११ व्या दिवसापासून वर्षपर्यत प्रत्यहीं उदक व अन्न यांसहित कुंभ पुत्रानें द्यावा. ज्याची सपिंडी वर्षापूर्वी होईल त्याचेंही मासिक श्राद्ध व उदकुंभ हीं वर्षभर करावींत. शतशः श्राद्धें केलीं व उदकुंभश्राद्ध केलें नाही तर ते मनुष्य दरिद्री व दुःखी असे या भवार्णवांत भ्रमण करितात. मत्सररहित होऊन १ वर्षपर्यत प्रेतासाठीं अन्नयुक्त उदकुंभाचें दान करील त्यास अश्वमेध फळ मिळेल. हें उदकुंभ श्राद्ध सपिंडीकरणापूर्वी एकोद्दिष्ट विधीनें करावें. पण सपिंडीनंतर पार्वण विधीनें करावें. हें उदकुंभश्राद्ध १३ व्या दिवसापासून करावें, असें भट्ट म्हणतात. या श्राद्धीं पिंडदान कृताकृत आहे व हें देवहीनही आहे. कारण हें पार्वणश्राद्ध उदकुंभयुक्त देवहीनश्राद्ध धर्मविरहित प्रत्याब्दिक श्राद्धापर्यत प्रत्यहीं संकल्प विधीनें करावें, असें वचन आहे. या श्राद्धीं विष्णुश्राद्धाप्रमाणें प्रायश्चित्तांगभूत सर्व श्राद्ध धर्म नाहींत. वाचनिक मात्र आहेत. यावरुन संकल्पविधीनें संकल्प क्षण, पाद्य, आसन, गंध, आच्छादन इतकी पूजा झाल्यावर अन्न वाढण्यापर्यत कर्म झालें म्हणजे '' पृथिवीते पात्रं '' इत्यादिक म्हणून '' त्वउदकुंभ इदमन्नंदत्तंच '' असें म्हणून इत्यादिक अन्नत्याग विधि करावा. व अंती तांबूल दक्षिणादि द्यावी. या श्राद्धांत ब्रह्मचर्य, पुनर्भोजन इत्यादि नियम नाहींत. वृद्धिश्राद्धाचे निमित्तानें मासिकांचा अपकर्ष करणें असल्यास उदकुंभ श्राद्धांचाही अपकर्ष करावा. कारण, ती प्रेतश्राद्धें आहेत. प्रत्यहीं उदकुंभासह अन्नदान करण्यास जो असमर्थ असेल त्यानें एकाच दिवशीं तितकीं आमान्नें व तितके उदकुंभ किंवा तिवक्या आमान्नांचा किंवा उदकुंभांचा निष्क्रय करुन ( द्रव्य करुन ) अपकर्षानें उदकुंभ श्राद्धें करावीं. वर्षपर्यत प्रत्यहीं उदकुंभश्राद्ध करणारास मध्यंतरीं अशौच प्राप्त झाल्यास दर्शादि श्राद्धाप्रमाणें तितक्या श्राद्धांचा लोपच करावा. अशौचानंतर प्रतिबंधामुळें न केल्यास त्याच्या पुढील जें उदकुंभ श्राद्ध त्यासह एकतंत्रानें अंतरलेल्या उदकुंभाचा प्रयोग करावा. '' अतिक्रांतोदकुंभ श्राद्धान्यद्यतनोद कुंभश्राद्धंच तंत्रेण करिष्ये '' असा संकल्प करावा.
तसेंच प्रथम वर्षी दीपदान करण्यास सांगितलें आहे. प्रेतास विषम मार्गी सुख व्हावें या इच्छेनें मनुष्यांनीं वर्षपर्यत प्रति दिवशीं दीप द्यावा. देव, ब्राह्मण, यांचे मंदिरांत पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख दीप लावावा. पित्याचे उद्देशानें दीप लावावयाचा तो उदकानें संकल्प करुन दक्षिणाभिमुख सुस्थिर असा लावावा.