श्रीगणेशाय नमः
मग कोणे एके काळीं ॥ गोपाळांसहित वनमाळी ॥ उठोनिया प्रातःकाळीं ॥ शिदोरी मागे मातेशीं ॥१॥
तैसेचि आपआपुले मातांप्रती ॥ गोपाळ शिदोर्या मागती ॥ जयांसि ब्रह्मानंदमुर्ती ॥ वोडंवी हात ॥२॥
कांखेसि घेवोनि शिदोरी ॥ गोपाळांसहित श्रीहरी ॥ आला यमुनेचिये तीरीं ॥ क्रीडावयासी ॥३॥
मांडिला गोपाळीं जेवटा ॥ ग्रास घेती मटमटां ॥ घणी नव्हे त्यांचे पोटा ॥ अवघी शिदोरी भक्षिली ॥४॥
मग माध्यान्हाचे अवसरीं ॥ गोपाळ भुकेनें पीडले भारी ॥ विनवोनि ह्नणती श्रीहरी ॥ शिदोर्या सरल्या ॥५॥
जरी घरचें अन्न आणणें ॥ तरी माता करील तापणें ॥ आणि होईल लाजिरवाणें ॥ खादाड ह्नणोनि ॥६॥
मग बोलिला पुरुषोत्तम ॥ पैल दिसे ऋषिआश्रम ॥ निघतो आहे यज्ञधूम ॥ तेथें जावें झडकरी ॥७॥
तयांसि आमुची गोष्टी करुन ॥ ह्नणावें आले रामकृष्ण ॥ त्यांहीं मागितलें अन्न ॥ क्षुधें थोर पीडले ॥८॥
गोपाळ झडकरी निघाले ॥ ऋषीआश्रमा पातले ॥ पायां पडोनि ह्नणती विनविलें ॥ कृष्णें तुह्मां ॥९॥
ॠषि बोलिले अव्हेरुन ॥ आह्मीं करितों देवतार्चन ॥ आधींच कैसें द्यावें अन्न ॥ गोवळ्यासीं ॥१०॥
गोपाळ सांगती येउनी ॥ कृष्णा अन्न न देती मुनी ॥ काय करावें चक्रपाणी ॥ मागुती वाणी बोलत ॥११॥
तरी आतां सत्रद्वारी जावें ॥ ऋषिभार्योतें सांगावें ॥ त्या अन्न घेवोनि येती भावें ॥ ऐसें देवें बोधिलें ॥१२॥
गोपाळ ह्नणती नवल पाहों ॥ पुरुषांहोनि स्त्रियांस भावो ॥ हा तरी ऐकिला नवलावो ॥ भुकें प्राण जातसे ॥१३॥
गोपाळांसि बोले श्रीपती ॥ जावोनि पहावें मागुती ॥ येथें आज्ञा जे पाळिती ॥ तयां भुक्तिमुक्ती होईल ॥१४॥
मग हळुच चालत आले ॥ आश्रमा ऋषीचि पावले ॥ ऋषिभार्योसि बोलले ॥ कीं श्रीकृष्ण अन्न मागतो ॥१५॥
तंव तोषल्या ऋषिकामिनी ॥ थोर भाग्य आमुचें जनीं ॥ डोळां देखों चक्रपाणी ॥ मग विनविती पतीतेम ॥१६॥
परि त्यांसी ह्नणती मुनी ॥ देवतातृप्ति नाहीं अजूनी ॥ हे शास्त्रविरुद्ध करणी ॥ कैसी करावी ॥१७॥
आणि तुह्मी अपूर्व बोलतां ॥ अन्नें घेऊनि जाऊं ह्नणतां ॥ शंका न वाटे तुमचे चित्ता ॥ आह्मांजवळी बोलावया ॥१८॥
तंव भार्या बोलती वचन ॥ कायसें तुमचें संधास्नान ॥ काय पूजिता व्यर्थ पाषाण ॥ प्रत्यक्ष देव सांडुनी ॥१९॥
कृष्ण हा परब्रह्म केवळ ॥ शुद्ध आकारलें निराकार ॥ तुह्मां काय अविद्याफळ ॥ हरि अनुकूल नव्हेची ॥२०॥
चतुर्भुज मूर्ती सांवळी ॥ ती उपजतां वसुदेवें देखिली । उगेंचि कपाटें उघडिलीं ॥ द्विधा जाहली यमुना ते ॥२१॥
पांचां दिवसाचे बाळकें ॥ पूतना शोषिली निमिध्यें एकें ॥ तैचोसि दैत्य नानावेखें ॥ वधियेले तयानें ॥२२॥
नंद बैसला देवतार्चनीं ॥ रांगत आला चक्रपानी ॥ नंदाचे सकल देव गिळूनी ॥ आपण आसनीं बैसला ॥२३॥
धांवोनि धरी यशोदा ॥ तंव शंख चक्र पद्म गदा ॥ यशोदा दावीतसे नंदा ॥ हें अपूर्व पहा जी ॥२४॥
ऐसे पंवाडे वर्णितां ॥ शारदा न पुरे गीतगा ॥ झणीं तुह्मी अज्ञानें भ्रमतां ॥ तरी अन्न देइंजे ॥२५॥
यावरी आज्ञा देवोनि मुनी ॥ ह्नणती अळंकार भूषणें लेउनी ॥ षड्रसन्नताटें भरुनी ॥ घेऊनि जावें सत्वर ॥२६॥
त्यांतील एक ऋषि ह्नणे ॥ कैंचा कृष्ण अन्न न देणें ॥ आपुली स्त्री वर्जिली तेणें ॥ जाऊं नेदी हटाग्रहेम ॥२७॥
दाटोनि निघतां तयेसी ॥ येरें धांवोनि धरिलें केशीं ॥ मग बांधिली बळें वृक्षासी ॥ सकळ ऋषिदेखतां ॥२८॥
वरकड गेल्या निर्मळामनें ॥ तें देखिलें नारायणें ॥ गोपाळांत क्रीडतां तेणें ॥ मानिला परमानंद ॥२९॥
रुपें दिसे परमसुंदर ॥ मयूरपिच्छांचा श्रृंगार ॥ कांसे कसिलां पीतांबर ॥ गळां हार वनमाळा ॥३०॥
गोपाळस्कंधीं ठेवोनि हात ॥ येकाहातें कमळ भवंडित ॥ शिरीं खोंविले घोंसमुक्त ॥ कांसे मिरवे सोनसळा ॥३१॥
कानीं कमळ खोविलेंसे हरीं ॥ दीप्ती तयाची कपाळावरी ॥ कुंडलें झळकती मकराकारीं ॥ मुखें हास्य करितसे ॥३२॥
ऐसा सुंदर देखिला हरी ॥ वृंदावनीं त्या ऋषिनारीं ॥ मग प्रणिपात चरणावरी ॥ ऋषिपत्न्यानीं घातला ॥३३॥
परी जे झाडीं होती बांधिली ॥ ते पुढांच येवोनि राहिली ॥ तंव त्यांहीं पुसतां बोलिली ॥ मी आलें तुह्मां पुढें ॥३४॥
मग त्या आसनें रचिती ॥ तेथें हरी उपविष्ट होती ॥ येकी उदकें चरण क्षाळिती ॥ उटी देती चंदनाची ॥३५॥
त्यांहीं ताटें विस्तारिलीं ॥ आरोगणा कृष्णे सारिली ॥ अवधीं गोपाळें जेविलीं ॥ फोडी देती कर्पूरेंसी ॥३६॥
चोखे पानें विडे देती ॥ अनुक्रमें सर्वाप्रती ॥ मग त्यांसि आज्ञा देत श्रीपती ॥ जावें आपुले आश्रमा ॥३७॥
द्विजस्त्रिया बोलती कृष्णासी ॥ गृहा अनिष्टा कां धाडिसी ॥ आह्मी राहूं चरणापाशीं ॥ होऊनि दासी स्वामीच्या ॥३८॥
तूं शरणागतां वज्रपंजरु ॥ तरी कां करिसी अव्हेरु ॥ तुं भवसागरींचें तारुं ॥ वायां घरचारु कासया ॥३९॥
तूं दीनजनांचा उद्धरणी ॥ नाम पडिलें याचिवरुनी ॥ जरी न सोडविसी भवबंधनीं ॥ तरी नाथ कोण ह्नणेल ॥४०॥
सहस्त्रजन्में तप करिती ॥ तुज पावावया श्रीपती ॥ तो तूं पावलासि आह्मांप्रती ॥ तरी मागुता दवडिसी कां ॥४१॥
येक तुजसाधिती थोर कष्टीं ॥ येक राहिले गिरिकपाटीं ॥ तो तूं जोडलासि फुकासाठीं ॥ आतां घरापाठीं न लावावें ॥४२॥
येक राज्य सांडुनि गेले ॥ येकीं प्रपंच त्यागिले ॥ येकीं वनें पर्वत सेविले ॥ येकीं साधिले पंचाग्नी ॥४३॥
जप व्रत तप अनुष्ठान ॥ येकीं केलें कृच्छ्रचांद्रायण ॥ येकीं तुजला धरिलें मौन ॥ तरी ध्यानीं न दिससी ॥४४॥
येक पवनातें साधिती ॥ येक खेचरी मुद्रा लाविती ॥ येक ध्यानमूर्ती विलोकिती ॥ तवप्राप्ती व्हावया ॥४५॥
परिसीं लोह लागल्या जाण ॥ तत्काळ तयाचें होय सुवर्ण ॥ तैसें तुझें झालिया दर्शन ॥ बंधन कासया पाहिजे ॥४६॥
ऐसा तूं कष्टेंही न जोडसी ॥ तो तूं आह्मीं देखिला प्रत्यक्षीं ॥ आतां न वंचों गृहासी ॥ ह्रषीकेशी तुझी आण ॥४७॥
यावरी बोले श्रीहरी ॥ तुह्मी ऋषिभार्या पराव्या नारी ॥ इहलोकीं तरी दोषभारी ॥ परनारी चाळवितां ॥४८॥
आतां जावें आश्रमासी ॥ रात्रंदिन ध्यावें आह्मांसी ॥ बंधन न बाधी तुह्मांसी ॥ गृहाश्रमासी राहिल्यां ॥४९॥
मग त्या ह्नणती कैसें जाणें ॥ चित्त चैतन्य अंतःकरणें ॥ तुझे ठायी जाहलीं लीनें ॥ चलनवलन राहिलें ॥५०॥
मग बोलिले श्रीपती ॥ चलनवलनीं होईल गती ॥ सुखें जावें आश्रमाप्रती ॥ कृपावचनें बोलिला ॥५१॥
तंव त्या घालिती दंडवत ॥ कंठ जाहले सद्नदित ॥ नयनीं ढळती अश्रुपात ॥ विलोकिती कृष्णातें ॥५२॥
तनुकंप होती खेदादिक ॥ रोमांच उदेले अनेक ॥ प्रगटला भाव सात्विक ॥ तेम प्रेम भक्त जाणती ॥५३॥
मग कृपादृष्टीं विलोकिल्या ॥ पुढती नमूनी त्या निघाल्या ॥ परतोनि पाहत चालिल्या ॥ कृष्णें वायां दवडिलें कीं ॥५४॥
आह्मी पापी चांडाळें ॥ आह्मांसि कृष्णें दवडिलें ॥ हें घोर घर नव्हे भलें ॥ व्यर्थ जाहलें हरिविण ॥५५॥
ऐशा नारी शोक करिती ॥ त्या पावल्या आश्रमाप्रती ॥ मग ऋषि तयांतें पुसती ॥ येरीं स्थिती सांगितली ॥५६॥
जेणें बांधिली होती नारी ॥ तो ह्नणे कायसी गोवळ्याची थोरी ॥ बुद्धिवंत मी सर्वात भारी ॥ कदा जाऊं न दिल्ही ॥५७॥
तंव त्या ह्नणती तेथें आहे ॥ आह्मीं बोलाविली परि ती न ये ॥ येरु ह्नणे पैल बांधिली पाहें ॥ जाहलें काय तें न कळे ॥५८॥
मग जावोनि सोडी तयेसी ॥ तों चलनवलन नाहीं देहासी ॥ भूमी पडली प्रेता ऐसी ॥ मग ॠषी त्यासी बोलती ॥५९॥
ह्नणती आश्वर्य काय जाहलें ॥ सामर्थ्य तंव आकर्षिलें ॥ लिंगदेहा काढोनि नेलें ॥ दुसरें गेलें स्थूळदेहा ॥६०॥
आदिपुरुष हा सामर्थ्यवंत ॥ तया जावें शरणागत ॥ तोचि जीववील सत्य ॥ मग समस्त चालिले ॥६१॥
निघते जाहले अवघे मुनी ॥ तंव देखिला चक्रपाणी ॥ घालिती सर्व लोटांगणी ॥ स्तुति करोनी बोलिले ॥६२॥
कृष्णा आह्मी पापिये चांडाळ ॥ शास्त्रभिमानी केवळ ॥ तूं शुद्धबुद्ध घननीळ ॥ आह्मां पडळ अविद्येचें ॥६३॥
तूं निर्विकल्प निराकार ॥ झालासि भक्तांकारणें साकार ॥ आह्मीं नेणूं मूढ किंकर ॥ जोडोनि कर विनवितों ॥६४॥
तूं शरणागतां वज्रपंजर ॥ भक्तजनांसी अभयंकर ॥ वेदां न बोलवे बडिवार ॥ आतां अव्हेर न करीं गा ॥६५॥
तूं सामर्थ्यवंत कृपानिधी ॥ ऐसी बोलती वेदसंधी ॥ आह्मीं चुकलों जी विधी ॥ परिसें आतां विनंती ॥६६॥
जयजयाजी पुरुषोत्तमा ॥ त्रितापहारा मेघश्यामा ॥ अपराध थोर घडला आह्मां ॥ तो क्षमा करावाजी ॥६७॥
यावरी द्विजांसि बोले कृष्ण ॥ आह्मी गोवळे अज्ञान ॥ आह्मां ह्नणतां भगवान ॥ हें लोकांत मिरवूं नका ॥६८॥
पुढती बोलिलें कृपावंतें ॥ तुह्मीं थोर ॠषी वंद्य आह्यांतें ॥ कर जोडोनि विनवी त्यांतें ॥ आज्ञा काय ती कीजे ॥६९॥
मग प्रार्थिले ऋषेश्वरीं ॥ मृत्यु पावली असे नारी ॥ ते जीववीं गा श्रीहरी ॥ कृपा करोनी ॥७०॥
तंव बोलिले श्रीपती ॥ तुह्मीं जावें आश्रमाप्रती ॥ तेथें असेल ती वर्तती ॥ संदेह चित्तीं न धरावा ॥७१॥
सकळीं करोनि नमस्कार ॥ आश्रमा गेले ऋषेश्वर ॥ तंव राहाटत असे सुंदर ॥ अपूर्व थोर वर्तलें ॥७२॥
परिक्षिती बोलिले शुकदेवासी ॥ कीं संशय वाटला मानसीं ॥ उत्तम बुद्धि स्त्रियांसी ॥ तैसी ॠषीसी कां न जाहली ॥७३॥
मग शुक ह्नणे परिक्षिती ॥ त्वां प्रश्न केला उत्तमस्थिती ॥ जीव अनादि असती ॥ स्वामिभृत्यगती जीवेश्वर ॥७४॥
जीव कर्मे येती जाती ॥ स्त्री पुरुष पशु पक्षी होती ॥ कर्मेचि सकल पावती ॥ स्वर्गनरक ॥७५॥
ह्नणोनि राया अवधारीं ॥ जीव नव्हे पुरुष नारी ॥ येरीनीं आराधिला जन्मसहस्त्रीं ॥ ह्नणोनि अंतरीं आठवला ॥७६॥
शास्त्राभिमान ऋषींसी ॥ शापानुग्रह समर्थौसी ॥ भक्ति नुपजेचि मानसीं ॥ बंधन कैसें तुटेल ॥७७॥
यजन याजन अध्ययन ॥ अध्यापन प्रतिग्रह दान ॥ हें सामर्थ्य सकळजाण ॥ जरी हरिचरण घ्याती ॥७८॥
ह्नणोनि ते कर्मी श्रेष्ठ ॥ परि भक्ती नुपजेचि वरिष्ठ ॥ स्त्रियांसि बुद्धी जाहली स्पष्ट ॥ भवारिष्ट चुकवावया ॥७९॥
परिक्षिती राया अवधारीं ॥ शुद्ध भाव जो होता शरीरीं ॥ तो आकर्षोनि गेली नारी ॥ कृष्णालागीं भेटावया ॥८०॥
ऋषांसि हरि होय ऐसें कळलें ॥ तरी आत्महित नाहीं मागितलें ॥ ऋषिभायेंतेंचि जीवविलें ॥ काय गुंतले तयेवीण ॥८१॥
शुक ह्नणती गा परिक्षिती ॥ स्त्रियांसी येच जन्मीं जाहली गती ॥ परि पतींसि देहांतरीं प्राप्ती ॥ ह्नणोनि बुद्धि नुपजे त्यां ॥८२॥
साक्ष सांगेन याचि अर्थी ॥ कोणीयेक होता दुर्मती ॥ कल्पतरुची जाहलिया प्राप्ती ॥ परी मंदमती नेणे तो ॥८३॥
तो असतां शूद्रयाती ॥ जुं एक पाहिजे त्याचे शेतीं ॥ तोडूं गेला वनाप्रती ॥ केली विश्रांती वृक्षातळीं ॥८४॥
उठोनि वरतें पाहिलें ॥ तंव तें पैल खांदीं दिसलें ॥ चिंतितां जूं होऊनि खालीं पडलें ॥ घेवोनि आला अभागी ॥८५॥
पाउलें चारी रिघोनि वहिलें ॥ उभें राहोनि उभारिलें ॥ झाड तंव देतें मागितलें ॥ तरी कां दुसरें न मागेचि ॥८६॥
मग तो हतदैव परतला ॥ झाडातळीं उभा ठेला ॥ दुसरे खांदीसि बोलिला ॥ तेंही निघाला घेउनी ॥८७॥
तो कल्पतरु ऐसें कळलें ॥ परी जूंच तेणें मागीतलें ॥ तैसें येथें ऋषींस कळले ॥ परि नाहीं स्फुरलें आत्महित ॥८८॥
ह्नणोनि जन्मा येवोनि जीवें ॥ एका हरिसि शरण जावें ॥ हित आपुलें करावें ॥ न दवडावें आयुष्य ॥८९॥
श्रीभागवतींची व्युत्पत्ती ॥ शुकें निवेदिली परिक्षितीप्रती ॥ ती भक्तिभावें जे ऐकती ॥ तयां श्रीपती पावेल ॥९०॥
ॠषि ह्नणे गा जन्मेजया ॥ शुकें भागवत कथिलें तव पितया ॥ त्रिभुवना पवित्र करावया ॥ श्रवणमात्रें करोनी ॥९१॥
आतां असो हा विस्तार ॥ कथा होतसे येणें पसर ॥ मग गोकुळा आला शारंगधर ॥ गोपाळांसहित ॥९२॥
तंव इंद्राचें वर्षासन ॥ प्रतिवर्षी करावें हवन ॥ ह्नणोनि निघाले वजजन ॥ जे वडील नंदादिक ॥९३॥
मेळविली सकळ सामुग्री ॥ हिंडोनियां घरोघरीं ॥ दुग्धघृताच्या घागरी ॥ आणिताती ॥९४॥
शर्करा गोरस दधिघृतें ॥ पुष्पें फळें रसाळें अमितें ॥ तें साहित्य देखिलें श्रीकांतें ॥ करितां त्यांसी ॥९५॥
मग नंदातें ह्नणे श्रीहरी ॥ काय करणेम जी सामुग्री ॥ तंव बोलिला वार्षिकपरी ॥ कृष्णाप्रती ॥९६॥
कीं जाहला असतां ग्रीष्मांत ॥ मेघ विसर्जन पृथ्वीसि होत ॥ इंद्र उदकांतें असे वर्षत ॥ मेघवृंदें करोनी ॥९७॥
इंद्रआराधना सकळीं करावी ॥ जेणं अमित वृष्टी व्हावी ॥ तृण धान्यें वृद्धि पावावीं ॥ आणि उदकें ॥९८॥
इंद्र तरी मुख्य देवतांत ॥ आणि मनुष्यां परमदैवत ॥ जीवन सर्वा असे पुरत ॥ याचेनि हातें ॥९९॥
तंव सकळ गौळी बोलत ॥ नंदा तूं बोलिलासि असंमत ॥ परी विचारावें कृष्णानुमत ॥ हा सामान्य नव्हे कीं ॥१००॥
ते वेळीं नंदादिक बोलती ॥ कृष्णजीतें मत पुसती ॥ तो ह्नणे बहुत ज्ञाते जे सांगती ॥ तें सुखें करावें ॥१॥
झणी आह्मातें पुसाल जरी ॥ तरि तें न ये तुमचे विचारीं ॥ या कार्याची भरोवरी ॥ बहुत असे ॥२॥
इंद्रास जैं इंद्रपद जाहलें ॥ तरी काय मेघ नाहींत पहिले ॥ ब्रहयानें केवीं वाढविलें ॥ भूतजात ॥३॥
इंद्राचा इंद्रपदठाय ॥ ऐसा जैं वर्षासमय होय ॥ तैं मेघ आपणाचि वर्षत जाय ॥ सृष्टिलागीं ॥४॥
हे तरी अष्टौलोकपाळ ॥ अष्टदिशा रक्षिती सकळ ॥ पश्विमदिशेस वरुणाचळ ॥ तो वर्षे एक घोषें ॥ ॥५॥
घन द्रोण पवन पांगुळ ॥ अठ्याण्णवकोटींचा मेळ ॥ ते करिती कृषीचा सांभाळ ॥ वर्षती जीवन ॥६॥
हें काय सांगूं तुह्मांपुढें ॥ जया चित्ता जें आवडे ॥ त्यासी मानिती भावें दृढें ॥ तो मनोरथ पुरविता ॥७॥
शैवा ईश्वर पुरविता ॥ वैष्णवांसि विष्णुदेवता ॥ शाक्तां शक्ती पुरवी सर्वथा ॥ इच्छा त्याची ॥८॥
सौरांसि सूर्यचि देवता ॥ गणाधीश तो गणेशभक्तां ॥ जगदात्मा तयांची इच्छा पुरविता ॥ त्याच रुपें ॥९॥
जे अग्निहोत्राचे चाळिते ॥ ब्रह्मोपासनेतें बोलते ॥ त्यांसि अग्नीच पुरविते ॥ सर्वव्यापकत्वें ॥११०॥
किंबहुना अनेक वासना ॥ जो भावी तेचि भावना ॥ त्याची तैसीच कल्पना ॥ सिद्धि पावे ॥११॥
तेथें जाणावा काय इंद्र ॥ कायसे ह्नणावे ब्रह्मा रुद्र ॥ विष्णु सूर्य होकां समुद्र ॥ आह्मां दैवत ॥१२॥
असो ज्याचेनि आधारें ॥ तृणें उदकें भूमि विस्तारे ॥ तो सहसा मेघ न सांवरे ॥ अति आगळा ॥१३॥
विशेषें भूमीसि पर्वतांचें बळ ॥ आधीं जन्म अष्टकुळाचळ ॥ हा गोवर्धन त्यांसि मेळ ॥ भूमि अंतरीं जाणावा ॥१४॥
त्या मेरुच्या मस्तकावरी ॥ ब्रह्मा रुद्र आणि हरी ॥ अष्टौ लोकपाळांच्या नगरी ॥ इंद्र आदि करोनी ॥१५॥
त्या मेरुचे वंशीं गोवर्धन ॥ नेणा याचें महिमान ॥ इंद्राचे आधारें तुह्मी वर्तून ॥ अवज्ञा करितां शैलाची ॥१६॥
ऐशा बोलोनि नानायुक्ती ॥ गौळियां दाविली उणपत्ती ॥ तें आलें सकळांचे चित्तीं ॥ ह्नणती कृष्ण सत्य बोले ॥१७॥
ऐसें गोपाळां बुझांविलें ॥ इंद्रयाग सांडविला त्वरें ॥ मग आराधनें उदित जाहले ॥ पर्वताचे ॥१८॥
तंव गोवर्धनयात्रेची आयती ॥ नंदादि गौळी मांडिती ॥ अन्नें चतुर्विध करिती ॥ क्षीरघृतेंसीं ॥१९॥
त्या अन्नाचे जुंपिले गाडे ॥ गोंकुळामाजी चहूंकडे ॥ पालाणोनि रथ घोडे ॥ यात्रेलागीं निघाले ॥१२०॥
समस्त चालिले गोपाळ ॥ तरुण वृद्ध आणि बाळ ॥ सर्वसामुग्रीसिं उतावेल ॥ घेवोनियां आले तेथें ॥२१॥
पर्वताचे पूर्व भागासि ॥ मंडप घातले वेगेंसीं ॥ गौळी बाह्य द्वारदेशीं ॥ उतरले सकळ ॥२२॥
इकडे जंव ऐसें वर्तलें ॥ तंव गोवर्धनी काय निपजलें ॥ जें कृष्णदेवें चरित्र केलें ॥ अद्भुत पैं ॥२३॥
तया पर्वताचे तळवटे ॥ विशाळ रुप धरिलें मोठें ॥ सावयवें न दिसे प्रगटें ॥ पर्वताकार ॥२४॥
देखोनि समस्त गौळी गोपाळ ॥ आश्वर्य करिती सकळ ॥ तें कृष्णचरित्र अकळ ॥ देखते जाहले ॥२५॥
पर्वत प्रत्यक्ष बोले वचन ॥ ह्नणे जाहलों आजि प्रसन्न ॥ मग वेदघोष ब्राह्मण ॥ करिते जाहले ॥२६॥
मग आणोनि अग्रोदकें ॥ घागरीं रिचविली उदकें ॥ पूर आले गंगेचे निके ॥ परी पोट त्यांचे न भरेची ॥२७॥
निसणी लावोनि वोळंगती ॥ कुंकुमें श्रीखंडें अर्पिती ॥ पुष्पमाळा वरी घालिती ॥ तयालागीं ॥२८॥
पुढें नैवेद्यांचे डोंगर ॥ अन्नें रिचविती अपार ॥ येरु करी स्वाहाकार ॥ वेगवत्तरीं ॥२९॥
सरली नंदाची सामुग्री ॥ मग हिंडती घरोघरीं ॥ जें होतें जयाचे घरीं ॥ तेंही अन्न आणिलेम ॥१३०॥
तेहीं न पुरे वाढितां ॥ अति विस्मय वाटला समस्तां ॥ ह्नणती गृहासि जावोनि आतां ॥ वेगीं पाक करावे ॥३१॥
तंव गंभीरशब्दें बोल पर्वत ॥ आतां मी जाहलों रे नृप्त ॥ तुमचा पुरेल मनोरथ ॥ जो मनीं चिंतिला तो ॥३२॥
आश्वर्ये बोलती सकळ ॥ कृष्णासि ह्नणूंनये बाळ ॥ येणें आमुचें केले सफळ ॥ वृत्त आजी ॥३३॥
ऐसें सर्व गौळी बोलती ॥ तंव अदृश्य जाहली ते मूर्ती ॥ मग निघोनि गोकुळाप्रती ॥ येतेजाहले गोपाळ ॥३४॥
ऐसी पूजिली दीपावळी ॥ स्त्रानें दानें आनंदें केलीं ॥ मिळोनियां सकळ गौळी ॥ ब्रीदें बांधिलीं सकळांतें ॥३५॥
मात फांकली देशांतरीं ॥ कीं प्रत्यक्ष पूजा भक्षितो गिरी ॥ लोक घेवोनि सामुग्री ॥ देशोदेशींचे येताती ॥३६॥
तंव इंद्रास ह्नणे ब्रह्मंसुत ॥ तूं कां गा राहिलासि निश्वित ॥ नंदें पूजिलासे पर्वत ॥ तुझेनि करभारें करोनि ॥३७॥
इंद्र विचारी जंव मनीं ॥ तंव तो सत्य बोले मुनी ॥ मग बोलाविले तत्क्षणी ॥ मेघ चारी ॥३८॥
आणि पाचारोनि अष्टकुळाचळ ॥ जे कां पृथ्वीचे नित्यपाळ ॥ ह्नणे हा गोवर्धन अचळ ॥ भूमीपासोनि चाळवा ॥३९॥
ते ह्नणती नव्हे आह्याधीन ॥ सांप्रत असे कृष्णाधीन ॥ तेव्हां बोले सहस्त्रनयन ॥ मेघांप्रती ॥१४०॥
जरी असे अवतार देवाचा ॥ कृष्णदेह मनुष्याचा ॥ बोल ऐकूनि त्या बाळाचा ॥ गर्व केला व्रजजनीं ॥४१॥
गोपाळांची करितो सेवा ॥ हा नंद भुलला याचे भावा ॥ प्रत्यक्ष देव सोडोनि उडवां ॥ पूजिला कीं दगडाचा ॥४२॥
आतां त्यांचे गर्व सोडवीन ॥ माझें इंद्रत्व दावीन ॥ शिक्षा गौळियां लावीन ॥ मेघांकरवीं ॥४३॥
पाहों याची आंगवण ॥ जाणवेल कृष्णाचें विंद्रान ॥ कैसें करील निवारण ॥ तें पाहूं आतां ॥४४॥
ह्नणोनि बोलाविलें मेघकुकळ ॥ अठ्याण्णव कोटी महाढिसाळ ॥ जें करुं शकेल जगबरळ ॥ एकार्णव पैं ॥४५॥
मेघांसि बोले भगनेत्री ॥ तुह्मीं जावें गोकुळावरी ॥ वर्षोनियां मुसळधारीं ॥ सर्व नगर बुडवावें ॥४६॥
तंव सुटली सागरा ॥ तैसे मेघ वर्षेती धारा सणसणां येती त्वरें गारा ॥ आंवळें बेलें प्रमाण ॥४८॥
मग गाई गोवळ समस्त ॥ सांदोसांदीं भयें लपत ॥ माता घालिती अपत्य ॥ वस्त्रातळीं ॥४९॥
तेथें दाटला थोर अंधार ॥ स्नेहें नोळखती आपपर ॥ ह्नणती आतां कोपला इंद्र ॥ आह्यांवरी ॥१५०॥
आतां कोणा जावें शरण ॥ जो हें निवारील मरण ॥ तंव नाभी नाभी ह्नणे वचन ॥ कृष्णदेव ॥५१॥
ह्नणे आर्ती आणा माझी साडी ॥ घेवोनि वार्ता जाणवे पुढी ॥ जेणें पूजा घेतली रोकडी ॥ तो केवीं न राखे ॥५२॥
ते वेळीं अंधारे रातीं ॥ कृष्ण निघाला असे पुढती ॥ वरी मेघधारा वर्षती ॥ अपार जाणा ॥५३॥
जावोनि गोवर्धना तळीं ॥ पर्वत उचलिला समूळीं ॥ पडवा जाहला तये वेळीं ॥ गाई गौळी सुखी केले ॥५४॥
पर्वत वामहस्तें उचलिला ॥ वरी छत्राकार धरिला ॥ तेव्हां गौळियां बोभाइला ॥ थोरसादें पर्वत ॥५५॥
शब्द गौळियांचे कानीं पडला ॥ कृष्णाचा ह्नणोनि वोळखिला ॥ गाईगोपाळसमूह चालिला ॥ तयाचे तळीं ॥५६॥
ह्नणती हा नवलाव कैसा ॥ पर्वत जडला आकाशा ॥ जरी दैवत नव्हे हा ऐसा ॥ तरी उचले केविं हा ॥५७॥
तयांचे तळीं सुखाड बहुवस ॥ वारा नाहीं ना पाउस ॥ विजूंचा नाहीं रहिवास ॥ न लागे गोवर्धनासी ॥५८॥
गौळी त्यातळी सुखावले ॥ पर्वत राहिला पाउसबळें ॥ जंव सप्तदिन भरलें ॥ तंव वोसरलें मेघवृंद ॥५९॥
मग मेघ विचारिती मनीं ॥ येथें न चाले आमुची करणी ॥ त्यांसी रक्षिता समर्थ कोणी ॥ आहे निरुंता ॥१६०॥
ह्नणोनि ते वेळां मेघसत्वरा ॥ इंद्रलोकीं निघोनि गेला ॥ सहस्त्राक्षापुढें बोलिला ॥ जें वर्तलें गोकुळी ॥६१॥
ह्नणे ऐकें जी वज्रधरा ॥ मेघवर्षाव केला फारा ॥ गोकुळावरी अखंडधारा ॥ सप्तदिन वर्षलों ॥६२॥
तेथें वोडवला गोवर्धन ॥ कांही न कळे त्यांचे महिमान ॥ कोण राहिला असे उचलोन ॥ त्यावरी थेंब न पडेची ॥६३॥
इतुकें ऐकोनियां इंद्र ॥ गोकुळा आला सहपरिवार ॥ तंव देखताजाहला चमत्कार ॥ गोकुळींचा ॥६४॥
तेथें तो देखे जगजेठी ॥ वामकरीं उचलिला गिरिकूटी ॥ तळीं लावोनि तर्जनी बोटीं ॥ उभा असे ॥६५॥
मग दंडवत जाहला करिता ॥ ह्नणे जयजयाजी अनंता ॥ तुं अपरंपारा अव्यक्ता ॥ पुराणपुरुषा ॥६६॥
तूं अससी कैवल्यनिघान ॥ त्रैलोक्याचें भवजीवन ॥ आह्मां रुद्रादिकां करुन ॥ रक्षिसी जग ॥६७॥
देवा गहन तुझी हे माया ॥ तुवां विश्व मोहिलें जया ॥ कर्मपाशीं बांधोनि प्राणियां ॥ खेळवितोसी ॥६८॥
त्रिगुणांचे करोनि यंत्र ॥ जैसे लाघवीं खेळे खांबसूत्र ॥ तुं जीवबाहुलीं विचित्र ॥ नाचवितोसी ॥६९॥
मज कैंची येवढी योग्यता ॥ तुज वोळखाचें संपूर्णता ॥ जेथें मोहला विश्वकर्मा ॥ चतुरानन ॥१७०॥
मज अपत्यभावें स्थापिलें ॥ त्वां इंद्रपदीं बैसविलेम ॥ देवा आधिपत्य दीधलें ॥ त्रैलोक्याचें ॥७१॥
मी आहेम सर्वअपराधी ॥ जाहलों केवळ कुबुद्धी ॥ ते क्षमा करावी कृपानिधी ॥ सेवकासी ॥७२॥
इतुकें इंद्रें बोलून ॥ साष्टांगें घातलें लोटांगण ॥ करसंपुटें जोडोन ॥ पुढे उभा ठाकला ॥७३॥
जंव कृष्णें त्यासि पाहिलें ॥ तंव मागुती दंडवत घातलेम ॥ मग आश्वासन दीधलेम ॥ सहस्त्राक्षां ॥७४॥
इंद्रा न विचारीं आमुची लीला ॥ येणेम कार्य नये तुमचें फळा ॥ आह्मीं पाळितसों तुमची लीला ॥ अवताररुपें ॥७५॥
आह्मांसि दैत्याचें कैंवैर ॥ आणि देव तरी कैंचे मित्र ॥ जैं निर्मिलें चराचर ॥ तैं भेद कैंचा होता ॥७६॥
राजस तामस सत्वगुणी ॥ देवांदानवांची भांजणी ॥ प्रकृतिसंबंधें संजोगणी ॥ करणें लागे ॥७७॥
आह्मां त्यालागींच अवतरणें ॥ आणि हा खेळ खेळणें ॥ तुह्मी या ठेवाठेवीत न पडणें ॥ सर्वथाही ॥७८॥
त्वां वर्तावें आपुले स्थितीं ॥ तुज करवीन भागपावती ॥ दीपावळी चतुर्दशी करिती ॥ तैं स्त्रान दान ॥७९॥
अमावास्या वतेंल दान ॥ तें पितरांसी होय अर्पण ॥ पाडवां पूजावा गोवर्धन ॥ सकळजनीं ॥१८०॥
तूं जाई आपुले स्थाना ॥ प्रतिपाळीं देवब्राह्मणां ॥ गर्व सांडोनि वर्तना ॥ करीं सुखें ॥८१॥
मग इंद्रें प्रदक्षिणा करुनी ॥ चालिला तो गोकुळाहुनी ॥ कृष्णचरणातें वंदोनी ॥ निघता झाला ॥८२॥
मागुतीं आली कामधेनु ॥ आपुलें कुळरक्षक ह्नणून ॥ कृष्णासि अभिषेक करुन ॥ नाम ठेविले गोविंद ॥८३॥
इंद्र गेलिया अमरावती ॥ गोकुळीं असतां श्रीपती ॥ जेजे पंवाडे गोप खेळती ॥ तेते सर्व परिसावे ॥८४॥
