कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय १४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जन्मेजय विनयी भावें ॥ कीं मज नीतिशस्त्र सांगावे ॥ जें बोलिलें विदुरदेवें ॥ अधांप्रती ॥१॥

वैशंपायन ह्मणती पाहें ॥ भारतीं श्रेष्ठ उद्योग आहे ॥ त्याहीमाजी विदुरोक्ती हे ॥ सारतर व्यासोक्त ॥२॥

विदुर अंधासि ह्मणत ॥ कीं प्रथमग्रासी मक्षिकापात ॥ तेवीं धर्मराजा नीतीमंत ॥ निरंतर दर्शनीय ॥३॥

तो त्वां पुत्रांचे अनुमतें ॥ पाठविला वनवासातें ॥ परि तो वडीलपणें मानी तूतें ॥ स्वयें कष्ठ भोगोनी ॥४॥

विदुर ह्मणे धृतराष्ट्रासी ॥ राया राजनीती परियेसीं ॥ निद्रानाश होय त्यासी ॥ बळिष्ठ ज्यासी विरोधी ॥५॥

दुर्बळ असोनि साधन न करी ॥ ज्यांचे द्रव्य गेलें भलतियापरी ॥ तैसाचि कामी व्याभिचारी ॥ आणि तस्कर ॥६॥

जो परद्रव्य अभिलाषी ॥ निद्रा नये इतुकियांसी ॥ तरी हेचि दोष तुह्मांसी ॥ असतील प्राप्त ॥७॥

यावरी अंध विदुरासि ह्मणत ॥ हें तुझें वचन गा सत्य ॥ पुढें ऐकावें तवोत्क ॥ ऐसें मज वाटतें ॥८॥

तरी त्वां निःशांक बोलणे ॥ मग विदुर अंधासि ह्मणे ॥ ऐकें पंडितांची लक्षणें ॥ द्त्ताचित्तें ॥९॥

पाहें राजलक्षणीं युधिष्ठिर ॥ साजे त्रैलोक्यासी नृपवर ॥ तेजस्वी प्राज्ञ सत्यपर ॥ कोमलता पराक्रमी ॥१०॥

तो वडिलत्वें मनोनि तूतें ॥ बहुत साहतो केशातें ॥ तुवां पंडितलक्षण निरुतें ॥ सोडिलेंसे मूर्खत्वें ॥११॥

दुर्योधनें शकुनी कर्ण ॥ चौथा नष्ट दुःशासन ॥ ऐसें तूं मंत्री करोन ॥ इच्छितोसी राज्यवृद्धी ॥१२॥

तरी शतयेक बुद्धीमंत ॥ तुज सांगतो प्रस्तुत ॥ संकलोनि नीतिग्रंथ ॥ विस्तारेंसीं ॥१३॥

आत्मज्ञान आणि शांती ॥ नित्यधर्म जेथ असती ॥ ते पंडित बुद्धिशतीं ॥ क्रमेंचि तिन्ही गणावे ॥१४॥

द्रव्यंतृष्णाविरहित ॥ जितेंद्रिय मंगलसेवित ॥ अमंगळ त्यजोनि पढत ॥ वेदशास्त्रपुराणें ॥१५॥

यथाशक्ती इच्छा धरी ॥ यथाशक्ती इच्छा धरी ॥ कोणाची अवगणना न करी ॥ तो पंडित पृथकभावें ॥१६॥

कार्यतत्व शीघ्र जाणणें ॥ मंत्रीविचार बहुधा ऐकणें ॥ मग अनिंद्य कर्तुत्व करणें ॥ तो बुद्धिमंत ॥१७॥

न बोले अनादरें पसतां ॥ आदरें पुसलिया होय वक्ता ॥ अप्राप्ताची नकरी चिंता ॥ तथा गतांचा शोक नकरी ॥१८॥

जो कष्टप्राप्तसमयीं ॥ मूढत्वा नागवसे कहीं ॥ आणि विचारोनियां पाहीं ॥ आरंभी कार्य ॥१९॥

जो अपुरें नसांडीं कार्य ॥ ज्यचा काळ सार्थकीं जाय ॥ ज्याचें चित्त स्वस्थ होय ॥ तो बुद्धिमंत ॥२०॥

जो उत्तम कार्य करी ॥ हितकारियावरी क्रोध न घरी ॥ जो वानिलें नागिकारी ॥ मोठेपण ॥२१॥

