श्रीगणेशाय नमः
मुनीसि ह्नणे भूपती ॥ सांगा पुढील वित्पत्ती ॥ तंव ह्नणे वैशंपायन ॥ ऐकें सावधान नृपती ॥१॥
शकुनिया आणि दुःशासन ॥ जयद्रथ दुर्योधन ॥ विचार करिती एकांतीं ॥ कीं अपावो रचावा कवण ॥२॥
तंव शकुनी बोले विचार ॥ द्रौपदी जाणे थाळीमंत्र ॥ तिचेनि बळें अन्नदान ॥ करीतसे युधिष्ठिर ॥३॥
आणि तियेचेनि प्रीतीं ॥ साह्य करितो श्रीपती ॥ ह्नणोनि व्यसनापासुनी ॥ सदा पांडव निस्तरती ॥४॥
तरी त्या पांचाळीसचि हरुं ॥ मग पांडवां सहज संहारु ॥ तंव भला भलारे मामेया ॥ ऐसें ह्नणे गांधा रु ॥५॥
परि सिंतर करी पांडवां ॥ ऐसा कोण पाठवावा ॥ जो हरोनि आणील द्रौपदीतें ॥ बरवा मनीं विचारावा ॥६॥
यावरी दुःशासन ह्नणे ॥ तेथें जयद्रथ पाठविणें ॥ तो बुद्धिवंत शिरोमणी ॥ हरील द्रौपदीकारणें ॥७॥
मग जयद्रथा ह्नणती समस्त ॥ तूं आमुचा सोयरा जामात ॥ तरी पांडवां सितरोनी ॥ हरीं द्रौपदी वनांत ॥८॥
ऐसें ऐकतां येरु ह्नणे ॥ तुमचें कार्य अगत्य करणें ॥ परि पांडव येतील धांवोनी ॥ ते सांवरावे कवणें ॥९॥
जरी एकल्या पाठवाल मातें ॥ तरी कार्य नासेल निरुतें ॥ ह्नणोनि नावनिगे वीर द्यावे ॥ मजसवें जावया तेथें ॥१०॥
मग बारासहस्त्र कुंजर ॥ येकीक्षोणी असिवार ॥ चारी शत महारथिये ॥ असंख्यात पायभार ॥११॥
इतुकिया सैन्यासहित ॥ वीर निघाला जयद्रथ ॥ तंव भीष्मद्रोन येवोनी ॥ पुसती दुर्योधना वृत्तांत ॥१२॥
कोठें धाडिलें जयद्रथासी ॥ येरु ह्नणे गेला पारधीसी ॥ तंव ते ह्नणती दुर्योधना ॥ कां मिथ्यावचनीं झकविशी ॥१३॥
तो पाठविला काम्यकवनीं ॥ हराया धर्माची कामिनी ॥ हा विचार केला खोटा ॥ अजयो पावाल निर्वाणी ॥१४॥
द्रोण ह्नणे कौरवनाथा ॥ नाश पाविजे परस्त्री हरितां ॥ सहस्त्रभग जाहला इंद्र ॥ अहिल्येसि अभिलाषितां ॥१५॥
वालिरावणांचा जाहला घात ॥ कलंकी जाहला निशानाथ ॥ सहस्त्रार्जुन वधिला रामें ॥ एकवीरेसि लाविता हात ॥१६॥
शकुनिया मंत्री तुजपाशीं ॥ ह्नणोनि आमुचें नायकिसी ॥ आतां काय बोलोनि वृथा ॥ होईल तें पुढें देखसी ॥१७॥
उगले राहिले ऐसें बोलोनी ॥ इकडे जयद्रथ आला काम्यकवनीं ॥ पांडव पारधीसि गेले होते ॥ द्रौपदी एकली ठेवोनी ॥१८॥
जंव ते गुंफेचिये द्वारीं ॥ द्रौपदी पतींचा मार्ग निहारी ॥ तंव देखिला जयद्रथ ॥ चातुरंग सपरिवारीं ॥१९॥
लाजोनि गेली गुंफेआंत ॥ तंव जयद्रथे सांडिला रथ ॥ गुंफेमाजी प्रवेशोनी ॥ धरिला द्रौपदीचा हात ॥२०॥
वेणिये धरोनि ओढिली ॥ नेवोनि रथावरी घातली ॥ आक्रंदे येरी थोरशब्दें ॥ ते ऋषीश्वरीं देखिली ॥२१॥
हाहाःकार जाहला तेथें ॥ द्रौपदी ह्नणे ऋषीश्वरातें ॥ पांडव आलिया सांगावें ॥ मज नेलें जयद्रवें ॥२२॥
असो तिये घेवोनि निघाला येरु ॥ आनंदला दळभारु ॥ वानिताती परस्परें ॥ भला फावला अवसरु ॥२३॥
तंव भूरिश्रवा ह्नणे ॥ हे निश्विंतता न माना झणें ॥ मज जाणवतसे आतां ॥ येईल पांडवांचें धावणें ॥२४॥
असो ते पवनवेगें चालिले ॥ तंव द्रौपदीयें कृष्णा भाकिलें ॥ ह्नणे धांव गा मुकुंदा ॥ येर्हवीं वोखटें जाहलें ॥२५॥
रथ धडधडां असे जात ॥ द्रौपदी हांका मारित ॥ इकडे जावोनि पांडवांजवळी ॥ ऋषी सांगती वृत्तांत ॥२६॥
द्रौपदी जयद्रथें हरिली ॥ वार्ता पांडवीं आयकिली ॥ धर्म ह्नणे भीमार्जुनाम ॥ जावोनि सोडवा वहिली ॥२७॥
येरु निघाले वेगवत्तर ॥ पार्थे धनुष्या जोडिल शर ॥ गदा हातीं वसवोनियां ॥ सवें चालिल वृकोदर ॥२८॥
इकडे द्रौपदीचा धांवा ऐकोनी ॥ मोहनी प्रेरितसे चक्रपाणी ॥ तियें भ्रमविलें जयद्रथादिकां ॥ तंव भीमार्जुन आले ठाकोनी ॥२९॥
अपराधियां मार्ग नयनीं ॥ न दिसे येती फिरफिरोनी ॥ तंव स्मरोनियां द्रोणगुरु ॥ पार्थ वर्षला मार्गणी ॥३०॥
देखोनि शरसंघ अलोट ॥ सैन्या भविन्नला आट ॥ एकाचीं शस्त्रें गळालीं ॥ ह्नणती आलेरे सुभट ॥३१॥
तेव्हां अर्जुनाचा रथ ॥ सैन्याभोंवता असे फिरत ॥ मध्यें वेढोनि सैन्यासी ॥ बाणजाळीं करी घात ॥३२॥
शल्य सुबळ पळोनि गेले ॥ तैं जयद्रथ वीरांसि बोले ॥ मी घेवोनि जातों द्रौपदी ॥ तुह्मी यांतें सांवरा वहिलें ॥३३॥
हळुहळू वोसरावें मागें ॥ मी हस्तनापुरा जाईन वेगें ॥ ह्नणोनि थापटिले वारु ॥ तंव भूली पडली मार्गें ॥३४॥
जिकडे जाय वेगवत्तर ॥ तिकडे काम्यकसरोवर ॥ पाठी न सोडिती भीमार्जुन ॥ कोपला सूताबरी थोर ॥३५॥
ह्नणे रे वैरियां मीनछासी ॥ आणोनि वैरियां देतोसी ॥ त्वां विश्वासघात केला ॥ पतन्ह तुझिये पूर्वजांसी ॥३६॥
इकडे भीमासि ह्नणे पार्थ ॥ पैल जातो जयद्रथ ॥ रथावरी असे द्रौपदी ॥ आतां करीन त्याचा घात ॥३७॥
तया पार्थ जाहला बोलता ॥ ह्नणे सांवरीं रे जयद्रथा ॥ येरु द्रौपदीये घेउनी ॥ अंधापरि होय पळता ॥३८॥
रथ झडझडां चालविला ॥ तंव भीमार्जुनीं नेहटिला ॥ मग आड घालोनि शस्त्रास्त्रें ॥ कौरवभार उठावला ॥३९॥
शल्प सुबळ आणि कर्ण ॥ दुर्बद्धी सुशर्मा जाण ॥ टबकारुनि उठावले ॥ पाचारिले भीमार्जुन ॥४०॥
सकळ वर्षले शस्त्रधारीं ॥ जैसे मेघ पर्वतावरी ॥ ते निवारिले धनुर्धरें ॥ मारुतास्त्रें झडकरी ॥४१॥
नंतरें अग्न्यस्त्र मोकलिलें ॥ तेणें कौरव दळ जाळिलें ॥ तये अग्निमाझारी ॥ वायव्यास्त्र प्रेरिलें ॥४२॥
तेव्हां कर्णे काय केलें ॥ घनभुजंग बाण प्रेरिले ॥ भुजंगीं शोषिला वायु ॥ घनीं अग्नीतें विझविलें ॥४३॥
शस्त्रास्त्रांचा महालोट ॥ जाहला वीरांसि धडधडाट ॥ तंव भीमसेनें गदाघातें ॥ केला सैन्यानि आटाआट ॥४४॥
जाहली मेदमांसा चिडणी ॥ अशुद्धें रापली मेदिनी ॥ दळ मारिलें बदुतेक ॥ येक धांवती जीव घेउनी ॥४५॥
अर्जुन ह्नणे वृकोदर ॥ तूं सांवरी या दळभारा ॥ जो शस्त्र घेवोनि उठेल ॥ तया पाठवीं यमपुरा ॥४६॥
मग दळभार टाकोनि मागें ॥ धांवला जयद्रथाचे लागें ॥ येरु द्रौपदी घालोनि पाठीशीं ॥ जातहोता पवनवेगें ॥४७॥
मनीं ह्नणे धनुर्धर ॥ यासी काहीं करुं प्रतिकार ॥ ह्नणोनि घातलें बाणजाळ ॥ पुढां बांधिला शरडोंगर ॥४८॥
बाण उफराटे आले ॥ येरें रथातें उभें केलें ॥ तंव राहें ह्नणोनि जयद्रथा ॥ पाठीसि अर्जुनें पाचारिलें ॥४९॥
अरे पांचाळी हरिली कवणेबळें ॥ आतां न दाविसी तोंड काळें ॥ ह्नणोनि सोडिला अग्निबाण ॥ तेणें जयद्रथा कवळिलें ॥५०॥
काकुळतीं भाखी करुणा ॥ ह्नणे रक्ष गा फाल्गुना ॥ उडी घालोनि रथाखालीं ॥ लागला पार्थाचे चरणां ॥५१॥
येरें करें धरोनि ओंढिला ॥ ध्वजस्तंभासी बांधिला ॥ पांचपाट काढिले शिरीं ॥ अर्धखांड भद्र केला ॥५२॥
द्रौपदीसी ह्नणे पार्थ ॥ तुज लाविला येणें हात ॥ यासी वधितों आतांची ॥ परि शरणागत वरी जामात ॥५३॥
दुःशीला दुर्योधनाची बहिणी ॥ ती ययाची कामिनी ॥ ह्नणोनि राखिला हा जीवें ॥ आणि लागला माझे चरणीं ॥५४॥
द्रौपदी ह्नणे पार्थातें ॥ भलें विटंबिलें जयद्रथातें ॥ यापरीस कवणा यश ॥ कीं रक्षिलें शरणागतातें ॥५५॥
परि धर्मा आणि ऋषीश्वरां ॥ भेटी न्यावा हा निलाजिरा ॥ नवलावो जाहला थोर ॥ कैसें मुख दावील वीरां ॥५६॥
मागें आहे कौरवभार ॥ तयासि झुंजतो वृकोदर ॥ तेथें जावोनि झडकरी ॥ यासी करावा आदर ॥५७॥
हें द्रौपदीवाक्य ऐकोन ॥ चालिला सवेग अर्जुन ॥ तंव इकडे कौरवभारें ॥ वेढिलासे भीमसेन ॥५८॥
जेजे भंगले होते वीर ॥ ते ते सांवरुनि आले समग्र ॥ एकला देखोनि भीमसेन ॥ वर्षले शस्त्रास्त्रांचे पूर ॥५९॥
हस्ती लोटिले महावतीं ॥ ते चूर्ण केले गदाघातीं ॥ एकाचीं फोडिलीं कुंभस्थळें ॥ एकां झुगारिलें आकाशपंथीं ॥६०॥
गदा भोवंडी गरगरां ॥ तेणें सुटला महावारा ॥ असिवार उडवितां दाही दिशां ॥ पळ सुटला पायभारां ॥६१॥
परि महारथिये लोटले ॥ त्यांहीं भीमसेना वेढिलें ॥ तंव येवोनि अर्जुन ॥ बाणजाळ मोकलिलें ॥६२॥
एकांचे अश्व तोडिले ॥ येक रथांगीं निवटिले ॥ एक लोळविले धरणीं ॥ एक गिरिकपाटीं हाकिले ॥६३॥
असो ऐसा दळभार ॥ रणीं लोळविला समग्र ॥ सहस्त्रीं दोन चार उरले ॥ त्यांहीं सेविला डोंगर ॥६४॥
विजयी जाहले भीमार्जुन ॥ मुरडले करोनि रणकंदन ॥ इकडे धर्मनकुळसहदेवो ॥ ऋषींसह करिती चिंतन ॥६५॥
तंव द्रौपदीसह भीमपार्थ ॥ ध्वजासि बांधोनि जयद्रथ ॥ वेगें आले धर्माजवळी ॥ आनंद वर्तला बहुत ॥६६॥
येरीं उतरोनि रथाखालीं ॥ धर्मासि दंडवतें केलीं ॥ नमस्कारिलें ऋषीश्वरां ॥ मग धर्मे वार्ता पुसिली ॥६७॥
जो अवघा वर्तला वृत्तांत ॥ तो सांगती भीमपार्थ ॥ तंव संतोषोनि युधिष्ठिरें ॥ सोडविला जयद्रथ ॥६८॥
तो विटंबिला देखोनी ॥ हांसती धर्मादिक मुनी ॥ ह्नणती परस्त्रिये लावितां हात ॥ फळ पावलें तत्क्षणीं ॥६९॥
यासी प्रायश्वित्त दीधलें ॥ बरवें धारातीर्थी मुंडिलें ॥ मग जाईजाई रे निर्लज्जा ॥ ह्नणोनि तया सोडिलें ॥७०॥
येरु निघाला वेगवत्तर ॥ थोर पावला अपकार ॥ मग गेला स्वदेशासी ॥ लज्जित होवोनि अपार ॥७१॥
असो पांडव गेले गुंफेसी ॥ भोजनें जाहलीं समस्तांसी ॥ येरीकडे जे भंगले वीर ॥ ते गेले हस्तनापुरीं ॥७२॥
त्याणीं अवघाही वृत्तांत ॥ दुर्योधनासि केला श्रुत ॥ विटंबिलें जयद्रथा ॥ सैन्या जाहला निःपात ॥७३॥
दुर्योधना दुःख वर्तलें ॥ ह्नणे भीष्मद्रोणांचें हंसें जाहलें ॥ केवीं जिजे अपयशें ॥ मग एकांतीं बैसले ॥७४॥
शकुनिया ह्नणे गांधारासी ॥ यशअपयश होय वीरासी ॥ आतां तेथें जावोनि स्वयें ॥ उसणें वधूं पांडवांसी ॥७५॥
कर्णासि दुर्योधन ह्नणे ॥ एकदां उजळ माथा करणें ॥ आपण जावोनि दळभारेंसीं ॥ घालू पांडवांवरी घालणें ॥७६॥
ऐसा निश्वयो केला ॥ तो भीष्मादिकां कळों आला ॥ त्यांहीं धृतराष्ट्रा जाणविलें ॥ कीं गांधारें अनर्थ मांडिला ॥७७॥
गांगेयासि धृतराष्ट्र ह्नणे ॥ तुह्मी शिकवा जी वडीलपणें ॥ येरु ह्नणे नायके तो ॥ आमुचीं सुबोधवचनें ॥७८॥
घालावयासि घालणें ॥ आपण दुर्योधन जाणे ॥ होईल एखादा अनर्थ ॥ तो कोणीही नेणें ॥७९॥
आमुचें शिकविलें नायकती ॥ तुह्मीं शिकवावें एकांतीं ॥ आतां न साहती पांडव ॥ कौरव नाशातें पावती ॥८०॥
द्रौपदीची वस्त्रें हरिलीं ॥ तेव्हांचि वेळा होती आली ॥ भीम वारिला युधिष्ठिरें ॥ भाक वडिलांची राखिली ॥८१॥
वनीं हराया द्रौपदीतें ॥ जयद्रथ धाडिला सैन्यासांगातें ॥ पार्थे मारिल्या चारी क्षोणी ॥ विटंबिलें जयद्रथातें ॥८२॥
आतां स्वयें जातो गांधार ॥ तरी अनर्थ दिसतो थोर ॥ तुह्मीं जाणावें निश्वयें ॥ ऐसें बोलिला गंगाकुमर ॥८३॥
धृतराष्ट्रें दुर्योधन बोलाविला ॥ नानाउपपत्ती शिकविला ॥ परि तो नायके ह्नणितले ॥ क्रोधें उठोनि चालिला ॥८४॥
ह्नणे पालाणारे सैन्या ॥ धावो दीधला निशाणा ॥ पारधीचें करोनि मिष ॥ निघालासे कौरवराणा ॥८५॥
सन्नद्ध चातुरंग चालिले ॥ तंव कर्ण गांधारासि बोले ॥ घाला घालूं अवचितांची ॥ वीर निवडा भलेभले ॥८६॥
यावरी दुःशासन ह्नणे ॥ मी पांडवांचें वर्म जाणें ॥ प्रथम धर्म जित धरोनी ॥ मग चौघां संहारणें ॥८७॥
पुढां कर्ण मध्यें दुर्योधन ॥ भोंवतें सैन्य पाठीं दुःशासन ॥ चालिले काम्यकवनासी ॥ तंव काय करी नारायण ॥८८॥
जाणों कळलें श्रीरंगासी ॥ मग चेष्टविलें चित्रांगदासी ॥ तोही सैन्येंसि काम्यकवनीं ॥ खेळों आला व्याहाळीसी ॥८९॥
दुर्योधनासवें सैन्य ॥ सातअक्षौहिणी दारुण ॥ बडिवार बोलोनि ह्नणती ॥ हें घ्या पैल काम्यकवन ॥९०॥
येथें गुजबुज न करावा ॥ चेइरे पडेल पांडवां ॥ घाला घालोनि वधावे चौघे ॥ धर्म जिवंत धरावा ॥९१॥
ह्नणोनि चालिले वेगवत्तर ॥ तंव पुढां देखिले पारके वीर ॥ कर्ण धांवोनि पुसता जाहला ॥ तुह्मी कवणाचे रे झुंजार ॥९२॥
येर ह्नणती गंधर्व आह्मी परि सत्य सांगा ॥ कोण तुह्मी ॥ तो ह्नणे आह्मी दुर्योधनाचे ॥ महावीर पराक्रमी ॥९३॥
आलों पारधी खेळावया तुह्मी वाट द्या ओसरोनियां ॥ येर ह्नणती कैंची वाट ॥ आलेति कां पां मरावया ॥९४॥
तेणें क्रोध आला कौरवांसी ॥ शस्त्रें घेवोनि आवेशीं ॥ अवघे ही उठावले ॥ झोडीत जाती गंधर्वासी ॥९५॥
शस्त्रें सुटती खणखणा ॥ पिटोनि दवडिली गंधर्वसेना ॥ कर्ण वर्षतां बाणजाळीं ॥ संतोषला कौरवराणा ॥९६॥
ऐसें चित्रांगदे देखिलें ॥ ह्नणे आमुचें सैन्य पळविलें ॥ ह्नणोनि क्रोधें उठावला ॥ शरजाळ मोकलिलें ॥९७॥
तंव कर्णे शीघ्रसंधानीं ॥ निवारिले बाण बाणीं ॥ मग सैन्यासहित चित्रांगद ॥ अदृश्य जाहला गगनीं ॥९८॥
तो वरुषला बाणीं अमितीं ॥ कौरव गंधर्वा न देखती ॥ खोंचोनियां सकळ दळ ॥ चातुरंग पडलें क्षिती ॥९९॥
चाक्षुषीविद्या अभिमंत्रिली ॥ बाणवृष्टी थोर केली ॥ गिरिकपाटीं पिटोनियां ॥ कौरवसेना घातली ॥१००॥
अश्व रथ आणि कुंजर ॥ पायद पडले अपार ॥ आपपर नोळखवे ॥ गंधर्वा न देखती झुंजार ॥१॥
शौर्य धरोनि उठावले ॥ परि कोणासि झुजावें हें नकळे ॥ अदृश्य मार होतसे ॥ कौरव अवघे भंगले ॥२॥
सर्वकर्ता चक्रपाणी ॥ तेणेंचि हे रचिली करणी ॥ पांडवांचा साह्यकारी ॥ कौरव मारविले रणीं ॥३॥
दळभार गेला भंगोनी ॥ दुर्योधन येकला रणीं ॥ तंव धांवोनि आला सवेग ॥ चित्रांगद तत्क्षणीं ॥४॥
ह्नणे रे अपराधिया चांडाळा ॥ कपटें गांजिली द्रुपदबाळा ॥ आतां पळसी कोणीकडे ॥ ह्नणोनि धरिला ते वेळां ॥५॥
मग रथीं वाहोनि निघाला ॥ गगनपोकळीं अदृश्य जाहला ॥ तंव मधुकर ह्नणे श्रोतयांसी ॥ ऐकावा प्रसंग पुढिला ॥६॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ नवमस्तबक मनोहरु ॥ अष्टमाध्यायीं कथियेला ॥ जयद्रथविटंबनप्रकारु ॥१०७॥