कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय १५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

जन्मेजयो ह्नणे गा मुनी ॥ शाळिग्राम गंडकीजीवनीं ॥ आणि चक्रे जाहलीं कवणे गुणीं ॥ पवित्रपणें ॥१॥

मग ह्नणे मुनीश्वर ॥ गंडकी अदितीचा अवतारु ॥ तेथें विसावाऋषी सवेंश्वरु ॥ अवतरलासे ॥२॥

तरी ऐक गा भुपती ॥ तृणबिंदूची कन्या देवहूती ॥ ते कर्दम नामें प्रजापती प्रती ॥ दीधली ऐकें ॥३॥

तिसी पुत्रजाहले तिन्ही ॥ जय विजय आणि कपिलमहामुनी ॥ जो गुप्तरुपें चक्रपाणी ॥ ज्ञानसिंधू ॥४॥

जयविजय महाशीळ ॥ हे विष्णुचे द्वारपाळ ॥ चौदाविद्या गा सकळ ॥ जाणती ते ॥५॥

ऋग्वेद यजुर्वेद यजुर्वेद अथर्बण ॥ साम मीमांसा पुराण ॥ न्याय धर्मशास्त्र किरण ॥ वेदअंगें ॥६॥

तंव मरुत राजा सोमवंशी ॥ तेणें याग मांडिला गृह्यकेशीं ॥ ब्रह्मासन दीधलें विजयासी ॥ जय केला आचार्य पैं ॥७॥

दोघां दीधली अपार दक्षिणा ॥ गणित नाहीं कनकरत्नां ॥ मग पूर्ण करोनि यागहवना ॥ निघाले दोन्ही ॥८॥

तंव तें दक्षिणेचें कांचन ॥ विभाग करिती दोघेजण ॥ परि तो जय ह्नणे वचन ॥ ऐकें माझें ॥९॥

माझा ज्येष्ठपणाचा वंतु ॥ वेगळा करीं पां यज्ञदत्तु ॥ तंव विजय ह्नणे अधिक तंतु ॥ नेदीं तुज ॥१०॥

ऐसा करितां विवादु ॥ येकमेकां लाविती संबंधु ॥ शेवटीं निकरा गेले बंधु ॥ जयविजय ते ॥११॥

मग ते येकमेकां शापिती ॥ जया तूं होई रे हस्ती ॥ तंव येरु ह्नणे मंदमती ॥ तूं होई जळचर ॥१२॥

तो विजय गंडकीनदीच्या जळीं ॥ सुसर जाहला तात्काळीं ॥ आणि जय जाहला महाबळी ॥ कुंजरु पैं ॥१३॥

मग कोणे एके वेळी ॥ कुंजर निघाला जळकेली ॥ तंव धरिला चरणकमळीं ॥ सुसरें तेणें ॥१४॥

जरी प्राप्त जाहले पशुशरीरा ॥ परी न सांडिती पूर्ववैरा ॥ कीं काष्ठ आलिया अग्निमोहरा ॥ परी न सांडी स्वभाव ॥ ॥१५॥

कुंजरें करितां महाप्रयत्न ॥ परि जळचर न सोडी चरण ॥ थोर जाहला खेदक्षीण ॥ गजेंद्र तो ॥१६॥

तंव त्या जाहला जातिस्मरु ॥ ह्नणे मी हरीचा निजकिंकरु ॥ विलापें धांवा करी कुंजरु ॥ तिये वेळीं ॥१७॥

जयजयाजी करुणाकरा ॥ भक्तवत्सला वज्रपंजरा ॥ धांवधांव गा शारंगधरा ॥ कृपाळुवा तूं ॥१८॥

जयजयाजी लक्ष्मीकांता ॥ आदिपुरुषा अनाथनाथा ॥ धांवधांव गा अनंता ॥ शेषशयना ॥१९॥

जयजयाजी वैकुंठा ॥ साहीदर्शनांचिया मठा ॥ या ग्रहमुखाचिया पेटां ॥ सोडवीं मज ॥२०॥

शैव वैष्णव आणि शाक्त ॥ सौर बौद्ध कीं गाणपत्य ॥ साहीदर्शनाचें पिक सत्य ॥ अलोढ्य तूं ॥२१॥