अथवा जालिया अपमान ॥ क्रोध नघरी समय जाणोन ॥ तो पंडित विचारज्ञ ॥ बुद्धिमंत ॥२२॥

जो सप्तव्यसनें सांडोन ॥ असे वर्तमान जाणोन ॥ मुर्खामाजी लपवोन ॥ आपणेयातें ॥२३॥

बहुत अकुशळ मिलती ॥ स्वामीचें कार्य नाशिती ॥ कांहीं न बोले तयांप्रती ॥ तो बुद्धीमंत ॥२४॥

तेथें नीतिमार्ग बोलतां ॥ मूर्ख प्रवर्तती अनर्था ॥ यास्तव जाणोनि होय नेणता ॥ तो बुद्धिमंत ॥२५॥

न करी परासि अपकार ॥ करी अपकारिया उपकार ॥ कळों नेदी अभ्यंतर ॥ तो बुद्धीमंत ॥२६॥

जयाचा अंगिकार करी ॥ तया नसंडी काळांतरीं ॥ तो कीर्ति पावे लोकाचारीं ॥ दुजा युधिष्ठिर ॥२७॥

सर्पालागीं न खेळवी ॥ नातलगांसी न आळवी ॥ राजयातें न चाळवी ॥ तो बुद्धीमंत ।२८॥

न करी अभक्ष्य भक्षण ॥ तैसेंचि अपेयाचें पान ॥ नकरी तो नर सज्ञान ॥ लोकत्रयीं ॥२९॥

सकळ पदार्थ वस्तु कुवस्त ॥ जाणे गुणलक्षण भावार्थ ॥ सुवस्तु संग्रही निभ्रांत ॥ तो बुद्धिमंत ॥३०॥

वडिलांची आज्ञा करी ॥ कुसंगासी त्यागी दूवी ॥ आपुलें हिताहित विचारी ॥ तो बुद्धीमंत ॥३१॥

गुरुवचनीं सदा रत ॥ हरिभक्तिसी मनोरथ ॥ कृपाळुपणें अभेदत्व ॥ भूतमात्रीं ॥३२॥

धनधान्य मिळालिया ॥ जो भोगी वांटोनियां ॥ अनाथांवरी करी दया ॥ तो बुद्धिमंत ॥३३॥

काम क्रोध मद मत्सर ॥ दंभ प्रपंच अहंकार ॥ द्देष दोष त्यजी निर्धार ॥ तो बुद्धिमंत ॥३४॥

ऐसें पृथकगुण भावें । शतपंडित ओळखावे ॥ ते लिहितां ग्रंथ नमावे ॥ कथाकल्पतरू ॥३५॥

हे गुण विपरित ज्यातें ॥ तें मूर्ख जाणावे निरुतें ॥ परि काहीं येक तूतें ॥ सांगतों राया ॥३६॥

मूढ आणि गर्विष्ठ अत्यंत ॥ दरिद्री थोर इच्छाभिभूत ॥ द्युत खेळोनि द्र्व्यार्थ ॥ मेळवूं इच्छी ॥३७॥

आपुलें कार्य सांडोनी ॥ फिरे परावियाचे सदनीं ॥ सेवा करी वेतनावांचोनी ॥ तो मुर्ख जाण ॥३८॥

समर्थाची वैर करीं ॥ वैरयासी मित्रत्व धरी ॥ मित्रालागीं द्देषें मारी ॥ करी दुष्टकार्यें ॥३९॥

पाचारिल्या विण निघे पुढें ॥ पुसल्यावांचोनि बडबडे ॥ वैरी असतां सावधान पुढें ॥ आपण राहे असावध ॥४०॥

स्वयें दोषवंत अवधारीं ॥ वडिलांचे दूषण प्रकट करी ॥ शक्तीविण कोप धरी ॥ ऐसें मूर्ख पृथकत्वें ॥४१॥

जो नायके न परिसे शिशु ॥ तयासि करी उपदेशु ॥ तो मूर्ख जाणिजेपशु ॥ धृतराष्ट्रा गा ॥४२॥

कृपणाची सेवां करी ॥ अनादायीं खर्च करी ॥ असोनि कर्पण्य अंगिकारी ॥ तोही मूर्ख ॥४३॥

राया मारितां शस्त्रप्रहारें ॥ येक मरे अथवा नमरे ॥ परि शाहणेयाचेनि मंत्रें ॥ सर्व नासे परदळ ॥४४॥

तैसाचि परराज्य परदेश ॥ चतुर वैर्‍याचा करी नाश ॥ परि ऐकतां मूर्खोपदेश ॥ आपुलाचि नाश होय ॥४५॥

आतां निश्वयात्मक बुद्धि करोनी ॥ कार्याकार्य निर्धारोनी ॥ शत्रु मित्र उदासीन तिन्ही ॥ करीं आपुलें ॥४६॥

साम दान भेद निग्रह ॥ हे चतुविंध उपाय ॥ करितां सर्वार्थ सिद्ध होय ॥ न करितां हानी ॥४७॥

षचज्ञानेंद्रियें जिंकोन ॥ संधि विग्रह यान आसन ॥ द्वैघीभाव संश्रयण ॥ षट्‍पदार्थ जाणावे ॥४८॥

आतां सप्तव्यसनें जाण ॥ स्त्री द्युत पारघीकरण ॥ सुरापान वाक्य कठिण ॥ कठिण दंड ॥४९॥

दुष्टद्रव्यसंग्रहण ॥ हें सांडीं सप्तव्यसन ॥ तरी सुख पावसी गहन ॥ घृतराष्ट्रा तूं ॥५०॥

विषें आणि शस्त्रमारें ॥ प्राणी येक येकचि मरे ॥ परि राजवर्गींचे कुमंत्रें ॥ होय राष्ट्रनाश ॥५१॥

कुळ नासे आपणासहित ॥ ह्मणोनि कुमंत्री त्यजी बुद्धीमंत ॥ न त्यजीं तो निम्रांत ॥ मूर्ख जाण ॥५२॥

राया मिष्ठान्न आहारू ॥ आणि नीतीधर्मविचारू ॥ येकलीयें नयें करूं ॥ जाणत्यानें ॥५३॥

येकलियें मार्ग न क्रमावा ॥ तथा प्रवास न सेवावा ॥ वारिलें करी तो जाणावा ॥ मूर्खरावो ॥५४॥

बहुत एकत्रनिजेलिया ॥ उठोनि नबचावें येकलिया ॥ जो कार्य करी न पुसलिया ॥ तो मूर्ख जाणिजे ॥५५॥

राया सत्यवचनें करुनी ॥ संसारसमुद्र तरती प्राणी ॥ जेवीं सिंधु नावेचिनी ॥ तरि जे देखा ॥५६॥

अगा भलतियाही अर्थी ॥ पुरुषें धरावी क्षमा शांती ॥ तरी बहुत गुण होती ॥ न धरिता दोषाधिक्य ॥५७॥

वैरियासी विरोध पाहीं ॥ कराया समर्थ राजेही ॥ येरां दुर्बळा आचारितांही ॥ होय नाश ॥५८॥

कोणा कठिणोक्ति न बोलावी ॥ नीचाची संगती न धरावी ॥ वैरी जिंकिल्यावांचोनि बरवी ॥ कीतीं नपवें ॥५९॥

तोचि सज्ञान भूपती ॥ जो न करी इतुक्यांची संगती ॥ तेंचि सांगतसें पुढती ॥ ऐकें राया ॥६०॥

चारण भाट नीच बाळक ॥ जटिल संन्यासी नापिक ॥ मूर्ख आळशी बहुभक्षक ॥ हे मंत्री नकरावे ॥६१॥

असाअधानता भय क्रोध ॥ निद्रा आलस्य विलंब प्रसिद्ध ॥ हे अवगुण बहुविध ॥ त्यजावे रायें ॥६२॥

जो न सांगे शास्त्राचारु ॥ तो आचार्य त्यजावा निर्धारू ॥ मूर्खऋत्विज नये करूं ॥ मंत्री मद्यपानी ॥६३॥

जो एतुलेंही करीं ॥ तों मूर्ख राजा निर्धारी ॥ पृथकभावें दोनीपरी ॥ सांगतसें सज्ञाना ॥६४॥

स्वामी होवोनि आपणातें ॥ समई रक्षीना निरुतें ॥ जो सेवोनि राहे तयातें ॥ तो मूर्ख जाण ॥६५॥

निष्ठुर बोलाची नारी ॥ तियेसी जो आत्मत्व करी ॥ तो मूर्ख आणि जो न करीं ॥ तो बुद्धिमंत ॥६६॥

गोधनें सोडोनि वनांत ॥ आपण राहे जो गांवांत ॥ करी गांवव्यवहाराची मात ॥ तो गोवारी त्यजावा ॥६७॥

नापिक वनांत जावोनि राहे ॥ तरी मूर्ख होय कीं नोहे ॥ तेणें कार्य काम पाहें ॥ करावें गांवांतची ॥६८॥

सत्य दान आणि उद्यम ॥ अक्रोध धैर्य शांती शम ॥ हे इतुके गुण उत्तम ॥ राखावे पुरुषें ॥६९॥

प्रज्ञा कुळोत्तम दम ॥ श्रुत दान पराक्रम ॥ थोडें बोलणें उत्तम ॥ आणि करणें परोपकार ॥७०॥

मंडित ऐशा आठीगुणीं ॥ तो सुखियां होय प्राणी ॥ हे न घरी तो नर जाणीं ॥ मूर्खराया ॥७१॥

आतां नाशाचे आठ गुण ॥ तेही सांगतों तुजलागुन ॥ प्रासादादि उच्छेदकरण ॥ तथा ब्राह्मणविरोध ॥७२॥

द्दिजाचें द्रव्य हरण ॥ निंदा आणि दुर्बळहनन ॥ कार्य नाठवे आवडे स्तवन ॥ आणि करणें याचना ॥७३॥

हे आठ दोष जाणोनी ॥ प्राज्ञें सांडावे बुद्धी धरोनी ॥ जो न सांडी तो प्राणी ॥ मूर्ख राया ॥७४॥

ज्याची कीर्तीं मृत्युलोकीं ॥ जितुका काळ असे आइकीं ॥ तंव परियंत्र स्वर्गलोकीं ॥ तो पुरुष वसतसे ॥७५॥

जो भुमिवृत्तिचेनि अर्थें ॥ असत्य बोलतो निरुतें ॥ त्याचे पूर्वज नाशातें ॥ पावती समग्र ॥७६॥

तस्मात् अर्थीं भूमीचिया ॥ तुं योग्य नव्हसी असत्य बोलाया ॥ भूमि देवोनि पांडवां तयां ॥ होई सत्यवादी ॥७७॥

नाहींतरी सपारिवारीं ॥ नाश पावसील निर्धारीं ॥ ह्माणोनि बुद्धिशत अंगिकारी ॥ सांडी मूर्खशत ॥७८॥

राया कौरव तेंचि वन ॥ माजी पांडव व्याघ्र जाण ॥ तरी एक नासे एकावांचोन ॥ पाहें विचारोनी ॥७९॥

स्त्री राजा सर्प शत्रु ॥ भोग आयुष्य नदीचा पुरू ॥ मूर्ख मद्यपी तस्कर कातरु ॥ यांचा विश्वास न धरावा ॥८०॥

सर्प सिंह आणि अग्नी ॥ राजकुळ कीं पुत्र जाणीं ॥ यांची अवज्ञा न करी तो ज्ञानी ॥ करी तो मूर्ख ॥८१॥

तरी पुत्रवत् पांडव वीर ॥ न करीं अवज्ञा अविचार ॥ अनर्थ करितील निर्धार ॥ खवळलिया ॥८२॥

जेवीं काष्ठ‍अंतर्गत ॥ अग्नी असे शांत गुप्त ॥ तो काष्ठातें नाहीं जाळित ॥ प्रत्यक्ष जाण ॥८३॥

परि तो घर्षणाच्या द्दारें ॥ कीं दीप्तं केलिया निर्धारें ॥ काष्ठेंचि जाळीं अपारें ॥ तैसें पंडुपुत्र ॥८४॥

हे लतारूपी कौरव ॥ ते वृक्षरूपी पांडव ॥ परस्परें विस्तारभाव ॥ जाणोनियां सख्य करीं ॥८५॥

राया तुं पुत्रांसहित ॥ वनरूपी अससी निम्रांत ॥ आणि सिंहरूपी निश्र्वित ॥ पंडुपुत्र ॥८६॥

तरी सिंह नाहींत जिये वनीं ॥ तें वन भलता नेईल तो डोनी ॥ तेवीं पांडव सिंहावांचोनी ॥ न राहे कौरववन ॥८७॥

उदका जन्मस्थान अग्नी ॥ कीं क्षत्रिय ब्राह्मणापासोनी ॥ नातरीं पाषाणजन्मखाणी ॥ लोखंडासी ॥८८॥

यांचे सामर्थ्य सर्वत्र वतें ॥ जेथें जन्म नाशी तेथें ॥ तैसा क्षत्रिय ब्राह्मणातें ॥ वंधु न शकेची ॥८९॥

ज्याचें अंतर्गत विचारलें ॥ तें बाहेरिल्यासि नकळे ॥ कार्य जालिया वरी कळे ॥ तो चिरकाळ राज्य करी ॥९०॥

मंत्रविचार करावा रायें ॥ तें तुजला सांगतों ठाये ॥ पर्वतावरी जावोनि पाहें ॥ कीं घवलारमाडिये ॥९१॥

अथवा वनांत जाउनीं ॥ जेय पुत्रादि नसती कोणी ॥ जावोनि ऐशा एकांतस्थानीं ॥ कीजे मंत्रविचार ॥९२॥

जया देशांत धूर्त स्त्री ॥ बाळकराजा राज्य करी ॥ तो देश सर्वप्रकारीं ॥ होय बुडस्थळ ॥९३॥

जेवीं पाषाण घालितां जळीं ॥ तो जावोनि बैसें तळीं ॥ कीं वृक्ष उन्मळे समूळी ॥ नदीतीरींचा ॥९४॥

धूर्त चारण आणि वेश्या ॥ जयाची करिती प्रशंसा ॥ तयाचें जीवन सर्वशः ॥ नव्हें प्रतापकारी ॥९५॥

राज्यभार दुर्योधनाचे माथां ॥ तुह्मी देवोनि जालेति निश्विता ॥ परि अल्पदिवशीं पडेल सर्वथा ॥ जेवीं बळीं पाताळीं ॥९६॥

तूं ऐश्वर्यमदें परियेंसीं ॥ बळवंत मानिसी पुत्रांसी ॥ करोनि गुणावगणनेसी ॥ परि पावसी नाश ॥९७॥

तरी गुणहीन पुत्र दूर करीं ॥ गुणवंत पांडव अंगिकारी ॥ ऐसी नीती नानापरी ॥ कथिली विदुरें ॥९८॥

तंव अंध विदुरातें ह्मणत ॥ हें तुझें वचन सत्य ॥ कीं जिकडे देवधर्म निभ्रात ॥ तिकडेचि जय ॥९९॥

तरी ऐसिया काय करणें ॥ स्नेहपाशीं मजकारणें ॥ बांधिलें आहे दुर्योधनें ॥ यास्तव न करवे पुत्रत्याग ॥१००॥

यावरी तो विदुर बोले ॥ जरी दुर्गुणी पुत्र जाहले ॥ तरी त्यांसी दंडितां भलें ॥ पुरुष पावें कल्याण ॥१॥

पांडव तरी गुणवंत ॥ तुझा प्रसाद असती इच्छित ॥ ह्मणोनि त्यांवरी निभ्रांत ॥ करीं राया प्रसाद ॥२॥

कित्येक ग्राम द्यावे त्यांसी ॥ मग ते संतुष्टतील तुजसी ॥ तेणें सदैव यश पावसी ॥ स्थिर होईल राज्यलक्ष्मी ॥३॥

तुवां वडिलत्वें पुढां व्हावें ॥ स्वपुत्रांचें हित करावें ॥ हें तुझें हित तुज सांगावें ॥ लागे आह्मं ॥४॥

प्राज्ञें जातिविरोध न करावा ॥ विरोध अनर्थमूळ जाणावा ॥ सुखदूःख भोग भोगावा ॥ वांटोनि गोत्रां मध्यें ॥५॥

जाती तारी जाती मारी ॥ दुष्ट बुडवी साधु तारी ॥ तरी पांडव साधूंच्या परी ॥ तूंही तैसा होईगा ॥६॥

तूं पांडवासहित असतां ॥ वैरियां अजिंक्य सर्वथा ॥ पूर्वी दुर्योधनें पंडुसुतां ॥ दुखविलें बहु ॥७॥

तरी तें केडीं वडीलपणें ॥ बुझावोनि त्यां सुख देणें ॥ तांसी जागा देवोनि ह्मणें ॥ निष्पाप तुवां ॥८॥

वर्णाश्रमधर्में आघवें ॥ तुवां राज्य चालवावें ॥ क्षत्रधर्मावेगळीं पांडवें ॥ तीं राजधर्मीं राहवीं ॥९॥

हे राजधर्म सांगीतले पाहीं ॥ पुढां आत्मज्ञान सांगावें कांहीं ॥ तरी मज अधिकार नाहीं ॥ न्यूनत्वपणें ॥११०॥

मग सनत्सुजात ऋषी स्मरिला ॥ तो विदुराजवळी पातला ॥ तेणें ब्रह्मोपदेश केला ॥ घृतराष्ट्रासी ॥११॥

तो भीष्मपर्वीं गीतार्थीं ॥ संकलोनि सांगिजेल पुढती ॥ ह्मणे वैशंपायन भुपती ॥ जन्मेजया गा ॥१२॥

ऐसें विदुरें सनत्सुजातें ॥ निरुपिलें घृतराष्ट्रातें ॥ असो रात्रि क्रमिलिया प्रभातें ॥ जाहली राजसभा ॥१३॥

एथ धृतराष्ट्र भीष्म द्रोण ॥ कृप शल्य आदिकरोन ॥ विदुर शकुनी दुर्योधन ॥ ऐसें सकळ बैसले ॥१४॥

तंव संजय तेथ आला ॥ आज्ञा घेवोनि बोलता जाहला ॥ कीं पांडवीं नमस्कार सांगीतला ॥ वडिलांतें पैं ॥१५॥

क्षेम असे समवयांसी ॥ आशिर्वाद घाकुटेयांसी ॥ स्नेहवाक्यें समस्तांसी ॥ पुसिलें कुशळ ॥१६॥

मग ह्मणे ऐका समस्त ॥ पांडवांकडील वृत्तांत ॥ धर्मानुमतें बोलिला पार्थ ॥ समक्ष कृष्णाचे ॥१७॥

दुर्योधनें धर्माकारणें ॥ राज्य नेदील सामवचनें ॥ तरीं खंडविखंड बाणें ॥ करीन कौरववाहिनी ॥१८॥

ऐसें सभे बोलिला संजय ॥ मग दुर्योधन ह्मणे गांगेय ॥ अरे हा वीर धनंजय ॥ येणें सुरशंकर जिंकिले ॥१९॥

कृष्णें मारिले दैत्य बहुत ऐसें हे नरनारायण विख्यात ॥ आतां भूभारहरणार्थ ॥ प्रकटले धर्मकाजीं ॥१२०॥

तूं मद्दाक्य न ऐकसी ॥ तरी नाश होईल सर्वासी ॥ झणी कुबुद्धी धरिसी ॥ सौबळाची ॥२१॥

परशरामें शापिला कर्ण ॥ आणि दुष्टबुद्धी दुःशासन ॥ यांचें मंत्रमत सांडोन ॥ ऐकें राजनीती ॥२२॥

तंव कर्ण ह्मणे भीष्मासी ॥ हें उचित नसे बोलावयासी ॥ धृतराष्ट्र दुर्योधनासी ॥ मीचि हितकर्त ॥२३॥

यावरी भीष्म अंधासि ह्मणत ॥ हा कर्ण श्र्लाघितो नित्य ॥ कीं पांडवांसी निभ्रांत ॥ जिंकीन मी ॥२४॥

तरी पांडवांची कळा येकही ॥ ययाजवळी दिसत नाहीं ॥ आणि याचे वाक्यें धर्मासि पाहीं ॥ दुर्योधन अवगणितो ॥२५॥

हा थोर अन्याय जाण ॥ कर्णें पराक्रम केला कवण ॥ गोग्रहणी अवमान ॥ केला अर्जुनें ॥२६॥

तैं कर्ण कोठें गेला होता ॥ नादिया जाहलासे आतां ॥ द्रोणही ह्मणे अंबिकासुता ॥ हेंचि मज वाटतें ॥२७॥

यांचें ह्मणितलें नायकावें ॥ दुष्टचतुष्टयवाक्य नकरावें ॥ युद्ध न करिता समजवावें ॥ धर्मादिकां ॥२८॥

पार्थवाक्य कथिलें संजयें ॥ तें तो करील निश्वयें ॥ आजि त्रैलोक्यीं कोण आहे ॥ पार्थासम ॥२९॥

मग संजयासि ह्मणे धृतराष्ट्र ॥ पुढें काय जाहला प्रकार ॥ संजय ह्मणे तो विचार ॥ ऐकें राया ॥१३०॥

धर्माज्ञेअवधीपर्यंत ॥ मत्स्य पांचाळादि समस्त ॥ युद्धा जाहले असती उदित ॥ परि धर्म निवारी तयां ॥३१॥

ऐसें बोलत बोलत ॥ संजय जाहला मूर्छागत ॥ तो उपचारोनि सावचित ॥ केला धृतराष्ट्रें ॥३२॥

यावरी संजय काय बोले ॥ म्या पांडवबळ मनीं आणिलें ॥ तेणें मूर्छागत जाहलें ॥ चित्त माझें ॥३३॥

धृतराष्ट्र ह्मणे निर्धार ॥ येकीकडे कौरवभार ॥ ये कीकडे वृकोदर ॥ येकलाची ॥३४॥

त्या भीमाचेनि भयें ॥ मजही मूर्छा येत आहे ॥ दुर्योधनादिकां पाहें ॥ करील अंत ॥३५॥

तैसाचि पार्थ धनुर्धर ॥ करिल कौरवांचा संहार ॥ ऐसा होवोनि चितातूर ॥ बोले दुर्योधनासी ॥३६॥

अरे तुज युद्धाची हौस ॥ तरी म्यां घ्यावा संन्यास ॥ ममस्त्रेहास्तव कौरवनाश ॥ करीत नाहीं धर्मराजा ॥३७॥

यावरी संजय ह्मणे राया ॥ तूं ऐसें जाणोनियां ॥ वश नको होऊं यया ॥ तोडीं स्नेहपाश ॥३८॥

निग्रह करीं पापपुरुषाचा ॥ जरी असेल पुत्र इच्छा ॥ तंव दुर्योधन बोलिला वचा ॥ पितयालागीं ॥३९॥

आपण भय न मानावें जीवीं ॥ आमुची चिंता न करावी ॥ असतां कौरवसेना आघवी ॥ जिंकीन मी पांडवांसी ॥१४०॥

भीष्म द्रोण कृपाचार्य ॥ अश्वथामादि सकळ राय ॥ असतां मज कोण भय ॥ जिकीन गदायुद्धीं ॥४१॥

त्यांचे दळ किती गणित ॥ संजय ह्मणे क्षोणी सात ॥ ऐकोनि अंध असे ह्मणत ॥ झणी संग्राम न होय ॥४२॥

ते सप्तुरुष आहेती ॥ ते पुष्पयुद्धही न करिती ॥ भीष्मद्रोणादिकां चित्तीं ॥ युद्ध करणें नसे ॥४३॥

यांचेनि बळें तुं झुंजसी ॥ तरी तें वृथा सर्वाशीं ॥ कर्णादिक बळे युद्धासी ॥ प्रवृत करणें ॥४४॥

गांधार ह्मणे तत्समयीं ॥ मज कोणाची चाड नाहीं ॥ मी आणिक कर्ण पाहीं ॥ करूं रणयज्ञारंभ ॥४५॥

तेथें पांडवरूपी पशंतें ॥ मारोनियां होमीन निरुतें ॥ अथवा मातें मारोनि राज्यातें ॥ भुंजोत ते सुखानें ॥४६॥

मी राज्यधन जीवितव्यें ॥ सकळ सांडीन तेंचि बरवें ॥ परि पांडवांसि द्यावें ॥ केविं राज्य ॥४७॥

जे मृत्तिका लागे सुईअग्रीं । तेही नेदी मी सर्वोपरी ॥ एकत्र न रक्षीं वैरी ॥ हाकृत निश्चयो ॥४८॥

तंव धूतराष्ट्र कौरवां बोलिला ॥ अरे ऐका माझिया बोला ॥ हा दुर्योधन म्यां टाकिला ॥ अभिमानिया ॥४९॥

याचिये संगतीं लागला ॥ पांडवासी युद्ध कराल ॥ तरी वचन आठवाल ॥ शेवटीं माझें ॥१५०॥

यावरी दुर्योधन बोले ॥ जरी पांडव सामर्थें आगळे ॥ त्री तेरावर्षें वन सेविलें ॥ कां पां त्याहीं ॥५१॥

मी कोपेन जयावरी ॥ तयाचें साह्य कोणी न करी ॥ हें मी आपुली सांगतों थोर ॥ सांत्वनालागीं तुमचें ॥५२॥

तंव कर्ण ह्मणे सर्वथा ॥ मी वधीन पंडुसुतां ॥ मजसी पुरे झुंजतां ॥ ऐसा कोण त्रिलोकीं ॥ ५३॥

तो भीष्में निर्भार्त्सिला ॥ तैं कर्ण काय बोलिला ॥ भीष्मा शरपंजरीं पडसी वहिला ॥ तेव्हांच दावीन पराक्रम ॥५४॥

ऐसें बोलोनि कोपें उठिला ॥ स्वमंदिरीं प्रवेशला ॥ तंव गांधार भीष्म बोलिला ॥ कर्ण जिंकील पांडवां ॥५५॥

मग विदुर ह्मणे दूर्योधना ॥ ज्ञातिविरोध वोखटा जाणा ॥ जेवीं पारधी मुकला प्राणा ॥ मधुलोलुप्यें ॥५६॥

गिरिकडां मोहाळ होतें ॥ पारधी प्रयासें पातला तेथें ॥ परि शेवटीं नुतरवे त्यातें ॥ मोहाळा घेवोनि ॥५७॥

ह्मणे हें खालीं टाकोनि द्यावें ॥ तरी चूर्ण होईल आघवें ॥ हातीच धरूनि उतरावें ॥ तरी उतरवेना ॥५८॥

ऐसा विचार करूं लागला ॥ तंव कड्याचा पाय निष्टला ॥ चूर्ण होवोनि जिवें गेला ॥ तैसा गांधार मरूं नको ॥५९॥

ह्माणोनि पांडवां आणिं सर्वथा ॥ तंव संजयो बोले संक्षेपता ॥ पार्थादिकंचें तेज पाहतां ॥ सग्राम न करावा ऐसें वाटे ॥१६०॥

तुमचे आज्ञेनुरुप गेलों ॥ हें वृत्त घेवोनि आलों ॥ आतां बहुत काय बोलों ॥ द्यावें त्याचें तयांसी ॥६१॥

परि हे गांधारा न आवडलें ॥ मग सभाविसर्जन जाहलें ॥ राव समस्तही गेले ॥ आपुलालें ठायीं ॥६२॥

यावरी धृतराष्ट्र ह्मणे संजयातें ॥ कीं कृष्णतत्व सांगें मातें ॥ येरू ह्मणे राया तूतें ॥ नकळे कृष्णतत्व ॥६३॥

तूं स्नेहपाशें गुंतलासी ॥ अंधपणें तत्व नेणसी ॥ तत्व कळे त्याचि पुरुषासी ॥ जो सर्वाभूतीं कृपाळु ॥६४॥

आणि जो जितेंद्रिय असे ॥ अहिंसक धर्मवशें ॥ तयासींचि तत्व भासे ॥ येरें वृथा बरळती ॥६५॥

तरी तूं कृपळु होत्साता ॥ इद्रियें जिंकी गा सर्वथा ॥ तेणें आपें आप तत्वता ॥ जाणसी कृष्णतत्व ॥६६॥

मग घृतराष्ट्र ह्मणे संजयातें ॥ सांगें कृष्णनाम अर्थातें ॥ मी तरेन तेणें निरुतें ॥ संसारजाळ ॥६७॥

तंव ह्मणे तो संजयो ॥ सकळभूभाराचा ठावो ॥ ह्मणोनि बोलिजे वासुदेवो ॥ सकळां वास तेथें ॥६८॥

ऐसा नामार्थ सांगीतला ॥ तेणें धूतराष्ट्र संतोषला ॥ जयजयाकरें शरण गेला ॥ मनेंचि कृष्णातें ॥६९॥

ऐसें उद्योगपर्वीं गहन ॥ विदुरोक्त नीतिप्रमाण ॥ तें संक्षेपें केलें कथन ॥ महाराष्ट्रभाषा ॥१७०॥

यानंतरें अपूर्व कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ तें ऐकावी संत श्रोतां ॥ ह्मणे मधुकरकवी ॥ ७१॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ नवमस्तबक मनोहरू ॥ विदुरनीतिप्रकारू ॥ चतुर्दशोऽध्यायीं कथियेला ॥१७२॥

॥ श्रीसांबसदाशिवर्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP