मात्र जें कांहीं । तें उभयातीत ॥४१॥

ज्ञानाचिया परिपाठी । ‘ सोहं ’ ह्नणे ज्ञानदृष्टी । तेंही गेलिया पाठी । अभेदातीत ॥४२॥

ऐसे गेलियां भेदाभेद । केवळ उरे शुद्ध । तेंचि पैं विशद । रुप करुं ॥४३॥

परमात्मा परंज्योति । परब्रह्म परंज्ञप्ति । परात्पर प्रकृती । परावर जो ॥४४॥

अज्ञु आद्य अचळू । अरुप अक्षय अढळू । अजरामर अमळु । अनादि जो ॥४५॥

निर्विकार नित्य । निः प्रपंच निर्मथ्य । निष्कर्म निज सत्य । सत्यमूर्ती ॥४६॥

निःशब्द निष्काम । निर्गुण निरुपम । निःसंग निर्व्योम । निजानंद ॥४७॥

स्वात्मा स्वयंज्योति । स्वलीळा स्वशक्ती । स्वकळा स्वात्मप्रतीति । आत्मत्वाची ॥४८॥

ऐसा अद्वय एकला । एकेकपणें संचला । यापरी आंगें हा जाला । भेदातीत ॥४९॥

तरी नांदतेन भेदें । तो भेद न देखत नांदे । आपुलेनि स्वात्मपदें । उल्हासतु ॥५०॥

तो आकारु निराकारें । आकारुनाशीं न सरे । अधिष्ठान प्रतितीभरें । अखंड झाला ॥५१॥

महादादी घडमोडी । हें त्या नलगे वोढी । भेदाभेदाचे लाग । न शिवती जयाचें आंग । हे दोनी तेथें मार्ग । हारपोनि गेले ॥५२॥

ह्नणोनी तेणें एकले । सपदि भेदाभेद गिळिलें । आपणयें निर्वाळिले । चिन्मय नित्य ॥५३॥

यालागीं पापपुण्य दोनी । न देखे नायके कानीं । स्वप्नीचे रविग्रहण नयनीं । जागतां नाहीं ॥५४॥

खद्योत तेज नयनीं । कां ताराप्रकाश कळंभा । कां पुण्यफळ शोभा । मावळती स्वयंभा । देखोनी दोन्ही ॥५५॥

अनादि आदि विद्या पाहो । जीपासोनि जाला मोहो । जिणे मिथ्याचि संदेहो । भवबंध केला ॥५६॥

प्रतिबिंब आभासे । कायि रवि जळीं बुडतसे । कीं लहुरीचेनि कासाविसें । शतखंड होईल ॥५७॥

घृत मद्य गंगाजळ । त्यांत बिंबे रविमंडळ । सृष्ट नष्ट धर्मशीळ । मानिती लोक ॥५८॥

तैसें साक्षित्वें असोनि त्यासी । मायामोहातें प्रकाशी । जैसी माळा सापपणासी । प्रकाशक जाली ॥५९॥

यापरी मोहोमाया । स्पर्शिली नाहीं त्याची तया । हेंचि दृष्टांते पाहावया । सौरसु करुं ॥६०॥

जैसी रुपाची छाया । वेगळी नव्हे त्याची तया । तैसी असोनि माया । स्पर्शली नाहीं ॥६१॥

रुपाचेनि योगें । छायाकर्म दिसे वेगें । तैसी असंगाचेनि संगें । मायाचेष्टा ॥६२॥

ऐसी मिथ्याचि माया । नासूं, म्हणोनि धरिली छाया । ते कष्ट जाती वायां । भ्रांताचे ते ॥६३॥

छाया शस्त्रें तोडितां न तुटे । पर्वतभारें न दपटे । साबळादिकीं न कुटे । बळवंतासी ॥६४॥

छाया तोडणीं जैं आणिजे पुढें । त्यावरी स्वयें छाया पडे । एवं छाया तोडणीं जैं आणिजे पुढें ।

त्यावरी स्वयें छाया पडे । एवं छाया तोडणें न घडे । तेवीं माया न झडे साधनी ॥६५॥

नासावी मिथ्याचि माया । तरीं जाणावें चेष्टवी तया । यालागीं आचार्या । सतत सेविजे ॥६६॥

त्या गुरुवाक्यस्थितीं । स्वस्वरुपाची प्राप्ती । निखळ स्वयें प्रतीति । आत्मत्वाची ॥६७॥

तेव्हां जगेंसी माया । न दिसे कोठें दिसावया । जैसें व्याळत्व हरावया । नातळत गेले ॥६८॥

आणि मीपणा मोहो । त्या मी पणासी नाही ठावो । यालागीं मोहाचा निर्वाहो । सकुटुंब देशधडी ॥६९॥

ऐसी मायामोहो दोन्ही । होती अधिकत्वें होउनी । तें गेलीं मावळोनी । जागृती स्वप्न जैसें ॥७०॥

जेथें स्वरुपाचा संदेहो । त्याचे आंगीं आदळे देहो । यालागीं संदेह तोचि देहो । निश्चितार्थेसी ॥७१॥

आणि संदेहाचें केलें । त्याचि नांव देह जालें । त्या संदेहा आलें । नष्टत्व कैसें ॥७२॥

होये नव्हे ऐसी भ्रांती । हे भ्रांती गर्भीची वस्ती । ते सगर्भित । सती जाली ॥७३॥

शुद्धसत्त्वाची अरणी । गुरुवाक्यें दृढ मथुनी । प्रदीप्त जाला ज्ञानाग्नी । निर्धूम जो ॥७४॥

तेथ पंचभूतांचीं काष्ठें । रजतम घृतेंसी सगटें । पेटविलें गोमटें । विश्वकुंड ॥७५॥

तया कुंडावांचुनी भ्रांती । ठावो नाहीं, मग जाली शांती । तेथें संदेहदेह स्थिती । निःशेष नासे ॥७६॥

गळाली संदेहवृत्ती । जाली निःसंदेह प्राप्ती । मग वोतली देहस्थिती । अक्षररसें ॥७७॥

जेवीं मेण मुसें निःशेष जाय । मग धातूचि कोंदली राहे । तेवीं नश्वरलोपें देह होये । परब्रह्मरुप ॥७८॥

जें नव्हे शब्दासांगडें । देखिलें परी न संगवे फुडें । जें वेदासीही कुवाडें । बोलतां पडलें ॥७९॥

जें जाणितलें विशद । परी न संगवें एवंविध । तेंचि शब्दातीत शुद्ध । केवळ पैं ॥८०॥

वेद काय नेणता परतला । जाणोनि नसंगवे बोला । यालागीं ठेला । ‘ नेति ’ म्हणउनी ॥८१॥

जें र्‍हस्व ना वर्तुळ । कृश ना स्थूळ । स्थिर ना चंचळ । वर्णरहित ॥८२॥

मूर्त ना अमूर्त । प्रकट ना गुप्त । भोक्ते ना अभोक्त । सर्वद्रष्टे ॥८३॥

समीप ना दूरी । सबाह्य ना अंतरीं । निर्धारा निर्धारीं । धीरु नव्हे ॥८४॥

आदि ना अंतू । मन बुद्धि अचिंत्यू । सर्वी सर्वातीतू । अनंतु नांदे ॥८५॥

जो क्षण नव्हे वेगळा । नांदत आहे स्वलीळा । जगचि एक डोळा । स्वरुप ज्याचें ॥८६॥

जो नाकळे तेजाचे दिव्यदीप्ती । देखतांचि मन मूर्च्छित । म्हणोनी शब्दातीत । ‘ नेति ’ श्रुती ॥८७॥

जो नाकळे संकल्पा । तो केवीं आकळे वाग्जल्पा । म्हणोनी शब्दातीत रुपा । नयेचि बोलीं ॥८८॥

अबळा पुसे युवतीसी । कांतसुख सांगे मजपासीं । तें शब्दें नये व्यक्तीसी । भोगिल्याविणे ॥८९॥

तैसी शब्दातीत बोली । हे अनुभावाची ठी केली । वांचूनी बोलावें बोलीं । तैसें नव्हे ॥९०॥

पाहतां साखर दिसे । गोडी वेगळी नदिसे । चाखतां गोडीच असे । साखररुपें ॥९१॥

गोडी पाहतां साखर न दिसे । तेवीं अनुभवीं जग नाना भासे । शब्दार्थाचें पिसें । तेथें कैंचे ॥९२॥

ज्यामाजीं गगन विरे । तेथें शब्द कोठें सरे । परी केवळ जें उरे । तें शब्दातीत ॥९३॥

आणि दोघां येकू खाये । तोही जेथें विरोनी जाये । याहिवरी जें होये । तें गुणातीत ॥९४॥

दो काष्ठांचे घसणीं । माजी उठी अग्नी । तो दोहीतें जाळुनी । आपणही शमे ॥९५॥

मग काष्ठ ना वन्ही । भस्मही जाये उडोनी । तेव्हां निर्विकार होउनी । राहे नभ ॥९६॥

तैसे रज तम मागें पुढें । जाळूनी शुद्ध सत्त्व वाढे । त्याचीही वाढी मोडे । आपेआप ॥९७॥

मग गुण ना कर्म । कुळ ना धर्म । स्वयें परब्रह्म । होउनी ठाके ॥९८॥

मग आपुलिया सत्ता । होये गुणकर्मी वर्तविता । वर्तवूनी अलिप्तता । नभाच्या ऐसी ॥९९॥

सर्व पदार्थी व्याप्त । असोनी नभ अलिप्त । तैसें गुणकर्मा वर्तवित । गुणातीत होउनी ॥१००॥

एवं गुणातीत सदभावा । याचेनि प्रकाशें प्रकाश तत्त्वां । परी त्या नित्या सदैवा । घेपवेना ॥१॥

जो इंद्रजाळ खेळवी । तो समस्तांतें मोहवी । परी ते विद्या न भुलवी । खेळवी तया ॥२॥

तैसा तत्त्वांचा मेळा । ज्याचेनि प्रकाशें सोज्ज्वळा । मां त्या केवीं केवळा । जाणितले जाये ॥३॥

ऐसें तत्त्वाद्वय शुद्ध । स्वयेंचि जालें विशुद्ध । प्राप्ततत्त्वावबोध । ऐसा जो जाला ॥४॥

होत्या त्रिगुणाच्या तीन वाटा । एकी उजु दोनी अव्हाटा । तेथ विधिनिषेधाचा चोहाटा । घालिजे घाला ॥५॥

त्या तत्त्वावबोध सपाटा । मोडूनी केल्या राजवाटा । मग रामराज्याचे चोहाटा । धेंडा पिटे ॥६॥

तेव्हां विधिनिषेध दोन्ही । पाहतां न दिसे मनीं नयनीं । जेउतें पाहे अवलोकुनी । तेउतें निरवधि ब्रह्म ॥७॥

मीनलीयां सप्तउदधी । वारी भरे निरवधी । तैशीये समपदीं । विलासतु असे ॥८॥

तेथ सन्मुख पाठीमोरें । फिटलें सोहंतेचें भुररें । मग देखणें होउनी उरे । सर्वत्र सर्व द्रष्टे ॥९॥

तेथें निद्रा ना जागणें । बैसणें ना उठणें । सहज स्वभावें असणें । सदोदित ॥११०॥

तयासी विधि तो कैसा आहे । निषेधीं त्यजावें काय । जें पाहावें तें आहे । तोचि एकू ॥११॥

विधिलागी घेणें । कां निषेधीं त्यजणें । हें नुरेचि ब्रह्मपणें । ब्रह्मवेत्त्यासी ॥१२॥

सांडुनी त्रिगुणाची मागी । विचरिजे एक ब्रह्ममार्गी । तरी विधिनिषेधालागीं । नुरेचि वस्तूवेगळें ॥१३॥

वस्तुत्वेंचि अभेदें । एकपणें केवीं नांदे । तें प्रतितीचेनि प्रबोधें । कीजेल विशद ॥१४॥

परी कुळीचे कुळवंत । कीं पंचायतनीचें दैवत । त्या सदगुरुचें मनोगत । मनामाजी वसे ॥१५॥

त्याचेनि पादप्रसादें । श्रोते आप्त होतु आत्मबोधें । तिहीं अधिष्ठिलिया वदें । विवेकरत्नें ॥१६॥

जें सुखाचे निखळ । वोती नित्य निर्मळ । ते श्रोते मजलागीं प्रबळ । अवधान देतु ॥१७॥

ज्यांचिया अवधानासवें । परब्रह्म भेटीसी धांवे । तेणें दिधलेंनि खेवें । नवरसें बोले ॥१८॥

श्रोतयाचें मन निवे । ऐसें वक्तृत्व कैचें स्वभावें । परी गोड करुनी परिसावें । संतजनीं माझें ॥१९॥

बाळक आणि बोबडे । तें परिसतां मातेसी प्रीती वाढे । यालागीं माझिये बडबडे । प्रिये जाली ॥१२०॥

वांचूनि पदपदार्थींचा अर्थू । मी बोलावया केवीं समर्थू । परी वाचेसी कृष्णनाथू । बोलउनी बोली पैसे ॥२१॥

तें संताचेनि सौरसें । जनार्दनु कृपावोरसें । एकाकीं प्रवेशें । चिदानंदरसीं ॥२२॥

यालागीं पदपदार्थांचे बोल । सप्रेमासी बोल । उथळ की सखोल । जाणती श्रोते ॥२३॥

तव संत ह्नणती उगा । नसुचि झाडा पैगा । निरुपण चालवी वेगा । एकरसाचें ॥२४॥

मागिलेनि श्लोकार्थे । लगट जाली चित्तें । तें सांडुनी परिहारातें । सोचूं नको ॥२५॥

यालागीं श्लोक पदार्थेसी । वाखाणितां चाड आह्मासी । म्हणोनि निरुपणासी । चालवी वेगीं ॥२६॥

या संताचेनि बोले । चौगुणें प्रेम जालें । जैसें रंका पद आलें । राणिवेचें ॥२७॥

स्वामी जी नावेक । अवधान करावें एकमुख । कैसें बोलिला श्रीशुक । वस्तुविस्तार ॥२८॥

वस्तूसी एकपण । सर्वत्रैक नांदणें । तेंचि पैं निरोपण । निरोपिजेल ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP