कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय ११

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि पुसे जन्मोजयो ॥ पंडूसि तरी कामाचा भेवो ॥ तरी कैसा घडला जी विपावो ॥ सुरतसंगीं ॥१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ शंका मरण नेणे पंचबाण ॥ ऋषिदेवादिकांसि मदन ॥ अजिंक जाणा ॥२॥

तिघें असतां तपोवनीं ॥ परि शाप वसे कुंतीच्या मनीं ॥ ते माद्रीसि अर्धक्षणीं ॥ न करी वेगळें ॥३॥

तंव कोणे येके अवसरीं ॥ श्रृंगार करोनियां माद्री ॥ कुंती जाहलिया दूरी ॥ गेली रायानिकट ॥४॥

तये वसंतऋतूचे काळीं ॥ पुष्पें मुहुरली वनस्थळी ॥ ते देखोनियां राजबाळी ॥ भुलला रावो ॥५॥

स्त्री असतां येकांतीं ॥ वरी श्रृंगार आणि रुपवती ॥ तेथें मुनीचीही वृत्ती ॥ न घरी वीर ॥६॥

जैसें अग्निसंगें मेण घृत ॥ कीं रवि रश्मिनीं वितुळे शीत ॥ तैसें स्त्रीस्पशें द्रवे रेत ॥ पुरुषाचें पैं ॥७॥

श्रृंगारमंडित देखोनि माद्री ॥ रायें धरिली वामकरीं ॥ ना ना ह्नणतांही सुंदरी ॥ भोगिली तेणें ॥८॥

परि काम न होतां संपूर्ण ॥ पंडूचा निघोनि गेला प्राय ॥ विकळ होवोनि अचेतन ॥ पडिला धरणीं ॥९॥

तेणें दुःखें दाटली माद्री ॥ ह्नणे कैसा कोपला त्रिपुरारी ॥ तंव धांवत आली सुंदरी ॥ कुंती माता ॥१०॥

मग लोटला दुःखसागर ॥ जाणों तनूसि झोंबला विखार ॥ तो शोक सांगतां संवत्सर ॥ न पुरे मज ॥११॥

मग पंडू सिंचिला ब्राह्मणीं ॥ कुंतीसि निरवोनी पुत्र दोनी ॥ त्यासी त्यजूनियां वन्हीं ॥ प्रवेशली माद्री ॥१२॥

ते सकळ ऋषी ब्राह्मण ॥ सिंचन करोनि विसर्जन ॥ अस्यी आणि पंडुनंदन ॥ आणिले हस्तनापुरा ॥१३॥

ऐसे दिवस भरले अकरा ॥ सवें कुंती माता सुंदरा ॥ तेणें ठावें जाहलें समग्रां ॥ कौरवातें ॥१४॥

ऐसें जाणोनियां सर्वत्र ॥ सामोरे आले भीष्म विदुर ॥ ऋषीनीं कथिला समाचार ॥ पंडुरायाचा ॥१५॥

मग कुंती आणि कुंमरा ॥ ऋषीनी निरविलें धृतराष्ट्रा ॥ आज्ञा घेवोनि गेले नगरा ॥ आपुलालिया ॥१६॥

इकडे पंडूचें उर्ध्वदैहिक ॥ भीष्में करविलें सम्यक ॥ तैं कौरवपांडव येकमेक ॥ करिती क्रीडा ॥१७॥

तंव ते गंगेचे कल्लोळी ॥ समस्त निघती जळकेली ॥ भीमें करितां कासकवळी ॥ येती कौरव ॥१८॥

भीम तो करें धरी सकळें ॥ जैशीं हस्ती कवळी कमळें ॥ तैसें बुडवी बाहुबळें ॥ कौरवांसी ॥१९॥

तेणें विपायें दुर्योधन ॥ जीवीं होय खेदक्षीण ॥ बळी जाणोनि भीमसेन ॥ करी द्वेष ॥२०॥

मग खेळतां सुरकाडी ॥ कौरव वेंघती वृक्षखोंडी ॥ परि तो द्रुम हालवोनि पाडी ॥ फळें जैशीं ॥२१॥

भूमी आदळतां दुर्योधन ॥ सकळांचाही हारवी पण ॥ ऐसा महाबळिया जाण ॥ नातुडे त्यांसी ॥२२॥

मग कौरवी समस्तीं ॥ मंत्र रचिला गा एकांतीं ॥ की विष घालोनियां शांती ॥ करुं भीमाची ॥२३॥

हा असतां भीमसेन ॥ आह्मा कैंचा राजमान ॥ ऐसें बोले दुर्योधन ॥ बंधुजनांसी ॥२४॥

मग कोणे येके अवसरीं ॥ भोजन नेलें कुरुकुमरीं ॥ गंगानदीचिये तटावरी ॥ विनोदेंसी ॥२५॥

विषें पचवोनियां अन्नें ॥ ऐसीं आणिली पक्कान्ने ॥ मग बोलाविलीं नंदनें ॥ कुंतीयेचीं ॥२६॥

सकळ बैसले भोजनपंक्ती ॥ दुर्योधन बोले तयां प्रती ॥ ग्रास घालीन आपुल्या हातीं ॥ भीमसेनासी ॥२७॥

मग तीं विषयुक्त पक्कान्नें ॥ भीमा घातलीं दुर्योधने ॥ येर सकल जेविले अन्नें ॥ सुधारससम ॥ ॥२८॥

तेणें घुमारिला भीमसेन ॥ परि कपट नेणती धर्मार्जुन ॥ मग निजेला पंडुनंदन ॥ वृकोदर तो ॥२९॥

उशीर जाहला जाणोन ॥ घरा गेले धर्मार्जुन ॥ परी गंगे राहिला दुर्योधन ॥ कौरव तो ॥३०॥

गेले जाणोनि धर्मार्जुन ॥ करें थापटिला भीमसेन ॥ तंव तो जाहला अचेतन ॥ मग तोषले समस्त ॥३१॥

तो कुंतीचा द्वितीय सुत ॥ दुष्टें घातला जळीं निद्रिस्थ ॥ मग गेला वाहत वाहत ॥ गंगाजळी ॥३२॥

तो गंगावोघ भूमंडळी ॥ भोगावती तेचि पाताळीं ॥ नागलोकासि तात्काळीं ॥ गेला भीमसेन ॥३३॥

तंव धांवोनिया समस्त ॥ दंश करिती सर्प तेथ ॥ परि इतुक्यांत जाहला सचेत ॥ भीमसेन ॥३४॥

विषें अंगीचें विष हरलें ॥ जैसें तेजें तम ग्रासिलें ॥ मग वासुकीने अमृत पाजिलें ॥ अष्टकुंडीचें ॥३५॥

तेणें नवनागसहस्त्रबळी ॥ भीम जाहला तात्काळीं ॥ मग पाठविला नागकुळी ॥ मृत्युलोकासी ॥३६॥

हे आदिपर्वीची कथा ॥ व्यासमुखींची भारता ॥ पुराणमार्गावीण श्रोता ॥ न मानी सत्य ॥ ॥३७॥

आणिक येक दुजी वार्ता ॥ कीं पद्मावतीनें वरिलें भीमप्रेता ॥ ते वासुकीची असे सुता ॥ लाधली वरु ॥ ॥३८॥

भीम जाणोनि अनिवार ॥ व्याघ्र जाहला महारुद्र ॥ मग उदरी चिरोनि वृकोदर ॥ काढिलें अमृत ॥३९॥

उदर फाडोनि अमृत काढिलें ॥ हें येकमत आहे बोलिलें ॥ परी आदिपर्वामाजी वहिलें ॥ बोलिलें नसे ॥४०॥

हे ऐकिजेती जनवार्ता ॥ ते अर्थावीण नुठली सर्वथा ॥ कीं बभ्रु पुत्र गा भारता ॥ भीमपद्मावतीसी ॥४१॥

असो इकडे भीमाची खंती ॥ शोक करीत माता कुंती ॥ शोध करितां दिनराती ॥ न लभे मार्गं ॥४२॥

मग भरतां दिवसां अठरा ॥ भीम आला स्वयें मंदिरा ॥ तो कुंती आदि समग्रां ॥ भेटला पैं ॥४३॥

भीमें समस्तां कथिलें समग्र ॥ परि कोणी बाहेर न घालिती उत्तर ॥ आणि खोंचलें मर्नी कुमर ॥ गांधारीचे ॥४४॥

ते जाणूनि पांडव दुस्तर ॥ पुढती मांडिलें क्रीडाक्षेत्र ॥ परि जाणोनि आले वेगवक्र ॥ व्यास तेथें ॥४५॥

मग सत्यवती आणि अंबिका ॥ तिसरी असे ते अंबालिका ॥ त्या व्यासें प्रबोधिल्या अनेका ॥ येकांतवचनीं ॥४६॥

ह्नणती हे गांधारीचे कुमर ॥ महाकपटी अपवित्र ॥ दुष्टक्रियेनें आपुलें स्वगोत्र ॥ वधितील जाणा ॥४७॥

हा महादुष्ट दुर्योधन ॥ यासी न साहे भीमसेन ॥ हें जाणोनि करील श्रीकृष्ण ॥ पक्षपात ॥४८॥

तो यांसी लोळवील रणीं ॥ तुह्मीं न पहावें नयनीं ॥ ह्नणोनि जावें तिघीजणीं ॥ तपसाधनासी ॥४९॥

ऐसें ऐकोनियां सुंदरा ॥ ललाटें हाणिती कराग्रां ॥ मग त्या गेल्या ना नरेंद्रा ॥ वनवासासी ॥५०॥

असो भीष्म बोले समग्रा ॥ कौरवपांडव कुमरां ॥ तुह्मी विद्याभ्यास करा ॥ कृपाचार्याजवळी ॥५१॥

हा आमुचा परात्परगुरु ॥ सकळविद्यांचा सागरु ॥ तंव पुसता जाहला नरेंदु ॥ जन्मेजयो ॥५२॥

कीं हा कृपाचार्य ब्राह्मण ॥ तो असे कोणाचा कोण ॥ मग बोलिले वैशंपायन ॥ रायाप्रती ॥५३॥

देवकन्या जाळपत्नी ॥ ते गौतमें देखिली नयनीं ॥ तेणें रेत द्रवला मुनी ॥ शरस्तंभावरीं ॥५४॥

तें लोटलें दोहीं स्थानीं ॥ ह्नणोनि बाळकें जन्मलीं दोनी ॥ कृपाचार्य आनि कृपिणी ॥ गौतमाचीं ॥५५॥

तीं शंतनूनें खेळतां व्याहाळी ॥ बाळें देखिली नेत्रकमळीं ॥ मग ती घालोनियां अंचळीं ॥ आणिली नगरा ॥५६॥

तंव ते कृपी कुमारी ॥ वयें जाहली असतां उपवरी ॥ मग ते अर्पिली नोवरी ॥ द्रोणाचार्या ॥५७॥

तिये जाहला अश्वत्थामा ॥ तो अदट सकळरायांयमा ॥ इतुक्यांत गौतम आला धामा ॥ शंतनूचिया ॥५८॥

तेणें कृपाचार्य कुमर वीरु ॥ केला देऊनि उपदेशमंत्रु ॥ सकल शस्त्रांचा विचारु ॥ कथिला तया ॥५९॥

तरी हे ऐसी गा भारता ॥ कृपाचार्याची उत्पत्तिकथा ॥ तो विद्या शिकवी समस्तां ॥ कुमरकांसी ॥६०॥

ऐसा तो कृपाचार्य असतां ॥ तेथें द्रोण आला अवचितां ॥ तोही गुरु केला कुमरां समस्तां ॥ पराक्रम पाहोनी ॥६१॥

तंव प्रश्न करी नृपनाथ ॥ द्रोण हा कवणाचा सुत ॥ आणि येथें यावया वृत्तांत ॥ काय जाहला ॥६२॥

मग सांगता होय मुनी ॥ भारद्वाज असतां वनीं ॥ तंव घृताची देखिली नग्नी ॥ रंभा स्वर्गीची ॥६३॥

तेणें ऋषी द्रवला रेत ॥ तें द्रोणीं झेलिलें पडतपडत ॥ मग घटीं घातलें सुरक्षित ॥ भारद्वाजें ॥६४॥

द्रोण जन्मला ऐशियापरी ॥ तया मेळविली कृपी नोवरी ॥ पुत्र जाहला तिचे उदरीं ॥ अश्वत्थामा ॥६५॥

तो द्रोण आणि राव दुपदू ॥ बालत्वीं होते गुरुबंधू ॥ मग द्रुपद करी अनुवाद ॥ द्रोणाचार्यातें ॥६६॥

कीं मज जाहलिया राज्यछत्र ॥ तुज अर्ध देईन निर्धार ॥ ऐसें बोलोनियां मधुर ॥ दीधली भाक ॥६७॥

मग तो कोणेयेके अवसरीं ॥ द्रुपद बैसला स्वभद्रीं ॥ तंव द्रोण आला भीतरीं ॥ आनंदेंसीं ॥६८॥

तो द्रुपदा विनवी नम्रोत्तरीं ॥ कीं मज द्यावी मुद्राचिरी ॥ जे बोलिला होतासि वक्रीं ॥ अर्धराज्याची ॥६९॥

तेणें खवळला नृपनाथ ॥ जैसा राहूवरी उमाकांत ॥ ह्नने सावध रे कीं उन्मत्त ॥ बोलसी विप्रा ॥७०॥

आणिक ह्नणे भृत्यजनां ॥ यासि अर्धचंद्राची द्यावी दक्षिणा ॥ देशाबाहेरि या ब्राह्मणा ॥ घाला वहिलें ॥७१॥

ऐसा जाणोनि अपमान ॥ क्रोधावला द्रोण ब्राह्मण ॥ जैसा कां चेतावला अग्न ॥ प्रळयकाळींचा ॥७२॥

मार्गी जातां ह्नणे द्रोण ॥ द्रुपदा आणीन जरी बांधोन ॥ तरीच मी होय ब्राह्मण ॥ सत्य मानी ॥७३॥

ऐसा धरोनियां उद्देश ॥ जो परशराम अविनाश ॥ तेथें केला विद्याभ्यास ॥ शस्त्रास्त्रांचा ॥७४॥

मग कृपासि जाणोनि सासरा ॥ द्रोण आला हस्तनापुरा ॥ तंव खेळतां देखिलें कुमरां ॥ कौरवपांडवांसी ॥७५॥

ते खेळती चेंडूफळी ॥ येकमेकां लाविती पाळी ॥ तंव चेंडू पडिला तये वेळीं ॥ कूपामाजी ॥७६॥

मग भोंवते भोंवती समस्त ॥ दोर पाश टाकिती बहुत ॥ खेदें क्षीण जाहले तेथ ॥ तंव आला द्रोण तो ॥७७॥

तयांसि कौतुकें ह्नणे द्रोण ॥ वायां करितारें हा शिण ॥ गुरुवांचोनियां प्रयत्न ॥ न चले यासी ॥७८॥

कृपाचार्य तुमचा गुरु ॥ तरी येवढां कां लाविला उशीरु ॥ हा भेदोनि कूप सत्वरु ॥ काढा बाहेरी ॥ ॥७९॥

तंव बोलिले राजकुमर ॥ कैसें भेदावें सरोवर ॥ हें दाखवाल तरी तुह्मी निर्धार ॥ गुरु आमुचे ॥८०॥

ऐकोनि सरसावला द्विजवरु ॥ हातीं घेतला कुशाग्रु ॥ चेंडू भेदोनियां सत्वरु ॥ काढिला बाहेरी ॥८१॥

मग धांवोनि समस्त कुमर ॥ भीष्मासि सांगती विचार ॥ कीं द्रोणापासाव धनुर्धर ॥ होऊं आह्मी ॥८२॥

द्रोणासि सन्मानोनि गंगासुतें ॥ नगरें दीधलीं बहुतें ॥ ह्नणे विद्या सांगावी येकचित्तें ॥ यया कुमरां ॥८३॥

द्रोण मानवला त्या उत्तरीं ॥ मग तयातें निरंतरीं ॥ विद्या सांगे शस्त्रास्त्रीं ॥ सकळियांसी ॥८४॥

भीमदुर्योधनासी गदा ॥ धर्म रथिया जाहला योद्धा ॥ पार्था लाधली धनुर्विद्या ॥ माद्रीज ते खङ्गधारी ॥८५॥

तंव कोणे येके काळ वेळीं ॥ कनकधनुषा नामें कोळी ॥ त्याचा पुत्र महाबळी ॥ एकलव्य तो ॥८६॥

तेणें ऐकोनि द्रोणाची कीर्ती ॥ भावें आला शाळेप्रती ॥ ह्नणे मी होईन विद्यार्थी ॥ स्वामी तुमचा ॥८७॥

द्रोण ह्नणेरे निषादा ॥ विद्या सांगतां उभयांसि बाधा ॥ कीं वेदकर्म वर्ण मंदा ॥ सांगों नये ॥८८॥

मग तो गेला अरण्याप्रती ॥ थोर अहंतापला चित्तीं ॥ तेथें द्रोणाची केली मूर्ती ॥ तय निषादें ॥८९॥

धूप दीप गंध सुमनें ॥ नानारसांचीं अर्पी अन्नें ॥ ब्रह्मचर्य ध्यानें नेमें ॥ ध्यास तया ॥९०॥

मग त्या मूर्तीचे अभ्यंतरीं ॥ आपण प्रवेशला श्रीहरी ॥ कीं गुरुपणातें न यावी हारी ॥ ह्नणोनियां ॥९१॥

धनुर्विद्येचा अभ्यास ॥ तया जाहला मतिप्रकाश ॥ ऐसा करी रात्रदिवस ॥ येकलव्य तो ॥९२॥

ह्नणोनि गुरु औषधी देवता ॥ भावेंचि फळती गा तत्वतां ॥ त्या वांचोनि निश्वितार्था ॥ मार्ग नाहीं ॥९३॥

असो मग कोणे ऐके अवसरीं ॥ कुमरीं ऐकिलें दूतद्वारीं ॥ की पुरुष येक वनांतरी ॥ करितो साधना ॥९४॥

ह्नणोनि तें पहावयाते ॥ द्रोण घेवोनियां सांगातें ॥ वनामाजी प्रवेशती ते ॥ राजपुत्र ॥९५॥

हिंडतां हिंडतां गिरिवन ॥ परि ठावें न पडे तें स्थान ॥ मग कुमरीं लाविले श्वान ॥ त्याचिये शोधासी ॥९६॥

तेणें गंधीवरोनि तत्काळीं ॥ देखती मूर्ति आणि कोळी ॥ तंव श्वानें दीधली आरोळी ॥ महाभुंकाची ॥९७॥

तो भुंकला जाणोनि श्वान ॥ येकलव्य करी संधान ॥ श्वानमुखीं भरिले बाण ॥ असंख्यात ॥९८॥

तेणें गुणें न निघे शब्द ॥ परि शरीरा न करीचि वध ॥ ऐसा केलासे विनोद ॥ सहज तेणें ॥९९॥

मग तें परतलें पैं श्वान ॥ भुंक भोजन राहिलें जीवन ॥ थोर होवोनि खेदक्षीण ॥ आलें कुमरांजवळीं ॥१००॥

तें देखोनि सकळ विस्मित ॥ कुमर जाहले विकळित ॥ मग निघाले मार्ग घेत ॥ त्याचिये वाटे ॥१॥

तंव तेथें देखिली समस्तीं ॥ द्रोणासारिखी पुढें मूर्ती ॥ साधन करितसे वित्पत्ती ॥ येकलव्य तो ॥२॥

तेणें आला जाणोनि द्रोण ॥ भूमी ठेविले धनुष्यबाण ॥ ह्नणे गुरुवर्या प्रसादें पूर्ण ॥ जाहलों तुमचे ॥३॥

मनीं विचारी अर्जुन ॥ कैसा कपटी हा ब्राह्मण ॥ आह्मां नेणतां विद्या परिपूर्ण ॥ केला कोळी ॥४॥

द्रोण ह्नणे गा कौळिका ॥ तूं विद्येंत जाहलासि निका ॥ तरी दक्षिणा द्यावी शिष्यका ॥ गुरुपूजेसी ॥५॥

कोळी ह्नणे जी गुरुद्रोणा ॥ मी तुमचा धर्म पुत्र जाणा ॥ मनीं आवडेल ती दक्षिणा ॥ मागा मज ॥६॥

तंव गुरु ह्नणे रे सुभटा ॥ तूं धनुर्विद्येचा कुरठा ॥ तरी दक्षिणे द्यावा आंगुठा ॥ बाणवोढीचा ॥७॥

मग कोळी ह्नने तथास्तु ॥ बाण काढिला झळाळितु ॥ आंगुठा कापूनि मनोरथू ॥ पुरवी द्रोणाचा ॥८॥

तो धनुष्य वोढी दुबोटें ॥ परी संधान न दे नेटें ॥ शीतशरासी लाविती बोटें ॥ ते अद्यापि धनुर्धर ॥९॥

मग होवोनियां हर्षित ॥ नगरा आले कुमार समस्त ॥ परी द्रोणाचे बहु आर्त ॥ अर्जुनावरी ॥११०॥

येकदा द्रुमाचे उपकंठीं ॥ जेथें पत्रांची बहुत दाटी ॥ तेथें सर्वाची चोरोनि दृष्टी ॥ द्रोणें मांडिला काष्ठगीध ॥११॥

द्रोण ह्नणे तयां समस्तां ॥ गीघ विंधूनि पाडा खालता ॥ परी तो सकळीं विलोकितां ॥ न लागे दृष्टी ॥१२॥

मग द्रोण ह्नणे गा पार्था ॥ गीधाचा छेदी पैं माथा ॥ धड राखोनियां खालता ॥ पाडीं त्वरें ॥१३॥

तें वाक्य जणोनि अर्जुनें ॥ आधीं सकळ छेदिलीं पर्णे ॥ मग शीर पाडिलें प्रथमबाणें ॥ पक्षियाचें ॥१४॥

तंव द्रोण संतोषला मनीं ॥ कीं द्रुपदासि हा जिंकील रणीं ॥ राज्य घेईन अर्धक्षणीं ॥ याचेनि बळें ॥१५॥

येकदा द्रोण जळीं निघाला ॥ तेणें मावेचा प्रपंच रचिला ॥ तंव तेथें अर्जुन पातला ॥ धनुष्यबाणेंसीं ॥१६॥

कौरव धांवती विनोदें ॥ जैसी रानींची श्वापदें ॥ परि अर्जुन देखोनि आनंदें ॥ नाचे द्रोण ॥१७॥

जो जळचरें ग्रासिला होता ॥ अर्जुनें तो सोडविला त्वरिता ॥ असो त्यावरी सभा करिता ॥ जाहला द्रोण ॥१८॥

मग कोणे येके अवसरीं ॥ सभा केली राजमंदिरीं ॥ विद्या दावावया कुमरीं ॥ घेतलीं शस्त्रें ॥१९॥

सभे अंध आणि विदुरु ॥ भीष्मा सहित परिवारु ॥ तंव आला द्रोणगुरु ॥ कुमरांसहित ॥१२०॥

मग ते आपुलालिया परी ॥ साधने दाविती कुसरी ॥ द्वंद्वयुद्ध परस्परी ॥ मांडविलें द्रोणें ॥२१॥

भीम आणि दुर्योधन ॥ गदायुद्धीं दोघे निपुण ॥ समबळ जाणोनियां द्रोण ॥ निघाला आड ॥२२॥

तंव टाळी पिटिली पंडुनंदनीं ॥ कीं भीमाची न पुरे आयनी ॥ तें दुर्योधनें जाणोनि मनीं ॥ खोंचला बहुत ॥२३॥

मग उभा केला कुमर कर्ण ॥ जाणोनि पातला अर्जुन ॥ पैजा बोलती ब्राह्मण ॥ कृपाचार्यादी ॥२४॥

कीं आपुलाले मातापितर ॥ आणि गोत्रजांचा करावा उच्चार ॥ हें केलिया वीण शस्त्र ॥ नेदी यशकीर्ती ॥ ॥२५॥

तेणें कर्ण लाजला मनीं ॥ कोण पिता कोण जननी ॥ तंव छत्र उभारी दिनमणीं ॥ कर्णावरी ते समयीं ॥२६॥

तैंसेंचि इंद्रें मेघडंबर ॥ अर्जुनावरी धरिलें छत्र ॥ तें देखतसे विचित्र ॥ दुर्योधन तो ॥२७॥

तंव दुर्योधन ह्नणे पितरां ॥ राज्य द्यावें या कर्णवीरा ॥ मग युद्ध राहाविलें निकरा ॥ जातील ह्नणोनी ॥२८॥

कौरवेश्वर ह्नणे राधासुता ॥ छत्र धरणें तुझिये माथां ॥ परी आह्मासी तुवां सर्वथा ॥ न द्यावें अंतर ॥२९॥

तें ऐकिलें परिवार प्रजें ॥ ह्नणती हें राज्य धर्मासि साजे ॥ कर्ण हें बापुडें नेणिजे ॥ कवण कवणाचें ॥१३०॥

मग दुर्योधन अंधासि ह्नणे ॥ ताता ऐंसे लोकांचे बोलणें ॥ तरी कैसियापरी करणें ॥ राज्य आह्मी ॥३१॥

तयासी ह्नणे धृतराष्ट्र ॥ हा बोल गा असे साचार ॥ पंडुरायाचा अधिकार ॥ धर्माकडेची ॥३२॥

हें ऐकोनि दुर्योधन ह्नणे ॥ तें केलिया मज नाहीं जिणें ॥ ऐसें विचारोनि अंतःकरणें ॥ जाणावें जी ॥३३॥

तंव अंध ह्नणे रे सुता ॥ यांसीं पाठवा वारुणावता ॥ तें राज्य यांसी दीधल्या व्यथा ॥ हरेल तुमची ॥३४॥

इकडे धर्मासि ह्नणे द्रोण ॥ तुमचे मनोरथ जाहले पूर्ण ॥ तरी गुरुदक्षिणो द्यावा अर्जुन ॥ पांचाळदेशावरी ॥३५॥

मग द्रुपदाचा पूर्व वृत्तांत ॥ द्रोणें पांडवां कथिला समस्त ॥ तंव धर्म दीधला पार्थ ॥ युद्धालागीं ॥३६॥

सवें घेवोनि त्या वीरेशा ॥ द्रोण पावला पांचाळदेशा ॥ द्रुपदासि धाडिला संदेशा ॥ अर्ध राज्याचा ॥३७॥

अरे द्रुपदा बोल भ्रष्टा ॥ राज्य द्यावें अर्धवांटा ॥ नातरी झुंजालागीं सुभटा ॥ होईं पुढें ॥३८॥

ऐसें ऐकोनियां द्रुपदु ॥ ह्नणे ब्राह्मणाचा कैसा मदु ॥ पर्वतासी पाहे भेदूं ॥ तृणशलाका ज्यापरी ॥३९॥

रंक रात्रीं भूमीशयना ॥ देखोनि रत्नमंचकाची रचना ॥ तैसी अविद्या ब्राह्मणा ॥ उपजली यासी ॥१४०॥

पंचाग्नि पर्जन्य आणि सितीं ॥ कीं देह दंडिजे कर्वती ॥ अथवा शिरकमळीं पशुपतीं ॥ पूजिजे जेणें ॥४१॥

नातरी नाना तपसाधनीं ॥ तोषवावा शूळपाणी ॥ तया वांचोनि सिंहासनीं ॥ कोण बैसेल ॥४२॥

परी हें अज्ञान बापुडें ॥ करुं आला मजसी पंवांडे ॥ तरी पाहूं चला कीडें ॥ सामर्थ्य त्याचें ॥४३॥

मग तो निघाला द्रुपद ॥ सकळ सैन्येंसी सन्नद्व ॥ तंव देखे वेदविद ॥ अर्जुनासहित ॥४४॥

द्रुपद ह्नणे हे दोघेजण ॥ ह्नणोनि मागें ठेविलें सैन्य ॥ कीं मज हांसतील राजेजन ॥ केलिया गजरु ॥४५॥

तंव द्रोण ह्नणे रे द्रुपदा ॥ राज्य देई मतिमंदा ॥ जरी महिमा भोगणें सर्वदा ॥ जगामाजी ॥४६॥

ऐकतां क्रोधें ह्नणे नरेंदू ॥ तूं अवध्य सकळांचा गुरु ॥ आणि हैं तो बापुडे लेकरुं ॥ न शके झुंजों ॥४७॥

तेणें वचनें कोपला अर्जुन ॥ जैसा कुंडीचा फुंकिला कृशान ॥ कीं सर्पासि लागतां चरण ॥ खवळे जैसा ॥४८॥

मग तयासी बोले पार्थ ॥ व्यर्थ बोलसी गा पुरुषार्थ ॥ आतांचि तुज धरीन जीवंत ॥ होई सरिसा ॥ ॥४९॥

धनुष्या केला टणत्कार ॥ शितीं लाविला चंद्रशर ॥ तंव युद्धा सरसावला वीर ॥ द्रुपदरावो ॥१५०॥

अर्जुनाचे सुटले शर ॥ जैसे पाताळीचे विखार ॥ तैसे भातांचे काढिले जिव्हार ॥ भेदावया ॥५१॥

अर्जुनें प्रथम तिहीं बाणीं ॥ सारथी आणि वारु दोनी ॥ द्रुपदाचे पाडिले धरणीं ॥ येकदाची ॥५२॥

तेणें द्रुपद जाहला विरथी ॥ तंव धांवला सेनापती ॥ परि तेणें पार्थे केली ख्याती ॥ पराभविलें सर्व सैन्य ॥५३॥

मग द्रुपदें केलें संधान ॥ बाणी व्यापिलें सकळ गगन ॥ परि ते अर्जुनें केले खंडण ॥ वरिचे वरी ॥५४॥

मग तया द्रुपदाचे कांबिट ॥ अर्जुनें केलें असे त्रिकुट ॥ आणि धांवोनियां निकट ॥ धरिला केशीं ॥५५॥

तो आणोनि द्रोणापाशीं ॥ द्रुपद दीधला गुरुदक्षिणेसी ॥ मग पायां पडोनि ब्राह्मणासी ॥ विनवी द्रुपद ॥५६॥

दुजें फलकट बोलती लौकिकीं ॥ कीं द्रुपद बांधिला मंचकीं ॥ तरीं हें संस्कृतीं व्यासऋषी ॥ बोलिले नाहीं ॥५७॥

प्रत्यक्षासी काय प्रमाण ॥ अर्जुनासवें होता द्रोण ॥ तरी द्रुपद कासयासी बांधोन ॥ नेईल गजपुरा ॥५८॥

असो राव ह्नणे गा द्रोणमुनी ॥ माझी अनृत फळली वाणी ॥ तरी मज अपराधिया रणीं ॥ कैंचा जय ॥५९॥

आतां आपुलें अर्ध राष्ट्र ॥ तुह्मीं भोगा जी समग्र ॥ आपण दोघे बाळमित्र ॥ असों सांगाती ॥१६०॥

मग बोले भारद्वाजसुत ॥ मज नाहीं रे राज्यस्वार्थ ॥ परि तुझा बोल होता खुपत ॥ हदयामाजी ॥६१॥

तरी आतां ऐकें गा नरेंद्रा ॥ राज्य देईन तुझे कुमरा ॥ आणि विद्या सांगेन पवित्रा ॥ त्याहीवरी ॥६२॥

परी द्रुपद संतापला निजमनीं ॥ ह्नणे प्रसन्न करीन देवमुनी ॥ पुत्र मागेन ऐसा रणीं ॥ जो जिंकील द्रोणातें ॥६३॥

इकडे द्रोण गेला हस्तनावता ॥ परी चिंता वर्तली अंधसुता ॥ कीं राज्य अर्जुनासि घेतां ॥ वेळ न लागे ॥६४॥

कौरव मिळोनि येकांतीं ॥ मंत्र रचिला समस्तीं ॥ कीं पांडव जाळावें वारुणावतीं ॥ कपटें करोनीं ॥ ॥६५॥

मग पुरोचन नामें प्रधान ॥ तयासि सांगे दुर्योधन ॥ कीं पांडवांचा घ्यावा प्राण ॥ अग्निद्दारें ॥६६॥

लाखेचें करुनि दामोदर ॥ त्यात घालावे पंडुकुमर ॥ कोणा नेणतां मंदिर ॥ लावावे तुवां ॥६७॥

तें विदुरासि जाहलें श्रुत ॥ तेणें धर्मातें कथिलें गुप्त ॥ कीं अग्निपासाव जीवित ॥ राखा आपुलें ॥६८॥

मग अंध ह्नणे पंडुसुतां ॥ तुह्मीं जावें वारुणावता ॥ सवें दीधलें पुरोहिता ॥ पुरोचनासी ॥६९॥

पांडव गेले वारुणावता ॥ पुढें काय वर्तली कथा ॥ ते ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥१७०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ वारुणावतप्रवेश प्रकारु ॥ एकादशोऽध्यायीं कथियेला ॥१७१॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP