ज्याचा वर्ण आरक्त असून मुख व पुच्छ यांचा वर्ण पांडुर असेल व ज्याचे खूर व शिंगें पांढरीं असतील तो नीलवृष जाणावा. अथवा ज्याचा वर्ण श्वेत असून मुख व पुच्छ हीं श्यामवर्ण असतील तो नीलवृष होय. किंवा सर्वाग श्यामवर्ण असून मुख व पुच्छ श्वेतवर्ण असेल तर तो नीलवृष होय. वृषाचा अभाव असल्यास मृत्तिकेचा किंवा पिठाचा वृष करुन होमादिविधीनें वृषोत्सर्ग करावा, असें कांही ग्रंथकार म्हणतात. यथोक्त वृष न मिळाल्यास जसा मिळेल तसा २ वर्षाचा, १ वर्षाचा वृष, एक वर्षाहून अधिक वयाच्या ४ किंवा १ वत्स ( कालवड ) तरी असावी. याविषयींचा प्रयोग आपापल्या सूत्राप्रमाणें ग्रहण करावा. डाव्या हातानें वृषाचें पुच्छ धरुन उजव्या हातानें तिल व कुश यांसहित उदक घेऊन प्रेताचे गोत्राचा उच्चार करावा; व '' अमुकस्मै वृष एष मया दत्तस्तं तारयतु '' असें म्हणून सुवर्णासहित उदक भूमीवर सोडावें. त्या वृषास कोणी धरुं नये व त्यास कोणी वाहूं नये. त्या गाईचें दोहन करुं नये व तिला कोणी बांधूं नये. पति असून पुत्रयुक्त अशा सुवासिनेचा वृषोत्सर्ग करुं नये. वृषोत्सर्गस्थानीं एक दूध देणारी गाय द्यावी. पति व पुत्र यांतून एक नसेल तर स्त्रियांचाही वृषोत्सर्ग करावा. सहगमन असल्यास स्त्रियांचे वृषोत्सर्गस्थानीं गायच द्यावी. वृषोत्सर्ग सांगतेसाठीं, तिल, उदकुंभ, गाय, वस्त्र व हिरण्य हीं पांच दानें करावी. ११ व्या दिवशीं दुसरें अशौच प्राप्त झाल्यास वृषोत्सर्गादिक आद्य मासिक व शय्यादिक दानें करावींच. अशा रीतीनें वृषोत्सर्ग केल्यास अश्वमेध यज्ञाचे फल मिळतें व ज्याच्या उद्देशानें नील वृषाचा उत्सर्ग केला तो उत्तम गतीस जातो. वृषोत्सर्ग मागच्या १० व पुढच्या १० पुरुषांस पवित्न करितो. याप्रमाणें वृषोत्सर्ग सांगितला.