कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनि ह्नणे गा नृपनाथा ॥ आतां अपूर्व ऐकें कथा ॥ चारी पुत्र प्रसवली कांता ॥ मदलसा ते ॥१॥

सुबाहू आणि शत्रुमर्दन ॥ शुभकीर्ती अलर्क लहान ॥ हीं नावें ठेवी विचारोन ॥ ऋतुध्वज तो ॥२॥

नामें ठेवितां मदलसा हांसे ॥ ह्नणे जी देहा नाम कैसें ॥ तिघे दवडिले उपदेशें ॥ सिद्धपंथीं ॥३॥

मग उरला पुत्र येक ॥ जयाचें नांव बोलिजे अलर्क ॥ तया सांगितले श्लोक ॥ राजधर्माचे ॥४॥

तंव राव ह्नणे वैशंपायना ॥ हें आणावें अंतः कर्णा ॥ मातेनें उपदेशिलें कवणा ॥ भव तराया ॥५॥

मग ह्नणे मुनेश्वर ॥ प्रथम सुबाहू कुमर ॥ नाम ठेवोनि ऋतुध्वजवीर ॥ गेला व्याहाळीसी ॥६॥

इकडे तया घालोनि हिंदोळा ॥ वोंव्या गात मदलसा बाळा ॥ ह्नणे अचेतनीं रे डोळा ॥ लावीं पुत्रा ॥७॥

कासया करिसी रुदन ॥ आपणेंचि आपणा केलें बंधन ॥ कीटक करी म्वभुवन ॥ कोशिके जैसें ॥८॥

येरवीं तूं नित्यमुक्त ॥ जैसा शुकनळिकेचा वृत्तांत ॥ कीं कूपीं होय पतित ॥ स्वप्नमाजी ॥९॥

जैसें जागृतीं सरे स्वप्न ॥ तेथें दुजें काय जाहलें मन ॥ नट नाटकीं दावी दर्शन ॥ प्राणियां जैसा ॥१०॥

तरी पुत्रा हें तुझे बंधन ॥ मायामोहें नाशक जाण ॥ कीं डांकसंगें कांचन ॥ वितुळे जैसें ॥११॥

तैसा तूं रे शुद्धबुद्ध ॥ पांच पंचकां जाहला संबंध ॥ तो ऐकें गा अनुवाद ॥ पुत्रराया ॥१२॥

प्रथम ब्रह्मीं माया जाण ॥ जैसें पर्वतीं उदेलें तृण ॥ तैसें तिसी फुटलें सगुण ॥ विराट जें ॥१३॥

माजी स्थिती प्रळय मध्यवास ॥ तमीं उपजलें आकाश ॥ आकाशीं जाहला पवनस्पर्श ॥ दशधा जो ॥१४॥

मग त्या पवनाचे पोटीं ॥ उदेली तेजाची पेटी ॥ तेंजी उदक आणि सृष्टी ॥ उभवणी जाली ॥१५॥

अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार ॥ हा प्रथम मायेचा उद्रार ॥ परस्परें होय विस्तार ॥ आणि नाश यासी ॥१६॥

शब्द स्पर्श रुप रस गंध ॥ हे पांचांतत्वाचे गुणभेद ॥ येकमेकां होती संबंध ॥ अनुक्रमेंसी ॥१७॥

वायु व्यान उदान कंठीं वावरे ॥ प्राणवायु हदयीं स्थिरे ॥ नार्भी समान ॥१९॥

अपानवायु गुदस्थान ॥ हे जाणावे पंच प्राण ॥ यांचे पांच उपप्राण ॥ जाहले पैं ॥२०॥

श्रोत्र त्वचा नेत्र जिव्हा घ्राण ॥ हीं ज्ञानेंद्रियें पांच जाण ॥ हें जाणावें सूक्ष्म स्थान ॥ पंचभूतांचें ॥२१॥

वाक् पाणी पाद लिंग गुद ॥ हें कर्मेद्रियांचें वृंद ॥ मन अकरावें विषयबद्ध ॥ चाळवी सकळां ॥२२॥

जागृती स्वप्न आणि निद्रा ॥ गतावृत्ती तुर्या पूत्रा ॥ या पांच अवस्था विचित्रा ॥ असती देहीं ॥२३॥

तंव जन्मेजय ह्नणे मुनी ॥ चारी अवस्था ऐकिजे कर्णी ॥ तरी गतावृत्ती हे उपलक्षणीं ॥ जाणिजे कैशी ॥२४॥

मग ऋषि बोले आपण ॥ आरसां केवीं पहावें कंकण ॥ प्रत्यक्ष दिसे तया प्रमाण ॥ कासयालागीं ॥२५॥

विषयीं वर्ते जे मती ॥ ते संसाररचनेची स्थिती ॥ परि आत्मज्ञानाची गती ॥ ते जागृती सत्य ॥२६॥

जेथें जागृती न दिसे ॥ आणि सुषुप्ती तेही न वसे ॥ ऐशिया मध्यें जे भासे ॥ ते स्वप्नावस्था ॥२७॥

जेथें स्वप्नाची होय हानी ॥ श्वासोच्छास येत मुखघ्राणीं ॥ त्या सुषुप्तिस्पर्शे होय ज्ञानी ॥ योगी जन ॥२८॥

हे सुषुप्ती जेथें विरे ॥ मग तुर्यावृत्ती संचरे ॥ पवनादिक निर्धारे ॥ नसती जेथ ॥२९॥

ते सर्वथा पैं अचेतन ॥ पंचतत्वांचें होय निरसन ॥ तिचिये स्पर्शे घडे स्थान ॥ गतावृत्तीसी ॥३०॥

मग त्या अचेतना आयती ॥ स्थूळ नेइजे अरण्याप्रती ॥ मग भूमी दाघ योजिती ॥ ज्ञातीजन ॥३१॥

कदाचित हे विवंचना करितां ॥ तंव तो चेतनु होय अवचिता ॥ मग घरा आणिजे मागुता ॥ महोत्साहें ॥३२॥

तये गतेचिये आवृंत्ती ॥ स्थूळदेहीं होय प्राप्ती ॥ ऐसी गता बोलिजे वृत्ती ॥ ते अवस्था चौथी ॥३३॥

जेथें निमाली गतावृत्ती ॥ तेथें तुयेंची सहज प्राप्ती ॥ स्थूळदेहाची होय शांती ॥ जये ठाई ॥३४॥

हे स्थूळदेहातें मुकली ॥ परी लिंगदेहा असे आथिली ॥ भोग भोगवी सूक्ष्मस्थळीं ॥ मागुती जे ॥३५॥

जेथें तुर्येचीही होय शांती ॥ ते उन्मनी महामुक्ती ॥ ह्नणोनि येरांची सांडोनि वृत्ती ॥ मिळिजे स्वरुपीं ॥३६॥

या अवधियांचा मेळा ॥ त्याचि जाणाव्या षोडशकळा ॥ हे बोलिजे मरिगळा ॥ लिंगदेहाची ॥३७॥

तत्वांचे पंधरा गुण ॥ सोळावें तें मन जाण ॥ या बोलती मुनिजन ॥ षोडश कळा ॥३८॥

पांच गुण बोलिजे धरणी ॥ चारी गुण असती जीवनीं ॥ तीन वन्ही वायूसि दोनी ॥ आकाशीं येक ॥३९॥

अथवा इंद्रियें अकरा ॥ आणि पंचगुण रे पुत्रा ॥ या विचारितां शरीरा ॥ कळा षोडशी ॥४०॥

यांसी कर्म मूळप्रधान ॥ सुखदुःखाचें देतभोजन ॥ राव रंक स्वर्ग पतन ॥ भोगवी कर्म ॥४१॥

जैं वासना घेइजे मनें ॥ तैं कर्म करी उपेणें ॥ वनीं गंधाचे उपलक्षणें ॥ विचरे पशु जैसा ॥४२॥

पाहतां तरी जीव नसे ॥ परी याचेनि योगें आभासे ॥ जैसा शकटु प्रकाशे ॥ गात्रसंगें ॥४३॥

तयाचा भंगिजे संचू ॥ मग सकळांचा होय पैसू ॥ तेव्हां शकट नामें पुरुषु ॥ कवणामाजी ॥४४॥

मागुता कर्मे होय उद्धार ॥ तरी नानावस्तुंचा साहे भार ॥ ऐसाचि आहे व्यवहार ॥ लिंगदेहाचा ॥४५॥

नातरी घटमठांचा संचु ॥ वेगळा कीजे अंशें अंशू ॥ तें घरजीवाचा आभासू ॥ कवणामाजी ॥४६॥

ह्नणती पंचविसांच मेळा ॥ तया कैंची चेष्टा लीळा ॥ तरी अंतरी जळपटळा ॥ मीन जैसा ॥४७॥

जीवा तैसा घराचा सोस ॥ वेगळा करिता तो अंश ॥ तैं घटमठाचा भास ॥ कवणामाजी ॥४८॥

नातरी मुखीं मिळे द्रव्य फळ ॥ नानावर्णी श्वेत नीळ ॥ ते विकृती होये तांबूल ॥ सुरंग जैसें ॥४९॥

अग्नी द्रव्य लोह सामुग्री ॥ प्रमाणें भरिजेती यंत्रीं ॥ मग लक्ष भेदोनियां अंबरीं ॥ होय शब्द ॥५०॥

अवयवीं आथिलें शरीर ॥ पाहता तरी वेगळे पाद कर ॥ कीं काष्ठपाषाणीं दामोदर ॥ रचिलें जैसें ॥५१॥

तयांचें करिता भिन्न ॥ मग कैंचे देहभुवन ॥ तैसा जीवा विचारिता जाण ॥ लिंगदेहो ॥५२॥

ह्नणोनि पांचापंचविसें ॥ लिंगदेह मुराले ऐसें ॥ तो जीव बोलिजे वाचे ॥ उपाधीक ॥५३॥

जळ धान्य तृण पान ॥ धेनू करी उदरपोषण ॥ ते विकृती होय शुभ्रवर्ण ॥ क्षीर जैसें ॥५४॥

जन्म मरण आणि जरा ॥ हीं तरी असती स्थूळशरीरा ॥ परी लिंगदेहाचा गाभारा ॥ न भंगे कांही ॥५५॥

हा मायेचा कर्मवट ॥ जैसा तंतु नासलिया पट ॥ होऊं न शके वरिष्ठ ॥ स्वांगपणें ॥५६॥

नातरी केळीचा रोपा ॥ चुरोनि टाकिजे सोपा ॥ तैसा जीव नाहीरे बापा ॥ येणें विचारे ॥५७॥

जैसी कां चक्राची फेरी ॥ तैसें तें कर्म अवधारी ॥ चौर्‍यायशींच्या येरझारी ॥ भोगवी जीवां ॥५८॥

जैसें घटीं संचरे आकाश ॥ तैसें तें ब्रह्म उदास ॥ अंतर्बाह्य समरस ॥ अलिप्त जें ॥५९॥

कमळकळिकेची पांकोळी ॥ बाह्य अंती पूर्ण जळीं ॥ ते पाहतां तरी कल्लोळीं ॥ न लिंपे जैसी ॥६०॥

जळीं बुडालिया घटाचा ॥ उदकस्पर्श होय आघवा ॥ तेथें बोलिजे रे बाबा ॥ जीवन जैसें ॥६१॥

तैसा तो सभराभरु ॥ नाहीं न ह्नणिजे संचारु ॥ ह्नणोनि बोलिजे विश्वंभरु ॥ येणें विचारें ॥६२॥

तो अचेतना करी चेतन ॥ जेथें पंचविसांचे गुण ॥ तें लिंगदेह होय निर्माण ॥ जीव सत्य ॥६३॥

नातरी पाहिजे आरिसां ॥ तैसा तो व्यापक अनारिसा ॥ सकळजीवांचिये सरिसा ॥ वर्ते जगीं ॥६४॥

तो साक्षी बोलिजे कूटस्थ ॥ जो भूतांहूनि अतीत ॥ असोनि नसे हा सिद्धांत ॥ ज्याचिये ठाई ॥६५॥

ह्नणोनि असों हें निर्गुण ॥ जया जन्म ना मरण ॥ छाया नाम ना दर्शन ॥ इंद्रियांसी ॥६६॥

ह्नणोनि बोलिजे तो शिव ॥ तूं तरी उपाधीक जीव ॥ पापपुण्याचा उद्भव ॥ तुझे ठायीं ॥६७॥

येक बोलिजे परमात्मा ॥ दुजा ह्नणिजे जीवात्मा ॥ हे घटमठसंगें रे व्योमां ॥ उपाधी जैसी ॥६८॥

येथें श्रुति साक्ष प्रमाण ॥ ऋगआगमीचें असे वचन ॥ तें विवंचिता व्याख्यान ॥ सांपडे सहज ॥६९॥

परी हैं विचारिता सत्य ॥ तें महानुभावाचें मत ॥ आतां युक्तीसि मिळेल युक्त ॥ तें घेईं बापा ॥७०॥

आणिक ऐके अनुवाद ॥ पुरेपणें पूर्वा होय बाध ॥ पुढें बोलिला यजुवेंद ॥ तें ऐक आता ॥७१॥

एकमेवाद्वितीयंब्रह्म ॥ हें येकचि वाक्य निःशीम ॥ ह्नणोनि लिंग तो जीव परम ॥ बोलिजे बापा ॥७२॥

येक आत्मा दुसरा परमात्मा ॥ तिजें लिंगदेह नैमिलें नित्यकर्मा ॥ आणि चौथा जीव हे भ्रांति भ्रमा ॥ न धरीं पुत्रा ॥७३॥

ऐसा मानीम लिंगदेहो ॥ जैसा सूर्योदयीचा न्यावो ॥ तरी सूर्यासि अभावो ॥ हें बोलोंनये ॥७४॥

नातरी जीव बोलिजे कैसा ॥ अरुपा रुप बोलिजे ऐसा ॥ जैसा घटमठीं आकाशा ॥ बोलिजे भेद ॥७५॥

मनोलिंग हे श्रुति सकळा ॥ ह्नणोनि जीव अभिन्न वेगळा ॥ जैसी अग्नी आणि ज्वाळा ॥ बोलिजे भेद ॥७६॥

तरी लिंगदेह हारे जीव ॥ तो भोगीतसे दुःख वैभव ॥ नानायोनींचा ठाव ॥ दाखवी कर्म ॥७७॥

शुक्रशोणिताचे समरसीं ॥ कर्मे घातलें गर्भवासी ॥ तेथे कष्ट काय ते मानसीं ॥ विचारीं पुत्रा ॥७८॥

मळ मूत्र जंतु जठरीं ॥ कप पित्त नानापरी ॥ अधोमुख ऐशा अधोरीं ॥ होतासि तूं ॥७९॥

बुजोनियां देहरंघ्रें ॥ श्वास कोंडोनि बांधिली गात्रें ॥ मग सोहं सांडोनि उत्तरें ॥ जल्पसी आन ॥८०॥

नाभिनळाचेनि संचारें ॥ गर्भी पोषण होती गात्रें ॥ माता भक्षी तें धातुमात्रें ॥ पावे तया ॥८१॥

भोंवती अग्नीची ज्वाळ ॥ वरी मळाचे कल्लोळ ॥ जंतु ग्रास करिती सकळ ॥ बाह्यातरीं ॥८२॥

मग वोढिलासि योनिरंघ्रें ॥ तेणें वोसरलीं देहगात्रें ॥ परि नवमास निराहारें ॥ होतासि पुत्रा ॥८३॥

तंव पावली क्षुधा निद्रा ॥ आधीन जाहलासी मातरां ॥ भूमीं लोळसी दिगंबरा ॥ मळामाजी ॥८४॥

काम क्रोध मद मत्सर ॥ दंभ प्रपंच लोब थोर ॥ ऐसा तृष्णेचा अवसर ॥ लेइसील आतां ॥८५॥

शतायूची जाहली गणती ॥ परी अर्ध गेली राती ॥ त्यांतूनि उरली जे गणती ॥ ते पडली वांटनीये ॥८६॥

बाळपणीची जातील बारा ॥ आणि वार्धकीं द्वादश रे पुत्रा ॥ तैशीच तारुण्यामध्यें बारा ॥ जातील आणिकें ॥८७॥

मग ग्रासालागीं भ्रमणीं ॥ बारा जाती उदरपोषणीं ॥ ऐसी आहेरे वांटणी ॥ आयुष्याची ॥८८॥

आतां उरलें तें काय किती ॥ माजी भोगिसी घरस्थिती ॥ आयुष्य जाय हातोहातीं ॥ स्वप्न जैसें ॥८९॥

पुत्र कलत्र धन शरीरा ॥ कांहीं विपरीत पावे पुत्रा ॥ तैं मरणाचिये आदरा ॥ संकोचे मन ॥९०॥

ह्नणोनि याची करीं धांवणी ॥ पाणी न येतां वळिवणीं ॥ वाट नुठितां बोळवणी ॥ घेइजे मार्गी ॥ ॥९१॥

ह्नणोनि होई सावध ॥ जंव पावला नाहीं व्याध ॥ तंव तोर्डारे भवबंध ॥ लिंगदेहाचा ॥९२॥

आतां एक पिंडोत्पत्ती ॥ जे गर्भकोशींची वित्पत्ती ॥ ते ऐक गा येकचित्तीं ॥ पुत्रराया ॥९३॥

लिंग मेघासारिसी वृष्टी ॥ धान्यद्वारें स्थूळाचे पोटीं ॥ मग ते पावे त्रिपुटी ॥ कर्मबंधें ॥९४॥

तैं शुक्रशोणिताची भेटी ॥ रचिली देहादिकांची सृष्टी ॥ सर्वबीजांची बरवंटी ॥ सर्वेचि असे ॥९५॥

मुसे आटितां कांचनरस ॥ तो अभिनव दिसे भिन्नांश ॥ परि कशीं लावितां सौरस ॥ मध्येचि असे ॥९६॥

द्विगुणभाग होय रेता ॥ माजी येकभाग मिळे शोणिता ॥ तैं पुत्र होयरे सुता ॥ सत्य जाण ॥९७॥

जरी दोनभाग मिळे शोणित ॥ येकभाग होय रेत ॥ तैं कन्या होय निश्चित ॥ कामिनीसी ॥९८॥

रक्तरेत उभयतां ॥ जरी गर्भीं मिळे समता ॥ तैं क्वीच होय तत्वता ॥ कर्मबंधें ॥९९॥

रेतरक्त न्यूनपूर्ण ॥ न्यूनीं काम करी संचरण ॥ तैं समता आणी आपण ॥ दोहीं तुकासी ॥१००॥

जरी रेता आणि रक्ता ॥ उभयां होय समता ॥ तरी तेथें पैरे मन्मथा ॥ पवाडु कैंचा ॥१॥

राव ह्नणे वैशपायना ॥ स्त्रियेसि काम अष्टगुणा ॥ परी पुरुषा अभाविकागमना ॥ निःकाम कैसी होय ॥२॥

मुनी ह्नणे गा भूपाळा ॥ स्त्री मासमासीं रजस्वला ॥ तेणें वीर्य द्रवे अबळा ॥ अन्नसंभूत ॥३॥

पयस्विनी नाडीचें रक्त ॥ जेथोनि वाहे शोणित ॥ तेणें निष्काम होय बहुत ॥ कामिनी ते ॥४॥

जैसी परद्वारी नायका ॥ तैसी प्रेंमें व्याधी पुरुषा ॥ तें वीर्य द्रवतां रतिसुखा ॥ विटती दोनी ॥५॥

उभय अधिकार असे येका ॥ येक शोणित येक लघुशंका ॥ रंघ्रें दोनी परी लौकिका ॥ येकचि भासे ॥६॥

आणि पुरुषाचे अंतरीं ॥ दोनीं रंघ्रें गा निर्धारी ॥ शुक्र आणि मूत्रपूरीं ॥ स्थाने दोनी ॥७॥

तंव जन्मेजय ह्नणे गा मुनी ॥ हें अपूर्व ऐकिलें कानीं ॥ तरी या गर्भकोशाची उभवणी ॥ सांगे मज ॥८॥

मुनि ह्नणे गा भूपाळा ॥ डाळिंबपुष्पाचा मुखकळा ॥ तैसी उदरीं मरिगळा ॥ गर्भकोशाची ॥९॥

तें मध्यभागीं मांडित मंडित कमळ ॥ मध्याभोंवतें असे जळ ॥ तें नाडीद्रवाचें मंडळ ॥ होयभंवते ॥११०॥

तो निद्रे निवटे कमळकळा ॥ परी कोश बुडतां जागे वहिला ॥ कोश बुडे तरी योनिस्थळा ॥ दुःख पावे ॥११॥

समयीं होय रजस्वला ॥ तैं विकासे गर्भकळा ॥ अर्धमास गा भूपाळा ॥ ऋतु तियेसी ॥१२॥

पुरुषांचे रतिविलासीं ॥ रेत लोटे कमळकोशीं ॥ मग संतुष्टी होय आपैसी ॥ तया कळिके ॥१३॥

जैसी पृथ्वी व्यापी वायूसी ॥ मग ते धान्य विरुढे जैसी ॥ तो योग होतां ग्रीष्मासी ॥ नेघे बीज ते ॥१४॥

तैसें गर्भा नव्हे धारण ॥ तैं कोश न करी आकुंचन ॥ तेथें मूत्रासारिसें होय पतन ॥ पुरुषबीजाचें ॥१५॥

जैं कोशाची होय संपुटी ॥ तैं गर्भ पोसे धातुपुष्टीं ॥ मग नाडी चाले उफराटी ॥ पयस्विनी ते ॥१६॥

ते नवमासांचेनि रुधिरें ॥ गर्भा विरुढती सर्व गात्रें ॥ मग बिंदुं फुटोनि ऊर्ध्वरंघ्रें ॥ चाले नाडी ॥१७॥

प्राणापानाचेनि चंचळें ॥ हदयीं भरती स्तनयुगुलें ॥ तें अशुद्धचि होय धवळे ॥ अर्भकाकारणें ॥१८॥

जाणों चंद्राचिये कळे ॥ तें अशुद्धचि होय धवळें ॥ मग स्त्रियेचेनि परिमळें ॥ होय अमृत तें ॥१९॥

तया गर्भाचें नाभिरंघ्रें ॥ पिंडपोषण होय देवसूत्रें ॥ आणि तेचि होय पोषणमात्रें ॥ प्रसूति गर्भासी ॥१२०॥

जैं हदयींचे वाहे क्षीर ॥ तैं न सरे योनिरंघ्र ॥ ऊर्ध्व लागलेंसे सूत्र ॥ पवनसंचें ॥२१॥

जैं मागुती होय गर्भइच्छा ॥ गर्भकोश वाहे मासांमासां ॥ तैं अष्ठी पडे शुद्धांशा ॥ स्तनक्षीरासी ॥ ॥२२॥

स्त्री आणि पुरुषाचे मेळीं ॥ आपणाचि रुंधे पोकळी ॥ मग पवन कोंडिल्या कमळीं ॥ होय विकास ॥२३॥

विकासल्या कमळकोश ॥ पुरुष पावे संतोष ॥ मग तो ढळे वीर्यरस ॥ योनि कोशीं ॥२४॥

जैंसे अबळे गर्भी शोणित ॥ तैसें पुरुषा मूत्ररेत ॥ दोनी कमळकोश मंडित ॥ सारिखेचि राया ॥२५॥

अन्नपाक पडे जठरीं ॥ तेणें रक्त होय अहोरात्री ॥ मग अनुक्रमें गा निर्धारी ॥ होय रक्तरेत ॥२६॥

अन्नरसाचा होय गोळा ॥ स्त्रिये बारा पुरुषा सोळा कळा ॥ नाडीस झरोनि येती तळा ॥ लिंगस्थानासी ॥२७॥

मग तो योनीचेनि स्पर्शे ॥ तेणें लिंगकोश विकासे ॥ तेव्हां संतोषोनि सुरसें ॥ द्रवे रसु ॥२८॥

जरी तो धातूच्या हीनबळा ॥ विकासला राहे कमळकळा ॥ तरी प्रमेय पडे गा भूपाळा ॥ बीज प्रेमें ॥२९॥

धातू दीजे द्रवगरळा ॥ तेणें आकोचे कमळकळा ॥ मग लिंगीं होय सांगोळा ॥ रेतासी त्या ॥१३०॥

आतां असो हे कोशकथा ॥ दोन रंध्रें उभयता ॥ मुनि ह्नणे गा भारता ॥ सारखींच जाण ॥३१॥

तंव राव ह्नणतसे हो मुनी ॥ येक स्थळ गर्भभुवनीं ॥ तेथें सम विषम चारी तिन्ही ॥ कैसेनि होती ॥ ॥३२॥

मग बोलिलें ऋषेश्वरें ॥ बीज वातास्तव वोसरे ॥ तें सरोनि दोंठायीं मुरे ॥ तये कमळीं ॥३३॥

चार भाग पितृस्थानीं ॥ आठ भाग मेळवी जननी ॥ ऐसे बाराभागांचे मिळणीं ॥ होय कन्या ॥३४॥

हेचि विपरीत होय रीती ॥ शुक्रशोणित संगती ॥ तो पुरुषलिंग गा भुपती ॥ गर्भ जाण ॥३५॥

जरी दोनीभागीं वोसरे ॥ बीजभाव गर्भी मुरे ॥ तरी साभागें दोनी परिकरें ॥ होती बालकें ॥३६॥

जरी साभाग येकीकडे ॥ आणि तीन भाग देवढे ॥ तरी गर्भी कन्या घडे ॥ तया योगें ॥३७॥

बाराभागांची वांटणी ॥ भागीं मिळती तीन तीनी ॥ तरी चारही भाग जननी ॥ बाळें प्रसवे ॥३८॥

गर्भी समभाग रेतरक्त ॥ तैं नपुंसकचि निभ्रांत ॥ द्विचा जालिया निश्वित ॥ होय कन्या ॥३९॥

हे मनुष्यदेहाची वार्ता ॥ तुज कथिली गा भारता ॥ येथें पशुपतंगाचिया गणिता ॥ काय काज ॥ ॥१४०॥

शुक्रशोणित भाग वोसरे ॥ तरी उपजतांचि मरे ॥ वांचतां तरी अंगगात्रें ॥ होती न्यूनाधिक ॥४१॥

नपुंसकाचा गर्भपिंड ॥ तो गर्भी होय दुखंड ॥ तीं क्लीबें गा वितंड ॥ कन्या आणि पुत्र ॥४२॥

सम होय शुक्रशोणिता ॥ परि आधीं द्रवतां माता ॥ ते क्लीबकन्या होय भारता ॥ कर्मबंधें ॥४३॥

ते कन्ये न होय रजोदर्शन ॥ आणि न उठती पीनस्तन ॥ ते जाणावी प्रजाविहीन ॥ निश्वयेंसीं ॥४४॥

परि वक्त्रेंविण भिन्ननाळें ॥ रस पावती वेगकाले ॥ जैसी रंभे लागती फळें ॥ गर्भभुवनीं ॥४५॥

कदाचित येक वरी असे ॥ मध्यभागीं रस आडसे ॥ जैसें सोडीगे अभ्यासें ॥ करी कर्ता ॥४६॥

येकचि मुसें वोतारा ॥ रस अर्पी चौभागारां ॥ तैसी पोशीतसे सुंदरा ॥ नाभिनाळें ॥ ॥४७॥

मग ह्नणे जन्मेजयो ॥ पशुपक्षियां नित्य न मिळे नाहो ॥ तरी त्यांतें कामउद्भवो ॥ आथिजे कैसा ॥४८॥

मुनि ह्नणे गा नृपनंदना ॥ पशुपक्षिणी आदि अंगना ॥ त्यांसी पुरुषप्रमाण अष्टगुणा ॥ नाहीं काम ॥४९॥

गर्भकाळीं होती रजस्वला ॥ तैंचि विकासे गर्भकळा ॥ ह्नणोनि येके सुरते अबळा ॥ धरिती गर्भ ॥१५०॥

मुनि ह्नणे गा भारता ॥ आतां असो हे योग्यता ॥ पूर्वील ऐकें ग्रंथकथा ॥ मदलसेची ॥५१॥

राव ह्नणे जी वैशंपायना ॥ वांझेसि फुटतसे पान्हा ॥ ते येकायेकी अंगना ॥ धरी गर्भ कैसा ॥५२॥

मुनि ह्नणे चक्रचूडामणी ॥ हा विपर्यावो ऐकें श्रवणीं ॥ तरी अंड प्रसवे पक्षिणी ॥ रिक्त जैसें ॥५३॥

स्मशानीं वाहोनि नेलें प्रेंत ॥ तया कैंचें स्त्री वित्त ॥ परी कदापि होय विपरीत ॥ चैतन्य जैसें ॥५४॥

पुत्रगर्भ दक्षिणे वसे ॥ वामकुक्षीं कन्या होतसे ॥ आणि मध्यभागीं जो असे ॥ तो नपुंसक ॥५५॥

तेथें जठराग्नीचे ज्वाळां ॥ रसबीजाचा होय गोळा ॥ अहोरात्रें त्या सलीला ॥ होय बुद्धुदत्व ॥५६॥

मग अंड होय अर्धमासें ॥ दोंपक्षी शिरोळियां ऐसें ॥ घनअर्बुद ऐसें दिसे ॥ दुजे मासीं ॥५७॥

अंकुर फुटती तीसरीं ॥ जाणों आर्द्रकाच्या कोरी ॥ मोड फुटती तैसिय परी ॥ शरीरासी ॥५८॥

अंगयुक्त आंगोळिका ॥ चेतना होय चतुर्थका ॥ पांचामासीं केश नखां ॥ आणि उपजे शोणित ॥५९॥

षड्मासीं अस्थीबळें ॥ सप्तममासीं वर्ण कळे ॥ मनेंद्रियांचें उघडे तळें ॥ तया गर्भासी ॥१६०॥

अष्टममासीं त्वचा पूर्ण ॥ गतजन्माचें करी स्मरण ॥ सोहंशब्दाचें चिंतन ॥ हदयामाजी ॥६१॥

तया गर्भा अष्टममासीं ॥ उपजलीया यम ग्रासी ॥ कीं वोज वितुळे मातृअंशीं ॥ तया गर्भाचें ॥६२॥

इंद्रियें तेजशक्ती सर्वथा ॥ ज्ञानबोध लपवी विधांता ॥ लिंगदेहस्थानींची देवता ॥ विरिंचि तो ॥६३॥

मग तो नवविये माशीं ॥ वोजशक्तीं गर्भकोशीं ॥ ज्ञान मुकोनियां सकळांशीं ॥ उपजे गर्भ ॥६४॥

गर्भगात्रां होय दाटी ॥ तेणें अपान रुंधें पोटीं ॥ मग माता होय कष्टी ॥ मासीं नवव्या ॥६५॥

तेथें अपानाचेनि आवेशें ॥ तेणें गर्भकोश विकासे ॥ येतां गर्भयंत्रीं वोवसे ॥ रुदन करी ॥६६॥

रजस्तमादि अन्न सौरस ॥ तेणें होय वर्णप्रकाश ॥ वातपित्तादि कटुरस ॥ भक्षी जननी ॥६७॥

गौरवर्ण होय वातें ॥ आणि सांवळा होय पित्तें ॥ कृष्णवर्ण तरी निश्वितें ॥ श्लेष्में होय ॥६८॥

हें ऋषिमताचें वचन ॥ जे स्थानीं दिसे त्रिवर्ण ॥ परी भिन्नता खुरासन ॥ येकरंगाचें ॥६९॥

तें बीज वातास्तव सरें ॥ ढळोनि मग दोंठायीं मुरे ॥ ते यमल रे निर्धारे ॥ होती पुत्र ॥१७०॥

पित्याची धातु ते कठीण ॥ मातेचें रक्त मृदु जाण ॥ दैवगतीचें कारण ॥ जीवनकळेसी ॥७१॥

तरी मातीचें जैसें डिखळ ॥ तैसें रचिलें देह स्थूळ ॥ आतां तें ऐकपां सकळ ॥ स्वस्थचित्तें ॥७२॥

ऐकें अवधूताचें मत ॥ जें अंतर मनुष्यदेहांत ॥ तया प्रमाण जाण हस्त ॥ येकऔट ॥७३॥

यमन अंगुळें बारा ॥ फोपस अंगुळें तेरा ॥ जीवलिंग हदयीं गाभारा ॥ अंगुळ येक ॥७४॥

सात अंगुळें स्त्रेहाळी ॥ औटअंगुळें पित्ताची खोली ॥ विडाळू बोलिजे जवळी ॥ दोन अंगुळें ॥७५॥

नवअंगुळें मूत्रकोठा ॥ मळकोठा अंगुळें दशअष्टा ॥ हें सांगितलें प्रगटा ॥ रुद्रप्रसादें ॥७६॥

मुख फाडिलें अंगुळें चारी ॥ जिव्हा अंगुळें आठ भीतरीं ॥ बत्तीस दात अधोर्ध्वपरी ॥ न्यून पूर्ण ॥७७॥

अंगुळ येक जिव्हांतर ॥ अंगूळ दीड जिव्हा वर ॥ ते जिव्हेचे मूळीं पत्र ॥ चार अंगुळें ॥७८॥

सांधे सांधले षोडश ॥ फांसोळियारे बाविस ॥ वाहात्तरसहस्त्र तुच्छ ॥ वेष्टिल्या नाडी ॥७९॥

दशोत्तरें दोनी शता ॥ सांधे सांधले विपरीता ॥ आतां चतुर्दश पैं स्थूळता ॥ ऐकें नाडी ॥१८०॥

इडा पिंगळा पयस्विनी ॥ कुहू गांधारी यशस्विनी ॥ पूषा सरस्वती शंखिनी ॥ दहावी अलंबुषा ॥८१॥

विश्वोदरा आणि सुषुम्रा ॥ हस्तिजिव्हा आणि वारुणा ॥ याचि पैं असती मुखस्थाना ॥ नाडी चतुर्दश ॥८२॥

बाहात्तर यासी केले कोठे ॥ आणि त्रयोदश दारवंठें ॥ दोन गुप्त अकरा प्रगटें ॥ महारंध्रें ॥८३॥

श्रोत्रें नेत्र घ्राणस्तन ॥ गुद लिंग नाभिभुवन ॥ ब्रह्मरंध्र आणि वदन ॥ ऐसीं अष्टपंचकें ॥ ॥८४॥

आणि जाणावीं लघुछिद्रें ॥ ओटकोटी रोमरंध्रें ॥ सप्तधांतू दहाचक्रें ॥ या शरीरीं ॥८५॥

सवाघट रुधिरस्थिती ॥ साडेतीन शतें अस्थी ॥ आठशतें पूर्ण जंतीं ॥ रचिलें देह ॥८६॥

वीस नखें उभयकमळीं ॥ औटकोटी रोमावळी ॥ अग्नी प्रज्वळे मध्यमंडळीं ॥ अहर्निशी ॥८७॥

एकवीससहस्त्र साहाशतें ॥ गणित केलें श्वासमारुतें ॥ तेथें सदा आयुष्य वेंचतें ॥ स्थूळदेहाचें ॥८८॥

आणिक ऐकें गा पुढ्ती ॥ सांधे साडेतीन असती ॥ परी हे सोळा बोलिजती ॥ स्थूळमानें ॥८९॥

येक मध्यशरीर अधर ॥ अधोर्ध्व मुख तीन पदर ॥ उभयपादादिक कर ॥ द्वादश पैं ॥१९०॥

परीं हें असे एक मत ॥ आणिक सांगों बहुत ॥ विसां आंगोळ्यां सहित ॥ चवेचाळीस ॥९१॥

उभयचरणींचे सव्विस ॥ सुषुम्नेमार्गी येकवीस ॥ उरुपृष्ठीं फांसोळिया अठ्ठाविस ॥ सप्त कंठमणी पैं ॥९२॥

उभयसुषुम्नेचे तटें ॥ बेताळीस आडफांटे ॥ आधारीं असती चार खुंटे ॥ कटिप्रदेशीं ॥९३॥

मुख ऊर्ध्वभाग हनुवटी ॥ शीरफेर आणि ललाटीं ॥ तीनी असती त्रिकुटीं ॥ ऐसे सप्त सांधे ॥९४॥

चारी हदयस्थानावरी ॥ ऐसे येकशेंशाण्णव शरीरीं ॥ आणिक आहेति अंतरीं गुप्त सांधे ॥९५॥

पश्विमपंथीचे मणी ॥ एकवीसस्वर्गाची निसणी ॥ तीन कोष्ठें येके स्थानी ॥ ब्रह्मा विष्णु महेश ॥९६॥

ब्रह्मशिखरीं त्रिकुटें ॥ तेथें असती नव कोठे ॥ पश्विममार्गे सागर फुटे ॥ तया भुवनासी ॥९७॥

पूर्वपश्विम उभय श्रोत्रें ॥ व्यानस्थान तय अंतरें ॥ नेत्रां असती दोन विवरें ॥ अक्षरयुग्मांची ॥९८॥

तयांमध्यें रसस्थान ॥ तें एकचि पैं जाण ॥ आणि रविशशी घ्राण ॥ कोठे दोनी ॥९९॥

ऐसीं स्थाने रे आठ ॥ मध्ये ते विराजे वैकुंठ ॥ जयाची नेणती वाट ॥ ब्रह्मादिक पैं ॥२००॥

तेथें सिंधू तो नीरक्षीर ॥ जो अनादि सिद्धेश्वर ॥ जयाचा न लेभे पार ॥ ब्रह्मादिकांतें ॥१॥

या बाहात्तरी कोठां ॥ तीनी सत्यवट येक मठा ॥ यात्रा करिती उपकंठा ॥ सविता शीतकर ॥२॥

ऐसें अहर्निशी करितां ॥ जप येकसहस्त्र साशतां ॥ तयापरी पुरे इयत्ता ॥ आयुष्याची ॥३॥

मग षटचक्रींचे पात्रा ॥ तो मंत्र ऐक पां पुत्रा ॥ जे अजपा पुसतसे भद्र ॥ शंकरासी ॥४॥

गुदीं आधारचक्रावरी ॥ चारी पत्रें रे निर्धारी ॥ व स ष श चौं अक्षरीं ॥ रेखिलें जाण ॥५॥

तेथें लिंग स्वाधिष्ठान ॥ तया षटपत्रें रे जाण ॥ बादिलांतरें केलें मंडण ॥ षडाक्षरांचें ॥६॥

नाभिस्थानीं मणिपूरा ॥ दहापत्रें तया चक्रा ॥ डफादीक दशाक्षरां ॥ रेखिलें तें ॥७॥

हदयस्थानीं अनाहती ॥ द्वादशपत्रें रे असती ॥ कठसहित वर्ण व्यक्ती ॥ रेखिली जाण ॥८॥

कंठस्थानीं विशुद्धचक्र ॥ तया विस्तार षोडशपत्र ॥ आदि असती सोळास्वर ॥ रेखिले तेथें ॥९॥

ललाटीं असे अग्निचक्र ॥ तें द्विदळींचे मनोहर ॥ तेथें हं क्षं हे तत्वसार ॥ रेखिले दोनी ॥२१०॥

ब्रह्मरंध्रींचें विकासलें चक्र ॥ तेथें असे सहस्त्रपत्र ॥ तें आदिस्थान ईश्वर ॥ कूटस्थाचें ॥११॥

तें अमृतमय केवळ ॥ प्रभेदीप्तीचें आदिमूळ ॥ अनुहातध्वनीचे कल्लोळ ॥ तेथें वाजती ॥१२॥

आधारीं असे कुंडलिनी ॥ जे ब्रह्मशक्ती रुद्रायणी ॥ गणेशदेवता स्वाधिष्ठानीं ॥ स्थापिलीसे ॥१३॥

मणिपूरीं दिनकर ॥ सोमदेवता सोमचक्र ॥ अनाहतीं विष्णुकुमर ॥ ब्रह्मयासी ॥१४॥

हदयोपरि मणिचक्र ॥ लक्ष्मीनारायण कंठक्षेत्र ॥ तेथें सरस्वती विशुद्धचक्र ॥ देवता जाण ॥१५॥

हदयअनुहातचक्रीं ॥ इंद्रऋषी अवधारीं ॥ महादेव वसे निर्धारीं ॥ अखंडित ॥१६॥

विशुद्धचक्र कंठस्थान ॥ तेथें अग्नि ऋषी जाण ॥ सहदैवत प्रमाण ॥ वर्ते तेथें ॥१७॥

भ्रूमध्यें अग्निचक्र ॥ हंसऋषी वसे स्वतंत्र ॥ परमात्मा देव निरंतर ॥ सर्वकाळी ॥१८॥

ललनाचक्रीं वरुण ॥ अग्निचक्रीं त्रिनयन ॥ निरंजनचक्री निरंजन ॥ अनंतासी ॥१९॥

एवं दशधा वर्णचक्रें ॥ क्रोधचिंता हास्यवक्रें ॥ बीजें उपदेशिलीं रुद्रें ॥ महांकाळीसी ॥२२०॥

या जपतां मूळमातृका ॥ तो मुकेल रे भवपातका ॥ जैसी गरुडवातें पन्नगां ॥ पडे फुटी ॥२१॥

यामाजी रे नाभिचक्रीं ॥ जीव बैसे येके पत्रीं ॥ तैं क्रोध चिंता हास्यवक्रीं ॥ प्रकाशे तेणें ॥२२॥

ह्नणोनियां राजपुत्रा ॥ त्या न भजें गा संसारा ॥ तिहीं तापांसि ज्याचा उबारा ॥ दुर्घट जाण ॥२३॥

भस्मकृमी आणि विष्ठी ॥ हें स्थूळाचे लिहिलें ललाटीं ॥ परी त्या लिंगदेहाची कंवटी ॥ न भंगे पैं ॥२४॥

याचा जाहलिया नाश ॥ कोठें कोणा न मिळें अंश ॥ कर्मगांठीचा न सांडे लेश ॥ लिंगरुप तो ॥२५॥

स्थूळ मिळेल धरणी ॥ कांहीं ग्रासील वन्ही ॥ परी लिंग जाईल सांडोनी ॥ कर्मपंथें ॥२६॥

स्थूळाचा जाहलिया नाश ॥ बीजीं मिळे अंशें अंश ॥ तरी मागुता गर्भवास ॥ भोगी कवण ॥२७॥

जैसी सर्प टाकी त्वचा ॥ कां विहंगम सांडी पिच्छा ॥ तैसा लिंगदेहाचा गाशा ॥ स्थूळचर्म हैं ॥ ॥२८॥

तरीं हें स्थूळ बापुडें ॥ त्यासी जीवनांव चढे ॥ पापपुण्याचें सांकडें ॥ लिंगदेहासी ॥२९॥

लिंगदेहाचा कोळसा ॥ जो चेतवी कर्मवासा ॥ ब्रह्माग्नीनें राख अंशा ॥ होवोनि ठाके ॥२३०॥

ब्रह्में जाणिजेतें मरण ॥ जैं पदपिंडा करी विवर्ण ॥ देहा चोरोनियां भोजन ॥ घडे जया ॥३१॥

ह्नणोनि करीं अभ्यास ॥ हदयीं न्याहाळीं आदिपुरुष ॥ मग तेणें होईल नाश ॥ लिंगदेहाचा ॥३२॥

उफराटिया अंतरदृष्टीं ॥ मुख्यगुरुत्वें लावीं दिवटी ॥ मग पापपुण्याची वनवटी ॥ होईल न्यून ॥३३॥

धान्य भाजिलिया वन्हीं ॥ तें भूमिसंगें मिळे जीवनीं ॥ परि विरुढपणाची काहणी ॥ राहिली तया ॥३४॥

तये ज्योतीचिये दृष्टीं ॥ लिंगविषयां पडे फुटी ॥ कीं नारिकेळ तुटे देठीं ॥ जाहलेपणें ॥३५॥

कां जाणोनियां पंचानंना ॥ गंधीं फुटे गजसेना ॥ नातरी उदक हरी लवणकणा ॥ मिळणीं जैसें ॥३६॥

मत्कुणांचिया रुधिरा ॥ गंधीं मावळे वज्रहिरा ॥ तैसा नासरे लिंगशरीरा ॥ ज्ञानें तेणें ॥३७॥

यद्वा उदेलिया दिनमणी ॥ तमा होय पाठवणी ॥ तैसा नाश आत्मज्ञानीं ॥ लिंगदेहासी ॥३८॥

केवळ शब्दें नाहीं सौरस ॥ साक्षात् करी रे अभ्यास ॥ नातरी कळेविण शुद्धांश ॥ आंवसे जैसा ॥३९॥

नातरी कळेचा कवटा ॥ तैसा स्थूळदेहाचा वरवंटा ॥ माजी खुरडी लिंगगोटा ॥ अभंग अमृत तें ॥२४०॥

मग ते फिटलिया गोटी ॥ नीरीं नीर सामावे घटीं ॥ तैं अद्वैताचिये पोटीं ॥ बैसिजे जाण ॥४१॥

जैसें देह पडलिया भाटीं ॥ पशुपक्षियां होय लुटी ॥ तैशी लिंगनाशीं फुटाफुटी ॥ होय सकळां ॥४२॥

वात प्राण आत्माकाश ॥ हे आदिअंतीं श्रुतिभास ॥ जीव आहे कीं नाहीं फोस ॥ तें ऐकें आतां ॥४३॥

श्रवण नेतील दिशा ॥ त्वचा मिळेल स्पर्शा ॥ नेत्र भेटतील दिनेशा ॥ रसना प्राचीनाथांसी ॥४४॥

घ्राण मिळेल मेदिनीं ॥ वाचा ग्रासील वन्ही ॥ हस्त हरील शतयज्ञी ॥ रोम वनस्पती ॥४५॥

चरण मिळती त्रिविक्रमा ॥ लिंग प्रजापती ब्रह्मा ॥ गुद जाईल निजधामा ॥ नैऋत्येचिया ॥४६॥

मन हरील चंद्रमा ॥ बुद्धी बोलावील ब्रह्मा ॥ अहंकार जाईल व्योमों ॥ चित्त हरिहर ॥४७॥

स्थूळ मिळेल धरणी ॥ पंचविसां जाहली वांटणी ॥ रक्त मिळेल जीवनीं ॥ सत्य जाण ॥४८॥

मग उरलिया शेषा ॥ तें मिळेल रे आकाशा ॥ कीं घट फुटलिया घटाकाशा ॥ जाणणें जैसें ॥४९॥

तरी येणें न्यायेरें सुता ॥ जीव नाहीं गा सर्वथा ॥ उरी उरती तरी सांगतां ॥ न करितें आळस ॥२५०॥

आतां ऐकें तत्वनाश ॥ पिंडीं ब्रह्मांडी सौरस ॥ शब्द नासे परी आकाश ॥ न सरे कांहीं ॥५१॥

ह्नणोनि आकाश नित्यमुक्त ॥ ऐसें सिद्धांसे महामत ॥ या संहाराचें पंचभूत ॥ सांगों तुज ॥५२॥

प्रळयो पावे त्रिगुणा ॥ परी नाश न लक्षवे गगना ॥ हें नासोनियां नंदना ॥ काय झालें ॥५३॥

ह्नणोनि अवकाश हा संपूर्ण ॥ परी शब्द नासे याचा गुण ॥ तो ओंकार वितळे त्रिगुण ॥ निरंजनीं ॥५४॥

मग अनुक्रमें पंचभूतीं ॥ येकमेकांसी ग्रासिती ॥ निःशब्द होय प्रळयांती ॥ तो आकाशनाश ॥५५॥

पृथ्वी विरल जीवनीं ॥ जीवना ग्रासील वन्ही ॥ वन्ही मिळेल पवनीं ॥ पवन शब्दाकाशी ॥५६॥

शब्द सामावे निरंजनीं ॥ अहंकार उपाधीची शिराणी ॥ यथाकाळीं होय मिळणी ॥ सर्वभूतीं ॥५७॥

जो प्रळय आहे ब्रह्मांडी ॥ तोचि दाऊं तुज पिंडीं ॥ त्या वांचोनियां सांकडी ॥ न फिटे तुझी ॥५८॥

आतां असो हे पुढती ॥ देह सांडिजे महत्तत्त्वीं ॥ ते देहावसानाची गती ॥ ऐक पुत्रा ॥५९॥

पृथ्वी बोलिजे घ्राणीं ॥ घ्राणरंध्रें वर्तंती दोनी ॥ गंधशक्ती नासे ते पळणी ॥ वसुंधरेची ॥२६०॥

तंव नेणें सुमनसुगंध ॥ मग नासे रसनेच्या स्वाद ॥ मधुर तिक्त आम्ल मंद ॥ नेणें सर्वद्रष्टा तो ॥६१॥

पृथ्वी विरेल जीवनीं ॥ मग रसना वितळे वन्ही ॥ तंव तो नोळखे नयनीं ॥ पुत्रादिकांतें ॥६२॥

ते नयनींची सुनीळदीप्ती ॥ तेविं संस्पर्श मारुतीं ॥ पवनाची जाय गती ॥ ऐकें आतां ॥६३॥

नाडीचे पळती मारुत ॥ आणि सर्वांगी बसे शैत्य ॥ मग आंगीं रोंवितां कोलित ॥ अचेतन तो ॥६४॥

आकाशीं सामावे प्राण ॥ तेणें हिक्कासे शब्दउदान ॥ शब्द आकाशाचा गुण ॥ सामावे अक्षरीं ॥६५॥

आणि हिक्का जरी शब्द मुरडे ॥ तैं पांचांचें उभारे दळवाडें ॥ ह्नणोनि शब्द निर्धारें घडे ॥ आकाशातें ॥६६॥

हें पंचतत्त्वांचेम गतागत ॥ ह्नणोनि अवकाश तो नित्य ॥ हे सांगितले सिद्धांत ॥ पुत्रा तुज ॥६७॥

हें नासल्या काय होणें ॥ जैंसें घटाकाशींचें नाणें ॥ तैसा शब्द नासे परि झिजणें ॥ नाहीं त्यासी ॥६८॥

आतां ऐक गा प्रवेश ॥ प्राणेद्रियांचा समावेश ॥ तो ऐक पां पंचरस ॥ पुत्रराया ॥६९॥

येकमेकां स्थितिनाश ॥ जैसा ऊर्णनाभी पसरी ग्रास ॥ कीं कूर्माचा संकोच विकास ॥ प्रकाशे जैसा ॥२७०॥

जो तरी अंतःकरणीं असे ॥ आणि तेथें मन उद्देशे ॥ बुद्धी कवणीये दिसे ॥ तो अहंकार पैं ॥७१॥

हे अंतःकरणचतुष्टयाची चेष्टा ॥ जैसा शतपत्रीं रोविजे कांटा ॥ तैसा भिन्नभाव सुभटा ॥ व्यापार याचा ॥७२॥

अहंकार विरुढे अपानीं ॥ गुदेंसी प्रवेशे गुणाचेनि संगें ॥ स्वप्नावस्था ॥७४॥

बुद्धी उदानाचे मंत्रीं ॥ चरणचक्षू करी मैत्री ॥ रुपगुण सप्रेम भीतरीं ॥ निद्रा असे ॥७५॥

मन मिळे उदानेसीं ॥ हस्तेसहित तत्त्वकुशी ॥ तेथें स्पर्शगुण प्रवेशीं ॥ गतावृत्ती असे ॥७६॥

अंतःकरण व्यानाचेष्टीं ॥ वाकश्रोत्रां करी भेटी ॥ तेथें आकाश गुणेंसी दाटी ॥ तूर्या असे ॥७७॥

प्राणअग्नीचा संकरीं ॥ ध्वनी चाले ऊर्ध्वसगरीं ॥ आकाशगुण जाण वैखरी ॥ दंतोष्ठयोंगें ॥७८॥

हा गुणइंद्रियांचा प्रवेश ॥ कीं विदेहाचा स्थितिनाश ॥ आतां ऐक पां अभ्यास ॥ योगमार्गाचा ॥७९॥

बैसोनियां पद्मासनी ॥ माजी वोढीयोगा गाढुनी ॥ चित्त लावीं पां उन्मनी ॥ तर्कमुद्रे ॥२८०॥

इडेपिंगळेचिया पवनां ॥ आणि आकुंचीं मूळअपाना ॥ नेईं सुषुम्नेचिया भुवना ॥ अनिळवन तें ॥८१॥

तेणें भरतील षट्चक्रें ॥ सर्पिणी उठेल ऊर्ध्वशिरें ॥ मग पश्विमेचिये मोहरें ॥ सुटती पाट ॥८२॥

बाहात्तरसहस्त्रांचे रस ॥ तेणें भिजती स्वर्ग येकवीस ॥ मग स्वरशतें पन्नास ॥ बुडणी जाण ॥८३॥

अग्निचक्राच्या उपकंठीं ॥ अनुहातसारणीच्या राहाटी ॥ तेथें न्हाणीं पां धूर्जटी ॥ ईश्वरातें ॥८४॥

मग ध्यान ना करणी ॥ चंद्र तारा ना तरणी ॥ ज्योती न्याहाळीं नयनीं ॥ नेत्रेंविण ॥८५॥

तेथें अमृताचे गरळे ॥ अंतरीं कामधेनू बोले ॥ मग परमानंदाचे सोहळे ॥ भोगिसी तूं ॥८६॥

जेथें अनुहात गर्जती ॥ शंख भेरी वीणे वाजती ॥ तेथें कोटिसूर्याची दीप्ती ॥ दीपेंविण ॥८७॥

भ्रमरगुंफेच्या अरुवारीं ॥ महासिंधू अनादरी ॥ आदिअवसान अंतरीं ॥ व्यापकू जो ॥८८॥

ते देखिजे आदिमूर्ती ॥ जे त्रिभुवनापरती ज्योती ॥ ते देखिलीया निर्गती ॥ होय लिंगदेहाची ॥८९॥

शरीर असो नानाव्यावृत्तीं ॥ परी चित्त राखें आत्मज्योतीं ॥ कीं देखिलेपणाची मूर्ती ॥ न लपे अभावीं ॥२९०॥

भूमीं रोवोनि वित्तविलासा ॥ प्राणी जाय दूरदेशा ॥ कीं माता स्मरे स्ववत्सा ॥ वेगळें जालिया ॥९१॥

नातरी दुडी न लावितां करु ॥ वार्ता करितां क्रमी सगरु ॥ चित्त माथां परी अनादरु ॥ दिसे जैसा ॥ ॥९२॥

कीं शेजे सूदलिया भ्रतारु ॥ मग नायका चिंती व्यभिचारु ॥ तैसा चालवोनि संसारु ॥ चिंतावा नरहरी ॥९३॥

ते चिंतिल्या आत्मज्योती ॥ लिंगदेहाची होय विभुती ॥ हे ब्रह्मविद्या कल्पांती ॥ न सरे पुत्रा ॥९४॥

जेवीं रविरश्मी नयनीं ॥ ते प्रमाण भासती भुवनीं ॥ असोनि लोपती नयनीं ॥ रचनेविण ॥९५॥

तैसी वारुनि चर्भदृष्टी ॥ गुरुमंत्रें धुवावी कोटी ॥ मग ज्ञानाची लावोनि दिवटी ॥ देखिजे निधान ॥९६॥

जरी ह्नणसी आत्मज्योती ॥ वृथा वाढविली सिद्धांती ॥ तरी गंधावांचोनि वृत्ती ॥ नुठी जाण ॥९७॥

जे शुद्ध आत्मज्योती ॥ तेचि ब्रह्मसाक्ष श्रुती ॥ तेणें भेदेल ग्रंथी ॥ लिंगदेहाची ॥९८॥

हे स्कंदपुराणींची ब्रह्मगीता ॥ तेथील साक्षी गा भारता ॥ अमराप्रती विधाता ॥ बोलिलासे ॥९९॥

ह्नणोनि अनुहातध्वनीचा नाद ॥ तो आरुषपणाचा बोध ॥ आतां असो हा अनुवाद ॥ नाथिले पणाचा ॥३००॥

हा ऐक पिपीलिका मार्ग ॥ परी हा साधितां उद्वेग ॥ महाकष्टीं पावे संयोग ॥ तया फळाचा ॥१॥

आणिक ऐक पां उपराळा ॥ पक्षी चढे अंतराळा ॥ तो कर्म सांडोनिया फळा ॥ घाली झेंप ॥२॥

आणिक येक प्लवंगम ॥ आकाश मूळ ना अनुक्रम ॥ परी फळ पाविजे हा धर्म ॥ पूर्वभाग्याचा ॥३॥

आणीक ये द्रुमाचे तळवटीं ॥ तो ध्यानस्थ अंतर्दृष्टी ॥ परमात्मा पाहोनि हदयसंपुटीं ॥ फळ पावावें ॥४॥

ह्नणोनि हें विचारी साधक ॥ फळ पावे तो होय अधिक ॥ जेथें मूढ शिष्यगुरु देख ॥ तेथें बोलों नये ॥५॥

मुनी ह्नणे गा भूपती ॥ नित्यनिश्वयो आत्मज्योती ॥ परी दृष्टातेविण प्रतीती ॥ न वाटे तुज ॥६॥

तो शिशुपाळवध भागवतीं ॥ अघासुराची आत्मज्योती ॥ परी दृष्टांतेंविण रती ॥ न वदें तुज ॥७॥

जालंधर पद्मपुराणीं ॥ त्याची ज्योती देहावसानीं ॥ ते प्राशिली शूळपाणी ॥ आत्मभावें ॥८॥

जैसें स्वरगर्भीचें व्यंजन ॥ तें निवडिती महाप्राज्ञ ॥ कीं हंस निवडिती जीवन ॥ पयगर्भीचें ॥९॥

स्फटिकगर्भीची रंगव्यक्ती ॥ ते नयन निवडी स्वस्थिती ॥ तैसी अवलोकावी आत्मज्योती ॥ नेत्रेंविण ॥३१०॥

ह्नणोनि हे खेचरी मुद्रा ॥ न्याहाळितां शून्यांतरा ॥ तेथें स्थापिती ईश्वरा ॥ ज्योतिरुपातें ॥११॥

येक द्रव्याचिया हावा ॥ सागरीं झेंपाविती नावा ॥ येका सांपडे द्रव्य ठेवा ॥ खणितां द्वारीं ॥१२॥

अथवा उफराटिया दृष्टीं ॥ अंतरीं पहावा धूर्जटी ॥ गुरुमुखें लावोनि दिवटी ॥ करावें काज ॥१३॥

अथवा येक नासिकाग्रीं ॥ तर्किती उन्मळितां नेत्रीं ॥ सोममित्राच्या योगसमरीं ॥ स्थापिती लिंग ॥१४॥

ह्नणोनि पूर्वील ठेवणी ॥ ते तया करील झगटणी ॥ तैसी तुजलागीं मी जननी ॥ जाहलें जाण ॥१५॥

ह्नणोनि न करीं विचारु ॥ कापीं यया कर्माचा दोरु ॥ मग वैराग्यरणीं शूरु ॥ होई बापा ॥१६॥

जैसा मदनाचिये बाणीं ॥ व्याघ्र गुंते रतिरमणीं ॥ मग अहंतापें छेदी झणी ॥ लिंग जैसें ॥१७॥

कोशीं कीटकाचिये जाळीं ॥ तो आपआपणा वेंटाळी ॥ ज्ञान झालिया पोकळीं ॥ होवोनि जाय ॥१८॥

पाहें पां भूचरें यापरी ॥ पांख फुटोनि जाय अंबरीं ॥ ते अळिका काय भ्रमरी ॥ जाहली दुसरी ॥१९॥

तैसें होईल आत्मज्ञानें ॥ साक्षात्कार गुरुखुणें ॥ मग तें धरोनि अंतःकरणें ॥ निघाला पुत्र ॥३२०॥

यापरी तो पुत्र सुबाहो ॥ करोनि देहाचा अभावो ॥ सांडोनिया मायामोहो ॥ गेला सिद्धपंथें ॥२१॥

कीं वन जळालिया वन्हीं ॥ तें कुरुंग न पाहे नयनीं ॥ तैसें स्थूळ जाय त्यजोनी ॥ हंस आत्मा ॥२२॥

आतां असो हें पुनरागत ॥ ऐसेचि बोधिले तीनी सुत ॥ ते होवोनियां अवधूत ॥ गेले राया ॥२३॥

मग पुत्र जो कां चतुर्थक ॥ जया नांव बोलिजे अलर्क ॥ तो मागीतला बाळक ॥ ऋतुध्वजें ॥२४॥

राव ह्नणे मदलसेसी ॥ पुत्र दवडिले उपदेशीं ॥ तरी हा उत्तीर्ण ऋणत्रयासी ॥ देई मज ॥२५॥

ते रायाची जाणोनि कीवे ॥ मदलसा ह्नणे ठेवीं नांव ॥ आणि ह्नणे जी व्योमापेव ॥ खणिजे कोणें ॥२६॥

हा आत्मा जी अभंग ॥ नामरुप ना कर्मसंग ॥ जन्म जरा मरणयोग ॥ नित्य राया ॥२७॥

जैसें सूर्याचें अस्तमान ॥ तैसें जीवा बोलिजे मरण ॥ प्राची उदेलिया किरण ॥ चेतवे जग ॥ ॥२८॥

परी हें नेधेल अंतःकरण ॥ पूर्वापरा नाहीं विलक्षण ॥ जीव कर्मिष्ठ देह घे आन ॥ परी ब्रह्मी नातळे नव्हाडी ॥२९॥

नामरुप कर्म गुणा ॥ हे स्थूळदेहासी जाण ॥ परी या गगनासि पाषाण ॥ न लगे टाकितां ॥३३०॥

जाणोनियां पतिदोष ॥ पुत्रा नांव ठेविले अलर्क ॥ मग आचारद्वीपींचा विवेक ॥ बोधिला तया ॥३१॥

श्रुतिशास्त्र नीति व्यवहार ॥ भक्ती भजन आचार ॥ आश्रममार्गीचा मंत्र ॥ कथिला तया ॥३२॥

आतां असो हे कथा ॥ आचार न सरे सांगतां ॥ वैराग्य नेटाऊनि न्यूनता ॥ पावेल सत्य ॥३३॥

हे अध्यात्मयोगाची कथा ॥ संकलित कथिली भारता ॥ नखें काय उपसितां ॥ सरिजे सिंधू ॥३४॥

हें मदलसाआख्यान ॥ जया होय श्रवणपठण ॥ तया भवपाशबंधन ॥ न बाधी कदा ॥३५॥

हे कल्पतरुची कथा ॥ अर्थिक मागे लिखितार्था ॥ तया ना ह्नणेल तो नरकपाता ॥ पडेल प्राणी ॥३६॥

आतां असो हे मदलसा माता ॥ हे मार्कडेयपुराणीची कथा ॥ ऐसेंचि दवडिलें सप्तसुतां ॥ गंगादेवीनें ॥३७॥

मग ह्नणे राव भारत ॥ गंगेनें सांगितला परमार्थ ॥ माजी काय जोडिला अर्थ ॥ तें सांगा मज ॥३८॥

असो आता ते कथा ॥ ऋषी सांगेल भारता ॥ तें ऐकावें सकळ श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥३९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ मदलसाआख्यानविस्तारु ॥ सप्तमोऽध्यायीं कथियेला ॥३४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP