कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय ११

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

वैशंपायनासि पुसे भूपती ॥ कृष्णें जावोनि इंद्रप्रस्थीं ॥ कैसी आणिली युवती ॥ कालिंदी ते ॥१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ सूर्य हा कश्यपाचा नंदन ॥ त्याची कन्या कामबाण ॥ कालिंदी नामें ॥२॥

ते सौंदर्यसिंधूची लहरी ॥ वयें जाहली उपवरी ॥ सूर्ये योजिला श्रीहरी ॥ प्राणेश्वर तयेसी ॥३॥

तंव ते यमुनेचिये तटीं ॥ तप मांडित येकांगुष्ठीं ॥ दुसरा न लावी सृष्टी ॥ दक्षिणचरण ॥४॥

अनशनी आणि मौनमुखा ॥ वायुभक्षणीं नेघे उदका ॥ हदयीं चिंतितसे टिळका ॥ यादवकुळींच्या ॥५॥

तंव तें जाणवलें श्रीपती ॥ ह्नणोनि आला इंद्रप्रस्थीं ॥ तो ऐकावा वृत्तांत भूपती ॥ आतां तुवां ॥६॥

पांचोळी वर्णिली पांडवीं ॥ मग त्यां इंद्रप्रस्थ दीधलें कौरवीं ॥ तेथें भेटावय स्वभावीं ॥ आला कृष्ण ॥७॥

पांडव वांचले जोहरीं ॥ पर्णिली द्रौपदी सुंदरी ॥ ह्नणोनि आला श्रीहरीं ॥ त्यानिमित्तें ॥८॥

येवोनि भेटला समस्तां ॥ परि कालिंदीची मनीं अवस्था ॥ ह्नणोनि बोलाविलें पार्था ॥ पारधीसी ॥९॥

वेगां सज्जोनियां रथ ॥ वरी बैसले श्रीकृष्णपार्थ ॥ मग आले खेळतखेळत ॥ यमुनावनासी ॥१०॥

कृष्ण ह्नणे गा अर्जुना ॥ कंठ शोषतसे तहाना ॥ तरी आणीं पां जीवना ॥ यमुनेचिया ॥११॥

अर्जुन भरों गेला उदका ॥ तंव तेथें देखिली कुमारिका ॥ जाणों सौभाग्यअंबिका ॥ घडीत होती ॥१२॥

तयेसि पुसिले अर्जुनें ॥ तूं कोण वो मृगनयने ॥ देह दमितेसि तारुण्यें ॥ कासयालागीं ॥१३॥

ऐकतां ह्नणे कालिंदी ॥ मी सूर्यदेवाची कुमरी ॥ मनीं इच्छितसें श्रीहरी ॥ प्राणेश्वर ॥१४॥

भारता मग तो पंडुकुमर ॥ उदक घेवोनि आला शीघ्र ॥ सर्व सांगितला विचार ॥ कामिनीचा ॥१५॥

तें जाणोनियां श्रीहरी ॥ आला यमुनेचिये तीरीं ॥ आणि दाविलें समोरीं ॥ रुप तयेसी ॥१६॥

शंख चक्र पीतवसन ॥ गदा पद्म श्रीवत्सलांछन ॥ आयुधेंसीं गरुडवाहन ॥ देखिला डोळां ॥१७॥

जंव कलिंदी पाहे दृष्टीं ॥ तंव उठिले रोमाच कुचतटीं ॥ मग नमस्कारिला जगजेठी ॥ नारायण ॥१८॥

कृष्णें केले पाणिग्रहण ॥ लाविलेंसे गांधर्वलग्न ॥ तेथें अर्जुन करी उच्चारण ॥ मंत्रबीजें ॥१९॥

मग ते धरोनियां करीं ॥ रथीं वाहिली सुंदरी ॥ जाणों शंभुअंकीं गौरी ॥ लावण्यकलिका ॥२०॥

ऐसी घेवोनिया कांता ॥ कृष्ण आला इंद्रप्रस्था ॥ परि कुंतीचिये आर्ता ॥ राहिला तेथें ॥२१॥

राया ऐसी ते कालिंदी ॥ तये प्राप्त जाहला श्रीहरी ॥ मग जाळिलें मुरारी ॥ खांडववन ॥२२॥

तंव ह्नणे राजा भारत ॥ खांडववनींचा वृत्तांत ॥ तो मज सांगावा समस्त ॥ सविस्तारीं ॥२३॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ श्वेतकेतु रायें केला यज्ञ ॥ षष्टिसंवत्सर कृशानं ॥ होमिला कुंडीं ॥२४॥

एक संवत्सरें पूर्णाहुती ॥ मुसळधाराप्रमाण घृतीं ॥ हवन केलें महाशांती ॥ इक्ष्वाकुनंदनें ॥२५॥

तेणें संतोषला गार्हपंती ॥ परी मंद जाहली दीप्ती ॥ ह्नणोनि गेला काकुळती ॥ अश्विनौदेवा ॥२६॥

तया सांगितलें स्ववैंद्यीं ॥ कीं खांडववनीं आहेति औषधी ॥ त्या भक्षिलिया निःशेष व्याधी ॥ जाईल तुझी ॥२७॥

मग त्या खांडववनाप्रती ॥ आपण प्रवेशला गार्हपती ॥ तंव धांवलासे सुरपती ॥ वेगवत्तर ॥२८॥

तेणें मेघां करविली वृष्टी ॥ अग्नि निवारिला उठाउठीं ॥ तेणें होवोनियां हिंपुटी ॥ धांवला अग्नी ॥२९॥

निवारणार्थ प्राथिलें बहुतां ॥ परी ते शंकती सुरनाथा ॥ आणि अग्नि कष्टला व्यथा ॥ पावतसे बहुकाळ ॥३०॥

भारता ऐसा तो कृशान ॥ व्याधींनें पीडला संपूर्ण ॥ मग होवोनियां ब्राह्मण ॥ आला इंद्रप्रस्थातें ॥३१॥

पुढां विशाळोदर थोर ॥ हस्तपाद अणुमात्र ॥ ऐसा देखिला पवित्र विप्र नारायणें ॥३२॥

त्यासि विस्मयें ह्नणे गोविंद ॥ तूं कोण गा वेदविद ॥ तंव तो ह्नणे मी प्रसिद्ध ॥ यज्ञपुरुष ॥३३॥

माझा ऐकावा एक प्रश्न ॥ श्वेतकेतु रायें केला यज्ञ ॥ तैं घृत वर्षला जेवीं घन ॥ मुसळधारी ॥३४॥

ऐसी जाहली पूर्णाहुती ॥ भारी तृप्तलों जी घृतीं ॥ परि तेणें नासली शक्ती ॥ ममतेजाची ॥३५॥

ह्नणोनि जाहलों संकीर्ण ॥ बहुतां गेलों मी शरण ॥ परि ऐकोनि सर्व वर्तमान ॥ न मानिती कोणी ॥३६॥

श्वेतकेतु राव सूर्यवंशी ॥ तेणें केलीगा मोडसी ॥ आतां ब्रहयाने धाडिलें तुजपाशी ॥ याचिबुद्धीं ॥३७॥

तरी खांडववनीं सर्व औषधी ॥ त्या भक्षिल्या हरेल व्याधी ॥ हें सांगितलेंसे वैद्यीं ॥ अश्विनौदेवीं ॥३८॥

मग कृष्ण ह्नणे गा अर्जुना ॥ तुवं जावें खांडववना ॥ तृप्ति करीं हुताशना ॥ बाहुबळेंसीं ॥ ॥३९॥

तंव श्रीकृष्णासि ह्नणे पार्थ ॥ तेथें धांवोनि येईल सुरनाथ ॥ तरी तुजविणें गा अनर्थ ॥ टाळील कवण ॥४०॥

कृष्ण ह्नणे गा कृशाना ॥ रथ शस्त्रें नाहींत दोघांजणां ॥ त्यावांचोनि खांडववना ॥ जाळवे केवीं ॥४१॥

भारता मग तो गार्हपती ॥ वरुणावतीं आला शीघ्रगती ॥ सोमें ठेविलेंसे प्रळ्यांतीं ॥ तें रुद्रास्त्र पैं ॥४२॥

तैसेचि वज्रनाभचक्र गदा ॥ हीं दीधलीं गोविंदा ॥ तंव अर्जुनासि उठली मेघा ॥ दिव्यास्त्रांची ॥४३॥

तें जाणोनि अग्नीनें रथ ॥ श्वेतवारुवां समवेत ॥ ध्वजस्तंभीं हनुमंत ॥ असे जयासी ॥४४॥

गांडीव धनुष्य अक्षयभाते ॥ हीं दीधलीं फाल्गुनातें ॥ मग ते जाहले निघते ॥ खांडववना ॥४५॥

बैसोनियां दिव्य रथीं ॥ तिघे निघाले उत्तरपंथीं ॥ तैं मेरुचे अंतर्गतीं ॥ देखिलें वन ॥४६॥

तिघे निघाले त्यावनीं ॥ नरनारायण देहुंडे दोनी ॥ श्वापदें निघती तीं विंधोनी ॥ पाडिती भीतरीं ॥४७॥

असंभाव्य पेटला वन्ही ॥ ज्वाळा लागल्या दिसती गगनीं ॥ काढा घेतसे वाटोनी ॥ दिव्यौषधींचा ॥४८॥

द्रुमपाणी जीवजंत ॥ येणें त्रिकुटें फेडिलें शैत्य ॥ काढोनियां जिव्हा सात ॥ रसायण घेतसे ॥४९॥

अग्नीनें तापलें सरोवर ॥ तेणें उकडती मीन मगर ॥ पशु पक्षी आणि तरुवर ॥ समग्र जळती ॥ ॥५०॥

तेथें तक्षकाचें निजस्थान ॥ शतयोजनें विस्तीर्ण वन ॥ तें दहन होईल ह्नणोन ॥ पावला इंद्र ॥५१॥

परि तक्षक गेला कुरुक्षेत्रा ॥ हें श्रुत नाहीं सुरेश्वरा ॥ मग बोलाविलें जलधरां ॥ वृष्टिलागीं ॥५२॥

तया तक्षकाचा सुत ॥ अश्वधनु नामें धुंधुवात ॥ त्यासि मांडिला आकांत ॥ वनामाजी ॥५३॥

मातेने तो घेवोनि उदरीं ॥ उडों निघाली बाहेरी ॥ तंव पुच्छ छेदिलें वरच्यावरी ॥ अर्जुनें तियेचें ॥५४॥

इंद्रें सोडितां विजावारा ॥ सर्प गेला कुरुक्षेत्रा ॥ मागुती मेघें सोडिलिया धारा ॥ वनावरी ॥५५॥

परि तो धनुर्धरशिरोमणी ॥ गगन व्यापितसे अक्षयबाणीं ॥ तेणें उदका जाहली सांडणी ॥ क्षणामाजी ॥५६॥

तंव मंदराचळाचें शिखर ॥ तें इंद्रें टाकिलें महाथोर ॥ परि बाणीं केलें शतचूर ॥ पंडुनंदनें ॥५७॥

तंव पावले परिवार ॥ गणगंधर्व आणि रुद्र ॥ यक्षराक्षस महाभार ॥ दिक्पतींचे ॥ ॥५८॥

मग मांडलें महातुंबळ ॥ तो एकला ते सकळ ॥ परी रणीं पळविलें देवकुळ ॥ त्या अर्जुनें ॥५९॥

तंव वाचा जाहली अंतरीं ॥ कीं तक्षक गेला कुरुक्षेत्री ॥ ह्नणोनि राहिली झुंजारी ॥ उभयवर्गाची ॥६०॥

पार्थे निवारिला सुरपती ॥ मग अग्नि घेतसे आहुती ॥ तंव बोभाइला काकुळती ॥ महादैत्य ॥६१॥

तो करीतसे महाशोक ॥ मयासुर दैत्य शिल्पिक ॥ ह्नणे अर्जुना तूं पुण्यश्लोक ॥ राख राख मज ॥६२॥

आणि विनवितसे कृष्णा ॥ राखें देवा माझिये प्राणां ॥ मी उत्तीर्ण होईन जाणा ॥ आपुलिया विद्येनें ॥६३॥

मग त्या पंडूच्या वल्लभा ॥ मयें दीधली मयसभा ॥ जये जळीं स्थळीं आणि नभा ॥ नसे उपमा ॥६४॥

आणि सारंग नामें पक्षिवर ॥ ते चारी वांचले सहोदर ॥ येर जाळिलें समग्र ॥ खांडववनीचें ॥६५॥

तंव ह्नणे पारिक्षिती ॥ सारंग वांचाया काय गती ॥ मग सांगे जन्मेजयाप्रती ॥ वैशंपायन ॥६६॥

कीं मंदपाळ नामें ऋषीश्वर ॥ महातापासी पुण्यपवित्र ॥ तो ऊर्ध्वरेता दिगंबर ॥ होता इंद्रियजित ॥६७॥

तो निवर्तलिया धर्मिष्ठ ॥ पितृलोकीं जाहला प्रविष्ट ॥ परी वरुता न चढवे घाट ॥ ब्रह्मलोकींचा ॥६८॥

मग तो पुसे पितृगणां ॥ मज कां न जाववे ब्रह्मभुवना ॥ तंव ते ह्नणती धर्मसाधना ॥ नाहीं तुज ॥६९॥

तूं जाहलासी ऊर्ध्वरेती ॥ परि उजविल्या नाहीं अस्थी ॥ आणि पुत्रप्रजांची संतती ॥ नाहीं तुज ॥ ॥७०॥

अगा चिरायो पुत्रप्रजेविण ॥ न सुटे तिहीं प्रकारींचें ॠण ॥ तप गेलेंसे निष्कारण ॥ मंदपाळा तुझें ॥७१॥

हाचि असे महाकलंक ॥ ह्नणोनि अंतरला ब्रह्मलोक ॥ तंव धरिला तेणें वेष ॥ सारंगपक्षियाचा ॥७२॥

मग तो आला खांडववनीं ॥ तेथें पर्णिल्या तीन पक्षिणी ॥ जरिता लपिता कामिनी ॥ आणि शुकसारिका ॥७३॥

पुढें तयां जाहले चौघेपुत्र ॥ मग तेणें सांडिलें घर ॥ तंव वाटे भेटले पवित्र ॥ अंगार अर्जुन ॥७४॥

तो तयांसि ह्नणे मुनी ॥ कीं माझीं पिलीं असती खांडववनीं ॥ तीं राखावीं गा तुवां वन्ही ॥ चारी सारंगें ॥७५॥

ऐसी वन्हीची करोनि स्तुती ॥ मग तो गेला वनाप्रती ॥ ह्नणोनि राखिलें गार्हपतीं ॥ चारीजणांसी ॥७६॥

ऐसें वन जाळिलें फाल्गुनें ॥ त्यांत वांचलीं साहीजणें ॥ मग रोग सांडिला कृशानें ॥ तेणें भेषजें ॥७७॥

मग संतोषीनि वैश्वानर ॥ ह्नणे अर्जुना त्वां केला उपकार ॥ सर्वा जठरींचा अंगार ॥ चेतविला तुवां ॥७८॥

तंव अर्जुनासि ह्नणे सुरपती ॥ तुज शस्त्रें देईन पुढती ॥ हे कथा कथिलीसे भारतीं ॥ व्यासवचनें ॥७९॥

वज्रनाभ चक्र आणि गदा ॥ हीं अग्नीनें दीधलीं गोविंदा ॥ आणि देवें पर्णिली प्रमदा ॥ कालिंदी ते ॥८०॥

तैसाचि अग्निघोष रथ ॥ श्वेतवारुवां सहित ॥ तो अग्नीनें दीधला उचित ॥ अर्जुनासी ॥८१॥

राया ऐसे ते नरनारायण ॥ सिद्धि पावलिला गा पण ॥ मग आले श्रीकृष्णार्जुन ॥ इंद्रप्रस्थासी ॥८२॥

तेथें भेटोनियां समस्तां ॥ श्रीकृष्णा जाहला निघता ॥ रथीं वाहोनियां कांता ॥ कालिंदी ते ॥८३॥

द्वारके प्रवेशला श्रीपती ॥ लग्न लाविलें सुमुहूतीं ॥ आनंद जाहला सर्वाप्रती ॥ चारी दिवस ॥ ॥८४॥

यानंतरें गा भारता ॥ कृष्णें आणीली अवंतिराजसुता ॥ ते ऐकावी समूळ कथा ॥ चित्त देवोनी ॥८५॥

पूर्वी वसुदेवाची भगिनी ॥ जरादेवी मृगनयनी ॥ ते दीधली होती पद्मिणी ॥ अवंतिनाथा ॥८६॥

तीस जाहले दोन पुत्र ॥ विदु आणि यदु महावीर ॥ आणि तिसरी कन्या मनोहर ॥ मित्रवृंदा ॥८७॥

असो तयेचा निमालिया पिता ॥ मग भ्रात्राधीन ते असतां ॥ तारुण्यें दाटली सकामता ॥ मित्रवृंदा ते ॥८८॥

पुत्रांसि ह्नणे तिची माता ॥ हे देवोरें श्रीअनंता ॥ तो भाचा होय विचारितां ॥ आमुचा सत्य ॥८९॥

ऐकतां मानवली मित्रवृंदा ॥ मनीं चिंतितसे गोविंदा ॥ ह्नणोनि पूजीत सर्वदा ॥ भवानीसी ॥९०॥

परि मातेसि बोलिला सुत ॥ कृष्णासि देइजे हें अनुचित ॥ आतां राव मेळवोनि समस्त ॥ मांडावें स्वयंवर ॥९१॥

मग बोलाविले राजे ॥ महामंडप घातले ओजें ॥ तेम द्वारके समजलें सहजें ॥ कृष्णरायासी ॥९२॥

तंव देवें संजोगोनि रथ ॥ हा कोणा नेणतां वृत्तांत ॥ अवंतिये सहसा कृष्णनाथ ॥ चालिला वेगें ॥९३॥

तेथें राव बैसले सैंवरी ॥ माळ घेवोनि आलीसे नोवरी ॥ तंव ते वाहिली श्रीहरीं ॥ रथावरी अवचितां ॥९४॥

तेथें जाहला हाहाःकर ॥ राय नोळखती आपपर ॥ मंडपीं होतसे संहार ॥ एकमेकां ॥९५॥

श्रीकृष्ण पावला द्वारावती ॥ सवें मित्रवृंदा शोभती ॥ जाणो शिवासवें पार्वती ॥ सौभाग्यकूपिका ॥९६॥

जनीं श्रृंगारोनि द्वारावती ॥ लग्न लाविलें सुमुहूतीं ॥ सोहळें जाहले श्रीपती ॥ चरी दिवस ॥ ॥९७॥

यानंतरें गा स्वयंवरीं ॥ श्रीकृष्णें जिंकिली सुंदरीं ॥ ते याज्ञजिती मनोहरी ॥ सत्यवती जे ॥९८॥

तंव प्रश्न करी पारिक्षिती ॥ कैसी आणिली याज्ञजिती ॥ तें सांगावें गा धर्ममूर्ती ॥ वैशंपायना ॥९९॥

मग ह्नणे मुनीश्वरु ॥ अयोध्येचा नृपवरु ॥ यज्ञजित महामेरु ॥ सूर्यवंशीं ॥१००॥

त्याची कन्या याज्ञजिती ॥ मृगनयनी कनककांती ॥ जियेसि घडितां पार्वती ॥ संतोषलीसे ॥१॥

ते संगीतशास्त्री प्रवीण ॥ नानामतींचें उत्पत्तिज्ञान ॥ निर्मळ जाहलें अंतःकरण ॥ शास्त्रबुद्धीं ॥२॥

ते कन्या भावितसे आपण ॥ कीं सर्वात श्रेष्ठ श्रीकृष्ण ॥ त्यावांचोनि पाणिग्रहण ॥ न करीं आणिकासीं ॥ ॥३॥

हें चिंतितसे अहर्निशी ॥ नित्यनित्य नमस्कारी तुळसी ॥ तें जाणवलें हषीकेशी ॥ मनोगत तियेचें ॥४॥

मग संजोगोनियां रथ ॥ अयोध्ये आला गोपिनाथ ॥ तंव रायें जाणितला सुत ॥ वसुदेवाचा ॥५॥

परस्परें जाहली प्रीती ॥ अर्चन करी भूपती ॥ तंव बोलिला श्रीपती ॥ रायाप्रती तेधवां ॥६॥

मग कृष्ण ह्नणे आपण ॥ याचकवृत्ती महा हीन ॥ हें ब्राह्मणाचें व्रतदान ॥ न साजे आणिका ॥७॥

परि कार्याती न पहावे दोष ॥ जेवीं भक्तिविरोधें महेश ॥ नातरी मही न सांडी पाउस ॥ तापलिया जैसी ॥८॥

तरी ऐकावें जी भूपती ॥ तुझी कन्या सत्यवती ॥ ते संकल्पोनि याज्ञजिती ॥ देई मज ॥९॥

ऐकोनि बोलिला भूपती ॥ तुज अर्पिजे पुष्पपत्रीं ॥ येवढी कैंची गा प्राप्ती ॥ श्रीकृष्णा मज ॥११०॥

कोटियज्ञांचे होय सुकृत ॥ तैं पावे तुझें चरणतीर्थ ॥ तो तूं आलासि अयाचित ॥ माझिये घरीं ॥११॥

परी असे माझें व्रत ॥ अपेट वृषभ असती सात ॥ त्यांसी घालील जो नाथ ॥ एकेचि वेळीं ॥ ॥१२॥

तोचि पर्णील हे सुंदरी ॥ हें मी बोलिलों उत्तरीं ॥ ह्नणोनि जाहली उपवरी ॥ याज्ञजिती हे ॥१३॥

तरी सुकुमार तूं सांवळा ॥ हें तुज न सांगवे गोपाळा ॥ इहीं मारिलें भूपाळा ॥ बहुतांसि पैं ॥१४॥

ऐकोनि उठिला शारंगधर ॥ कांसे वेष्टिला पीतांबर ॥ आंगीं चर्चिला मलयागर ॥ तांबूल वदनीं ॥१५॥

मग खोडें हांकिले समस्त ॥ श्रीकृष्ण रुपें जाहला सात ॥ मुखीं चेपोनियां नाथ ॥ एकदाचि वोविली ॥१६॥

ज्याचे शेष आंथरुणी ॥ तो मंडूकां केवीं सांपडे स्वप्रीं ॥ पर्वत उचली त्यासि मणी ॥ दडपी केवीं ॥१७॥

तैसा तयाचा पुरुषार्थ ॥ वायांच वाढवावा कां ग्रंथू ॥ गजें तोडितां कमलतंतू ॥ काय थोरी ॥१८॥

मग मुहूर्ते घडिवट ॥ श्रृंगारिलें मंडप मठ ॥ विप्र धरोनियां अंत्रपाट ॥ लाविलें लग्न ॥१९॥

मनीं संतोषला भूपती ॥ कृष्णा अर्पिली याज्ञजिती ॥ जैसी शिवासि हैमवती ॥ वाहिली शैलनाथें ॥१२०॥

बैसला बोहल्यावरी मुरारी ॥ उटणें होतसे नानापरी ॥ काहळा मृदंग मंगलतुरीं ॥ गजें मंडप ॥२१॥

गायनवाद्यें पेखणें ॥ जाहलीं वरात आठन्हाणें ॥ मग दीधलीं आंदणें ॥ वधुवरांसी ॥२२॥

दहा सहस्त्र सालंकृता ॥ धेनु दीधल्या गोपिनाथा ॥ नवसहस्त्र मदोन्मत्तां ॥ कुंजरांसीं ॥२३॥

परिचारिका तीन सहस्त्र ॥ नवकोटी तुरंगवर ॥ नर दीधले कामगार ॥ नवपद्मेंसीं ॥२४॥

वस्त्रें रत्नें द्रव्य अमित ॥ नवलक्ष दीधले रथ ॥ मग निघाली वरात ॥ द्वारकेसी ॥२५॥

हे व्यासवाणी श्रीभागवतीं ॥ तरी मी कां करुं काकुळती ॥ रथीं वाहोनियां युवतीं ॥ निघाला कृष्ण ॥२६॥

तंव राय मिळाले परचक्रीं ॥ त्यांही वेष्टिला मुरारी ॥ हिरोनि न्यावया नोवरी ॥ याज्ञजिती ते ॥२७॥

जैसे सिंहाचिया आहारा ॥ जंबुक करिती आडवारा ॥ नातरी पतंग वैश्वानरा ॥ झडपी जैसा ॥२८॥

तंव इतुकिया समयांतरीं ॥ तेथें पार्थ आला अवसरीं ॥ तेणें देखिला श्रीहरी ॥ परवीरीं वेष्टित ॥२९॥

मग धनुष्यीं लावोनि गुण ॥ विंधित सुटला अर्जुन ॥ जैसा गजयूथा पंचानन ॥ कोपला पैं ॥१३०॥

नातरी गरुडाचिया झडपां ॥ पळ सुटे महासर्पां ॥ कीं हरिकीर्तनी महापापां ॥ सुटे पळ ॥३१॥

आतां असो हा रणवट ॥ खेळतां न शिणे जैसा नट ॥ परि श्रोता मानील वीट ॥ संग्रामाचा ॥३२॥

असो द्वारके धाडिले पदाती ॥ कीं वेगें श्रृंगारा द्वारावती ॥ श्रीकृष्ण आला नगराप्रती ॥ सुमुहूतीं पैं ॥३३॥

वधुवरां करिती अक्षयवाणें ॥ नगरीं जाहलें वाधावणें ॥ भारता याज्ञजिती नारायणें ॥ आणिली ऐसी ॥३४॥

यानंतरें गा नरेंद्रा ॥ श्रीकृष्णे आणिली भद्रा ॥ जिची सरी करितां मुखचंद्रा ॥ नाहीं साम्य ॥३५॥

ते लावण्यबीजाची राशी ॥ तयेची सरी नपवे उर्वशी ॥ कांती जेवीं कनकाशीं ॥ अभिन्नपणें ॥३६॥

जरी वर्णू चांफेकळी ॥ तरी ते सौभाग्यें नाहीं आगळी ॥ हे पद्मिणी अलिकुरळीं ॥ शोभे अधिक ॥३७॥

तंव प्रश्नेच्छा जाहली जन्मेजया ॥ ह्नणे हे कोणाची असे तनया ॥ आणि पावली कृष्णराया ॥ कैसेपरी ॥३८॥

मुनि ह्नणे गा अवधारीं ॥ श्रुतंकीर्ति नामें सुंदरी ॥ ते साक्षात सहोदरी ॥ वसुदेवाची ॥३९॥

कैकेय्य नामें भूपती ॥ त्यासि दीधली ते श्रुतकीर्ती ॥ तिची कन्या रुपवंती ॥ भद्रादेवी ॥१४०॥

तंव तिचा निमाला पिता ॥ ह्नणोनि माता करितसे चिंता ॥ ह्नणे हे कृष्णासि देतां तत्वतां ॥ होय काज ॥४१॥

श्रीकृष्ण जाहलिया सोयरा ॥ तेणें राज्य होईल अढळ कुमरां ॥ आणि मागुती दुणावे सोयरा ॥ वसुदेव तो ॥४२॥

तें नित्यनित्य ऐके भद्रा ॥ मग अवस्थें नलगे निद्रा ॥ परि पूजितसे गौरीहरा ॥ नित्य कमळीं ॥४३॥

व्रतदान फळ भोजन ॥ कार्तिक आणि माघस्त्रान ॥ श्रीकृष्णें करावें पाणिग्रहण ॥ ह्नणोनियां ॥४४॥

तें जाणवले गोपिनाथा ॥ मग दारुकें सज्ज केलें रथा ॥ श्रीकृष्ण गेला अवचिता ॥ कैकेयपुरासी ॥४५॥

तो देखतां मंगलमूर्ती ॥ थोर संतोषली श्रुतकीर्ती ॥ भद्रेनेंही देखिला श्रीपती ॥ लावण्यकळिका ॥४६॥

केलें अर्ध्य पाद्मपूजन ॥ जाहलें अभ्यंग टिळा भोजन ॥ मग समर्पिलें कन्यारत्न ॥ भद्रावती ते ॥४७॥

भद्रेंनें वंदिलें चरणकमळ ॥ कंठीं घातली पुष्पमाळ ॥ लग्न लावोनियां तात्काळ ॥ नेली कृष्णें ॥४८॥

मग तेथोनि निघाला श्रीहरी ॥ रथीं वाहिली भद्रा नोवरी ॥ जाणों ब्रहयाशेजारीं सावित्री ॥ सौभाग्यराशी ॥४९॥

हे उपमा देतां थोकडी ॥ जेथें अमृतरसाची गोडी ॥ तेथें साखरेची वेलवाडी ॥ वानिजे काय ॥१५०॥

ऐसी आणिली भद्रावती ॥ वेगें श्रृंगारिली द्वारावती ॥ नगरनारी ओंवाळिती ॥ वधुवरांसी ॥५१॥

उभविलीं मंडप मखरें ॥ सोहळा मांडिला महागजरें ॥ लग्न लाविलें वेदमंत्रें ॥ गर्गाचार्ये ॥ ॥५२॥

मार्जन होतसे श्रीहरी ॥ कनकलशांचिया हारी ॥ शेजे मिरवतसे नोवरी ॥ भद्रावती ते ॥५३॥

मग ते आनंदें देवकी माता ॥ अक्षयवाणें करी उभयतां ॥ कीं बहुत होवोत गा कांता ॥ कृष्णा तुज ॥५४॥

जाहले अहेर कुळदैवतां ॥ भोजनें दीधलीं ग्रामां समस्तां ॥ ऐसी आणिली गा भारता ॥ भद्रावती ते ॥५५॥

राया यानंतरें अवधारीं ॥ लक्ष्मणा नामें सुकुमारी ॥ ते जिंकिली धारायंत्रीं ॥ श्रीकृष्णदेवें ॥५६॥

तंव जन्मेजय ह्नणे हो मुनी ॥ लक्ष्मणा कोणाची नंदिनी ॥ ते कैसी जिंकिली गा पणीं ॥ नारायणें ॥५७॥

ह्नणे मुनीश्वर ॥ महेंद्रदेशींचा नृपवर ॥ तेणें प्रसन्न करोनि ईश्वर ॥ मागितली कन्या ॥५८॥

जये नाम असे लक्ष्मणा ॥ रुपें आगळी ते त्रिभुवना ॥ चंद्र सांडिजे सांडणा ॥ मुखावरोनी ॥५९॥

ऐसी ते परम स्वरुपता ॥ कन्या असे महेंद्रनाथा ॥ मग मांडिली असे चिंता ॥ तिचे विवाहाची ॥१६०॥

सकळ पृथ्वी दीजे ब्राह्मणा ॥ तें फळ आहे कन्यादाना ॥ कीं उभयमुखी धेनुदाना ॥ ग्रहणसमयीं ॥६१॥

या दीधलिया महादानां ॥ प्राप्ति होय नारायणा ॥ मग कैवल्यसुखाच्या साधना ॥ पाविजे येणें ॥६२॥

मोक्षाचा दाता श्रीकृष्ण ॥ सकळदानांचें श्रेयसाधन ॥ तरी तोचि घेवो हें कन्यादान ॥ ह्नणोनि यत्न मांडिला ॥६३॥

संकल्पोनियां दुस्तर ॥ विचित्र रचिलें धारायंत्र ॥ कटाहीं छाया देखोनि सूत्र ॥ भेदावें लक्ष ॥६४॥

चक्रमध्यस्थ गवाक्षद्वारें ॥ नेत्र विंधावा प्रथम शरें ॥ तें चक्र भ्रमतसे सूत्रें ॥ वायुचेनि ॥६५॥

जळीं पाहोनियां दृष्टीं ॥ अधोमुखें ऊर्ध्वपृष्टी ॥ यंत्रें भेदोनि ललाटी ॥ पाडावा मीन ॥६६॥

ऐसें तयाचें कल्पित ॥ राव पाहोनि गेले बहुत ॥ परी कोणा न घडे जैत ॥ महापणाचें ॥६७॥

ह्नणोनि जाहली ते उपवरी ॥ मनीं चिंतितसे नोवरी ॥ ह्नणे वेगां धांव गा श्रीहरी ॥ धांवण्यासी ॥६८॥

तुजयेवढा थोर दाता ॥ मी पीडित असें कामव्यथा ॥ तरी तोषवावा ममपिता ॥ लक्ष भेदोनी ॥६९॥

ऐसें चिंतोनि अंहर्निशीं ॥ व्रतदानें मासोपवासीं ॥ तयेनें वापीकुप बहुवसीं ॥ केले मार्गी ॥१७०॥

पेरिले पुण्यतरुवर ॥ महादानीं पूजिलें विप्र ॥ व्रतबंध केले गा सहस्त्र ॥ ब्रह्मकुमराचें ॥७१॥

नित्यनित्य वंदी तुळसी ॥ संकल्प धरोनि मानसीं ॥ ह्नणे मज व्हावा हषीकेशी ॥ प्राणेश्वर ॥७२॥

तंव तें जाणितलें श्रीकृष्णें ॥ मग वेगीं केलें धांवणें ॥ आला तयेचे कारणें ॥ गरुडासहित ॥७३॥

वेगां पावला महेंद्रपुरी ॥ रायें जाणितला मुरारी ॥ मग येवोनि नगरा बाहेरी ॥ केलें अर्ध्यपाद्य ॥७४॥

तंव राजे पावले समस्त ॥ नानाकुळींचे विख्यात ॥ जयां अंगीं महापुरुषार्थ ॥ वाटिवेचा ॥७५॥

मग बोलिला बृहत्सेन ॥ कीं माझा पुरवील जो पण ॥ त्यासि देईन संकल्पोन ॥ लक्ष्मणा हे ॥७६॥

ह्नणोनि ठेविले धनुष्यबाण ॥ राव एकमेकां करिती विलोकन ॥ तंव उठावला दुर्योधन ॥ कौरवराव ॥७७॥

तेणें पाहिलें अनुमान ॥ परि न थारे दृष्टिपूर्ण ॥ मग उठिला वीर कर्ण ॥ महाप्रौढीचा ॥७८॥

तेणेंहि सामर्थ्य अनुमानिलें ॥ परी दृष्टीं न दिसे बाहुलें ॥ ह्नणोनि धनुष्यबाण ठेविले ॥ खालते तेणें ॥७९॥

तंव बोले भीमसेन ॥ हा अवघड असे गा पण ॥ हें विंधूंशके एक कृष्ण ॥ किंवा अर्जुन दूसरा ॥१८०॥

मग उठिला वीर अर्जुन ॥ जंव कानाडीं वोढिला बाण ॥ तंव वोढितां चुकेल पण ॥ ऐसें जाणवलें तयासी ॥८१॥

ऐसे अंगवंग चीनभट ॥ चैद्य मागध मराठ ॥ तें देखोनियां विकट ॥ जाहले निश्वळ ॥८२॥

मग उठिला नारायण ॥ तेणें धनुष्या लाविला गुण ॥ कानाडी भरुनियां बाण ॥ राखिला वाममुष्टीं ॥८३॥

मग पाहोनियां जळीं ॥ भ्रमती लक्षिली मासोळी ॥ निरुती केली बाहुली ॥ वामनेत्रीची ॥८४॥

पाहोनियां अधोदृष्टी ॥ गगनीं वाहिली वाममुष्टीं ॥ दुसरे बाणें तळवटीं ॥ पाडिलें लक्ष ॥८५॥

तंव जाहला जयजयकार ॥ लक्ष्मणेनें वरिला शारंगधर ॥ पुष्पें वर्षला सुरेश्वर ॥ देवांसहित ॥८६॥

सहज असतां पंडुकुमरां ॥ अर्जुनादिकां धनुर्धरां ॥ सोहळा जाहला समग्रां ॥ गोविंदासी ॥८७॥

रायें दीधले अश्वरथ ॥ दासी अश्व हत्ती मदोन्मत्त ॥ शुभवाद्यें मंगळगीत ॥ झालें समस्तां ॥८८॥

कृष्णें पुसोनि बृहत्सेना ॥ गरुडीं वाहिलीं लक्ष्मणा ॥ आली वरात मंगळगाना ॥ नानावाद्येंसी ॥८९॥

निघोनियां सुमुहूर्ती ॥ द्वारकें प्रवेशला श्रीपती ॥ वरात आली मंगळगीतीं ॥ मंदिरासी ॥१९०॥

भारता मग त्या लक्ष्मणे ॥ सकळीं केलीं अक्षयवाणें ॥ नगरीं जाहलें वाधावणें ॥ आनंदाचें ॥९१॥

तरी ऐशापरी गा भारता ॥ लक्ष्मणा पावली गोपिनाथा ॥ हें नाहीं न ह्नणावें श्रोतां ॥ मत्स्याचें लक्ष ॥९२॥

परि असे गा भागवतीं ॥ कीं सूर्यपर्वी महातीर्थी ॥ गोपी घेवोनियां श्रीपती ॥ गेले कुरुक्षेत्रा ॥९३॥

तेथें पांडव आणि द्रौपदी ॥ सहज आलीं तीर्थविध्री ॥ तेव्हां श्रीकृष्णाचिये संवादीं ॥ कथिलें असे ॥९४॥

मिळाल्या गोपी नंद यशोदा ॥ स्यमंतपंचकीं रामगोविंदा ॥ भेटले त्यांचिये आनंदा ॥ न सांगावे मज ॥९५॥

ऐशा श्रेष्ठ आठ सुंदरा ॥ प्राप्त जाहल्या नंदकुमरा ॥ आतां वधिजेल भौमासुरा ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥९६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ अष्टनायकविवाहविस्तारु ॥ एकादशोऽध्यायीं सागितला ॥१९७॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP