श्रीभगवान म्हणाले,
दोषदृष्टिरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासुन मुक्त होशील. ॥१॥
हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे.॥२॥
हे परंतपा ! या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसारचक्रात फिरत राहतात. ॥३॥
जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. ॥४॥
ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत. परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा, भूतांना उप्तन्न करणारा व त्यांचे धारण - पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. ॥५॥
जसा आकाशापासून उप्तन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायु नेहमी आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उप्तन्न झाल्यामुळे सर्व भुते माझ्यात राहतात, असे समज. ॥६॥
हे अर्जुना ! कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. ॥७॥
आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार त्याच्या कर्मानुसार उप्तन्न करतो. ॥८॥
हे अर्जुना ! त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत. ॥९॥
हे अर्जुना ! माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने हे संसारचक्र फिरत आहे. ॥१०॥
माझ्या परम भावाला न जाणणारे मुर्ख लोक मनुष्यशरीर धारण करणार्या मला सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरुपात वावरणार्या मला परमेश्वराला सामान्य मनुश्य समजतात. ॥११॥
ज्यांची आशा व्यर्थ, कर्म निरर्थक आणि ज्ञान फुकटे असे विक्षित्प चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसूरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करुन राहतात. ॥१२॥
परन्तु हे कृन्तीपुत्रा ! दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणुन अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात. ॥१३॥
ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात. ॥१४॥
दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण- निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपानी असलेली मज विरट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात. ॥१५॥
श्रौतयज्ञ मी आहे, स्मार्तयज्ञा मी आहे. पितृयज्ञ मी आहे. वनस्पती, अन्न व औषधी मी आहे. मंत्र मी आहे. तूप मी आहे. अग्नी मी आहे आणि हवनाची क्रियाही मीच आहे. ॥१६॥
या जगाला धारण करणारा व कर्मफल देणारा, आई-वडिल, आजोबा, जाणण्याजोगा पवित्र ओंकार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. ॥१७॥
प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण पोषण करणारा, सर्वाचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वाचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा सर्वाच्या उप्तत्ति - प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे. ॥१८॥
मीच सुर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षन घेतो व त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुना ! मीच अमृत आणि मृत्यु आहे आणी सत् व असत्ही मीच आहे. ॥१९॥
तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करुन स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणार्या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात. ॥२०॥
ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणार्या, तिन्ही वेदांत सांगितलेल्या, सकाम कर्माचे अनुष्ठान करुन भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात. ॥२१॥
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणार्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. ॥२२॥
हे अर्जुना ! जे सकाम भक्त श्रद्धेने दुसर्या देवांची पूजा करतात, तेही माझीच पूजा करतात. परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते. ॥२३॥
कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे. पण ते मला परमेश्वराला तत्त्वतः जाणत नाहीत; म्हणुन पुनर्जन्म घेतात. ॥२४॥
देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भुतांची पूजा करणारे भुतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. ॥२५॥
जो कोण भक्त मला प्रेमाने पान, फुल , फळ पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पन केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. ॥२६॥
हे अर्जुना ! तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मल अर्पण कर. ॥२७॥
अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यासयोगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभफलरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. ॥२८॥
मी सर्व प्राणिमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो. ॥२९॥
जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा. कारण तो यर्थार्थ निश्चयी असतो. अर्थात् त्याने ईश्वरभजनासारखे दुसरे काहीही नाही, अस पूर्ण निश्चय केलेला असतो. ॥३०॥
तो तत्काळ धर्मात्मा होतो आणी नेहमी टिकणार्या परम शांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना ! तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही. ॥३१॥
हे अर्जुना ! स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोगी अर्थात चाण्डालादी कोणीही असो, तेसुद्धा मला शरण आले असता परम गतीलाच प्राप्त होतात. ॥३२॥
मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी भक्तलोक मला शरण येऊन परम गतीला प्राप्त होतात, हे काय सांगावयास पाहिजे ? म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्यशरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर. ॥३३॥
माझ्यात मन ठेव. माझा भक्त हो. माझी पूजा कर. मला नमस्कार कर. अशारीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. ॥३४॥