श्रीगणेशाय नमः
जन्मेजय ह्नणे वैशंपायना ॥ आणिक सोळासहस्त्र अंगना ॥ त्या जोडल्या नारायणा ॥ कैशियापरी ॥१॥
मग ह्नणे मुनीश्वर ॥ भौमासुर महीचा कुमर ॥ जो प्राग्ज्योतिषपुरींचा नृपवर ॥ नरकासुरनामें ॥२॥
तो विष्णुचा अंगजात ॥ मही ह्नणे करावा हा अजित ॥ तंव विष्णु ह्नणे यासि मृत्य ॥ माझेनि हातें ॥३॥
मही ह्नणे गा शारंगधरा ॥ मज देखतां वधावें कुमरा ॥ ह्नणोनि अजित सर्वत्रां ॥ भौमासुर ॥४॥
पृथ्वी आणि वनमाळी ॥ प्रसंग घडला सायंकाळीं ॥ यास्तव भौम जाहला बळी ॥ दैत्यस्वभावी ॥५॥
तरी पृथ्वीस आहे वर ॥ कीं मज देखतां वधावा पुत्र ॥ आणि सत्यभामा अवतार ॥ महीचा पैं ॥६॥
ऐसा आहे पूर्व संकेत ॥ तंव तो उदेला महादैत्य ॥ देवां मानवां अजित ॥ नागवे कवणा ॥७॥
तेणें देवमातेची कुंडलें ॥ आणि इंद्राचें छत्र हरिलें ॥ जें पूर्वी होतें दीधलें ॥ प्रतीचीनाथें ॥८॥
तैसेंचि पृथ्वीचिया नरेंद्रां ॥ जिकोनि आणिल्या कन्या अपारा ॥ द्रव्य रथ तुरंगवरां ॥ असंख्यात ॥९॥
परी त्याचे मनींचा विचार ॥ कीं कन्या होतील सोळासहस्त्र ॥ तेव्हांच घालीन कंठीं सूत्र ॥ सकळिकांसी एकदां ॥१०॥
ऐसा तो सदा विचारी ॥ एकी दोनी चारी हरी ॥ काळ गेला याचिये परी ॥ बहुत त्याचा ॥११॥
जंव सोळासहस्त्र जाहल्या पूर्ण ॥ तंव उपजले महाविघ्र ॥ जैसें कृपण मेळवी धन ॥ अभाग्यपणेंसीं ॥ ॥१२॥
ऐशा त्या कन्या समस्ता ॥ तारुण्ये जालिया सकामता ॥ मग हदयीं चिंतिती अनंता ॥ अहर्निशी ॥१३॥
दैत्य मातला महावीर ॥ तंव द्वारके उदेला शारंगधर ॥ तें जाणोनियां सुरेश्वर ॥ आला देवांसहित ॥१४॥
इंद्र ह्नणे गा श्रीपती ॥ थोर गांजिली माता अदिती ॥ कुंडले नेलीं महादीप्ती ॥ नरकासुरें ॥१५॥
आणि माझे मस्तकींचें छत्र ॥ तें करोनि नेलें बलात्कार ॥ जें दीधलें होतें मेघडंबर ॥ प्रतीचीनाथें ॥१६॥
जरी तूं उपजलासि उपकारा ॥ तरी वधावें त्या भौमासुरा ॥ त्या वांचोनि यादवेंदा ॥ नव्हे धीर ॥१७॥
मग गरुडवाहनावरी ॥ आपण आरुढला श्रीहरी ॥ आणि अर्धांगीं घेतली सुंदरी ॥ सत्यभामा ॥१८॥
वेगां पावला प्राग्ज्योतिषपुरा ॥ जाणों रुद्र कोपला दूसरा ॥ दृष्टीं पाहतसे सैरा ॥ श्रीकृष्णदेवो ॥१९॥
सात अगड सात पौंळी ॥ लोह खांब अग्रजळीं ॥ नग्नशस्त्रें यंत्रप्रभावळी ॥ रचिली रचना ॥२०॥
ऐशा विस्तीर्ण चौफेरीं ॥ उंचमानें गगनोदरीं ॥ सैन्यप्रधान सामुग्री ॥ महा थोर ॥२१॥
देवें त्राहाटिला पांचजन्य ॥ ऐकोनि धाविन्नला प्रधान ॥ जया अंगीं साभिमान ॥ पंचमुखाचा ॥२२॥
तो उठावला महा निर्धाती ॥ मग चक्र सोडितसे श्रीपती ॥ कमळगजाचिये दृष्टांती ॥ तोडिलीं शिरें ॥२३॥
तंव त्याचे सप्त सुत ॥ महा प्रौढीचे पर्वत ॥ वेगां पावले वर्षत ॥ नानाशास्त्रीं ॥२४॥
ताभ्र अंतरिक्ष श्रवण ॥ नभ विश्वावसु अरुण ॥ आणि सातवा नभस्वान ॥ महाबाहो ॥२५॥
ते जाणोनि महावीर ॥ मग देवें सोडिले चक्र ॥ तेणें पाडिले चौफेर ॥ नगराभोवतें ॥२६॥
तंव विष्णुनामें दळपती ॥ तेणें गरुड हाणितला गदाघातीं ॥ परि नखें काढिली आंतीं ॥ गरुडें त्याचीं ॥२७॥
आणि कोप आला गोविंदा ॥ मग अभिमंत्रोनि सोडिली गदा ॥ घायें पौळी पाडोनि वसुधा ॥ केली सम ॥२८॥
मग पालाणोनि कुंजर ॥ कोपें धावला भौमासुर ॥ जैसा आमिषालागीं जळचर ॥ विसरे मरण ॥२९॥
नातरी दीपकळीचा रंग ॥ देखोनि झडप घाली पतंग ॥ किंवा द्विपघटेसि कुरंग ॥ पावे मरण ॥३०॥
त्रिशूळें हाणितलें यदुनायका ॥ जेवीं कुंजरा झडपी मक्षिका ॥ नातरी घृतबिंदूनें पावका ॥ शिंपिजे जैसा ॥ ॥३१॥
तेणें सोडिली शस्त्रास्त्रें ॥ तंव मगनीं झांकोळलीं नक्षत्रें ॥ दिवसा दाटलें आंधारें ॥ युद्धे तेणें ॥३२॥
परी श्रीकृष्णप्रताप दिनमणी ॥ शस्त्रें वारुनि ठेला रणीं ॥ तंव वाद्यें लागलीं गगनीं ॥ भयानकें ॥३३॥
मग काढिलें सुदर्शन ॥ मंत्रोनि केलें अभिवंदन ॥ ह्नणे वेगें करीं शिरच्छेदन ॥ भौमासुराचे ॥३४॥
तैं चालिलें महाचक्र ॥ जाणों काळाचें विशाळ वक्त्र ॥ भूमीं पाडिलें तेणें शिर ॥ महिसुताचें ॥३५॥
तेणें जाहला महाध्वनी ॥ देव वर्षले दिव्यसुमनीं ॥ तंव मूर्तिमंत पातली मेदिनी ॥ स्तुति करीत ॥३६॥
ह्नणे जयजयाजी श्रीपती ॥ त्वां साच केली भारती ॥ मग भौमस्त्रियेनें कृष्णाप्रती ॥ दिव्य वस्तू दीधल्या ॥३७॥
कुंडलें आणि इंद्रछत्र ॥ तिसरी वैजयंती पवित्र ॥ राजकन्या आणि भांडार ॥ दीधलें नारायणा ॥३८॥
आणि त्या ऐरावतीचे सुत ॥ चौसष्टीसंख्या चौदंत ॥ त्यावरी द्रव्य वाहोनि समस्त ॥ धाडिले द्वारके ॥३९॥
आणि सोळासहस्त्र वनिता ॥ राजकन्या अपर्णिता ॥ त्या पाठविल्या समस्ता ॥ द्वारकेसी ॥४०॥
मग कृष्णें जाबोनि इंद्रभुवना ॥ छत्र दीधलें सहस्त्रनयना ॥ कुंडलें वाहिलीं चरणां ॥ अदितीचिया ॥४१॥
तेथोनि निघाला नरकांतक ॥ येतां आणिला पारिजातक ॥ हा श्रीभागवतींचा विवेक ॥ परी हरिवंशीं अनारिसें ॥४२॥
वेगां पावला द्वारावती ॥ सोहळा मांडिला सुमुहूती ॥ सोळासहस्त्र विचित्रगतीं ॥ रचिले मंडप ॥४३॥
एकएकीसि पृथकाकारीं ॥ सोळासहस्त्र जाहला मुरारी ॥ बोहल्यावरी बैसला शेजारीं ॥ सकळिकांच्या ॥४४॥
आतां असो हें स्वयंवर ॥ आठी आगळ्या सोळासहस्त्र ॥ हें सांगितलें समग्र ॥ भारतातुज ॥४५॥
आतां वैजयंतीमाळा ॥ ते समूळ कथा ऐकें भूपाळा ॥ उद्धरोनियां शापशिळा ॥ पावली विष्णूसी ॥४६॥
तंव ह्नणे जन्मेजयो ॥ कोणें शापिला कोण ठावो ॥ हा फेडावा जी संदेहो ॥ माझे मनींचा ॥४७॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ दक्ष हा ब्रहयाचा नंदन ॥ तेणें एके काळीं त्रिनयन ॥ विरोधिला ॥४८॥
त्याची कन्या दाक्षायणी ॥ आली यागमंडपा शोभनीं ॥ तंव न पाहे विलोकुनी ॥ दक्षरावो ॥४९॥
मग ते शिवाची अंतुरी ॥ कोपें आवेशली दक्षावरी ॥ शरीर जाळिलें तये कुमरीं ॥ योगसाधनें ॥५०॥
तें नारदें जाणविलें रुद्रा ॥ कीं यागीं नाशिली हो भद्रा ॥ आणि त्राशिलें तुमच्या समग्रां ॥ नंदीगणांसी ॥५१॥
ऐसे केलें प्रजापतीं ॥ मग कोपला पशुपती ॥ जटा आसुहिली हातीं ॥ मस्तकींची ॥५२॥
परम क्रोधावला शंकर ॥ तेणें नाद उठिला गंभीर ॥ तंव उपजला वीरभद्र ॥ महाबाहो ॥५३॥
त्यासी ह्नणे महारुद्र ॥ दक्षासि वधूनि येई शीघ्र ॥ मग करोनियां नमस्कार ॥ निघाला स्वसैन्येंसीं ॥५४॥
तेथें युद्ध मांडिलें तुंबळा ॥ एक विटंबविले प्रबळ ॥ दक्षाचें जाळिलें शिरकमळ ॥ होमकुंडीं ॥५५॥
मग ते दक्षरायाची कांता ॥ जे नामें बोलिजे प्रसूता ॥ ते सहस्त्रवर्षे आरुढप्रेता ॥ धरुनि राहिली ॥५६॥
परि न चाले होमहवन ॥ रुद्रांचे राहिलें अवदान ॥ दक्षें शापिलें असे दारुण ॥ महादेवासी ॥५७॥
आणिक नाहीं यागकर्ता ॥ ह्नणोनि देवांसि पडली चिंता ॥ ह्नणती यागेंविण गा नाभिजांता ॥ पीडलों आह्मीं ॥५८॥
तरी तो दक्षप्रजापती ॥ रुंड पडिलें असे क्षितीं ॥ तें उठवोनियां यागस्थिती ॥ स्थापीं मागती ॥५९॥
मग ह्नणे चतुरानन ॥ तपीं बैसलाचे पंचानन ॥ त्या वांचोनियां यजमान ॥ कोण उठवील ॥६०॥
परी हें पुसों नारायण ॥ ह्नणोनि निघाले विष्णुभुवना ॥ हरीसि सांगती विवंचना ॥ प्रजापतीची ॥६१॥
ऐकोनि ह्नणे नारायण ॥ स्त्रीविरहें दुःखित पंचानन ॥ त्यासि हें ह्नणतांचि नयन ॥ उघडील मागुता ॥६२॥
ह्नणोनि मी नयें गा सर्वथा ॥ बहुत भीतसें जगन्नाथा ॥ हे न काढावी हो कथा ॥ प्रजापतीची ॥६३॥
तंव देवासि ह्नणे बृहस्पती ॥ तुवां यावें गा श्रीपती ॥ रुद्रा समजावोनियां शांती ॥ जाणवों आपण ॥६४॥
मग निघाले समग्र ॥ पावले मेरुचें अधोपर ॥ तंव देखिलें सिद्धसरोवर ॥ अनुपम्य पैं ॥६५॥
तें महाविस्तीर्ण विशाळ ॥ अगाध उदकें सुशीतळ ॥ कमळगर्भी अंळिकुळ ॥ आमोद घेती ॥६६॥
भोंवते सोमकांताचे अचळ ॥ नानाद्रुम आणि बकुळ ॥ हंससारिका कोकिळ ॥ करिती क्रीडा ॥६७॥
तें देखोनियां शारंगधर ॥ देवांसहित जाहला स्थिर ॥ विमानें खुंटवोनियां सुरवर ॥ न्याहाळिती शोभा ॥६८॥
त्या देखोनियां सरोवरा ॥ विस्मयो जाहला समग्रां ॥ परि उदक घ्यावया भीतरां ॥ प्रवेशला हरी ॥६९॥
तंव देखिली एक शिळा ॥ वरी कनककमळांची माळा ॥ ते अपूर्व देखोनियां गळां ॥ घातली देवें ॥७०॥
ती घेतां कमळमाळा ॥ तेणें लागलीसि करकमळा ॥ तैं उद्धरिली शापशिळा ॥ दिव्यशरीर पैं ॥७१॥
ऐसी उद्धरिली सुंदर ॥ तियेनें हरिचरणीं ठेविलें शिर ॥ तें देखोनि सुरवर ॥ विस्मित जाहले ॥७२॥
तेव्हां आला तिचा भ्रतार ॥ विजय नामें विष्णूचा दारवटंकर ॥ तेणें जाणोनियां शारंगधर ॥ गेला लोटांगणीं ॥७३॥
मग शिळेसि पुसे शारंगधर ॥ तंव ते ह्नणे मी नेणेजी विचार ॥ परि हा विजय भ्रतार ॥ होय माझा ॥७४॥
देव विनोदें बोले तीप्रती ॥ तुझें नाम वो वैजयंती ॥ कीं विजयाची पत्नी निश्विती ॥ ह्नणोनियां ॥७५॥
त्यांतें भरोनि शेंसपाट ॥ ब्रह्मा बोले शांतिपाठ ॥ मग वृत्तांत पुसे वैकुंठ ॥ नारदासी ॥७६॥
तंव ते नारदें समूळ कथा ॥ श्रुत केली देवां समस्तां ॥ ते आतां ऐकें गा भारता ॥ चित्त देवोनि ॥७७॥
पूर्वी कोणे एके अवसरीं ॥ जयविजय दारवंटेकरी ॥ त्यांचा पिता सदाचारी ॥ सुशीळ नामें ॥७८॥
तो असे महापुण्यपवित्र ॥ सदा हरिसेवेसि तत्पर ॥ शुचिकर्मे समपीं उपहार ॥ गोविंदासी ॥७९॥
ऐसा तो नित्यनेमधारी ॥ उपहार समपीं श्रीहरी ॥ तें ताट उचलोनियां अंतरीं ॥ जाय गगनपंथें ॥८०॥
नानाषड्रसपक्कान्नें ॥ विष्णूंसि समपीं एकमनें ॥ तें आरोगिजे देवें आपणें ॥ पवित्र ह्नणोनियां ॥८१॥
असो विजयाची स्त्री जयंती ॥ ते पाक करी शुचिष्मंती ॥ परि एकदा काज करितां भ्रांती ॥ पडली तयेसी ॥८२॥
अलोणि कीं जाहलें क्षारें ॥ ह्नणोनि चाखिलें जिव्हाग्रें ॥ तो नैवेद्य योजिला उपहारें ॥ षड्रसांचा ॥८३॥
तेणें समर्पिले ताट ॥ परि तें जाहलें उच्छिष्ट ॥ सुशीळें केलें नाना कष्ट ॥ परि न चढे उपहारु ॥८४॥
श्रमें जाहला खद्क्षीण ॥ ह्नणे कां आजी रुसला नारायण ॥ मनीं पाहे विचारोन ॥ तंव जाहलें उच्छिष्ट ॥८५॥
मग क्रोधाचेनि उत्तरीं ॥ रागें शापिली ते सुंदरी ॥ कीं होसील शिळ सरोवरीं ॥ भारींजडत्व ॥८६॥
माझें जन्मार्जित व्रत ॥ विष्णुसि ताट पावे नित्य ॥ तें आजि केलें अनृत ॥ दुराचारिणी तुवां ॥८७॥
ऐसी शापिली ते सती ॥ तंव विजया आली काकुळती ॥ ह्नणे कैं होईल ऊर्ध्वगती ॥ या शापाची ॥८८॥
मग ह्नणे तो मुनीश्वर ॥ इथेनें उच्छिष्टविला उपहार ॥ तरी विष्णूनें लावितां अभयंकर ॥ होईल उद्धार इयेचा ॥८९॥
भारता मग सिद्धसरोवरीं ॥ शिळा जाहली ते सुंदरी ॥ आणि विजय जाहला ब्रह्मचारी ॥ तिचेनि दुःखें ॥९०॥
मग तोही तयेचि सरोवरीं ॥ येकांगुष्ठें तप करी ॥ आराधितसे नानापरी ॥ दिनमणीतें ॥९१॥
ऐसें करितां सहस्त्रवर्षा ॥ पाताळीं श्रवण जाहलें शेषा ॥ तंव अमृतकूंडीं उमटली देखा ॥ कमळिणी एकी ॥९२॥
तिसीं लागलें कनककमळ ॥ तेणें लोपलें सूर्याचें मंडळ ॥ शेषें अर्पिलें तें फूल ॥ सूर्यनारायणा ॥९३॥
तीं अमृतकूंडींचीं कमळें ॥ ह्नणोनि अमरें सर्वकाळें ॥ परि सूर्ये टाकिली तीं फुलें ॥ विजयापुढें ॥९४॥
जाणोनि सेवेचा परिमळ ॥ वरी समर्थाचा द्वारपाळ ॥ मग उश्यापें करीतसे मेळ ॥ श्रीहरी तो ॥९५॥
पुढें उश्शापपण होणार ॥ ह्नणोनि संयोगें उठती अंकुर ॥ येरवीं अंबुज केवीं अमर ॥ उगवे जळीं ॥९६॥
असो ध्यान जाहलें विसर्जन ॥ विजयें उघडिले जंव नयन ॥ तंव पुढें देखिलें सुमन ॥ कनककांती ॥९७॥
तें विजयें घेतलें हातीं ॥ पाहे तंव महादीप्तीं ॥ मग तया उपजली खंती ॥ स्त्रियेची पैं ॥९८॥
ह्नणे आजी असती जयंती ॥ तरी श्रृंगारितों आपुले हातीं ॥ हीं कमळें ती मिरविती ॥ शिरीं आपुलिया ॥ ॥९९॥
कटकटा ते जाहली शिळा ॥ ह्नणोनि आदळी वक्षस्थळा ॥ नेत्रीं सुटल्या विरहज्वाळा ॥ महा दुःखाच्या ॥१००॥
राया स्त्रीविणें जो नरु ॥ तो पर्वतपाथरींचा तरु ॥ भूमिउदकाचा आधारु ॥ न देखे जैसा ॥१॥
स्त्रीविनें नव्हे गृहस्थ ॥ होम आणि हवनातीत ॥ भोजन मज्जनें श्रीमंत ॥ न दिसे कांहीं ॥२॥
स्त्रीविणें तरी जे संपत्ती ॥ ती स्मशानीमची विभूती ॥ पुत्रफळाची नाहीं संतती ॥ स्त्रियेविण ॥३॥
रमणीवांचोनि जें घर ॥ तें पर्णकुटीसम साचार ॥ जैसें कपाटीं असे वानर ॥ दीनवदन ॥४॥
सुखशयनीं ते सुखवी कांता ॥ अभ्यंगीं भोजनीं ममता ॥ वेळ पावलियासी सर्वथा ॥ पाठी राखें ॥५॥
भ्रतारा जोडवी अपत्य ॥ प्रसंगीं प्राण वेंची सत्य ॥ ह्नणोनि स्त्रियेवांचोनि आप्त ॥ नव्हे आणिक ॥६॥
स्त्रीविणें तरी गंधभोग ॥ ते कर्दंमसाराचे रोग ॥ ऐसा करोनियां उद्वेग ॥ उठिला विजय ॥७॥
मग घेवोनि कनककमळा ॥ सरोवरीं पत्नी पाहिली शिळा ॥ तें बांधिलें तिचिये गळां ॥ कनककमळ ॥८॥
मागुती बैसलासे घ्यानीं ॥ स्त्रीची अवस्था धरोनि मनीं ॥ नमस्कारिला दिनमणी ॥ विजयें येणें ॥९॥
ऐशी शतवर्षी एका फुला ॥ कमळिणी प्रसवे पाताळा ॥ त्याचिपद्धतीं शापशिळा ॥ पावे कमळें ॥११०॥
ऐसीं अष्टोत्तरशत कमळें ॥ एकवटलीं शापशिळे ॥ देंठगर्भीं जडोनियां सकळें ॥ जाहली माळा ॥११॥
तंव पुरली शापअवधी ॥ विष्णु आला ते संबंधीं ॥ माळ घातली स्वार्थबुद्धीं ॥ तंव लागला हात ॥१२॥
तेणें शिळेसि जाहलें उद्धरण ॥ सतीनें धरिले अच्युतचरण ॥ ह्नणे शाप जाहला जी भंजन ॥ तुझेनि देवा ॥१३॥
तो जाणोनियां कार्यार्थ ॥ मग मुरडिला श्रीअनंत ॥ आतां असो हा वृत्तांत ॥ दक्षकथेचा ॥१४॥
ऐसी उद्धरिली शापशिळा ॥ आणि वैजयंती जोडली गोपाळा ॥ ते नारायणें घातली गळा ॥ अमरकमळांची ॥१५॥
विजय आणि जयंती ॥ यांपासाव जाहली उप्तत्ती ॥ ह्नणोनि नाम ठेविलें श्रीपती ॥ वैजयंती ऐसें ॥१६॥
तरी ऐसी हे भारता ॥ वैजयंती जोडली अनंता ॥ हे पद्मपुराणींची कथा ॥ सांगितली तुज ॥१७॥
परि आनरिसें भागवतीं ॥ कीं पृथ्वीनें दीधली वैजयंती ॥ दैत्य वधिला जैं श्रीपती ॥ भौमासुर तो ॥१८॥
आतां असो हे वैजयंती ॥ सुदर्शन पावला श्रीपती ॥ तें ऐकावें सकळ श्रोतीं ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥१९॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ वैजयंतीभौमासुर प्रकारु ॥ द्वादशोऽध्यायीं सांगितला ॥१२०॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