श्रीगणेशाय नमः
देवीं देवीची मांडिली स्तुती ॥ जयजयजी आदिशक्ती ॥ आद्य मध्य माये अंतीं ॥ तूंचि देवी ॥१॥
जयजय हो जगदोद्धारे ॥ जय ब्रह्मिष्ठे सदाचारे ॥ स्थावरजंगमखेचरे ॥ तूंचि देवी ॥२॥
जयजगदाधारनिधी ॥ कार्य कल्पने सर्वसिद्धी ॥ महामंगले बोधबुद्धी ॥ तूंचि देवी ॥३॥
तूं कार्य कारिणी कारण ॥ तूंचि दृश्याचें अंजन ॥ तूं व्याधि विघ्नांचे हरण ॥ आद्यअंबिके ॥४॥
तूं विश्वेश्वरी ईश्वरी ॥ अन्नपूर्ना त्रिपुरारी ॥ आदिमहीरुपे स्थावरी ॥ आपरुपे तूं ॥५॥
जय विश्वबीज परममाया ॥ प्रकृति स्थिति उत्पत्ति लया ॥ अनंतरुपा सत्व दया ॥ तूंचि देवी ॥६॥
तूं भुक्ति मुक्ति माया विद्या ॥ सर्वमोहिनी सर्वआद्या ॥ श्रुतिसंग गद्यपद्या ॥ तूंचि देवी ॥७॥
सर्वागना तुझेंचि रुप ॥ तुझेनि तेजें विश्ववोप ॥ स्वर्गापवर्गदे निःपाप ॥ तूंचि देवी ॥८॥
तूं वैष्णवी नारायणी कळा ॥ सर्वार्थसाधक सर्वमंगळा ॥ शिवे त्र्यंबके गौरी सकळां ॥ तूंचि देवी ॥९॥
मयूरकुक्कुट केसरी ॥ त्रिवाहनशक्ती कौमारी ॥ गुणमाया सावित्री ॥ तूंचि देवी ॥१०॥
वैष्णवी शंख चक्र गदापाणी ॥ पद्मा सारंगा गरुडासनी ॥ शांभवी पापदग्धदर्शनी ॥ तूंचि देवी ॥११॥
नृसिंहरुपा उग्रशक्ती ॥ माथांमुकुट वज्रहस्ती ॥ सहस्त्रनयनी वृत्रशांती ॥ तूंचि देवी ॥१२॥
दुष्टदमनी वीर विक्राळा ॥ घोर डोलती मुंडमाळा ॥ ते चामुंडा अतुर्बळा ॥ तूंचि देवी ॥१३॥
शिवदूती मुंडमथनी ॥ महारुपे घोषध्वनी ॥ लक्ष्मी लज्जा शुंभवधिनी ॥ तूंचि देवी ॥१४॥
कालरात्री सरस्वती ॥ तूं भूषिता तामसी पार्वती ॥ नेत्र मुख चरण हस्तीं ॥ रक्ष रक्ष मार्ते ॥१५॥
श्रवण घ्राण नारायणी ॥ तूं सर्वस्वरुपा स्वामिणी ॥ सर्वशक्ती भवतारिणी ॥ तूंचि देवी ॥१६॥
ज्वाळा कराळा अतिउग्रे ॥ असुरमदिंनीं भयंकरे ॥ महाकाळी महारौद्रे ॥ तूंचि देवी ॥१७॥
सर्व पापविध्वंसिनी ॥ संतभक्तवरदायिनी ॥ असुररक्तचर्चिनी ॥ जयचंडिके ॥१८॥
रोगरणांपासूनि काळिके ॥ विषव्याळांपासूनि अंबिके ॥ ज्वलज्वाळांपासूनि व्यापके ॥ रक्ष रक्ष मातें ॥१९॥
वेदशास्त्रीं आणि पुराणीं ॥ तूतें वर्णिती दिव्यवाणी ॥ श्रौतस्मार्त षडदर्शनीं ॥ तूंचि वंद्य ॥२०॥
आचार प्रायश्वित्त नीतिव्यवहारु ॥ शिष्य शिकवणें आणि श्रीगुरु ॥ विषय विलास श्रृंगारु ॥ तूंचि माते ॥२१॥
जयजय वैरिविध्वंसिनी ॥ जय त्रिविधतापशमनी ॥ जय काळिके त्रिलोचनी ॥ शरण तुज ॥२२॥
मग ह्नणे आदिशक्ती ॥ तुमचे मनोरथ पूर्ण होती ॥ पुढील ऐके रे सुरपती ॥ भविष्य माझें ॥२३॥
अठ्ठाविसां युगीं बुधवारीं ॥ आश्विन वैवस्वत मन्वंतरी ॥ काळिका रक्षीन द्वापारीं ॥ सुरगणांतें ॥२४॥
जैं समस्त लोक भूतळ ॥ दैत्य जिंकिती स्वर्ग पाताळ ॥ देवांसि करिती व्याकुळ ॥ असुरादिक ॥२५॥
हे शुंभ निशुंभ मागुती होती ॥ तुह्मां जिंकितील सुरपती ॥ बळी होवोनि अमरावती ॥ जिंकिती ते ॥२६॥
तें मी नंदयशोदा भुवनी ॥ वसुदेव पिता देवकी जननी ॥ विंध्याचळनिवासिनी ॥ वधीन दैत्यां ॥ ॥२७॥
तैं रक्तवर्ण अंगकांती ॥ इंद्रगोपां ऐसी दंतपक्ती ॥ रक्तदंतिका नामें सुरपती ॥ ह्नणतील मातें ॥२८॥
मागुती भूमंडळीं जाण ॥ शतवर्षे पडेल अवर्षण ॥ तैं देव करितील स्मरण ॥ मागुती माझें ॥२९॥
तैं मी उपजेन अयोनी ॥ दैत्यदळ वधीन क्षणीं ॥ तेव्हां सत्वनेत्री गा वज्रपाणी ॥ ह्नणतील मातें ॥३०॥
मागुती सर्वदेवांपासाव ॥ मी जन्मेन महाशैव ॥ तैं शाकंभरी माझें नांव ॥ वदती जगीं ॥३१॥
तैं मर्दोनि दैत्यकुळ ॥ सुखी करीन विश्व सकळ ॥ मग नांवें लोकपाळ ॥ ह्नाणतील मातें ॥३२॥
मागुती हिमाचळाचे उदरीं ॥ मी जन्मेन गा कुमारी ॥ तैं दैत्यकुळाची बोहरी ॥ करीन जाणा ॥३३॥
दैत्यांचें करीन भंजन ॥ बाहुबळें राखीन त्रिभुवन ॥ तैं भीमादेवी ऐसे सुरगण ॥ ह्नाणतील मातें ॥३४॥
मागुती उठतील असुर ॥ महाक्षेत्री महावीर ॥ तैं भ्रमररुपें समग्र ॥ भक्षीन जाणा ॥३५॥
तैं मज लोकीं त्रिजगतीं ॥ लोक ह्नणतील भ्रमरशक्ती ॥ तरी चिंता न करीं गा सुरपती ॥ नारायणा ॥३६॥
जे काळीं उठती दैत्यगण ॥ तेव्हां करावें माझें स्मरण ॥ तैं मी तुचमें करीन निर्विघ्न ॥ सत्य जाणा ॥३७॥
आतां तुह्मी सुरवर समग्र ॥ माझें ऐका मुख्योत्तर ॥ तें जगत्रयाचें हितकर ॥ सांगेन तुह्मां ॥३८॥
दैत्य दानव निशाचर ॥ पीडा माजेल अवांतर ॥ तरी व्रत सांगेन तें पवित्र ॥ करावें तुह्मीं ॥३९॥
तेणें हरितील व्याधि वैरी ॥ आणि नांदाल पुत्रकलत्री ॥ धन धान्य पशु वस्त्रींझ ॥ कराल राज्य ॥४०॥
शरत्काळीं अश्विनमासीं ॥ अष्टमी नवमी चतुर्दशी ॥ घट स्थापोनि नववे दिवशीं ॥ करावें हवन ॥४१॥
तर्पण अर्चन पूजन ॥ आणि माझें करावें कीर्तन ॥ प्रतिभिसि करावें नमन ॥ अहर्निशी ॥४२॥
त्यांचे वैरी व्याधि विघ्न ॥ तीं हा सिंह भक्षील जाण ॥ आणि मी भवानी खङ्ग घेऊन ॥ राखीन त्यांसी ॥४३॥
मधुकैटभ महानिकरें ॥ कीं शुंभनिशुंभ वधिले स्वकरें ॥ तैसे वैरी करीन पाठिमारे ॥ स्वभक्तांचे ॥४४॥
त्यांचें दुःख दरिद्र आपदा ॥ अग्निशस्त्रांपासूनि सर्वदा ॥ वियोग उत्पातांची बाधा ॥ हरीन जाणा ॥४५॥
भय चिंता उपसर्ग ॥ मोक्ष देवोनि वारीन नरकभोग ॥ आणि वैरियां समस्तां खर्ग ॥ आदळीन मी ॥४६॥
आणि माझें गुणकीर्तन ॥ जो सर्वदा पढे पठण ॥ होमदान जप यज्ञ ॥ करी तिथीसी ॥४७॥
तरी तयांपासूनि सरती ॥ मी न ढळें गा क्षणरती ॥ आणि मोक्षपदाचे पंक्तीं ॥ बैसवीन जाण ॥४८॥
दुःस्वप्न ग्रहपीडा पिशाच ॥ भूतभैरव राक्षस ॥ हे निवारीन अहर्निश ॥ अदृष्टरुपें ॥ ॥४९॥
दुर्गी जळीं महावनीं ॥ व्याघ्र व्याळ राजभुवनीं ॥ लोहपाश बंदिखानीं ॥ पडोंनेदीं ॥५०॥
गंधाक्षता धूप दीप दान ॥ मंत्रविधि पूजा हवन ॥ विप्रां अन्नभोजन दान ॥ आणि वाद्य कीर्तन पैं ॥५१॥
ऐसें आचारितां नरनारी ॥ त्यांचे अंतर्बाह्य असें शरींरीं ॥ आणि माझेनि भावें कुमारीं ॥ द्यावें भोजन ॥५२॥
वैश्य क्षेत्रीं अथवा ब्राह्मणीं ॥ हे आचरावें सकळजनीं ॥ परि द्रव्यमंत्र होमहवनीं ॥ भिन्नभ्रांती ॥५३॥
जें जया असे भोज्य भोजन ॥ तें घ्यावें द्रव्याहुतीं अवदान ॥ तें मज पावेल परिपूर्ण ॥ सर्वभावे ॥५४॥
आश्विन अथवा माघ चैत्रीं ॥ हें आचरावें नवरात्रीं ॥ उपोषण करावें फळआहारीं ॥ मजप्रीत्यर्थ ॥५५॥
पुष्पमाळा रंगमाळिक ॥ योगिनी पूजाव्या कुमारिका ॥ हें सांगावें लौकिका ॥ तुह्मीं व्रत ॥५६॥
मग ब्रह्मा इंद्र हरिहर ॥ प्रणाम करिती समग्र ॥ ह्नणती तूं अंतःपट साचार ॥ ब्रह्मसाक्षी भूतांतके ॥५७॥
जय चंडिके चंडविक्रमे ॥ माहाकालिके अगम्ये ॥ महामारी मेघश्यामे ॥ काळिके तूं ॥५८॥
जयजयहो जगत्रयजननी ॥ महादेवी महाध्वनी ॥ लक्ष्मीरुपे सिंधुनंदिनी ॥ आदिअंबे ॥ ॥५९॥
ऐसें स्तविती सुरवर ॥ शरण जाहले समग्र ॥ तंव अदृश्य जाहली खेचर ॥ आदिअंबा ॥६०॥
सुरगर्णेसि अमरावती ॥ भंद्री बैसला सुरपती ॥ विष्णुवैकुंठी आणि पशुपती ॥ कैलासाप्रति गेले ॥६१॥
तंव जन्मेजयो ह्नणे गा मुनी ॥ दैत्य वधिले क्षणोक्षणीं ॥ परि त्यांची न तुटे खाणी ॥ कवणेगुणें ॥६२॥
मुनी ह्नणे गा भूपती ॥ जैसे दिवस आणि राती ॥ नातरी छाया आणि प्रकृती ॥ सवेंचि जाण ॥६३॥
कीं चंद्रकळा पौर्णिमेसी ॥ ते विखंडूनि दवडी तमासी ॥ मागुती ते प्रतिपदेसी ॥ उद्भवे जाण ॥६४॥
स्तनीं एकचि पिंड पदर ॥ कीं क्षीरासवें जैसें रुधिर ॥ तैसे देव आणि असुर ॥ नव्हती भिन्न ॥६५॥
जैसे भूमिगर्भीचे कण ॥ शतवर्षे पडतां अवर्षण ॥ मग तें उदकमात्रें तृण ॥ वाढे जैसें ॥६६॥
तैसा वाढे पापाचार ॥ तेणें दैत्यबीजा फुटे अंकुर ॥ पुण्यकाळीं होय संहार ॥ मागुता त्यांचा ॥६७॥
आतां असो हे विल्पत्ती ॥ मार्केडेय बोलिला संस्कृतीं ॥ तैशीच म्यां वर्णिली सप्तशती ॥ भाषावचनें ॥६८॥
ओं नमोजी विघ्ननाशना ॥ विरिंचि विष्णु त्रिनयना ॥ व्यास वाल्मिकी वैशंपायनां ॥ आदिकरोनी ॥६९॥
हे मार्केडेयपुराणीची कथा ॥ वैशंपायन सांगे भारता ॥ तो संवाद श्रोतयां प्राकृता ॥ सांगितला सकळ ॥ ॥७०॥
हें चंडिकेचें आख्यान ॥ सप्तशती नामें महारत्न ॥ तें ऐकावें पुण्यकीर्तन ॥ श्रोतेजनीं ॥७१॥
रायासि ह्नणे वैशंपायनु ॥ सुरथ राव जाहलामनु ॥ सूर्यदेवाचा नंदनु ॥ सावर्णिक जो ॥७२॥
ऋषीचिये संगतीं ॥ तया घडली पूजाभक्ती ॥ तो मनु जाहला गा भूपती ॥ येणेंचि गुणें ॥७३॥
हे मार्केडेयपुराणींची कथा ॥ मार्केडेयें सांगीतली सुरनाथा ॥ ते म्यां कथिली गा भारता ॥ जन्मेजया तुज ॥७४॥
हें चंडिकेचें आख्यान ॥ जयां होय श्रवण पठण ॥ तयांचे पुण्यासि अवसान ॥ आथीचना ॥७५॥
तयां घडे गंगासागरु ॥ द्वादशलिगें आणि मेरु ॥ ज्यांही ऐकिला आचारु ॥ चंडिकेचा ॥७६॥
राव ह्नणे वैशंपायना ॥ तुवां तृप्त केलें मन श्रवणां ॥ मग पूजा करोनि चरणा ॥ लागे जन्मेजयो ॥७७॥
असो आतां हे आदिमाता ॥ वर्णिता न पुरे विधाता ॥ आतां ह्नणतसे कविता ॥ श्रोतयांसी ॥७८॥
हा नामें कथाकल्पतरु ॥ नानामंत्रांचा पुण्यपारु ॥ फळभारीं आला तरुवरु ॥ तुह्मांयोगें ॥७९॥
जें व्यासवाल्मिकप्राणित ॥ तेंचि येथे बोलिलो सत्य ॥ कीं सुवर्णाचे करी जडित ॥ कर्ता जैसें ॥८०॥
नातरी डाकें सोन्यासि मिळणी ॥ हें तरी कीजेतें टंकणीं ॥ परि अग्निवीण झळणी ॥ न होय त्याची ॥८१॥
जरी जाहला विदानी ॥ तरी केवीं करी वाळूची लेणीं ॥ आणि वस्तूविणें मोहनी ॥ कीजे केवीं ॥८२॥
हें करावया काय कारण ॥ तरी अबोधांसी व्हावय ज्ञान ॥ जैसें मेघवृष्टीचें जीवन ॥ पोषी सकळां ॥८३॥
तर्क मीमांसा चिंतामणी ॥ भाष्य वेदांत श्रुतिश्रवणीं ॥ तेथें प्राकृताची शिराणी ॥ बोलावी काय ॥८४॥
परि हे जाणावी तडाग सरिता ॥ येथें पात्र दोर न लागे सर्वथा ॥ अनायासें तृप्ती होय तृषार्ता ॥ अंजुलीनें ॥८५॥
येकाचि सोन्याचे अळंकार ॥ हा उपाधीचा उद्नार ॥ परि सत्यत्वें करितां निर्धार ॥ सुवर्णची ॥८६॥
कीं येक मोलयुक्त सोनटका ॥ आणि दुजा सांपडे जी फुका ॥ परि तो मोलाचिये तुका ॥ न उतरे कीं ॥८७॥
तैशा भाषा संस्कृत प्राकृत ॥ या संहोदरी जी सत्य ॥ रुप वेगळें परि मत ॥ येकचि की ॥८८॥
ऐसा कोण आहे वक्ता ॥ कीं भाषा सर्वही बोलेले ज्ञाता ॥ आणि बोलिलिया समस्ता ॥ जाणिजेल ॥८९॥
ऐसेंचि गा संस्कृत अगाध ॥ सौरसें जाणिजे प्राकृतसिद्ध ॥ अपभ्रंशें भाषा विविध ॥ ऋषिप्रणीत ॥९०॥
संस्कृता वेगळी ह्नणिजे बोली ॥ ते देशपरत्वें जाणिजे चाली ॥ त्या विविध देशांची बोली ॥ सांगूं आतां ॥९१॥
भिल्ल हिंदोड आणि अंग ॥ कोंकण क्कनिप वंग ॥ कणीव काश्मीर कलिंग ॥ आरवस्थान पैं ॥९२॥
द्राविड गौड तैलंग ॥ सेंधळ लंका आणि कावंग ॥ कुंभकोण आणि मरंग ॥ आणि मरु श्रीहट पैं ॥९३॥
जाम काम आणि भोटाक ॥ अहिर गुर्जर कर्नाटक ॥ चैद्य माळ दीनवाटक ॥ कनोज पैं ॥९४॥
यवात आणि काबुल ॥ गौड अथनी मंगरुळ ॥ मोरकाड आणि मकाशीळ ॥ हेमनंद पैं ॥९५॥
हेरंब मारवाड जोट ॥ गौड तेटन महाराष्ट्र ॥ मोरकावर कोट चौहट ॥ महानंद पैं ॥९६॥
हाबिल काबिल मुलतान ॥ हबव फिरंगी खुरासन ॥ वेद अंतर्वेद महाचीन ॥ आणि चोळ पांचाळ पैं ॥९७॥
असीब कांबोज नेपाळ ॥ जाफरशाग कुंतळ ॥ मेरु तपौद्र वानरउगुळ ॥ या देशबोल्या पैं ॥९८॥
ययांमधील येकचि नेहटी ॥ ते मी बोलिलों मर्हाठी ॥ जैसा हिरा शोभे मुकुटीं ॥ रत्नांमाजी ॥९९॥
हा असे कथाकल्पतरु ॥ भाषादीक्षा ग्रंथगुरु ॥ कीं नभोगणीं दिनकरु ॥ मिरवे जैसा ॥१००॥
नानाग्रंथीचे घेवोनि सार ॥ हें म्यां रचिलेंसें भांडार ॥ संतांकणी अळंकार ॥ घालावया ॥१॥
हा पावन कथाकल्पतरु ॥ विधीनें ऐके स्त्री अथवा नरु ॥ तयां होय कन्या पुत्रू ॥ निपुत्रिकांसी ॥२॥
हा ग्रंथ ऐकेल श्रवणीं ॥ तेणें प्रदक्षिणा केली मेदिनी ॥ कीं केदारीं प्राशिले पाणी ॥ रेतकुंडीचें ॥३॥
कीं कपिलादान केलें ब्राह्मणा ॥ कीं ब्रह्मागिरीस शत प्रदक्षिणा ॥ तें पुण्य जोडे एका श्रवण ॥ कल्पतरुचे ॥४॥
एका कृष्णाचे करितां स्मरण ॥ तें मेरुतुल्य कनकदान ॥ येथे पदप्रसंगी हरि नारायण ॥ आरुढले ॥५॥
कनककोंदणाचें संगें टांक ॥ पूजा जैसी पावे लाख ॥ तैसा येणें मी जाहलों रंक ॥ श्रीकृष्णचरणीं ॥६॥
जैसा नारायणें स्नेहाचा पंक ॥ कीं व्याधी विभांडी मृगांक ॥ तैसा सर्वपापां दाहक ॥ कल्पतरु हा ॥७॥
विवाहमंडपाचे पक्कान्नी ॥ येक क्षार कीं अलवणी ॥ तेथें दूषण द्यावया सुगरिणी ॥ उचित नव्हे ।८॥
तैसें मज अशेषा बोलतां ॥ कदापि आन ग्रंथीची वार्ता ॥ तथापि असतां ज्ञानी श्रोता ॥ न ठेवावें दूषण ॥९॥
जैसे चालतां राजबिदी ॥ आनइच्छे पाव पडे पदीं ॥ तो न ह्नणावा सुबुद्धी ॥ मागिलांचा ॥११०॥
घेतां तस्कराचा मांग ॥ तैसा पहावा पदलाग ॥ ह्नणोनि क्षमा करणें राग ॥ श्रोतेजनीं ॥११॥
ह्नणोनि विनवितसें तुह्मां ॥ न्यून पूर्णे करावी क्षमा ॥ नातरी लेखनी शब्दव्योमा ॥ लावी कवण ॥१२॥
हा उपसितां शब्दसिंधू ॥ येकादा राहिला पदबिंदू ॥ तरी त्या दोषाचा बाधू ॥ न ठेविजे तुह्मीं ॥१३॥
आतां असो हा विवेक ॥ पूर्ण जाहला पंचमस्तबक ॥ पुढें षष्ठस्तबकाचा श्लोक ॥ ऐकावा तुह्मीं ॥१४॥
विंझुणा वारितां नरेंद्रा ॥ आपुलाही निवारे उबारा ॥ तैसें तुह्मां सांगतां पवित्रा ॥ निवालों मी ॥१५॥
कौंडिण्यगोत्र वसिष्ठ मित्रावरुण ॥ तीनप्रवरें शुद्ध संपूर्ण ॥ यज्ञशाखे जन्म धारण ॥ अंबऋषीचे ॥१६॥
त्या अंबऋषीची कांता ॥ कमळजा नामेम पतिव्रता ॥ ते प्रसवली विष्णुभक्ता ॥ कृष्णकवीसी ॥१७॥
तया प्रसन्न असे अनंत ॥ जो अंतरात्मा विश्वगत ॥ तेणें दाविला असे ग्रंथ ॥ कल्पतरु हा ॥१८॥
गोदावरीचे दक्षिणतीरीं ॥ पद्मपूर बोलती द्वापरीं ॥ ग्रंथ जाहला मुख्यक्षेत्री ॥ नासिकस्थानीं ॥१९॥
अरुणा वरुणा गोदावरी ॥ सरस्वती कपाळेश्वर सुंदरी ॥ कल्पतरु वाहिला पुष्पपत्रीं ॥ गोविंदचरणीं ॥१२०॥
या कल्पतरुची स्थळरत्नें ॥ चोरोनि विघडील कथापानें ॥ तेणें ज्योतिलिंगासि चरणें ॥ केला प्रहार ॥२१॥
सिद्ध न जाणोनियां ग्रंथा ॥ जो विघडूनि काढील कथा ॥ तेणें चंडिकेचे माथां ॥ लाविला चरण ॥ ॥२२॥
हे कथाकल्पतरुची कथा ॥ प्रीति पावो श्रीअनंता ॥ समस्तां जाहला विनविता । कवि कृष्णयाज्ञवल्की ॥ ॥२३॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ सप्तशतीआख्यानविस्तारु ॥ अष्टादशाऽध्यायीं कथियेला ॥१२४॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ श्रीसीतरामचंद्रार्पणमस्तु ॥ स्तबक ओव्यासंख्या ॥२९१७॥ ॥ ॥ इति पंचमस्तबकः समाप्तः ॥