मग तें जाणोनियां श्रीपती ॥ गरुडासनीं शीघ्रगती ॥ हरि आला तयाप्रती ॥ गंडकीसी ॥२२॥

देवें आपुलें सुदर्शनचक्र ॥ दोहींमध्ये घातलें वज्र ॥ तंव मुक्त जाहले सहोदर ॥ बंधु दोन्हीं ॥२३॥

परि तें चक्र सुदर्शन ॥ शिळे लागलें सानसान ॥ तेणें दृषद भेदोनियां वदन ॥ जाहलीं चक्रें ॥ ॥२४॥

चक्र काढावया वनमाळी ॥ हात घाली गंडकीजळीं ॥ तंव लक्ष्मी प्रवेशली शिळीं ॥ कनकरुपें ॥२५॥

जैसा पिंवळीं ह्षीकेश ॥ कीं नदीमाजी कृष्णअंश ॥ तैसा शिळीं केला प्रवेश ॥ गोपिनाथें ॥२६॥

मग ते जयविजय दोनी ॥ त्यांहीं श्रीहरी देखिला नयनी ॥ चतुर्भुजांचे मांडणीं ॥ आयुधेंसीं ॥२७॥

कंठीं माळा वैजयंती ॥ मेघश्याम अंगकांती ॥ श्रीवत्स आणि जगज्ज्योती ॥ कौस्तुभाची ॥२८॥

कांसे मिरवे पीतांबर ॥ कुंडलें मुकुट मनोहर ॥ ऐसा देखिला चक्रधर ॥ द्वारपाळीं ॥२९॥

तो देखोनियां नयनीं ॥ दोघे गेले लोटांगणी ॥ मग देवें वाहूनि विमानीं ॥ नेले वैकुंठासी ॥३०॥

आणि तया दोघांप्रती ॥ वचनीं बोलिला श्रीपती ॥ कीं हे शाळिग्रामआकृती ॥ माझी जाणा ॥३१॥

यासी वाहतील तुळसी चंदन ॥ तिहीं मज पूजिलें जाण ॥ त्यांहीं वैकुंठी घातलें आसन ॥ देवांमाजी ॥३२॥

आतां असो हे गजेंद्रकथा ॥ संकलित सांगितली गा भारता ॥ कीं विधिनिषेध वाढवितां ॥ नावरे ग्रंथ ॥३३॥

हें गजेंद्रोपाख्यान ॥ महाभारतींचें महिमान ॥ परि द्वितीयस्तबकीं असे आन ॥ कथा भागवतींची ॥३४॥

कीं इंद्रद्युभ्न नामें भूपती ॥ तो ध्यानीं असतां नेमस्तीं ॥ तंव ऋषि आला अगस्ती ॥ सहजें तेथें ॥३५॥

परि राव होता निजध्यानीं ॥ ह्नणोनि देखिला नाहीं नयनीं ॥ तंव शापबोलिला मुनी ॥ अगस्ती तया ॥३६॥

अरे दांभिका नृपवरा ॥ मज देखोनि झांकिसी नेत्रा ॥ तरी सहस्त्रवर्षे कुंजरा ॥ भोगिशी योनी ॥३७॥

आतां असो हे पुढती कथा ॥ उगेंचि कां वाढवावें पुनरागता ॥ मागां ऐकिलें असे श्रोतां ॥ द्वितीयस्तबकीं ॥३८॥

तंव ह्नणे पारिक्षिती ॥ शाळिग्रामाचें आणिलें चित्तीं ॥ परी कृष्णानदीये प्रविष्ट श्रीपती ॥ जाहला कैसा ॥३९॥

मग बोलिले मुनीश्वरु ॥ कीं ब्रह्यानें केलासे अध्वरु ॥ सिंहाद्रि नामें गिरिवरु ॥ महाबळस्थानीं ॥४०॥

आले देवऋषी त्रिनयन ॥ नारद तुंबर नारायण ॥ इंद्र चंद्र सूर्य वरुण ॥ आले सपत्नीशीं ॥४१॥

तंव पुण्याहवाचना कारणें ॥ सावित्री बोलाविली चतुराननें ॥ परि श्रॄंगार घालितां लेणें ॥ जाहला उशीर ॥४२॥

विलंब होईल मुहूर्तसाधना ॥ हें ऋषीनीं कथिलें चतुरानना ॥ मग बैसविली पुण्याहवाचना ॥ गायत्री ते ॥४३॥

जंव श्रृंगार करुनियां कांता ॥ सावित्री आली गा भारता ॥ तंव शेजीं देखिली वनिता ॥ गायत्री ते ॥४४॥

मग कोपोनि ह्नणे वैकुठां ॥ कीं त्यजूनियां मज ज्येष्ठा ॥ शेखीं सन्मानिली कनिष्ठा ॥ गायत्री हे ॥४५॥

साधूची निंदा आणि अवकळा ॥ जे ऐकती पाहती डोळा ॥ ते षड्भागांचिया फळा ॥ भोगिती पैं ॥४६॥

ऐसें घडेल जया जनां ॥ ते भोगितील पापपुण्या ॥ कीं तुह्मां देखतां अवज्ञा ॥ जाहली माझी ॥४७॥

तुह्मां असतां देवगणां ॥ गायत्री बैसली पुण्याहवाचना ॥ तरी तुह्मी जडरुप व्हाल जाणा ॥ नदीरुपें ॥४८॥

हा शाप बोलिली सावित्री ॥ तंव कोपोनि बोले गायत्री ॥ कीं तूंही मिळशील सागरीं ॥ नदीरुपें ॥४९॥

ऐसें ऐकोनि शापदान ॥ थोर शंकले देवगण ॥ मग विनविते जाहले वचन ॥ सावित्रीसी ॥५०॥

कीं नदी जाहलिय देवीं समस्तीं ॥ मग दिवस अथवा कैंची राती ॥ प्रळय पाळण आणि उत्पत्ती ॥ राहिली मग ॥५१॥

तंव देवां ह्नणे सावित्री ॥ तुह्मी आपुलाले अंशमात्रीं ॥ नदी व्हावें हो समग्रीं ॥ मेदिनीसी ॥५२॥

मग तें मानवलें समस्तां ॥ देव जाहले पुण्यसरिता ॥ ते कोणकोण गा भारता ॥ सांगों तुज ॥५३॥

कृष्णा बोलिजे नारायण ॥ पूर्वे महानदी तो त्रिनयन ॥ ब्रह्मकमंडली तो चतुरानन ॥ सत्य पैं ॥५४॥

पूर्वे वाहती ते देवगण ॥ पश्विमे वाहती ते स्त्रीजन ॥ हें रामायणींचें महिमान ॥ बोलिलेंसे ॥५५॥

आतां असो हें भारता ॥ तुवां पुसिली कृष्णाकथा ॥ तरी देव जाहले सरिता ॥ ऐशियापरी ॥५६॥

मुनि ह्नणे गा भूपती ॥ तूं महाभक्त धर्ममूर्ती ॥ तुझेनि संगें उद्धरती ॥ महादोषिये ॥५७॥

जैसें तुंबीचें आपण वक्र फळ ॥ तरोनि आणिका तारी कल्लोळ ॥ कीं चंदन करी शीतळ ॥ तापलियातें ॥५८॥

जैसा महानष्ट हीनयाती ॥ धनेश्वर नामें विप्रजाती ॥ तो उद्धरला संतसंगतीं ॥ राया जैसा ॥५९॥

तंव विचारी नरेश्वर ॥ कीं धनेश्वर हा कोठील विप्र ॥ तेणें काय केला अनाचार ॥ आणि उद्धरला कैसा ॥६०॥

मग मुनि ह्नणे गा अवधारीं ॥ पुरी नामें कोणीयेक नगरी ॥ तेथें होता अनाचारी ॥ ब्राह्मण तो ॥६१॥

रसविक्रय करी सर्वकाळीं ॥ दासी अश्व रेणु काबळी ॥ येकादशी न करी कदाकाळीं ॥ लाटा होवोनियां ॥ ॥६२॥

सदा चोरी आणि परद्वारी ॥ जन्म गेला वेश्येचा घरीं ॥ नित्यानित्य पातक करी ॥ धर्म नेणे कदाही ॥६३॥

मग तो नर्ददेच्या तीरीं ॥ महिकावती नामें नगरी ॥ तेथें आला कार्तिकाभीतरीं ॥ उदीमासी ॥६४॥

केणें घृत तेल साबण ॥ नाग गुड शर्करा लवण ॥ नाग सोमल जहर मरण ॥ आणिकही वस्तु पैं ॥६५॥

ऐसे भरोनि चौरस ॥ अश्व गौवा बटकी दास ॥ घेवोनि आला बहुवस ॥ उत्तरदेशा ॥६६॥

तेथील शेटियां तत्वतां ॥ उधार घातला समस्तां ॥ तीन दिवस लागले मागतां ॥ धनेश्वरासी ॥६७॥

तंव त्या नगरींचे महाजन ॥ अहर्निशी ऐकती पुराण ॥ आणि येक करिती कीर्तन ॥ हरिमंदिरीं ॥६८॥

मग तो विप्र धनेश्वर ॥ तयां मागे आपुला उधार ॥ जन ह्नणती गा धरीं धीर ॥ नावेकवरी ॥६९॥

ऐसें करितां नित्यानीं ॥ तेणे हरिकथा पडे श्रवणीं ॥ परि तें त्यजूनि वैराग्य न मानी ॥ हदय त्याचें ॥७०॥

धूपदानें मंगळआरती ॥ तुळसी चौक विष्णुप्रती ॥ संतसन्यासी योगी येती ॥ देखे सभेसी ॥७१॥

कार्तिकस्त्रानाचे नेमी ॥ सूक्तपाठक नित्यहोमी ॥ तयांचे जाय सदा धार्मो ॥ उधारासी ॥७२॥

ऐसा हिंडतां कार्तिकमासीं ॥ सोमवार शुद्ध पौर्णिमेसी ॥ सर्प लागला धनेश्वरासी ॥ महाविखार ॥७३॥

तेणें जाचणीचे विपत्तीं ॥ यमलोका नेला यमदूतीं ॥ तंव कथिलें चित्रगुप्तीं ॥ यमरायासी ॥७४॥

कीं हा महानष्ट दुराचारी ॥ पातक लिहितां न माय अंबरीं कार्तिकमासीं ॥ सोमवार शुद्ध पौर्णिमेसी ॥ सर्प लागला धनेश्वरासी ॥ महाविखार ॥७३॥

तेणें जाचणीचे विपत्तीं ॥ यमलोका नेला यमदूतीं ॥ तंव कथिलें चित्रगुप्तीं ॥ यमरायासी ॥७४॥

कीं हा महानष्ट दुराचारी ॥ पातक लिहितां न माय अंबरीं ॥ मग तो पचविला अघोरीं ॥ यमदूतांहीं ॥७५॥

शतयोजनें कुंडस्थळ ॥ मध्यें धगधगीत चक्रजाळ ॥ तेथें टाकिला तंव शीतळ ॥ जाहला वन्ही ॥७६॥

मग कुंभिपाकाभीतरी ॥ बांधोनि घातला दुराचारी ॥ तंव रौरवाभीतरीं ॥ सकळ पचवीत ॥७७॥

पुढें असिपत्राचे वनीं ॥ तेथें वेढिला यमगणीं ॥ परि त्या धारा युक्तमणी ॥ जाहल्या तया ॥७८॥

मागुती तो श्वानशबलीं ॥ आणि फोडिला कागकुळीं ॥ परि दृष्टी जाहली आंधळी ॥ श्वानां वायसांची ॥७९॥

दूत ह्नणती जी प्रेतनाथा ॥ यासी नलगे जाचणी सर्वथा ॥ लिखित चुकलें जी लिहितां ॥ पुण्य याचें बहु असे ॥८०॥

तंव तें ऐकोनि चित्रगुप्त ॥ त्याचें दाविती जनलिखित ॥ कीं पुण्य येणें जी किंचित ॥ केलें नाहीं ॥८१॥

इतुक्यांत नारद आले यमाप्रती ॥ ह्नणती हा होता संतसंगती ॥ कार्तिकमासीं महिकावती ॥ रेवातटासी ॥८२॥

हा उदीमनिमित्तें दुराचारी ॥ उधार मागे हरिजागरीं ॥ तंव ते ह्नणती नावेकवरी ॥ ऐकें नाम ॥८३॥

ह्नणोनि हा संतसंगतीं ॥ पापी जाहला पुण्यकीर्ती ॥ ह्नणोनि वैवस्वता रौरवभीती ॥ धनेश्वरासी आधीचना ॥८४॥

अग्नि यासी न करी झगटी ॥ परि रौरव यासी दावा दृष्टीं ॥ मग दूतीं नेला संकटीं ॥ दावावयासी ॥८५॥

तंव तो हरीच्या निजगणीं ॥ उचलूनि घातला विमानीं ॥ शीघ्र नेला विष्णुभुवनीं ॥ पातकी तो ॥८६॥

मग तो द्विज धनेश्वरु ॥ अलकेचा राजा केला कुबेरु ॥ तो बोलिजे गुह्यकेश्वरु ॥ महापुण्यें ॥ ॥८७॥

ह्नववोनि ऐकें गा भारता ॥ तूं महाशीळ आणि श्रोता ॥ तुझे संगतीं आह्मां बहुतां ॥ जोडला लाभ ॥८८॥

यास्तव आलिया संसारीं ॥ धर्मकीर्तन जो न करी ॥ तो आपणचि विष्णुचा वैरी ॥ जाहला जाणा ॥८९॥

हे पद्मपुराणींची कथा ॥ तुज म्यां कथिली गा भारता ॥ तरी संतसंगतीहूनि परता ॥ नाहीं लाभ ॥९०॥

आणिक ह्नणती वैशंपायनु ॥ ऐसाचि सुरथ जाहला मनु ॥ सूर्यदेवाचा नंदनु ॥ सावर्णिक जो ॥९१॥

ऋषीचिये सत्संगतीं ॥ तया घडली पूजा भक्ती ॥ तो मनु जाहला गा भूपती ॥ याचियेपरी ॥९२॥

तंव प्रश्न करी जन्मेजयो ॥ कीं सुरथ हा कोठील रावो ॥ आणि तो मनु व्हावया उपावो ॥ काय जाहला ॥९३॥

मग वैशंपायन ह्नणती वचनीं ॥ कीं व्यासाचा शिष्य जैमिनी ॥ तया कथिलें मार्केडेयमुनीनीं ॥ तें सांगों तुज ॥९४॥

सूर्यवंशीं राजा सुरथ ॥ महाबळिया विख्यात ॥ महिमंडळींचा नृपनाथ ॥ तोचि येक ॥९५॥

तया काळक्रमें गा संकेता ॥ पुण्य सरलें राया भारता ॥ तो पावला दुःखव्यथा ॥ महाविकंद ॥९६॥

परचक्र पातलें थोर ॥ राज्य घेतलें पैं समग्र ॥ विमुख जाहले बंधु पुत्र ॥ दाईज दारा ॥९७॥

तेणें अहंतापला सुरथ ॥ ह्नणे रुसला जगन्नाथ ॥ मग राज्य सोडोनि उत्तरपंथ ॥ धरिला तेणें ॥९८॥

ऐसा हिंडतां गिरिमेदिनीं ॥ तो पावला चित्ररथवनीं ॥ जेथें असती महामुनी ॥ मार्केडेयादि ॥९९॥

तेथे तो येवोनि सुरथ ॥ ऋषीसि करी प्रणिपात ॥ मग सांगता जाहला वृत्तांत ॥ आपुला त्यासी ॥१००॥

ह्नणे गा मार्केडेया अवधारीं ॥ माझें राज्य घेतलें तस्करी ॥ आणि बंधु पत्नी कुमरीं ॥ त्यजिलें मज ॥१॥

जैसें स्तनीं सरलिया पीयूषा ॥ मग माता नावडे बाळका ॥ कीं द्रव्य सरलिया गणिका ॥ त्यजी वल्लभातें ॥२॥

अथवा शरींरी गेलिया प्राण ॥ मग दूरी टाकिती स्वजन ॥ नातरी दग्ध जालिया वन ॥ त्यजिती मृग ॥३॥

तैसें जाहलेंचि दातारा ॥ अपवित्र जाहलो चराचरा ॥ आतां दीनानाथा ऋषीश्वरा ॥ आलों शरण तुज ॥४॥

माझें हदय निवे सीतें ॥ गेलें राज्य मुरडे मागुतें ॥ ऐसें सांगावें येकचित्तें ॥ मजप्रती गा ॥५॥

तंव कवण येक वैश्य ॥ महाशीळ आणि तापस ॥ तोही तेथें आला निराश ॥ दुःखितमनें ॥६॥

मग त्यासी ह्नणे राव सुरथ ॥ तुज यावया काय वृत्तांत ॥ तूं कवण गा कवणाचा सुत ॥ सांगें मज ॥७॥

तंव वैश्य ह्नणे गा सुरथा ॥ मी समाधी नामें नृपनाथा ॥ धनी नाम कुळजाता ॥ सत्य जाण ॥८॥

माझें कुळसंचित घन ॥ चोरीं हरिलें गा जाण ॥ आणि त्यजूनियां स्त्रीजन ॥ गेले मज ॥९॥

तंव ह्नणे राव सुरथ ॥ हे ऋषीसि जाणवूं मात ॥ मग पुरेल मनोरथ ॥ उभयवर्गाचा ॥११०॥

यापरी तो राव सुरथ ॥ मुनीसि जाणवी आपुली मात ॥ ह्नणे जाहलों जी शरणागत ॥ समस्तां तुह्मां ॥११॥

तंव ह्नणती महामुनी ॥ सदा सुखिया आत्मज्ञानी ॥ नातरी पतंगादि मनुष्ययोनी ॥ दुःखी जाणा ॥१२॥

कष्टीं मेळविजे धन ॥ जाहलें तरी राखितां विघ्न ॥ गेलें तरी शरीरप्राण ॥ जावों पाहती ॥१३॥

येक दिवसा देखती प्राणी ॥ येक रात्रीं प्रकटलोचनी ॥ परि अहर्निशी आत्मज्ञानी ॥ देखणें जाणें ॥१४॥

तरी आतां ऐकें गा सुरथा ॥ तुह्मी आराधा मूळदेवता ॥ जे हरुंशके महाव्यथा ॥ प्रणियांची ॥१५॥

जे भुक्तिमुक्तीची महादानी ॥ शरणागतां वज्रदाइनी ॥ विघ्नव्यथा दुःखनाशिनी ॥ महामाया ॥१६॥

तिचें ऐकावें चरित्र ॥ षोडशपूजा विधिमंत्र ॥ ते निवारुंशके समग्र ॥ दुःख तुमचें ॥१७॥

ध्यान पूजन मंत्र स्तुती ॥ आणि चरित्र मूळख्याती ॥ तंव राव ह्नणे हे सांगावें मजप्रती ॥ ऋषी तुह्मीं ॥१८॥

मग रायासि ह्नणती ऋषी ॥ अष्टमी नवमी चतुर्दशी ॥ मूर्ती घ्यावी अष्टदशी ॥ बहुत साची ॥१९॥

अक्षमाळा खङ्ग चक्र ॥ कमळ बाण गदा वज्र ॥ शंख घंटा पाणिपात्र ॥ आणि कमंडलु पैं ॥१२०॥

शक्तिदंड आणि परशु ॥ मुसळ त्रिशूळ आणि पाशु ॥ चंद्राकृती अर्धाशु ॥ महाधनुष्य ॥२१॥

मुंडमाळा रक्तलोचनी ॥ करालवदनी चित्रवासिनी ॥ हे सप्तश्रृंगा सिंहासनी ॥ चंडिका पैं ॥२२॥

रक्तचामुंडा सुंदरी ॥ जे उदेलीसे द्वापारीं ॥ नंदव्रजाचिये घरीं ॥ महामाया ॥२३॥

ते चारीभुजा धारिणी जाणा ॥ रक्तवर्ण रक्तवसना ॥ भ्रुवांकेश कृष्णलोचना ॥ रक्तहार भूषणें ॥ ॥२४॥

खङ्गपात्र आणि सुशीळ ॥ अर्कवदनी करीं लांगूल ॥ अधरवोष्ठ रातोत्पल ॥ रक्तदंतिका ॥२५॥

आतां गौरी महाशक्ती ॥ अष्टभुजा सरस्वती ॥ शुद्धदंती हेमकांती ॥ चंद्रवदना ॥२६॥

कंठीं मुक्तामणि माळा ॥ प्रसन्नवदनी भक्तवत्सला ॥ कमळलोचनी मिरवे टिळा ॥ चंदनाचा ॥२७॥

बाण चक्र आणि मुसळ ॥ शंख घंटा आणि त्रिशूळ ॥ धनुष्य आणि लांगूल ॥ मिरवे तिये ॥२८॥

कल्होळिका आणि कर्कशा ॥ चारीभुजा गा तामसा ॥ नीळवर्ण नीरदा ऐशा ॥ मंडित पैं ॥२९॥

खङ्गपात्र आणि नेत्रीमुसळा ॥ नीलोत्पलदलकराळा ॥ मर्गजवदनी लांगूला ॥ आयुधें जिये ॥१३०॥

ऐसी करुनियां स्तुती ॥ धातु पाषाण अथवा क्षिती ॥ ध्यान पूजन गा भूपती ॥ करावें भावें ॥३१॥

ते आतां ऐक पां स्तुती ॥ महाबीज भुक्तिमुक्ती ॥ देवीं स्तबिलें दैत्यशांती ॥ वधालागीं ॥३२॥

मधुकैटभ महिषासुर ॥ रक्तबीज धूम्रनेत्र ॥ शुंभ निशुंभ दैत्यभार ॥ मर्दिले जे ॥३३॥

आणि चंडमुंड महावीर ॥ ऐसे वधिले गा समग्र ॥ तैं जे स्तविले बीजमंत्र ॥ ते जपें राया ॥३४॥

हे गुह्य गौप्य कथा ॥ प्रसंगें आली गा भारता ॥ तरी प्रकट करुं प्राकृता ॥ तुझेनि प्रसादें ॥३५॥

जैसें चातकांचे उदरीं ॥ उदक न माय शिंपीभरी ॥ परि तो उपकारा निरुत्तरीं ॥ इच्छी घनातें ॥३६॥

तैशी हे आदि सप्तशती ॥ गुह्यगौप्य निगमभारथी ॥ ते भाषा वचनें प्राकृती ॥ दाऊं जनासी ॥३७॥

हे कल्पतरुची कथा ॥ अर्थिक मागेल लिखितार्था ॥ त्यासी ना ह्नणेल तो नरकपाता ॥ पडेल प्राणी ॥३८॥

ओं त्रिगुणा तामसी देवी ॥ जय शक्तिके चंडिके शांभवी ॥ जय स्वर्गदुगें वैष्णवी ॥ महामाये ॥३९॥

महालक्ष्मी महाकाळी ॥ जय भीमरुपे महाबळी ॥ जय दशभुजे त्रिशूळी ॥ दशानने तूं ॥१४०॥

शामे विशाळे कमळासने ॥ जयजय माते त्रिलोचने ॥ महस्त्रिये तूं जगन्मान्ये ॥ जय चंडिके तूं ॥४१॥

गौरी सरस्वती अंबिके ॥ श्वेतानने कुलपालिके ॥ चंद्रिके कर्कशे देविके ॥ जय महेशमर्दिनी ॥४२॥

जय शाकंभरी नीलवणें ॥ जय शंखिनी उग्रलोचने ॥ उमा पार्वती व्हावें साने ॥ जय शक्ति काळिके पैं ॥४३॥

ब्रह्मभारती काळरात्री ॥ महापाणी अंधेश्वरी ॥ अरियां येक उरे धात्री ॥ जय महाधेनु पैं ॥४४॥

जय तेजोमंडलदूरदेशे ॥ जय भ्रामरी अंकुशपाशे ॥ मह वैदेही दैत्यनाशे ॥ जय देवगभें तूं ॥४५॥

शैवोक्ता कामकुमारी ॥ श्रीरुक्मा माहेश्वरी ॥ जय त्रिपुरे भयंकरी ॥ जय भैरवे पैं ॥४६॥

हें करीं गा नित्य स्तवन ॥ ध्यान ध्येय पूजा आचरण ॥ येणें हरेल गा विघ्न ॥ सुरथा तुझें ॥४७॥

आणि या समाधी नामें वैश्या ॥ उभयतां येकाचि उपदेशां ॥ हें केलिय दुःखपाशां ॥ मुकाल तुह्मी ॥४८॥

हें व्रत आचरे जो नरु ॥ त्यासी विघ्न कलहो किंकरु ॥ आणि भुक्तिमुक्ती पैलपारु ॥ पाविजे येणें ॥४९॥

ऐशी समस्त मूळकथ ॥ ऋषीनें कथिली गा भारता ॥ मग तो जाहला आचरिता ॥ सुरथ रावो ॥ ॥१५०॥

नंतरें गा सुरथ राजा ॥ मूर्ती रेखूनि अठराभुजा ॥ महिये वारुनि शेजां ॥ बैसला आपण ॥५१॥

पाहोनि नदीचें पुण्यस्थान ॥ तेथें बैसले दोघेजण ॥ करिते जाहले पूजा हवन ॥ मंत्री पैं ॥५२॥

होमद्रव्यें आज्ययुक्त सुमनीं ॥ दूर्वा समिधा नानारत्नीं ॥ मांस घालितसे कापुनी ॥ आंगींचें पैं ॥५३॥

मुखें मौन्य आणि निराहारी ॥ भूमीशयन ब्रह्मचारी ॥ तीन वरुषें दिवसरात्रीं ॥ केलें तेणें ॥५४॥

हदयीं जपतसे निजमाळा ॥ इंद्रियातें त्यजूनि सकळां ॥ ह्नणे दावीं हो माये डोळां ॥ अंबे रुप तुझें ॥५५॥

ऐसें करितां तीन संवत्सर ॥ तंव ती प्रकटली खेचर महिषमर्दिनी अठरा कर ॥ देखिली दोघीं ॥५६॥

तंव सात्विक रोमाकुंर ॥ सद्नदित जाहल कंठस्वर ॥ मग नाभीनाभी ह्नणे सुंदर ॥ अंबिका ते ॥५७॥

प्रसन्न जाहलियें रे सुरथा ॥ भक्तिभजनीं मह विख्याता ॥ तुवां धर्म दाविला समस्तां ॥ ममभक्तांसी ॥५८॥

तुझे पुरती गा मनोरथ ॥ राज्यलक्ष्मी पावशी समस्त ॥ वैरी करिशी आपुले भृत्य ॥ नरमंडळीचे ॥५९॥

पुत्र प्रजा आणि प्रधान ॥ समस्त होती तुज आधीन ॥ आणिक ऐक पां वचन ॥ सुरथा तूं ॥ ॥१६०॥

हा जाहलिय भोग पूर्णू ॥ तूं होशील सावर्णीक मनू ॥ सूर्य देवाचा नंदनू ॥ सत्य जाण ॥६१॥

आणि ह समाधीं नामें वैश्य ॥ याचे पातकाचा जाहला नाहीं नाश ॥ परी चिंता न करीं रे बहुवस ॥ तूं आतां गां ॥६२॥

तुझिये मनींचे मनोरथ ॥ पूर्ण होतील गा समस्त ॥ आणि तुजला स्त्री बहुसुत ॥ मानितील गा ॥६३॥

परि विशेषें शरदकाळीं ॥ हें व्रत घ्यावें सकळीं ॥ तरी मी विघ्न तात्काळीं ॥ हरीन त्याचें ॥६४॥

ऐसें ह्नणोनि देवता ॥ अदृश्य जाहली गा भारता ॥ मग सुरथ जाहला भोगिता ॥ राज्य आपुलें ॥६५॥

राया तो सुरथ नृपचूडामणी ॥ वैरी भंगोनि बैसला सिंहासनीं ॥ मग पुत्र आणि परिवार कामिनी ॥ भेटली समस्त ॥६६॥

तंव जन्मेजय ह्नणे जी अवधारीं ॥ सुरथा कथिलें ऋषीश्वरीं ॥ तें चरित्र गा सविस्तरीं ॥ सांगा मज ॥६७॥

ते महामाय महाशक्ती ॥ ते उदेली कैवल्य गती ॥ आणि कायकाय केली ख्याती ॥ तें सांगा मज ॥६८॥

आतां असो हे सुरथकथा ॥ मुनी सांगेल भारता ॥ तें ऐकावें सकळ श्रोतां ॥ ह्नने कृष्णयाज्ञवल्की ॥६९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ सप्तशतीआख्यानपवित्रू ॥ पंचदशाऽध्यायीं कथियेलें ॥१७०॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP