श्रीगणेशाय नमः
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ओंनमो जी नारायणा ॥ जळशयना आदिकारणा ॥ अजरामरा निर्गुणा ॥ विश्वंभरा तूं ॥१॥
जयजयाजी विद्यासागरा ॥ गणाधीशा नरकुंजरा ॥ सकळकळा स्वाधिकारा ॥ गणेशा तूं ॥२॥
तूं अनादि अपरंपारु ॥ परमदैवत जगद्नुरु ॥ सर्वशक्तिमान ईश्वरु ॥ भुवनाधीश ॥३॥
तूं ब्रह्म परात्पर ॥ तूं व्यास एकाक्षर ॥ दुर्जनांसी संहारकर ॥ तूंचि देवा ॥४॥
तूं आत्मा अखिल मूर्ती ॥ तूंचि मन तूंचि विश्रांती ॥ कीं विश्वंभर विश्वमूर्ती ॥ मूर्तित्रय ॥५॥
तूंचि गुरु उपदेशिता ॥ तूंचि वक्ता तूंचि श्रोता ॥ तूंचि भोग्य तूंचि भोक्ता ॥ सर्वरसांचा ॥६॥
ऐसिया तुज नमस्कारु ॥ तूंचि प्रेरिता कल्पतरु ॥ तूं बोलविता विचारु ॥ वागेश्वरीसी ॥७॥
ऐसी अंतरीं करितां स्तुती ॥ प्रत्यक्ष पावला श्रीगणपती ॥ ह्नणे प्रसन्न जाहलोंरे पुढती ॥ बोलें ग्रंथ ॥८॥
ऐसा नमिला श्रीगणेश ॥ कुळदेवतेनें दीधला आयास ॥ मग नमिला श्रीगुरुव्यास ॥ आणि संतसज्जन ॥९॥
आतां नमूं संतश्रोतां ॥ जयां हरिकथेची आस्था ॥ तयां नमूं विष्णुभक्तां ॥ सद्भावेंसीं ॥१०॥
मागें स्तबक जाहला आठवा ॥ आदिपर्व देशोभावा ॥ आतां नववा श्रवण करावा ॥ श्रोतांजनीं ॥११॥
तुमचेनि संगतीकरणीं ॥ श्रीकृष्णकथा बोलेन वाणी ॥ तेणें होईल माझे मनीं ॥ आनंदभरितें ॥१२॥
जैसा विंझुणा वारितां नरेंद्रा ॥ आपुलाही निवे उबारा ॥ तैसा मी निवेन शरीरा ॥ तापत्रंयांपासोनी ॥१३॥
नातरी कनकाचे करितां टाकें ॥ संगें पूजा पावे लाख ॥ तैसा येणें प्रसंगें लोक ॥ पावेल पूजा ॥१४॥
देवस्थानीं असतां शंख ॥ पूजेसि स्पर्श होय उदक ॥ ब्रह्महत्यादि नासती अनेक ॥ दोष तेणें ॥१५॥
आतां होवोनि सावधान ॥ पांडवकथा कीजे श्रवण ॥ तेणें उल्हासे अंतःकरण ॥ वक्तयाचें ॥१६॥
जन्मेजयराजा भारती ॥ वैशंपायन वेदमूर्ती ॥ या दोहींची सुखसंगती ॥ घडली येकीं ॥१७॥
या दोघांचा अनुवाद ॥ हरिकथेचा परमानंद ॥ तो ऐकावा भेदाभेद ॥ ह्नणे मधुकरकवी ॥ ॥१८॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ नवमस्तबक मनोहरु ॥ मंगलाचरणप्रकारु ॥ प्रथमाध्यायीं कथियेला ॥१९॥