कुटीचक, बहूदक, हंस व परमहंस असे संन्यासाचे चार प्रकार आहेत. ते उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत. बाहेर पर्णकुटींत किंवा घरांत राहून भगवी वस्त्रें धारण करणारा त्रिदंडी. शिखा व यज्ञोपवीत यांनीं युक्त असून बांधवांचे घरी किंवा घरीं भोजन करणारा असून आत्मनिष्ठ असेल तो कुटीचक होय. पुत्रादिकांचा त्याग करुन सात घरें भिक्षा मागून पूर्वी सांगितलेलीं वस्त्रें इत्यादि वेष धारणा करणारा बहूदक होय. पूर्वोक्त वेष धारण करणारा असून एकदंडी असणारा हंस. व शिखायज्ञोपवीतविरहित एकदंडी असणारा तो परमहंस होय. भगवें वस्त्र चारही संन्यासांस आहेच. हंस व परमहंस यांचा भेद - शिखा व यज्ञोपवीत असणारा हंस व हीं नसणारा परमहंस. एकदंड उभयतांसही आहेच. विविदिषादशेंत परमहंसास दंड धारण करणें नित्य आहे. विद्वत्तादशेंत कृताकृत आहे. कारण, दंड, शिखा व आच्छादन हीं परमहंस धारण करीत नाहींत असें श्रुत आहे. वैराग्य नसतां उपजीविकेसाठीं संन्यास ग्रहण केल्यास नरकप्राप्ति होते. कारण एकदंडाचा आश्रय करुन जे पुष्कळ लोक उपजीविका करितात ते कर्मत्यागानें घोर रौरव नरकांत पडतात व ज्ञानशून्य असतां काष्ठदंड धारण करुन जो भक्ष्याभक्ष्यविचार न करितां सर्वभक्षक होतो, तो घोर नरकास जातो, इत्यादि स्मृति आहे.