कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय १७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मग सुग्रीव नामें भृत्य ॥ शुंभें बोलाविला त्वरित ॥ तयासि सांगितला वृत्तांत ॥ नारदाचा ॥१॥

ह्नणे तूं जाई गा हिमवंता ॥ तेथें मजयोग्य असे कांता ॥ ते प्रबोधोनियां दूता ॥ आणीं वहिलीं ॥ ॥२॥

तूं भला अससी वक्ता ॥ माझी वानावी स्वरुपता ॥ तयेसि नेवोनि येकांता ॥ सांगावें तुवां ॥३॥

कार्यकल्पनेचिया विवर्णा ॥ माजी दूत जोडे शाहणा ॥ तरीच गौरव वाढे दुणा ॥ श्रीमंताचा ॥४॥

अश्व रत्नें आणि कुंजर ॥ सर्व जिंकोनि भरिलें भांडार ॥ लेणीं लुगडी अळंकार ॥ नानापरींचे ॥५॥

सूर्यापासूनि उच्चैःश्रवा ॥ ऐरावती अमरदेवा ॥ कुबेरा जिंकूनिया ठेवा ॥ हरिला सर्व ॥६॥

हंसवाहनासहिता विमान ॥ आणि स्यंदन नामें रथ जाण ॥ हेही आणिलें पैं हिरोन ॥ विरिचिदेवाचे ॥७॥

आंदोळोनिसमुद्रजळा ॥ आणिली अमरकमळमाळा ॥ नवरत्नादिक मुक्ताफळां ॥ अमोलिक ॥८॥

यमापासूनि शक्ति मरण ॥ वरुणाचें छत्र नीळवर्ण ॥ सलिलापासाव संपूर्ण ॥ अणिलें यावां ॥९॥

अग्निपासाव घेतले तेज ॥ चंद्रापासाव औषधी बीज ॥ ऐसें त्रिलोंकी जें जें भोज ॥ तें माझेचि घरीं ॥१०॥

ऐसें सांगोनिया उत्तरें ॥ वश करावें सुंदरें ॥ ना ह्नणेल तरी बळात्कारें ॥ आणावी गा ॥ ॥११॥

ऐसें बोधितां पैं दूता ॥ मग तो सुग्रीव जाहला निघता ॥ वेगीं वेधला पर्वता ॥ हिमगिरीसी ॥१२॥

तें जाणिवलें अंबिक ॥ कीं शुंभें धाडिलें सेवका ॥ ह्नणोनि साउमी आली काळिका ॥ एकांतासी ॥१३॥

मग ते समूळ दैत्यकथा ॥ दूतें निवेदिली गा भारता ॥ ह्नणे सुंदरें दैत्यनाथा ॥ वरावे तुवां ॥१४॥

तया वरिलिया दैत्यनाथा ॥ तूं त्रिभुवनीची होशील माता ॥ कांहीं न करीं वो चिंता ॥ भाक माझी ॥१५॥

तंव हांसोनि बोले काळिका ॥ ह्नणे बोलसी काय मूर्खा ॥ कमळकळिके आणि भेका ॥ करिसी सरी ॥१६॥

कीं मुक्ताफळांचिया माळा ॥ खराकंठीं केवीं रे गोवळा ॥ नातरी सूकरा लाविला टिळा ॥ चंदनाचा ॥१७॥

कीं चंद्र पिकला अंबरीं ॥ तो रस घेइंजे चकोरीं ॥ पुष्ट असतांही काकधारीं ॥ नेघवे पिक ॥१८॥

मग सुग्रीव ह्नणे कोपेंसी ॥ काय बोलतेसी तामसी ॥ मानें न येतां धरोनि केशीं ॥ नेईन तुज ॥१९॥

ज्याचे घरीं वीर लक्षकोडी ॥ जेणें देव घातले बंदवडी ॥ तो स्त्रियेसी कींव बापुडी ॥ वानील काय ॥२०॥

तो कोपलिया महाबळी ॥ मेरु घालूंशके पाताळीं ॥ गगना आणील महीतळीं ॥ क्षणामाजी ॥२१॥

मग ते दुर्गा भगवती ॥ कोपोनि ह्नणे दूताप्रती ॥ कीं सांग रे भारती ॥ शुंभाजवळी ॥२२॥

जो मातें समरीं जिकी नर ॥ तो मी करीन रे भ्रतार ॥ हा असे कुळाचार ॥ देवतेचा ॥२३॥

अरे त्रिभुवनींचा अधिपती ॥ शुंभ कैंचा तो मंदमती ॥ याहूनि प्रतिज्ञा काय तुजप्रती ॥ बोलों दूता ॥२४॥

आतां जाई वेगवग्त्र ॥ त्यासी सांगें समाचार ॥ कीं बळी होसील तरी गळसर ॥ बांधीन तुझा ॥२५॥

मग तो दैत्य किंकर ॥ शुंभपुरा गेला सत्वर ॥ त्यासी कथिला समाचार ॥ काळिकेचा ॥२६॥

दूत ह्नणे जी दातारा ॥ अनुसर नेदी ते सुंदरा ॥ कीं रणीं जिंकील तयाचि नरा ॥ घालील माळ ॥२७॥

ते महागर्वाची आथिली ॥ पुरुषनयनें क्रांतली ॥ ऐसी ऐकोनियां बोली ॥ कोपला शुंभ ॥२८॥

मग धूम्राक्ष नामें असुर ॥ तो बोलाविला महावीर ॥ तया कथिला समाचार ॥ काळिकेचा ॥२९॥

ह्नणे तूं जाई रे हिमवंता ॥ धरोनि आणावी ते वनिता ॥ मग तेथूनि जाहला निघता ॥ धूम्रलोचन ॥३०॥

साठीसहस्त्र कुंजरां ॥ गणित नाहीं पायभारां ॥ वेगीं पावला गिरिवरा ॥ हिमाचळासी ॥३१॥

तंव तें जाणोनि परदळ ॥ साउमी आली ते अबळ ॥ आणि देखती दैत्यकुळ ॥ काळीकेतें ॥३२॥

धूम्र ह्नणे हो सुंदरी ॥ तूं शुंभाची बांधीं गळसरी ॥ नातरी नेईन बलात्कारीं ॥ धरोनियां ॥३३॥

मग ते बोले अबळा ॥ म्यां निरोप असे दीधला ॥ तो करीं रे वहिला ॥ असुरा तूं ॥३४॥

थोर आवेशली भवानी ॥ मुकुट लागला असे गगनीं ॥ दिशां पसरिले सहस्त्रपाणी ॥ भयानक ॥३५॥

तंव हाक दीधली धूम्रलोचनें ॥ ह्नणे धराधरा रे अंगनें ॥ मग वर्षते जाहले बाणें ॥ अंबिकेवरी ॥३६॥

सर्वेचि आला गजभारीं ॥ तंव उठावला केसरी ॥ निमिष्यें केली बोहंरी ॥ सैन्यगजांची ॥३७॥

मग घेवोनि मुसळ कृत्ती ॥ कोपें चालिली आदिशक्ति ॥ धूम्र हाणितला निर्घातीं ॥ हदयावरी ॥ ॥३८॥

घायें जातसे चांचरी ॥ मुसळें हाणिला शिरावरी ॥ तया दाविली यमपुरी ॥ क्षणामाजी ॥३९॥

तें श्रुत होता शुंभवीरा ॥ मग दूत पाठविला दूसरा ॥ ह्नणे चंडमुंडहो ती खेचरा ॥ आणा धरोनी ॥४०॥

ते महाधीट रागीट ॥ तिचें मोडा रे धमकट ॥ बांधोनि आणावी बळकट ॥ शस्त्रास्त्रेंसीं ॥४१॥

मग ते चालिले सहोदर ॥ चातुरंग सेनासंभार ॥ वेगें पावले पाठार ॥ हिमवंताचें ॥४२॥

ऐसें जाणोनियां कुमारी ॥ चढली हिमवंताचे शिखरीं ॥ ते जाणोनियां खेचरी ॥ चालिलें सैन्य ॥४३॥

मग खङ्ग बाण त्रिशूळीं ॥ द्रुम पर्वत महाशिळीं ॥ ऐसी गवसविली सकळीं ॥ काळिका ते ॥४४॥

तंव ते कोपोनि अंबिक ॥ हात पसरोनि महामुखा ॥ गर्जना करोनियां देखा ॥ चालिली ते ॥ ॥४५॥

मुंडमाळा लेइली कंठीं ॥ सिंहचर्म असे कटिवटीं ॥ रागें उचलोनियां भ्रुकुटी ॥ दीधली हाक ॥४६॥

जिव्हा लांबवूनि वदनीं ॥ आरक्त नेत्र प्रळयाग्नी ॥ शस्त्रें घेवोनियां रणीं ॥ प्रवेशलीं ते ॥४७॥

हाणितां न पाहे सान थोर ॥ सेनेसहित गजभार ॥ अंकुश पाश समग्र ॥ घालीत वदनीं ॥४८॥

अश्व रथ आणि पायदळा ॥ सिंहें विदारिलें सकळां ॥ मग ह्नणती पळारे पळा ॥ उरलियांसी ॥४९॥

देवीनें येक ते घेतले वदनीं ॥ येक मर्दिले मेदिनीं ॥ येक गेले जीव घेवोनी ॥ चंडाजवळी ॥५०॥

ते देखोनि सैन्यशांती ॥ चंड धांवला शीघ्रगतीं ॥ चक्रे हाणितली आदिशक्ती ॥ हदयावरी ॥५१॥

तंव चक्रें सहस्त्र शतें ॥ चंडावरी घातलीं देवतें ॥ तींही निवारिली दैत्यें ॥ येतयेतां ॥५२॥

मग बैसोनि सिंहासनीं ॥ कोपें चालिली भवानी ॥ त्रिशूळें हाणोनियां धरणीं ॥ पाडिला चंड ॥५३॥

सिंहें विदारिले उदर ॥ घेतसें घटघटां रुधिर ॥ दैत्या दाविलें यमपुर ॥ क्षणामाजी ॥५४॥

वधिला जाणोनियां चंड ॥ कोपें धांविन्नला मुंड ॥ हातीं घेवोनि प्रचंड ॥ पर्वत येक ॥५५॥

येतां जाणोनि पर्वतशिखर ॥ देवीनें गदाघातें केलें चूर ॥ मग करीं घेतलें वज्र ॥ मुंडवधासी ॥५६॥

मुखें करुनि महागर्जना ॥ सुरा पाजिली पंचानना ॥ ह्नणे घे घे रे धरीं गहना ॥ दुर्जनासी ॥५७॥

तंव तो चालिला केसरी ॥ दैत्य धरिला नखशस्त्री ॥ सर्वेचि हाणितसे कुमरी ॥ शक्तिघातें ॥५८॥

घायें केली महागर्जना ॥ तेणें न्याहो उठिल वना ॥ तो महानाद गेला कर्णा ॥ निखिलाचिये ॥५९॥

मग त्या मुंडाचे शिर ॥ कापूनि टाकलें भयंकर ॥ रणयाग करी खेचर ॥ चंडमुंडांचे ॥६०॥

ऐसें वधिले चंडमुंडां ॥ तेणें नाम जाहलें चामुडा ॥ भैरव नाचती बांगडां ॥ रणामाजी ॥६१॥

इकडे ऐशी आली वार्ता ॥ कीं चंडमुंड वधिले दैवतां ॥ मग कोप चढला गा भारता ॥ शुंभवीरासी ॥६२॥

बोलाविला रक्तबिंदु ॥ तयासि केला अनुवादु ॥ कीं काळिका धरोनि वधू ॥ करीं तियेचा ॥६३॥

धूम्रवंशाचें जें कुशळ ॥ तें न्यावें गा सैन्य सकळ ॥ बहु मेळवोनियां दळ ॥ जाई वहिला ॥६४॥

मग तो रक्तबिंदु असुर ॥ सवें घेवोनि दळभार ॥ वेगें पावला गिरिवर ॥ हिमवंत जेथें ॥६५॥

शतयुद्धांचे आथिले ॥ कोटीबळाचे वोतिले ऐसें सहापद्में मिरवले ॥ महावीर ॥६६॥

तंव तें जाणोनि भवानी ॥ आरुढली सिंहासनी ॥ हाक देवोनि रणभुवनीं ॥ आली तेव्हां ॥६७॥

सिंह गर्जे भयंकर ॥ धनुष्याचा टणत्कार ॥ तें ऐकोनि दळभार ॥ थरारिला गा ॥ ॥६८॥

देवीनें करितांचि संधान ॥ लक्षकोटी सुटले बाण ॥ धाकें पळतें जाहलें सैन्य ॥ रक्तबीजाचें ॥६९॥

सवेंचि देवी पासाव शक्ती ॥ निघाल्या देवांच्या आकृती ॥ आयुधें वहनें सहिती ॥ कोटी तेहतीस ॥७०॥

प्रथम आद्यशक्ति ब्रह्माणी ॥ बैसली हंसाचिये वहनीं ॥ ब्रह्मसूत्र कमंडलुपाणी ॥ अक्षमाळा ॥७१॥

वृषारुढ माहेश्वरी ॥ त्रिशूळ डौर त्रिनेत्री ॥ दशभुज पंचवग्त्री ॥ देवता ते ॥७२॥

कौमारी ते षडाननी ॥ चतुर्भुज मयूर वाहिनी ॥ शूळ चक्र शंखपाणी ॥ लांगूल पैं ॥७३॥

यज्ञवाराहरुप शक्ती ॥ दशन ज्योती चंद्रदीप्ती । महाहुंकारें हुंबती ॥ पावली ते ॥७४॥

इंद्रशक्ती गजवाहिनी ॥ वज्रपाणी सहस्त्रनयनी ॥ ऐशा आल्या रणयज्ञीं ॥ तेतीसकोटी ॥ ॥७५॥

तंव जें रणींचे दैत्यसैन्य ॥ पळतहोतें रानोरान ॥ तें सकळही निःपात करोन ॥ टाकिलें क्षणीं ॥७६॥

माहेश्वरी हाणी त्रिशूळें ॥ ब्राह्मी वोढी पाशबळें ॥ वैष्णवी असंख्य चक्रजाळे ॥ मारीतसे ॥७७॥

कौमारी मारीत शक्ती इंद्रायणी वज्रघाती ॥ वाराही तोडिते दातीं ॥ येकावीरा ।७८॥

नारसिंही फाडी वदनीं ॥ शोणितें दाटली मेदिनी ॥ सर्व भक्षिलें तत्क्षणीं ॥ शिवदूतीनें ॥७९॥

ऐसें केलें मातृगणीं ॥ सकळ ग्रासिली अरणी ॥ येक गेले पळोनी ॥ दैत्याजवळी ॥८०॥

तें जाणोनि धूम्रजटिल ॥ हातीं घेवोनियां त्रिशूळ ॥ शिरीं वोतोनियां बगुळ ॥ आले दोन्ही ॥ ॥८१॥

तंव जाणितलें तामसीं ॥ मग दोघे धरुनि बाहुवसीं ॥ वेगीं आपटिले शिळेसी ॥ काळिकेनें ॥८२॥

मग चालिला रक्तबीज ॥ वीरांमाजी मुकुटध्वज ॥ ज्याचा रक्तबिंदू पडतां सहज ॥ उपजती वीर ॥८३॥

त्या जाणोनियां देवता ॥ बाणजाळ जाहल वर्षता ॥ ह्नणे आतां धरोनि समस्तां ॥ नेईन शुंभाजवळी ॥८४॥

तंव ते चालिली इंद्रशक्ती ॥ चक्र घेवोनि वज्रहातीं ॥ दैत्या हाणितलें निर्घाती ॥ मस्तकावरी ॥८५॥

तेणें लोटलें अशुद्ध ॥ तेथोनि वीर निघाले विविध ॥ ते तयाऐसेचि करिती युद्ध ॥ समरांगणीं ॥८६॥

परि ते हाणीत चालिली शक्ती ॥ भिंडिमाळा त्रिशूळ घातीं ॥ वज्रें खेचरी हाणिती ॥ दुजा भावो ॥८७॥

ते बिंदु पडतांचि सृष्टी ॥ दैत्य उपजले लक्षकोटी ॥ रक्तबीजाचे परि दिठी ॥ दिसती सकळ ॥८८॥

तंव चालिली वैष्णवी शक्ती ॥ चक्रीं जाहली हाणिती ॥ ऐशा वीर हाणित निघती ॥ महाकोपें ॥८९॥

मग मिळोनियां समग्रा ॥ हातीं वसवोनि त्रिशूळचक्रां ॥ हाणित्याजाहल्या वीरां ॥ येकसरें ॥९०॥

तें भूमी लोटतां शोणित ॥ वीर उद्भवले असंख्यात ॥ सृष्टी व्यापिली समस्त ॥ कोणा अंत न करवे ॥९१॥

घायें अधिकचि पडे रुधिर ॥ वीर उद्भवले कोटिसहस्त्र ॥ तें देखोनियां सुरवर ॥ कांपिन्नले ॥९२॥

ते रक्तबीजाचे अंकुर ॥ त्यांहीं व्यापिलें दिगंतर ॥ धगधगीत महाअसुर ॥ उपजताती ॥९३॥

तेणें भय सुटलें सुरवरां ॥ विचार करिती परस्परां ॥ कीं आतां काय करील वीरा ॥ काळिका हे ॥९४॥

मग चामुंडेसि ह्नणे चंडिक ॥ विशाळ पसरीं आपुले मुखा ॥ वेगीं घोटी हो या पीयूषा ॥ शोणितासी ॥९५॥

आणि तुह्मी समस्त योगिनी ॥ रक्त न पडतां मेदिनीं ॥ पात्रें भरोनियां वदनीं ॥ घ्यावे घोट ॥९६॥

ऐसें करोनि सन्मत ॥ चंडिकेनें वधिला दैत्य ॥ चामुंडा पीतसे शोणित ॥ वरचेवरी ॥९७॥

ब्रह्माणी दुर्गा रुद्रायणी ॥ तेतीसकोटी आदिकरोनी ॥ अशुद्ध प्राशिती वदनीं ॥ रक्तबीजाचें ॥९८॥

जैसें पर्जन्यकाळीचे नीर ॥ तैसे शोषिती रक्तपूर ॥ यापारि क्षणे प्राशिलें रुधिर ॥ त्या असुराचें ॥९९॥

ऐसे शोषिता रुधिर ॥ तेणें निमाले दैत्य समग्र ॥ मग काळिकेनें ग्रासिले वीर ॥ रक्तबीजाचे ॥१००॥

तेथें जाहला जयजयकर ॥ आनंदले ऋषि निर्जर ॥ पुष्पवर्षाव जाहला थोर देवीवरी ॥१॥

भुतें भैरव क्षेत्रपाळ ॥ तेथें नग्न नाचती सकळ ॥ जाणों रणीं फेडिला दुष्काळ ॥ रक्तबीजें ॥२॥

चौसष्टकोटी योगिनी ॥ छपन्नकोटी कात्यायनी ॥ उदोशब्दें वदती रणयज्ञीं ॥ काळिकेसी ॥३॥

मग तें जाणोनि शुंभवीर ॥ क्रोधें चालिला महाअसुर ॥ ह्नणे आतां करीन संहार ॥ योगिनींचा ॥४॥

वेगें येवोनि रणमंडळीं ॥ गजाश्वनरांची खंदळी ॥ दृष्टीं देखे विदारिली ॥ असंख्यात ॥५॥

तेथें देखिली काळिका ॥ तेतीसकोटीची नायिका ॥ जे अजिंक्य भूतातका ॥ आणि दैत्यां ॥६॥

मग शुंभ ह्नणे गे तामसी ॥ नारदें कथिली तेचि तूं होसी ॥ तरी आतां धरोनि केशीं ॥ नेईन तुज ॥७॥

ह्नणोनि वर्षिन्नला बाणधारीं ॥ जैसा मेघ शैलशिखरीं ॥ दिशा दाटल्या अंबरीं ॥ अंधकारें ॥८॥

सवेंचि टाकी शस्त्रास्त्रें ॥ आणि टाकिलीं गिरिवरें ॥ जाणों सेतु बांधिती वानरें ॥ सीतेलागीं ॥९॥

येथें आक्षेपील श्रोता ॥ कीं देवी जुनाट आरुती सीता ॥ तरी हे युगांतरें सांगे भारता ॥ वैशंपायन ॥११०॥

असो दैत्यावरी अंबिका ॥ कोपें चालिली काळिका ॥ ह्नणे साहें साहेंरे मशका ॥ त्रिशूळघात ॥११॥

ऐसा जाहला आदळ ॥ जाणों मिळाले मंदराचळ ॥ काळिकेनें घातला त्रिशूळ ॥ दैत्यावरी ॥१२॥

तो टाळितां न टळे त्रिशूळ ॥ हदयी लागला अळुमाळ ॥ तंव मूर्छा येवोनि विकळ ॥ पडिला शुंभ ॥१३॥

तें जाणोनि सहोदर ॥ उठावला निशुंभवीर ॥ रथीं होवोनियां स्वार ॥ धांवला कोपें ॥१४॥

तेणें शुंभा सहोदरा ॥ पाठीं घातलें महावीरा ॥ मग धनुष्यीं लावोनि शरा ॥ विंधिताहोय ॥१५॥

तंव ते सरसावली काळी ॥ बाण दीधले अंतराळी ॥ सारथीं पाडिला त्रिशूळीं ॥ वारुंसहित ॥ ॥१६॥

तेणें दहासहस्त्र चक्रें ॥ देवीवरी सोडिलीं मत्रें ॥ येरीनें ती छेदिलीं समग्रें ॥ बाणघाती ॥१७॥

परि मागुती गदाघातें ॥ निशुंभ हाणी चंडिकेतें ॥ जाणों पद्मकोश रक्तें ॥ वाहिला जैसा ॥१८॥

एकमेकां घालिती त्रिशूळ ॥ वोपिती भाळीं तीव्र शस्त्र ॥ मग देवी घालीत करवाळ ॥ असुरावरी ॥१९॥

खङ्ग घातलें जिव्हारीं ॥ जाणों पाडिला वज्रगिरी ॥ तेणे लोटला धरित्री ॥ निशुंभ तो ॥१२०॥

तंव हदयीं वळंघला केसरी ॥ शिवदूती आणि काळरात्री ॥ समस्ती हाणोनिया शस्त्रीं ॥ केला शतखंड ॥२१॥

मग बैसोनि देहप्रांती ॥ सिंह आणि शिवदूती ॥ निशुंभ भक्षिला समस्तीं ॥ वांटोनियां ॥२२॥

इकडे शुंभ होवोनि सावधु ॥ दृष्टीं पाहे धाकुटा बंधु ॥ तंव देखिला गात्रमंदु ॥ अस्थिपंजरांचा ॥२३॥

मग तो सरसावोनि वीरु ॥ रथीं जाहला असिवारु ॥ ह्नणे आतां करीन संहारु ॥ योगिनींचा ॥२४॥

शुंभासि ह्नणे चंडिका ॥ त्रिलोकस्वामिणी मी अंबिका ॥ आतां गर्व सांडीं रे अविवेका ॥ वांटिवेचा ॥ ॥२५॥

तुज आली मरणव्यथा ॥ ह्नणोनि गांजिले सुरनाथा ॥ अभिलाषदृष्टीं मजप्रती दूतां ॥ धाडिलें तुवां ॥२६॥

तरी तें काढीन उसणे ॥ तवरक्ताचें करीन उटणें ॥ बाणीं घडीन रे कांकणें ॥ तवकलेवराची ॥२७॥

तुझिये उदरीची आंतें ॥ ती मी घालीन यज्ञोपवीतें ॥ क्रीडाडावमांडीन येथें ॥ तवशिराचा ॥२८॥

त्रिशूळाचें करोनि बाशिंग ॥ तव शिरीं बांधीन अभंग ॥ भैरव वाजवितील मृदंग ॥ महाशब्दाचे ॥२९॥

तुझिये जीवाची वरात ॥ यमपुरा धाडीन सत्य ॥ वर्‍हाडीणी जेविती रक्त ॥ तेतीसकोटी ॥१३०॥

ऐसें ह्नणोनि त्या देवता ॥ येकरुप जाहल्या समस्ता ॥ मग चालिली गा भारत ॥ अंबिका ते ॥३१॥

तयेसि बोले शुंभवीर ॥ माझा मारिला सहोदर ॥ आणि आटिल सर्व परिवार ॥ माझे कुळाचा ॥३२॥

आतां बोलूं काय प्रौढी ॥ तुज घालितों बांदवडी ॥ ऐसें ह्नणोनि वाण कानाडीं ॥ लावियेला ॥३३॥

इकडे बोटीं मर्दोनि गुण ॥ अंबेनें लाविला चंद्रबाण ॥ मग धनुष्य तोडोनि निर्गुण ॥ केला वीर ॥३४॥

वारु रथ आणि सारथी ॥ बाणें छेदीतसे शक्ती ॥ मग होवोनि पदाती ॥ चालिला तो ॥३५॥

हातीं घेवोनि गिरिवर ॥ देवीवरी टाकी असुर ॥ तो काळीनें केला चूर ॥ गदाघातें ॥३६॥

मग युद्धें अग्निवरुणास्त्रें ॥ दोघां जाहली परस्परें ॥ तें झुंज सांगतां गा न सरे ॥ सहस्त्रमुखा ॥३७॥

मग चंद्राची प्रत्यक्षदीप्ती ॥ तैसें शस्त्र काढी शक्ती ॥ परि तें शुंभें हाणोनि गदाघातीं ॥ केलें चूर्ण ॥३८॥

दैत्य आदळला अंगपृष्ठीं ॥ अंबिका हाणी वज्रमुष्टी ॥ तेणें मूर्छित पढिला सृष्टीं ॥ क्षणएक दैत्य ॥३९॥

तंव चरणें हाणितला कामिनीं ॥ दैत्य अशुद्ध वमी वदनीं ॥ परि अंबा धरोनि चरणीं ॥ उडविली तेणें ॥४०॥

दोघां फिरतां गगनपोकळीं ॥ घोर जाहली हातफळी ॥ हाणिताती कानसुलीं ॥ येकमेकां ॥४१॥

कंठकळा विकळ बांगडी ॥ आंगुठा कोपर चरण नाडी ॥ ढोकी ढोल गुढगाडी ॥ हाणिताती ॥४२॥

तळतपीं हनुवटी ॥ कासकवळी मनगटीं ॥ आदळती बोटसुती ॥ येकमेकां ॥४३॥

असो भिडतां अंतराळीं ॥ येकमेकां बाहुबळीं ॥ ऐसी जाहली हातफळी ॥ बहुत दिवस ॥४४॥

तयां भिडतां गगनोदरीं ॥ धाक मानिला सुरवरीं ॥ मग विस्मयें चकित अंतरीं ॥ जाहले सकळ ॥४५॥

तंव तें जाणोनि काळिका ॥ चरणीं धरिले दैत्यनायका ॥ भूमी आपटोनि यमलोका ॥ धाडिला तो ॥४६॥

मग धांवोनि आला केसरी ॥ तेणें नखें घातलीं उदरीं ॥ अशुद्ध प्राशी सत्वरीं ॥ कलेवराचें ॥४७॥

भूतभैरव कंकाळ ॥ रणीं नाचती वेताळ ॥ काळिका झेली त्रिशूळ ॥ रणमंडळीं ॥४८॥

उदो बोलती योगिनी ॥ भलीभली हो देवी जननी ॥ तृप्त केलें रणयज्ञीं ॥ भूतमात्रां ॥४९॥

आतां असो हा बीभत्स वीर ॥ मेलियासी काय श्रृंगार ॥ हें सांगतां कथापार ॥ न लाभेची ॥१५०॥

मापें मोजितां मारुता ॥ केवीं वोहोट पडे भरिता ॥ ह्नणोनि शुक्ति सांडोनि मुक्ता ॥ घ्यावें सत्य ॥५१॥

ऐसें वधिले दैत्यकुळ ॥ सुखी जाहलें दिग्मंडळ ॥ स्वस्थळी बैसले दिग्पाळ ॥ आणि दिग्गजही ॥५२॥

गगन जाहलें निर्मळ ॥ वर्षू लागलें मेघजळ ॥ सागरा मिळाले सकळ ॥ वोध नदीचे ॥५३॥

वेद पढती द्विजकुळ ॥ तरुमुहुरले सकळ ॥ याज्ञिक पूजिती त्रिकाळ ॥ यज्ञपुरुषातें ॥५४॥

पूजिती तुळसी वृंदावन ॥ देवस्थळीं होत किर्तन ॥ गंधर्व गाती गायन ॥ देवसभेसी ॥५५॥

अप्सरा नाचती अंगणीं ॥ लागली वाद्यांची ध्वनी ॥ आरत्या करिती कामिनी ॥ काळिकातें ॥५६॥

देवीं केला जयजयकार ॥ स्तुती करिती विधिहरिहर ॥ पुष्पें वर्षले सुरवर ॥ अंबेवरी ॥५७॥

आतां असो हा दैत्यवंशु ॥ चंडिकेचा यशप्रकाशू ॥ पुढील ऐकावा सौरसु ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥५८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ शुंभनिशुंभवध परिकरु ॥ सप्तदशोध्यायीं सांगितला ॥१५९॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥
॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP