कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय २

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ एक फेडावा संदेहो ॥ गोकुळी अवतरला कृष्णदेवो ॥ कवणेपरी ॥१॥

कैसी केली बाळक्रीडा ॥ कोणा राखिले वधिले होडां ॥ तो कृष्णअवतार यापुढां ॥ सांगें मज ॥२॥

आणि वर्ण जाहला सांवळा ॥ कैसी वैजयंती माळा ॥ गदा पद्म चक्र गोपाळा ॥ लाधलीं कैसीं ॥३॥

तैसेंच श्रीवत्सलांछन ॥ कैसेनि लाधलें चिन्ह ॥ कांसे पीतांबर वसन ॥ कैंचे देवा ॥४॥

सोळासहस्त्र अंतःपुरां ॥ एक शत अष्ट लाधल्या सुंदरा ॥ हें सांगावे मुनीश्वरा ॥ विस्तारोनि ॥५॥

आणि तें गरुडवाहन ॥ कैसेनि लाधलें शेषशयन ॥ तें करावें जी आतां ज्ञान ॥ सकळ मजसी ॥६॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ बहुत उत्तम पुसिलासि प्रश्न ॥ जेणें सुखी होय मन ॥ वैष्णवांचें ॥७॥

तरी पूर्वी रामावतारीं ॥ राक्षसीम गांजिली देवनगरी ॥ ते निर्दाळोनियां वैरी ॥ अमर स्वर्गी स्थापिले ॥ ॥८॥

पुनरपि उठिलें दैत्यकुळ ॥ उपद्रविले देव सकळ ॥ त्यांही गांजितां विप्रकुळ ॥ यज्ञकर्मे राहिलीं ॥९॥

मग त्या दैत्यभारें महिला ॥ पातकें दाटलीं गा भूपाळा ॥ तंव ते गेली अंतराळा ॥ धेनुवेषें ॥१०॥

वेगीं पावली ब्रह्मभुवन ॥ ब्रह्मयासी विनवी जाण ॥ तुज आलें गा शरण ॥ विरिंचि देवा ॥११॥

या पातकाचेनि महाभारें ॥ तळा जाईन मी निर्धारें ॥ दैत्यीं उच्छेदिले थारे ॥ वेदकर्माचे ॥१२॥

दैत्यदेहाचे स्वभावगुण ॥ अहंदर्प महाभिमान ॥ क्रोध पारुष्य अज्ञान ॥ असुरभावें ॥१३॥

याचा जाहला संचार ॥ खूंटला धर्माचा विचार ॥ तेणें होय वर्णसंकर ॥ अभिचार घडे ॥१४॥

पडिला अधर्माचा डांगोरा ॥ न चाले धर्माचा उभारा ॥ मग पावणे पैलतीरा ॥ कवणेपरी ॥१५॥

ऐशा भारें दाटली क्षिती ॥ ह्नणोनि येतसे काकुळती ॥ तूं आमुचा अधिपती ॥ चतुरानना ॥१६॥

तूं ब्रह्मांडाचा अभिमानी ॥ सकळ स्थिती तुजपासोनि ॥ तरी विचारावी सोडवणी ॥ या भाराची ॥१७॥

आतां ऐसा करी पां विचार ॥ जेणें दैत्यांचा होय संहार ॥ सकळधर्माचा उद्धार ॥ वर्णाश्रमाचा ॥१८॥

ऐसें ऐकूनि कृपावचन ॥ ब्रह्मा विचारी आपण ॥ हें तव न घडे हरिविणा ॥ तरी जाणऊं तयासी ॥१९॥

मग ह्नणे चतुराननु ॥ क्षीरसागरीं असे विष्णु ॥ त्यावांचोनि भाराचा शिणू ॥ टाळील कोण ॥२०॥

तो आह्मी विनवूं श्रीपती ॥ आतां तूं जाई वो मागुती ॥ अल्पकाळें वसुमती ॥ पावसील सुख ॥२१॥

मग ते आली वसुंधरा ॥ देव गेले क्षीरसागरा ॥ जेथें असे योगनिद्रा ॥ गोविंदाची ॥२२॥

द्वारीं गरुड कर जोडून ॥ शेषशयनीं नारायण ॥ लक्ष्मी करी संवाहन ॥ चरणसेवा ॥२३॥

योगनिद्रा आत्मज्ञानी ॥ लाविली मुद्रा उन्मनी ॥ ऐसा देखिला अष्टनयनीं ॥ नारायण ॥२४॥

मग ब्रह्मा करी स्तुती ॥ जयजया जी मंगलमूर्ती ॥ तुजवांचोनियां क्षिती ॥ पावली दुःख ॥२५॥

जयजयाजी शेषशयना ॥ परिपूर्णा गुणनिधाना ॥ अजरामरा निर्गुणा ॥ नारायणा तूं ॥२६॥

तूं सकळ भुवनांसी कारण ॥ जाणसी स्थिती पाळण ॥ सकळ जीवाच कारण ॥ तुझे हातीं ॥२७॥

जयजयाजी प्रेमदानी ॥ महाभागा महामुनी ॥ पाप दाटलें असे मेदिनी ॥ तुजवीण देवा ॥२८॥

फेडावया दैत्यभार ॥ त्वां धरावा अवतार ॥ धर्म रक्षावा निर्धार ॥ त्रिभुवनींचा ॥२९॥

तंव जाहली गगनवाणी ॥ देवीं अवतरावें मेदिनीं ॥ मग मी येईन गा अष्टनयनी ॥ भूमंडळासी ॥३०॥

वृंदेसि केला असे पुढार ॥ ह्नणोनि मथुरे घेईन अवतार ॥ वृंदावनीं खेळतां दैत्यभार ॥ फेडीन जाणा ॥३१॥

शेषासि ह्नणे शारंगधर ॥ तूं माझा परम मित्र ॥ तरी तुजवांचोनि अवतार ॥ न घेववे मज ॥३२॥

आतां वसुदेवाचे उदरीं ॥ तुवां जावें गा झडकरीं ॥ नंदयशोदेचे मंदिरीं ॥ असावें तुवां ॥३३॥

तुज गेलिया माघारीं ॥ मी येईन निर्धारी ॥ यमुनानदीचेनि तीरीं ॥ खेळावयासी ॥३४॥

मग मंजुळ बोले शेष ॥ वसुदेवा कैचें पुण्य विशेष ॥ तयाचा तूं आदिपुरुष ॥ पुत्र होसी ॥३५॥

सहस्त्रजन्मांच्या कायकोटी ॥ योगी ध्याती हदयसंपुटीं ॥ तयांसि न देसी भेटी ॥ प्रत्यक्षरुपें ॥३६॥

ऐसें तया काय सुकृत ॥ जे तूं तयाचें होसी अपत्य ॥ हें सांगावें जी सत्य ॥ नारायणा ॥३७॥

तैसेंचि नंद आणि यशोदा ॥ त्यांचें पुण्य काय गोविंदा ॥ जे तयांचे आंगींची मेधा ॥ उपजली तुज ॥३८॥

मग ह्नणे नारायणु ॥ स्वायंभुव जो कां मनू ॥ तो वर्तमानींचा ब्राह्मणू ॥ सुतपा नामें ॥ ॥३९॥

तयाची जे कुटुंबिनी ॥ प्रौणिनामें मृगनयनी ॥ तिणें पुत्राकारणें विनवणी ॥ केली भर्त्यासी ॥४०॥

तयेसि ह्नणे प्राणेश्वर ॥ पुण्याविणें कैंचा कुमर ॥ तरी प्रसन्न करोनि हरिहर ॥ मागों फळ ॥४१॥

मग तो अधोमुखें धूम्रपान ॥ करी पंचाग्निसाधन ॥ सहस्त्रवरुषें मौन ॥ धरिलें तेणें ॥४२॥

तयाची जे स्त्री प्रौणी ॥ ती असे निराशनी मौनी ॥ ऐसीं सहस्त्रवर्षे दोनी ॥ ब्रह्मचर्येसीं ॥४३॥

ऐसी जाणोनियां महातापसी ॥ मग विचारिलें लीलाविलासीं ॥ रुप दावोनि सर्वाशीं ॥ जाहलों पुसता ॥४४॥

तंव तीं बोलती दोनी ॥ तुज सारिखा पुत्र चक्रपाणी ॥ त्या वांचोनि अंतःकरणीं ॥ नाहीं दुजें ॥४५॥

मग म्यां बोलिलें सहस्त्रशिरीं ॥ तीन जन्म येईन उदरीं ॥ मग तीं धाडिलीं पुढारीं ॥ रुद्रसेवेसी ॥४६॥

तेथें प्रसन्न जाहलीं गिरिजा हर ॥ त्यांहीं ठेविला अभय कर ॥ तेचि कश्यप अदिती निर्धार ॥ जाण शेषा ॥४७॥

तंव बोले शेषदेवो ॥ या बोलाचा काय गर्भभावो ॥ तो फेडावा संदेहो ॥ माझे मनींचा ॥४८॥

दहा अवतार अवतरलां आपण ॥ त्यामाजी तीनअवतार ते कवण ॥ हें करावें मज ज्ञान ॥ कृपा करोनी ॥४९॥

मग ह्नणे नारायण ॥ अगा तूं महा विचक्षण ॥ बरवा पुसिलासि प्रश्न ॥ तरी ऐक आतां ॥ ॥५०॥

वामन आणि भृगुसुत ॥ तिसरा देवकींचा गोपिनाथ ॥ परिसें तो वसुदेव सुत ॥ शूरसेनाचा ॥५१॥

मागुती भृगुवंशीं अवतार ॥ जो जमदग्नि ऋषेश्वर ॥ रेणुकागर्भी कुमर ॥ तो परशुराम ॥५२॥

तेचि हे वसुदेव देवकी ॥ जन्मलीं गा मृत्युलोकीं ॥ त्यांचे नाम सहस्त्रमुखी ॥ न सांगवे मज ॥५३॥

आतां यशोदा आणि नंद ॥ त्यांचा असे पूर्वसंबंध ॥ तोहि ऐसाचि अनुवाद ॥ ऐक आतां ॥५४॥

कोणी एक द्रोण नामें वसु ॥ महाशीळ शांत तापसु ॥ तेणें मांडिला उद्देशु ॥ माझिये भक्तीचा ॥५५॥

त्याची प्रणिता नामें सुंदरा ॥ तये नाम बोलिजे धरा ॥ जयेचे तपसमुद्रपारा ॥ न वर्णवे मज ॥५६॥

दोघें करिती अनुष्ठान ॥ नानापरीचें व्रत दान ॥ मनीं धरोनि कारण ॥ पुत्रबुद्धिचें ॥५७॥

त्यांचे देखोनियां कष्ट ॥ मग मी होवोनि प्रगट ॥ ह्नणे जाहलों रें संतुष्ट ॥ मागें द्रोणा ॥५८॥

तेव्हां तीं द्रोण आणि धरा ॥ वाचा बोलिलीं मधुरा ॥ कीं पुत्रपणें शारंगधरा ॥ असावेम गृहीं ॥५९॥

तरी द्रोणवसु तोचि नंद ॥ आणि धरा ते यशोदा अनुवाद ॥ ऐसा हा पूर्व संबंध ॥ सांगितला शेषा ॥६०॥

तंव ह्नने जन्मेजयो ॥ वसुदेव देवकीचा नाहो ॥ तो कोठील जी रावो ॥ कवणवंशींचा ॥६१॥

मग ह्नणे मुनेश्वर ॥ सोमवंशीचा नृपवर ॥ त्या शूरसेनाचा पुत्र ॥ वसुदेव तो ॥६२॥

आणि उग्रसेनाची नंदिनी ॥ देवकी नामें मृगनयनी ॥ ते वसुदेवाची कांमिनी ॥ कृष्णमाता ॥६३॥

आणिक ऐकावा विचार ॥ कंस हा काळनेमीचा अवतार ॥ तो द्रुमीळदैत्याचा निर्धार ॥ रेतजात ॥६४॥

तो उग्रसेनाचा क्षेत्रनंदु ॥ परी देवकीचा क्षेत्रबंधु ॥ हा असे पूर्वसंबंधु ॥ सोयरिकेचा ॥६५॥

मग ते देवकी कुमरी ॥ वयें जाहली उपवरी ॥ ते मेळविली असे नोवरी ॥ वसुदेवासी ॥६६॥

उत्तम पाहोनियां मुहूर्त ॥ वर्‍हाडिका जाहली सालंकृत ॥ मग बोळविली वरात ॥ बंधुवर्गी ॥६७॥

पूजा करोनियां समग्री ॥ रथीं बैसविलीं वरनोवरी ॥ कंस जाहला धुरकरी ॥ बंधुभावें ॥६८॥

वेगां क्रमवीतसे पंथ ॥ बंधु बहिणी आणि जामात ॥ तंव गगनीं जाहला अकल्पित ॥ शब्द येक ॥६९॥

अरे कंसा नृपवरा ॥ जो येईल देवकीच्या उदरा ॥ तो तुज वधील असुरा ॥ सत्य जाण ॥७०॥

इचा जो आठवा गर्भ ॥ तो तुझा करील शिरभंग ॥ जैसा कमळनाळा मातंग ॥ करी दमन ॥७१॥

ऐसी जाहली गगनवाणी ॥ ते कंसें ऐकिली श्रवणीं ॥ मग ह्नणे हे असे बहिणी ॥ काय काजा ॥७२॥

आपुल्या प्राणाचें जें हित ॥ तेंचि करावें हें सत्य ॥ येर तें वर्जावें समस्त ॥ पुत्रराज्यादि ॥७३॥

जे वदली असे देववाणी ॥ हे तंव हिताची जननी ॥ ह्नणोनि आतां वधुं बहिणी ॥ देवकी हे ॥७४॥

ह्नणोनि काढिलें खड्रजाळ ॥ ह्नणे वंशवल्लीचें कापू मूळ ॥ जंव नाहीं आलें फळ ॥ दुष्टभावाचें ॥७५॥

मग वसुदेव आला काकुळती ॥ ऐकें कंसा धर्मनीती ॥ ब्रह्मरेषा तंव कल्पांतीं ॥ न चुके जाण ॥७६॥

जैं गर्भी रचिलें शरीर ॥ तैंचि वर्तविलें गा समग्र ॥ त्या पूर्वकर्माचे अंकुर ॥ मोडील कवण ॥७७॥

वायां तुज वाटे निमित्त ॥ हें तंव देह पंचमूत ॥ आतां स्त्री वधितां काय हित ॥ असे तुजसीं ॥७८॥

आणि आत्मा तव अविनाश ॥ देहभाव हा तरी आभास ॥ परी पहा बहिण वधितां दोष ॥ ठेविती जन ॥ ॥७९॥

आणि हे देवकी नोवरी ॥ प्रतिकळा बोलिली गौरी ॥ हा पूर्वील निश्वय ऋषेश्वरीं ॥ बोलिलासे ॥८०॥

परि तो न मानी उत्तर ॥ खड्रें छेदूं पाहे शिर ॥ मग बोलिला गंभीर ॥ वसुदेव रावो ॥८१॥

कंसा अवधारीं विनंती ॥ रक्षिं रक्षिं पां युवती ॥ गर्भ देईन तुझे हातीं ॥ आठवा जाण ॥८२॥

तें मानवलें कंसासुरा ॥ भाष घेतली वधुवरां ॥ मग आला आपुल्या मंदिरा ॥ कंसराणा ॥८३॥

तें प्रधानां जाणवलें समग्राम ॥ बंदिशाळे नेले वधुवरां ॥ मग करिते जाहले विचारा ॥ गगनवाणीच्या ॥८४॥

ऐसी करितां चिंतवणी ॥ तंव आला नारदमुनी ॥ पूजा करोनि आसनीं ॥ बैसविला कंसें ॥८५॥

मग तो सकल वृत्तांत ॥ नारदासी केला श्रुत ॥ तंव हासिन्नला ब्रह्मसुत ॥ ऐकोसनींयां ॥८६॥

कोणापासोनि कोण आठ ॥ हें तंव नेणवे निकट ॥ तरी कैसें टाळाल अरिष्ट ॥ देवकीगर्भीचें ॥८७॥

ऐसा करोनि अनुवाद ॥ तेथोनि गेला नारद ॥ पाठीं मांडिला प्रबंध ॥ प्रधानवर्गी ॥८८॥

ह्नणती बोलिला जो नारद ॥ तो तंव सगर्भ असे भेद ॥ तरी आतां करावा वध ॥ सकल गर्भाचा ॥८९॥

मग जाहलें गर्भाधान ॥ देवकी प्रसवली पुत्ररत्न ॥ तंव धांवला आपण ॥ कंसराव ॥९०॥

पाहे तंव देखे पुत्रु ॥ ह्नणे हाचि होय कीं स्वशत्रू ॥ मग आपटिला कुमरु ॥ मेदिनीसी ॥९१॥

ह्नणती कोणा जावें शरण ॥ जो निवारील दुःखकारण ॥ काय आचरलों दारुण ॥ उभयवर्गे ॥९३॥

कीं घडला ब्रह्मद्वेष ॥ संतसाधूंचा उपहास ॥ जेणें न वाढे आमुचा वंश ॥ आणि दरिद्र पावलों ॥९४॥

जो कां चोरी हेमरत्न ॥ करी अगम्यागमन ॥ तयालागीं होय बंधन ॥ यमपाशींचें ॥९५॥

हे बोलतां शास्त्रनीती ॥ कथा विस्तारेल बहुतीं ॥ असो ऐसीं शोक करिती ॥ उभयवर्गे ॥९६॥

जैसें वनगाईचें चामर ॥ चोरोनि नेती तस्कर ॥ मग तें करितसें ढोर ॥ दुःख जैसें ॥९७॥

किंवा पक्ष्याचें बाळक ॥ पारधी धरी एकाएक ॥ तैं मुख पसरोनि शब्दघोष ॥ करीत जननी ॥९८॥

आतां असो विस्तार बहुत ॥ ऐसेचि वधिद्ले सहा सुत ॥ ते शापदग्ध गेले त्वरित ॥ पाताळासी ॥९९॥

ऐसे वधिले सहा गर्भ ॥ पितरें करिती थोर उद्वेग ॥ पातक जडलें असे सांग ॥ कंसासुरासी ॥१००॥

तेणें तपाची सरली सामुग्री ॥ मग शेषासि ह्नणे श्रीहरी ॥ त्वां अवतरांवे कुहरीं ॥ देवकीच्या ॥१॥

राया मग तो सहस्त्रफणी ॥ गर्भी संभवे तेचि क्षणीं ॥ तो रेवतीरमण मुकुटमणी ॥ बलदेव साच ॥२॥

तंव गर्भा जाहले षण्मास ॥ मागुती जाहला उदास ॥ देवकी पाहे तंव निरास ॥ देखे उदर ॥३॥

जया गर्भासि जाहला वधु ॥ तो तरी परिसावा संबंधु ॥ ते असती मरीचीचे बंधु ॥ ब्रह्मपुत्र ॥४॥

ब्रहयानें अभिलाषिली शारदा ॥ हास्य न साहवे तया अबुधां ॥ ह्नणोनि शापिलेम तया संबंधा ॥ ब्रह्मदेवें ॥५॥

तुह्मां होईल अधःपतन ॥ मृत्युलोकी जन्म दारुण ॥ मग ते गेले शरण ॥ नारदासी ॥६॥

ह्नणती आमुची चुकवीं वेदना ॥ गर्भवास महा दारुणा ॥ मग दीधलें आश्वासना ॥ नारदें तयांसी ॥७॥

ह्नणे संसारापासाव उपरती ॥ तुह्मां करीन शीघ्रगती ॥ अल्पकाळेंचि मागुती ॥ पावाल स्वर्ग ॥८॥

ह्नणोनीच येवोनि नारद ॥ कंसाजवळी करी अनुवाद ॥ सर्वगर्भाचा व्हावया वध ॥ काज रचिले ॥९॥

आतां असो हें जन्मेजया ॥ देवें बोलाविली माया ॥ ह्नणे त्वां जावोनि लवलाह्यां ॥ करावें काज ॥११०॥

माये देवकीच्या उदरीं ॥ जन्मला असे सहस्त्रशिरी ॥ तो तुवां घालावा उदरीं ॥ रोहिणीच्या ॥११॥

आणि तुवां उपजावें खेचरी ॥ गोकुळीं यशोदेच्या उदरीं ॥ कंसें मारितां अंतरीं ॥ जावे तुंवां ॥१२॥

मग ते नंमूनियां मुरारी ॥ वेगें निघाली खेचरी ॥ आली लवलाहें रात्रीं ॥ देवकीपाशीं ॥१३॥

जंव देवकी असे निदसुरी ॥ तंव गर्भ काढिला झडकरी ॥ नेवोनि घातला उदरीं ॥ रोहिणीच्या ॥१४॥

रोहिणी होती नंदाधरीं ॥ मायेचें विंदान जाहलें भारी ॥ नेला गर्भ क्षणांतरीं ॥ तिच्या उदरीं तो ॥१५॥

तंव ते जाहली विस्मित ॥ उदरीं गर्भ देखे अकस्मात ॥ परी जाहली भयभीत ॥ लोकनिदेस्तव ॥१६॥

इकडे देवकी मनीं विचारी ॥ गर्भ जो होता माझिये उदरीं ॥ तयाचा घात जाहला जरी ॥ तरी शोणित न दिसे कैसें ॥१७॥

देवकी करीत असे शोक ॥ कैसा कोपला जगन्नायक ॥ उदरींचाही नेला बाळक ॥ कंसासुरें ॥१८॥

तंव कंसें ऐकिलें दूतद्वारें ॥ गर्भ चिंतवला सुंदरे ॥ तो कंस मोजी कराग्रें ॥ सातवा गर्भ ॥१९॥

इकडे यशोदेच्या उदरीं ॥ आपण निघाली खेचरी ॥ आणि हरि आला उदरीं ॥ देवकीचे ॥१२०॥

सहस्त्रभानूचीं दिव्य शोभा ॥ तैसी दिसे देवकीची प्रभा ॥ वसुदेव देखे हिरण्यगर्भा ॥ आश्वर्यमनें ॥२१॥

ऐसा प्रवेशतां श्रीहरीं ॥ देव नाचती अंबरीं ॥ पुष्पें वर्षती महाभारीं ॥ मेघ जैसे ॥२२॥

मग वसुदेव आणि देवकी ॥ सुखिया जाहलीं मंचकीं ॥ षड्रर्भीचें शोक दुःखी ॥ विसरलीं तीं ॥२३॥

मनीं उपजे आनंद ॥ न टिके विरोधाचा संबंध ॥ जाणों आतांचि तुटला वंध ॥ पातकांचा ॥२४॥

तंव इंद्रादिक देव समस्त ॥ स्तुति करिती अंतर्गत ॥ कीं येणेंप्रसंगेंचि मूर्तिमंत ॥ देखिजेल ब्रह्म ॥२५॥

मग जाहले पूर्णदिवस ॥ गर्भा भरले नव मास ॥ प्रसूतव्यथे बहुवस ॥ दाटलीं देवकी ॥२६॥

तैं वद्य अष्टमी श्रावणीं ॥ बुधवार आणि नक्षत्र रोहिणी ॥ मेघवर्षाव होतां रजनी ॥ अर्ध गेली ॥२७॥

देवकीये आली निद्रा ॥ रक्षक घोरती घरघरां ॥ तंव देखिला येकसरां ॥ पुढें बाळ ॥२८॥

देखोनि जाहलीं हर्षित ॥ न वाटे काहीं भय दुःख तेथ ॥ मग वसुदेवासी गुप्त ॥ दाखविलें ॥२९॥

जंव वसुदेव पाहे दृष्टीं ॥ तंव पुढें देखिला जगजेठी ॥ चौदा भुवनें ज्याचे पोटीं ॥ सामावलीं ॥१३०॥

मूर्ती देखिली धाकुटी ॥ तंव च्यारी भुजा बरवंटी ॥ आयुधेंसी माळकंठीं ॥ वैजयंती ॥३१॥

कसिलासे पीतांबर कटीं ॥ कमलनयन व्यंकटा भृकुटी ॥ दशन हिरे विंबाधर हनुवटी ॥ दिव्यशोभा ॥३२॥

मेघवर्ण अंगकांती ॥ इंद्रनीळाची वोतिली मूर्ती ॥ मणी पदकांची दीप्ती ॥ हदयावरी ॥३३॥

वसुदेव न्याहाळी कुमर ॥ हर्षे जाहला निर्भर ॥ परि आठवले दुःखसागर ॥ षड्रर्भाचे ॥३४॥

आतां येईल कंसकाळ ॥ तो हा सांवळा वधील बाळ ॥ तंव बोलिला गोपाळ ॥ वसुदेवासी ॥३५॥

गोकुळीं नंदाचिये घरीं ॥ यशोदेच्या जन्मलीं उदरीं ॥ ते योग माया खेचरीं ॥ कुमारीरुपें ॥३६॥

आतां माझी चिंता न करीं ॥ मज घालीं नंदाचे घरीं ॥ यशोदा असतां निदसुरी ॥ आणिजे कंन्या ॥३७॥

ताता तुझा हरला शीण ॥ तूं सुतपा नामें ब्राह्मण ॥ तुझा पुत्र मी नारायण ॥ जाण निरुतें ॥३८॥

तुजलागी होता वर ॥ कीं तीन जन्म होईन कुमर ॥ तरी वामन आणि फरशधर ॥ तिसरा मी ॥३९॥

आतां तव जन्माचा भोग ॥ पुढील खंडिला कर्ममार्ग ॥ तूं पावलासि अपवर्ग ॥ मोक्षसुख ॥१४०॥

वासना उरलीसे पुत्रपणाची ॥ तेही पुरवीन गा तुमची ॥ क्रीडा खेळूनि गोकुळींची ॥ येईन मागुता ॥४१॥

करोनि कंसाचा निःपात ॥ पुरवीन तुमचा मनोरथ ॥ मग पावेल मोक्षस्वार्थ ॥ अंतकाळीं ॥४२॥

तंव तेथें आले सुरवर ॥ ब्रह्मादिक जे समग्र ॥ स्तविते जाहले उभय कर ॥ जोडोनियां ॥४३॥

मग ब्रह्मा करितसे स्तुती ॥ जयजया जी कमळापती ॥ गुणनिर्गुणा सर्वाभूतीं ॥ व्यापक तूं ॥४४॥

तूं सच्चिदानंदघन ॥ जन्मजरांचे निवारण ॥ एकबीज गा निर्माण ॥ प्रळयकाळींचें ॥४५॥

जैसी ऊर्णनाभीची दोरीलीलें ग्रासी आणि पसरी ॥ तैसा तूं गा श्रीहरी ॥ मूर्तिमंत ॥४६॥

तुझें आह्मां घडे दर्शन ॥ येवढें कैंचें महापुण्य ॥ परि भक्तकृपेस्तव अवतरण ॥ केलें तुवां ॥४७॥

तूं सच्चिदानंद सत्य ॥ तूं परिपूर्ण नित्यवंत ॥ तूं शुद्धबुद्ध अनंत ॥ ब्रह्मरुप ॥४८॥

तूं जीवनाचें जीवन ॥ तूं ज्ञानाचें विज्ञान ॥ तूं मोक्षाचें आदिस्थान ॥ ब्रह्मपाळका ॥४९॥

तुझा वर्णिता लीलाविलास ॥ सहस्त्रमुखीं श्रमला शेष ॥ मी करितसें वेदघोष ॥ चहूं मुखें ॥१५०॥

मग जाहली पुष्पवृष्टी ॥ देव गेले निजमठीं ॥ वाद्यें लागलीं वैकुंठी ॥ तये वेळीं ॥५१॥

गोकुळीं वसुदेवाची राणी ॥ जीचें नाम असे रोहिणी ॥ ते धाडिली लपवोनि ॥ कंसाभेणें ॥५२॥

तेथें त्या नंदाचे घरीं ॥ रामासि प्रसवली रोहिणी ॥ ॠतुत्रयाचें अंतरी ॥ धाकुटा कृष्ण ॥५३॥

आतां असो हे पुण्यकथा ॥ जन्म जाहला गोपिनाथा ॥ पुढील ऐका व्यवस्था ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥५४॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ कृष्णजन्मप्रकारु ॥ द्वितीयोऽध्यायीं कथियेला ॥१५५॥

॥ श्रीसांबासदाशिवार्पणमस्तु ॥

॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP