॥ श्रीगणेशाय नमः ॥
मुनि ह्मणे जीमुतीतें वधिलें ॥ येर मल्ल पळोनि गेले ॥ त्यांहीं जावोनि दुर्योधना ॥ सविस्तर श्रुत केलें ॥१॥
मग दुर्योधन दुःशासन ॥ शकुनी आदिकरोनि कर्ण ॥ ह्मणती ते निश्चयें पांडव ॥ असती गुप्तवेष धरुन ॥२॥
येरव्हीं जीमुतीतें मारी ॥ ऐसा वीर नाहीं धरत्रीं ॥ तो भीमाचि होय निर्धारें ॥ तरी प्रकट होईल कवणेपरी ॥३॥
भीष्म द्रोण बोलाविले ॥ समस्त कौरव मिळाले ॥ आलोच करिती परस्परें ॥ तंव शकुनियां काय बोले ॥४॥
ह्मणे नष्टचर्य सरलें नाहीं ॥ तंव ते न प्रकटती कांहीं ॥ भीष्मद्रोण ह्मणती राया ॥ परि ते पांडवचि पाहीं ॥५॥
गुप्तवेषें विराटगृही ॥ सैरंघ्री ते द्रौपदी पाहीं ॥ भीमें वधिलें कीचकादी ॥ कैंचे गंधर्व लटिकी द्दाही ॥६॥
ऐसी जाहली निगुती ॥ तरी कां पां न फिटे भ्रांती ॥ आतां जो पाठवाल तेथें ॥ तया जीमूतीचीच गती ॥७॥
यावरी दुर्योधन ह्मणे ॥ दळभारेंसी ॥ स्वयेंचि जाणें ॥ संग्रामनिमित्त करोनी ॥ पांडव ठायीं पाडणें ॥८॥
भीष्म ह्मणे भलतें करा ॥ परि ते ठाउके न पडती गांधारा ॥ जंव पुरे नष्टचर्य ॥ तंव सत्व राखणें युधिष्ठिरा ॥९॥
मग शकुनियें ह्मणितलें ॥ मज येक असे आठवलें ॥ करोनि दोनभाग सैन्य ॥ विराटावरी जावें वहिलें ॥१०॥
गाई वळवाव्या मत्स्याचिया ॥ धर्म पाठविला भीमा धनंजया ॥ कांतरी गोब्राह्मणांच्या काजीं ॥ प्राण वेंचणें होय तयां ॥११॥
येणें उपायें प्रकट होती ॥ हें मानवलें सकळांप्रती ॥ मग सन्नद्ध करोनि सैन्य ॥ लागले विराटनगरपंथीं ॥१२॥
अकराक्षोणी दळभार ॥ सवें रणतुरांचा गजर ॥ स्थिरावोनि कृष्णेतटीं ॥ काय बोलिला गांधार ॥१३॥
दक्षिणदिशेचीं गोधनें ॥ तिकडे सुशर्मा तुह्मी जाणें ॥ चारी क्षोणी सैन्येंसी ॥ सकळ वळावीम गोधनें ॥१४॥
तुह्मी असा बुद्धीवंत ॥ हें कार्य करावें सावचित्त ॥ येरू निघाला दक्षिणदिशे ॥ खिल्लार वैराटाचें पुसत ॥१५॥
तंव तें पसरलें चरत देखा ॥ सवें पांचशतेअ रक्षकां ॥ त्यांहीं देखिलें पारक्यांतें ॥ मग गजबजले एकमेकां ॥१६॥
क्षणें सेना भोवंती पसरली ॥ मध्यें गोवळें कोंडिलीं ॥ मग थापटोनि गोधनें ॥ सुशर्म्याजवळी आणिलीं ॥१७॥
ते गोप सुशर्म्यासि ह्मणती ॥ तुह्मी महावीर क्षात्रवृत्ती ॥ तरी चोरी करितां दोष थोर ॥ गाई वळवितां अधोगती ॥१८॥
येरू ह्मणे भलेभले ॥ जारे वैराटा सांगा वहिले ॥ संग्रामेंविण नवचों आह्मी ॥ ह्मणोनि गोवळ सोडिले ॥१९॥
येरुं शंखध्वनी करित ॥ नगरीं प्रवेशले धांवत ॥ ह्मणती गोधनें वळविलीं ॥ धांवणें करा जी त्वरित ॥२०॥
रायें पुसिलें गोवळांसी ॥ नावें कायरे तयांसी ॥ येरूं ह्मणती पुसलें परी ॥ ते न सांगती आह्मांसी ॥२१॥
परि तयांचें दळ अपार ॥ वळविलें अवघें खिल्लार ॥ चौफेर पातल्या फौजा ॥ आह्मी पळोनि आलों शीघ्र ॥२२॥
मग विराट ह्मणे वीरांसी ॥ चला समस्त दळभारेंसी ॥ तंव ते सन्नद्ध होउनी ॥ निघाले थोर आवेशीं ॥२३॥
राव ह्मणे जी कंकभटा ॥ तेथें संग्राम होईल मोठा ॥ तरी गाई सोडवणेसी ॥ बल्लवा घ्यावें सुभटा ॥२४॥
कंकभटा ह्मणे रायासी ॥ तो काय जाणे युद्धासी ॥ सुखें येईल सांगातें ॥ परि आपण सांभाळिजे तयासी ॥२५॥
असो बोलावोनि बल्लवातें ॥ धर्में सांगितलें तयातें ॥ कीं संग्राम पहावा रायाचा ॥ तुह्मी राहोनि निवांतें ॥२६॥
यांचा मोड नेत्रीं देखावा ॥ मग त्वां पराक्रम करावा ॥ विजई होई रणमंडळीं ॥ ऐसा वर दीधला बल्लवा ॥२७॥
मग रथीं वेंधोनि नृपवर ॥ सवें असंख्य दळभार ॥ गांठीत आला पारकेयां ॥ सोडीत शस्त्रास्त्रांचे पूर ॥२८॥
तंव परतले येर वीर ॥ युद्ध जाहलें घोरांदर ॥ खणखणाटें पडिला वन्ही ॥ सुटले शोणिताचे पूर ॥२९॥
धडमुंडीं दाटली क्षिती ॥ अश्वगजरथपदाती ॥ पाचारोनि परस्परें ॥ शस्त्रघायें निवटिती ॥३०॥
तैं सुशर्म्याचे वीर ॥ नावें सारिती समग्र ॥ ह्मणती कौरवांचे भ्रद्रजाती ॥ कैंचा सृष्टिमाजी झूंजार ॥३१॥
ऐकोनि ह्मणितलें वैराटें ॥ गाई वळोनि केलें खोटें ॥ जयांची अपुरी आंगवणी ॥ ते तस्करत्वें भरिती पोटें ॥३२॥
काय उणें कौरवांप्रती ॥ कां पां शिरीं घेतली अपकीर्तीं ॥ गाई सोडोनि जारे पळा ॥ आतां लागा आल्या पंथीं ॥३३॥
सुशर्मा विराटासि ह्मणे ॥ आमुचें कर्तुत्व कोणी न जाणे ॥ पांडव कराया ठाउके ॥ आह्मीं हरिलीं गोधनें ॥३४॥
वैराट ह्मणे सुशर्म्यासी ॥ पांडव नाहींत रे मजपाशीं ॥ तरी गाई सोडोनि जा ॥ आपुलिये नगरासी ॥३५॥
येरू ह्मणे तुह्मी शरण होउनी ॥ जावें आलिये वाटे मुरडोनी ॥ आशा सांडा गोधनांची ॥ कां वृथा जातां मरणीं ॥३६॥
तें विराटासि न साहवे ॥ मग उठावला हांवे ॥ वरुषलासे बाणधारीं ॥ सुशर्मा सैरावैरा धांवे ॥६७॥
शर तोडिले संधारमात्रें ॥ फिटलें शस्त्रजाळ आंधारें ॥ सुशर्मया विराटासी ॥ युद्ध जाहलें अतिनिकुरें ॥३८॥
जरी सांगों संग्रामपसरू ॥ तरी विस्तरेल कल्पतरू ॥ असो इकडे शस्त्रास्त्रेंसीं ॥ रणीं भिडले उभयभारू ॥३९॥
तंव सुशर्में पांचां बाणीं ॥ विराट विंधिला तत्क्षणीं ॥ एकबाण मत्स्यहृदयीं ॥ वारू विंधिले चौंबाणीं ॥४०॥
आणि सवेंचिं येकें शरें ॥ सारथी पाडिला वसुंधरे ॥ रथ जात सैरावैरा ॥ मत्स्य विकळ शरीरें ॥४१॥
पळ सुटला सैन्यासी ॥ सुशर्में धरिलें विराटासी ॥ उदक पाजोनि केला सावध ॥ मग बोलिला तयासी ॥४२॥
नाभीनाभी मत्सराया ॥ चालें दुर्योधना भेटावया ॥ ह्मणोनि रथ मुरडिला ॥ मत्स्या भुजीं बांधोनियां ॥४३॥
दळभार मुरडला समस्त ॥ सुशर्मा चालिला जयवंत ॥ तंव इकडे विराटाच्या वीरीं ॥ बल्लव हिणाविला बहुत ॥४४॥
ह्मणती आजी कीचक असता ॥ तरी या सकळां मारिती ॥ हा पाहतसे बल्लव ॥ परि कांहीं नचले पुरुषार्थता ॥४५॥
मत्स्य नेइजेतो बांधोनी ॥ हा उगाचि पाहे नयनीं आजी सोडवील रायातें ॥ ऐसा येथें नाहीं कोणी ॥४६॥
यावरी तो बल्लव ह्मणे ॥ अरे माझें सामर्थे पाहणें ॥ मग एक वृक्ष उपटोनी ॥ धाविन्नला सोडवणें ॥४७॥
झोडीत चालिला दळभारासी ॥ वीर पळविले दाहीदिशीं ॥ अश्वगजरथ पायद ॥ लोळविले धरणीसी ॥४८॥
मग पाचारिलें सुशर्म्यातें ॥ ह्मणे साहें साहें रे निरुतें ॥ गाई चोरोनि जातोसी ॥ तरी यश कैसें प्राप्त तूतें ॥४९॥
ऐकोनि मुरडला सुशर्मा ॥ मग सैन्यें वेढिलें भीमा ॥ येरें झोडोनि वृक्षघातें ॥ सैन्य पाडिलें असीमा ॥५०॥
सिंह चौताळे गजांवरी ॥ नातरी गरुड सर्पावरी ॥ कीं पर्वत फोडी वज्रधर ॥ तैसा कौरवांतें संहारी ॥५१॥
कौरवभार चाकाटला ॥ ह्मणती बल्लव उठावला ॥ येरें धांवोनि सुशर्म्याचा रथ ॥ नेटें आंगेसिं भिडिन्नला ॥५२॥
रथ उचलोनि वेगेंसीं ॥ त्राणें आपटिला भूमिसी ॥ तंव पळोनि गेला सुशर्मा ॥ मृत्यु आला सारथीवारूसी ॥५३॥
सुशर्मा पळे वेगवत्तर ॥ पाठी लागला वृकोदर ॥ केशीं धरोनि आसुडिला ॥ येरू काकुळती करी थोर ॥५४॥
ह्मणे मी असें शरणागत ॥ राखराख गा जीवित ॥ येरें बांधोनि मागिले हातीं ॥ गेला वैराटापें धांवत ॥५५॥
ध्वजस्तभासी होता बांधिला ॥ तो भीमें मत्स्य सोडिला ॥ मग लाथेनें हाणोनी ॥ सुशर्मा भूमीसि पाडिला ॥५६॥
यावरी धांवोनि पुढिले भारीं ॥ गाई वळविल्या झडकरी ॥ राखणाइत कौरवांचे ॥ असंख्य मारिले वृक्षप्रहारीं ॥५७॥
आणि कौरवांचे रथ घोडे हस्ती ॥ नानाशस्त्रें वस्त्रें संजुती ॥ एकवटोनि आणिलीं भीमें ॥ तीं दीधलीं मत्स्याप्रती ॥५८॥
राव आनंदें धाविन्नला ॥ बल्लव स्नेहें आलिंगिला ॥ ह्मणे उतराई नव्हें बापा ॥ आजि प्राण त्वांराखिला ॥५९॥
मग बल्लवें ह्मणितलें ॥ राया म्यां कवणासि जिंकिलें ॥ सुशर्मा बाहुलें बापुडें ॥ येणें काय मन संतोषलें ॥६०॥
मनीं विचार होता थोर ॥ कीं आजी आला असेल गांधार ॥ सवें दुःशासन कर्णादिक ॥ तयाचा करणें संहारा ॥६१॥
परि ते नाहीं आले आजी ॥ थोर अवस्था राहिली माझी ॥ हीं दीनें रंकें बापुडीं ॥ वधितां लाज रणामाजी ॥६२॥
आतां सुशर्मा सोडोनि द्यावें ॥ नगरीं महोत्साहें प्रवेशावें ॥ राव संतोषला ऐकुनी ॥ सुशर्मा सोडिला बल्लवें ॥६३॥
मग तो अधोवदनें चालिला ॥ स्वनगरीं जावया निघाला ॥ चारीक्षोणी दळभारू ॥ रणीं बल्लवें झोडिला ॥६४॥
तंव इकडे दुर्योधानें ॥ उत्तरेचीं वळाया गोधनें ॥ सातक्षोणी दळभारासी ॥ आज्ञा दीधली तत्क्षणें ॥६५॥
भीष्म द्रोण आणि कर्ण ॥ सोमदत्त कीं विकर्ण ॥ कृपाचार्य सुबळसुत ॥ अश्वत्थामा दुःशासन ॥६६॥
जयद्रथादि महारथी ॥ कनकदंडीं शोभताती ॥ छत्रें ध्वज पताका ॥ निशाणनादें गर्जती ॥६७॥
उत्तरें नगरनाळेया पाठारीं ॥ गोधनें चारिती खिल्लारी ॥ तंव गाईवळपर्वताआडोनी ॥ उठावा केला कौरववीरीं ॥६८॥
पांचशतें राखणाइत ॥ देखोनि पळाले हाका देत ॥ येरीं वळाविल्या गाई ॥ गोवळे शंखध्वनि करित ॥६९॥
नगरामाजी प्रवेशले ॥ ह्मणती धांवाधांवा वहिले ॥ गोधनें हरिलीं पारकीं ॥ अपरिमित दळ आलें ॥७०॥
नगरीं गवगव जाहला ॥ ह्मणती राव दक्षिणे गेला ॥ तंव हे बोंब आली दुसरी ॥ पुत्र उत्तर असे एकला ॥७१॥
उत्तर ह्मणे जनांप्रती ॥ आजी मज नाहीं सारथी ॥ येरव्हीं सोडवोनि गोधनें ॥ करितों जगामध्यें ख्याती ॥७२॥
तो विराटाचा कुमर ॥ थोर बोलतसे बडिवार ॥ तंव सैरंध्री ह्मणे उत्तरा ॥ माझा ऐकें गा विचार ॥७३॥
येक अर्जुनाचा सारथी ॥ ज्याची त्रैलोक्यामाजी ख्याती ॥ खाडववन जाळिलें पार्थें ॥ तैं रथ फिरवी गतिविगती ॥७४॥
येरू ह्मणे हो सैरंध्रिये ॥ तो कवण सांगे लवलाहें ॥ सैरंध्री ह्मणे बृहन्नळ ॥ सर्व कळापूर्ण होय ॥७५॥
हा जरी करील ह्मणितलें ॥ जरी तुवां सर्वथां जिंकिलें ॥ परि तो उत्तरेच्या प्रार्थनेविण ॥ नायके आणिकाचें सांगितलें ॥७६॥
मग उत्तरेसि बोलाउनी ॥ उत्तर ह्मणे वो बहिणी ॥ जाईन गाईच्या कुडावियां ॥ पाठवीं बृहन्नळा प्रार्थुनी ॥७७॥
येरी गेली नाटकशाळे ॥ तंव पुसिलें बृहन्नळें ॥ इतुका वेग करोनि मुली ॥ कां पां शीघ्र आलीस बोलें ॥७८॥
येरी करसंपुट जोडोनी ॥ विनवीतसे कुमारवचनीं ॥ जीजी गोधनें पारकीं नेलीं ॥ उत्तर जातसे सोडवणीं ॥७९॥
तरी तुह्मासि बोलाविलें ॥ कां मत्स्य बल्लव दक्षिणे गेले ॥ आतां उत्तरदिशेचें गौसाह्य ॥ हें तुह्मां करणीय वहिलें ॥८०॥
ऐकोनि उत्तरेचीं वचनें ॥ दिवस मोजिले अर्जुनें ॥ तंव तेरा दिवसां आगळीं ॥ तेरा वर्षे जाहलीं पूर्णें ॥८१॥
मग आनंदोनि चित्तीं ॥ ह्मणे आतां करूं ख्याती ॥ उत्तरेसि पुसता जाहला ॥ हें कोणीं सांगितलें तुजप्रती ॥८२॥
तये वेळीं उत्तरा बोले ॥ हें सैरंध्रीयें श्रुत केलें ॥ येरें माथा तुकावोनी ॥ येवोनि उत्तरा जोहारिलें ॥८३॥
येरें बृहन्नट सन्मानिला ॥ सर्ववृत्तांत सांगीतला ॥ ह्मणे सारथी होवोनि तुह्मी ॥ माझा रथ चालवा वहिला ॥८४॥
राव गेलासे दक्षिणे ॥ आपणां उत्तरदिशे जाणें ॥ कौरव जिंकोनियां रणीं ॥ गाई अगत्य सोडविणे ॥८५॥
ऐकोनि बृहन्नटा बोले ॥ म्यां सारथ्यपण पार्थाचें केलें ॥ तया बोला मत्स्यसुता ॥ बहुत दिवस जाहले ॥८६॥
आतां विसरलों कळा कुसरीं ॥ दुजा येक विचार अवधारीं ॥ जरी पार्था ऐसा महारथी ॥ तैंचि सारथी धिंवसा धरी ॥८७॥
मग ह्मणे बाळ उत्तर ॥ हा काहीं न कीजे विचार ॥ अरी मारीन समरंगणीं ॥ तरीच मी मत्स्येंद्रकुमर ॥८८॥
आतां वेग करीं शीघ्रगती ॥ पार्था कौतुक वाटलें चित्तीं ॥ मग संजोगोनि रहंवर ॥ लेहले उभय संजुती ॥८९॥
पार्थें बैसोनियां रथीं ॥ वारु दाविले गतीविगती ॥ तंव संतोषोनि उत्तर ॥ ह्मणे सत्य पार्थाचा सारथीं ॥९०॥
रथा करोनि प्रद्क्षिणा ॥ वंदिली माता सुदेष्णा ॥ येरीनें दिला आशिर्वाद ॥ जिंकोनि येई कौरसेना ॥९१॥
उत्तरा ह्मणे हो सहोदरा ॥ जिंकोनियां कौरववीरां ॥ अलंकार आणावे आह्मां ॥ सैरंघ्रीसि पीतांबरा ॥९२॥
तें ऐकोनियां किरीटी ॥ पालवीं बांधी शकुनगाठी ॥ मग उत्तर चढोनि सत्वर ॥ रथ हाकिला दाटोदाटी ॥९३॥
खिल्लारियां समवेत ॥ उत्तरदिशे चालिला रथ ॥ तंव देखिला कौरवभार ॥ छत्रशस्त्रीं लखलखित ॥९४॥
मध्यें दुर्योधन वीर ॥ भोंवता सातक्षोणी दळभार ॥ दुरोनि देखतां राजपुत्रें ॥ चळकंप सुटला थोर ॥९५॥
न धरवेचि कांहीं प्रौढी ॥ रथाखालीं घातली उडी ॥ पवनवेगें पळत असे ॥ दाटली हिंवाची हुडहुडी ॥९६॥
तंव पार्थ ह्मणे धीर धरीं ॥ कैसा बोलिला होतासि मंदिरीं ॥ तो भरंवसा धरोनि आलों ॥ शेवटीं केली हे परी ॥९७॥
तुज भेडाचेनि सांगातें ॥ उणें आलेंरे आमुतें ॥ ऐसें ह्मणोनि रथावरी ॥ ओढोनि घेतलें उत्तरातें ॥९८॥
येरू आला काकुळती ॥ चरणीं लागे पुढतपुढतीं ॥ ह्मणे भेटाया मातेसी ॥ जाऊंदे गा नगराप्रती ॥९९॥
ऐसा करुणाक्रांत देखिला ॥ मग पार्थें आश्र्वासिला ॥ उत्तरा नाभीरे ह्मणोनी ॥ मस्तकीं हस्त ठेविला ॥१००॥
तूं गा चालवीं माझा रथ ॥ मी करीन यांचा निःपात ॥ येरू ह्मणे कौरवां जिंकी ॥ ऐसा एकचि असे पार्थ ॥१॥
तंव ह्मणे बृहन्नट ॥ तूं नावेक धरीं नेहट ॥ अर्जुन तो मीचि जाण ॥ खुणा सांगतों ऐक प्रकट ॥२॥
पार्थ किरीटी अर्जुन ॥ बीभत्स विजयी फाल्गुन ॥ सव्यसाची धनंजय ॥ गुडाकेश श्र्वेतवाहन ॥३॥
या दशनामीं अलंकृत ॥ मी कुंतिआत्मज पंडुसुत ॥ उत्तर ह्मणे प्रत्यया आलें ॥ परि कोठें असती शस्त्रें रथ ॥४॥
तये वेळीं ह्मणे पार्थ ॥ जैं आलों तुमच्या नगरांत ॥ तै पाठविला स्वर्गलोकीं ॥ इंद्राजवळी दिव्यरथ ॥५॥
गांडीव धनुष्य अक्षय्य भाते ॥ शमीवरी ठेविले निरुते ॥ ते सर्पवेषें विद्याबळें ॥ असती गुरुकृपासामर्थ्यें ॥६॥
जाई शस्त्रें आणीं झडकरी ॥ माझें नाम स्मरण करीं ॥ सर्पवेष सांडोनियां ॥ शस्त्रें होतील निर्धारीं ॥७॥
येरू गेला शमीजवळी ॥ पार्थ चिंतिला हदयकमळीं ॥ तंव सर्पाचीं जाहलीं शस्त्रें ॥ तीं घेवोनि आला तत्काळीं ॥८॥
पार्थें चिंतिला सुरनाथा ॥ तंव स्वर्गीचा उतरला रथ ॥ श्र्वेतवारू महाघोष ॥ ध्वजस्तंभीं हनुमंत ॥९॥
तिये रथीं चढला सत्वर ॥ सारथीं केलासे उत्तर ॥ पार्थ चालिला कौरवांवारी ॥ करुनि धनुष्या टणत्कार ॥११०॥
इकडे द्रोण भीष्मातें बोलिला ॥ पैल पहा हो पार्थ आला ॥ ध्वजीं भुभुःकारे हनुमंत ॥ उठिला सवावरी येकला ॥११॥
अवघे चाकाटोनि पाहती ॥ खुणा निरुत्यां ओळखिती ॥ खळबळला सिनासमुद्र ॥ कोप दुर्योधनाचित्तीं ॥१२॥
ह्मणे या आचार्यासि कोणी ॥ शीख लाविता नाहीं रणी ॥ वानिती अर्जुनाचा यांवा ॥ आह्मां भय दाखउनी ॥१३॥
हा अर्जुन कोठोनि आला ॥ वीरां वृथा दचक घातला ॥ अन्न खावोनि आमुचें ॥ पार्थ लटिकाचि वानिला ॥१४॥
आजि मारितों मी तोडीं ॥ परि चुकवू हे प्रसंगघडी ॥ आमुचे आश्रित असोनी ॥ वानिती पार्थाची प्रौढी ॥१५॥
पांडव प्रकटतील कैसे ॥ पुनः वनवास बारावर्षें ॥ तीं कां येतील बापुडीं ॥ नष्टचर्यचि सरलें नसे ॥१६॥
ऐसें असे तुमच्या मनीं ॥ मागुतें पांडव जावे वनीं ॥ भले हिताचे आचार्य ॥ पढतमूर्ख अज्ञानी ॥१७॥
मग बोलिला कर्णासी ॥ काय उगला ऐकितोसी ॥ दळ खळबळलें आघवें ॥ फजीत करीं या द्रोणासी ॥१८॥
यावरी कर्ण ह्मणे हो द्रोणा ॥ वायां वानितां अर्जुना ॥ जैं गांजिली द्रौपदी ॥ तें कोठें होती आंगवणा ॥१९॥
तुह्मी दुर्योधनाचे पोशिले ॥ आणि पार्था वानिता भलें ॥ तरी विश्वास कायसा ॥ वडीलपण धिकू जाहलें ॥१२०॥
जरी हा अर्जुणचि असला ॥ तरी मी यासी जिंकीन येकला ॥ तंव ह्मणे कॄपाचार्य । कर्णा राहें रे उगला ॥२१॥
थोर पार्थाचा पुरुषाचार ॥ खांडववनीं जिंकिला देवेंद्र ॥ हनुमंत सेतुबंधनीं ॥ तैसाचि पार्वतीश रुद्र ॥२२॥
द्रौपदी जिंकली सैंवरीं ॥ तैं तुह्मांसि पिटिलें समरीं ॥ काल सोडविलें दुर्योधना ॥ गंधर्वीं नेतां गगनोदरीं ॥२३॥
तयाचे पंवाडे वर्णितां ॥ दचक होतो वीरचित्ता ॥ तूं वृथाभिमान जल्पोनी ॥ जिंकीन ह्मणती पंडुसुता ॥२४॥
इकडे संन्निध येवोनि रथ ॥ पार्थें स्फुरिला देवदत्त ॥ भीष्म ह्मणे ऐकें कर्णा ॥ हा घे आला पंडुसुत ॥२५॥
शंखाचिये नादासरसी ॥ खळबळ जाहली सैन्यासी ॥ येक संसरोनि सन्नद्धले ॥ परि भयभीत मानसीं ॥२६॥
अवघीं चिन्हें भासलीं ॥ परि कांती बीभत्स देखिली ॥ येक ह्मणती होय कीं नव्हे ॥ येक ह्मणती माव केली ॥२७॥
येक ह्मणती विराट आला ॥ येक ह्माणती पार्थ नटला ॥ अरे देवदत्त कपिध्वजी ॥ गांडीवधारी वीर भला ॥२८॥
हे काय ह्मणोनि प्रकटले ॥ मग दिवस गणूं लागले ॥ तंव नष्टचर्य जाहलें पूर्ण ॥ भाषावचन साच केलें ॥२९॥
मग ह्माणितलें भीष्मदेवें ॥ आजी गांधार नुरे जीवें ॥ तरी सकळीं मिळोनियां ॥ दुर्योधनासि रक्षावें ॥१३०॥
अरे शकुनिया दुःशासना ॥ तुह्मीं पळवावें दुर्योधना ॥ गोधनें घेवोनि जा नगरीं ॥ आह्मीं साहूं या अर्जुना ॥३१॥
ऐसा विचार जाहला ॥ मग संग्राम प्रवर्तला ॥ तो ऐकिजे श्रोताजनीं ॥ मधुकर विनविता जाहला ॥३२॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ नवमस्तबक मनोहरु ॥ एकादशाऽध्यायीं कथियेला ॥ उत्तरगोग्रहणप्रकारू ॥१३३॥