देशकालांचें स्मरण करुन
'' मातृपितृश्वशुरादिकुलपूतत्वब्रह्महत्यादिदोषदूषितपूतत्वपत्यवियोरुंधतीसमाचारत्वसार्धकोटित्रयसहस्त्रसंवत्सरस्वर्महीयमानत्वादिपुराणोक्तनेकफलप्राप्तये श्रीलक्ष्मीनारायणप्रीतिद्वारा विमुक्तिप्राप्तये वा अन्वारोहणं करिष्ये. ''
असा संकल्प करावा. व
"लक्ष्मीनारायणो देवो बलसत्व गुणाश्रयः ॥ गाढं सत्वंचमेदेयाद्वायनैः परितोषितः ॥ सोपस्काराणि शूर्पाणि वायनैः संयुतानिच । लक्ष्मीनारायणप्रीत्यै सत्वकामाददाम्यहं ॥ अनेन सोपस्कर शूर्पदानेन लक्ष्मीनारायणौ प्रीयेतां ॥ ''
या मंत्रांनी हळद, कुंकुम, वस्त्र, फल इत्यादिकांनी युक्त असलेलीं सुपें सुवासिनींस द्यावींत. नंतर वस्त्रांत पंचरत्नें व नीलांजन बांधून व मुखांत मौक्तिक घालून अग्नीजवळ जावें आणि
'' स्वाहासंश्लेषनिर्विण्ण शर्वगोत्रहुताशन । सत्वमार्ग प्रदानेन नयमां पत्युरंतिकं ॥ ''
या प्रार्थनामंत्रानें अग्नीची प्रार्थना करावी. यानंतर
'' १ अग्रयेतेजोधिपतयेस्वाहा, २ विष्णवेसत्वाधिपतयेस्वाहा, ३ कालायधर्मापतयेस्वाहा, ४ पृथिव्यैलोकाधिष्ठात्र्यै०, ५ अभ्द्योरसाधिष्ठात्रीभ्यः०, ६ वायवेबलाधिपतये०, ७ आकाशायसर्वाधिपतयेस्वाहा०, ८ कालायधर्माधिष्ठात्रे०, ९ अभ्दयःसर्वसाक्षिणीभ्यः०, १० ब्रह्मणे वेदाधिपतये०, ११ रुद्राय स्मशानाधिपतयेस्वाहा ''
याप्रमाणें अकरा आहुतीनीं अग्नींत आज्याचा होम करावा व अग्नीस प्रदक्षणा करुन दृषद व उपल म्हणजे पाटावरवंटा यांची पूजा करावी आणि हातांत पुष्पांजली घेऊन
'' त्वमग्ने सर्वभूतानामंतश्चरसि साक्षिवत् । त्वमेव देव जानीषे न विदुर्यानिमानुषाः ॥ अनुगच्छामि भर्तारं वैधव्यभयपीडिता । सत्वमार्गप्रदानेन नयमां भर्तुरंतिकं ॥ ''
या मंत्रांनीं अग्नीची प्रार्थना करावी. हे मंत्र हळूहळू म्हणून अग्नींत प्रवेश करावा. नंतर ब्राह्मणानें '' इमानीरविधवा० '' ही ऋचा व '' इमाः पतिव्रता पुण्याः-- स्त्रियो यायाः सुशोभनाः । सहभर्तृशरीरेण संविशंतु विभावसुम् ॥ '' या मंत्रांचा पाठ करावा. भयानें चंचल झाल्यास प्रेताच्या उत्तरप्रदेशीं निजलेल्या त्या स्त्रियेस दीरानें किंवा पाठीमागून स्मशानांत जाते तिला पदोपदीं अश्वमेधाचें फल निश्चयानें मिळतें. '' '' ब्राह्मणी स्त्री मृतपतीच्या पाठीमागून जाईल तर ती आत्महत्येनें आपणास व पतीस स्वर्गास नेणार नाही, इत्यादि ब्राह्मणासि निषेध करणारीं वचनें आहेत, ती पृथक् चितिपर आहेत. भर्त्याचें मंत्राग्नीनें दहन झाल्यावर पाठीमागून जें सती जाणें ती पृथक् चिति होय. मंत्राग्नीनें दहन होण्यापूर्वी अस्थानीं किंवा पलाशविधीनें जें सहगमन ती एकचिति होय. कारण अस्थि इत्यादिक पतिस्थानापन्न असल्यानें त्यांस पतिशरीराची साम्यता आहे. ही एकचिति सर्व वर्णास उक्त आहे. पण पृथक् चिति क्षत्रिय, वैश्य शूद्रादिकांसच उक्त आहे. ब्राह्मणी स्त्रियांस उक्त नाही. देशांतरीं पति मरण पावला असतां साध्वी स्त्रियेनें त्याच्या दोन पादुका वक्षस्थलीं धारण करुन शुद्ध होऊन अग्निप्रवेश करुन पृथक् चितीचा विधि करावा.
पतित किंवा प्रायश्चित्तासाठी मरण पावलेल्या भर्त्याबरोबर अन्वारोहण नाहीं. '' ब्रह्महत्या करणारा, कृतघ्न व मित्रघ्न, असा पति असला तरी त्यास सौभाग्यवती स्त्री पावन करिते '' इत्यादि वाक्य अन्य जन्मार्जित ब्रह्महत्यादि पातकांच्या शुद्धीविषयीं आहे. '' एका दिवसांत पोहोंचतां येईल अशा देशीं राहणार्या साध्वी स्त्रीचा सहगमनाचा निश्चय असेल तर ती येईपर्यंत पतीचें दहन करुं नये. हे द्विजहो, रजस्वलेच्या तिसर्या दिवशीं पति मरण पावल्यास तिच्या सहगमनासाठीं एक रात्र प्रेत ठेवावें. '' रजस्वलेच्या पहिल्या व दुसर्या दिवशीं पति मृत झाल्यास त्याचें लौकिकाग्नींनी अमंत्रक दहन करुन पांचव्या दिवशीं अस्थींसहवर्तमान अनुगमन करावें. रजस्वला देश व काल इत्यादिकांच्या अनुकूलतेनें तत्कालींच सहगमनाची इच्छा करीत असेल व शुद्धीची प्रतीक्षा करीन नसेल तर त्याकालीं त्या स्त्रीनें एक द्रोण म्हणजे ८ पायल्या भात मुसळानें कांडून त्याच्या आघातांनीं सर्व रजोनिवृत्ति झाली असतां पंच मृत्तिकांनीं शुद्धता करावी व दिवसाच्या क्रमानें म्हणजे पहिल्या दिवशीं तीस, दुसर्या दिवशीं वीस व तिसर्या दिवशीं दहा गोप्रदानें करुन ब्राह्मणांच्या वचनानें शुद्धि ग्रहण केल्यावर सहगमन करावें. भाताच्या आघातानें जी रजोनिवृत्ति होते ती अतींद्रिय असल्यानें हा निर्णय युगांतरी योजावा असें वाटतें. जननाशौच व मृताशौच असतां सहगमन करुं नये, असें कांहीं ग्रंथकार म्हणतात. पूर्वी प्राप्त झालेल्या अशौचांत भर्ता मरण पावल्यास अशौचयुक्त स्त्रियांनींही सहगमन करावें, बाळंतीण अथवा रजस्वला असतां करुं नये, असें कालतत्त्वविवेचन ग्रंथांत म्हटलें आहे व तेंच योग्य आहे असें वाटतें. गर्भिणी, बालापत्या म्हणजे बालकें असलेली स्त्री, बाळंतीण, रजोदर्शन न झालेल्या, बाटलेल्या, व्यभिचारिणी व पतीशी दुष्टभाव करणार्या स्त्रियांनीं सहगमन करुं नये. कित्येक ग्रंथकारांच्या मतें पतिव्रतांसच सहगमनाचा अधिकार आहे. '' ज्या स्त्रिया काम, क्रोध, भय व मोह यांनी भर्त्याच्या ठायीं सदोदित प्रतिकूल वृत्तीनें आचरण करीत असतील त्या सर्व पवित्र होतात '' इत्यादि वाक्य अर्थवाद आहे असें म्हणतात. त्यांत भर्त्याच्या अशौचांत किंवा अशौचानंतर पृथक् चित्यारोहण केलें तर त्निरात्र अशौच व पिंड; सहगमन असल्यास त्या स्त्रीचें अशौच व पिंडादि क्रिया पतीच्या पिंडादि क्रमानें जाणावी. अन्वारोहण असेल तर स्त्रियेची व पतीची उदकक्रिया, पिंडदान क्रिया व प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हीं एकच करावींत. अन्वारोहण केलें असतां स्त्रीस निराळे पिंड व निराळ्या अश्म्यावर तिलांजलि देऊं नये. तिलांजलि एकाच अश्म्यावर द्याव्या. नवश्राद्धें व सपिंडी निरनिराळीं करावीं. सहगमन असतां वृषोत्सर्ग एकच करुन स्त्रीच्या वृषोत्सर्गस्थानीं एक गाय द्यावी. पण सपिंडी करुं नये. किंवा भर्त्यासहवर्तमानच करावी, किंवा भर्ता इत्यादि तिघांसह करावी. इत्यादि पक्ष पूर्वी सांगितले आहेत. मासिक व सांवत्सरिक इत्यादि श्राद्धीं एक पाक व एक काल इत्यादि व्यवस्था श्राद्धप्रकरणांत सांगितली आहे. याप्रमाणें सहगमनाविषयीं निर्णय सांगितला.
याप्रमाणें काशीनाथोपाध्याय यांनीं अंत्यविधीचा निर्णय करुन तो निर्णय शुद्ध होण्यासाठीं भगवच्चरणीं अर्पण केला. याप्रमाणें अंत्येष्टिनिर्णय सांगितला.