हें इंद्रस्तुतिमहिमान ॥ जयां होय श्रवणपठण ॥ ते गोसहस्त्रफलदान ॥ आणि निर्वाण पावती ॥८५॥
इतुक्यांत शरत्प्रवर्तली ॥ कार्तिकशुक्क एकादशी आली ॥ जे कां प्रबोधिनी बोलिली ॥ हरिप्रिया ॥८६॥
दशमीसि दिंडी पेखणें ॥ एकादशीसि जागरणें ॥ ऐकती विष्णुकथा पुराणें ॥ हरीचीं पैं ॥८७॥
गोपगोपी गीतवाद्य आनंदें ॥ भावें नृत्य करिती छंदें ॥ वर्णिती नवरस अभिनक्वादें ॥ अवतारचर्चा ॥८८॥
ऐसिया जागरांतरीं ॥ रात्रीचे चतुर्थ प्रहरीं ॥ नंदें स्त्राना आयती केली ॥ पारणेंयासी ॥८९॥
कालिंदीतीरा नंद गेला ॥ सूर्योदय नाहीं जाहला ॥ तये समयीं स्त्रानासि निघाला ॥ जळामाजी ॥१९०॥
असंकल्प अधूतचरण ॥ व्रतनेमाचें उत्सर्जन ॥ न करितां हरिनामोच्चारण ॥ जळीं निघे ॥९१॥
न पाहतां रात्रिसमय मेळीं ॥ पवित्रता नाहीं तया जळीं ॥ मुहूर्त एक उदयकाळीं ॥ पूर्वेसि पहावें ॥९२॥
असो मग जळीं देत बुडी ॥ तंव जलदेवता पाय वोढी ॥ तो नेलासे लवडसवडी ॥ पाताळलोका ॥९३॥
नंद देखे वरुणनगरी ॥ तेथेम वरुणराजा सहपरिवारीं ॥ बैसलासे जळाभीतरीं ॥ सिंहासनीं ॥ ॥९४॥
गोकुळीं हाहाःकार जाहला ॥ ह्नणती नंद ढोहीं बुडाला ॥ कृष्णदेव पाहूं आला ॥ तेथें शुद्धी कारणें ॥९५॥
वोळखोनि बुडावयाचें कारण ॥ मग जळीं निघाला आपण ॥ तो वरुणलोका जाऊन ॥ पुढें उभा ठाकला ॥९६॥
जया कोटिसूर्याची दीप्ती ॥ ऐसा वरुणें वोळखिला श्रीपती ॥ मग करुनियां प्रार्थना स्तुती ॥ उचितानंद दीधला ॥ ॥९७॥
पुढती दंडवत घालतां ॥ ह्नणे जयजयाजी वैकुंठनाथा ॥ आजी वरुणलोकीं सफळता ॥ धन्य मी जाहलों ॥ ॥९८॥
धन्य माझीं मातापिता ॥ जो या देहाचा असे दाता ॥ त्यांचेनि प्रसादें अनंता ॥ भेटलासी ॥९९॥
जया आराधितां जन्मसहस्त्रीं ॥ योगी ध्याती निरंतरीं ॥ परि ध्यानीं न ये श्रीहरी ॥ तो प्रत्यक्ष देखिला म्यां ॥२००॥
मग कृष्णेम उचलिला माथा ॥ ह्नणे तूं न भियें गा सर्वथा ॥ कां आणिलासि नंदपिता ॥ तें कारण सांगिजे ॥१॥
वरुण ह्नणे न करितां शौचाचमन ॥ धूतपाद आणि दंतधावन ॥ येणें न केलें सूक्तपठण ॥ आणि स्मरण हरीचें ॥२॥
आणिक असे दुजें कारण ॥ म्यां पहावे देवाचे चरण ॥ आतां सफल जीवितप्रमाण ॥ जाहलें तवदर्शनें ॥३॥
मजसी केलें दिशापती ॥ आणि सकळ उदकांचा पती ॥ हे अवधीच तुझी संपत्ती ॥ द्रव्यरचना भ्रांतिपट ॥४॥
इतुकें तेथें वर्तलें ॥ तें नारदें दृष्टीं देखिलें ॥ श्रीकृष्णचरित्र वोळखिलें ॥ देवां दुर्लभ जें ॥५॥
मग तो घेवोनि नंद्रासी ॥ कृष्ण आला गोकुळासी ॥ वृत्त सांगे गौळियांसी ॥ जें सकळ वर्तलें ॥६॥
गौळी ह्नणती राजसद्रुरु ॥ आमुचा प्राणलिंग जगदीश्वरु ॥ इतुके दिन आह्मीं केला अव्हेरु ॥ याचा पार न कळतां ॥७॥
मग द्वादशीसी पारणें ॥ करिती विप्रसंतर्पणे ॥ विप्रां देवोनियां दानें ॥ केलेम व्रत विसर्जन ॥८॥
सकळ गौळी बैसले एकांतीं ॥ ह्नणती नंदा तूं सदैव गा भूपती ॥ त्वां देखिली वारुणावती ॥ आणि वरुणरावो ॥९॥
तें जाणवलें नारायणा ॥ ह्नणे सकळ चलारे स्त्राना ॥ मग ते नेले मज्जना ॥ यमुनेमाजी ॥२१०॥
जंव करिती अधमर्षण ॥ तों देखती विष्णुभुवन ॥ ब्रह्मादिक विष्णुगण ॥ असती जेथें ॥११॥
तयांमाजी मध्यस्थानीं ॥ कृष्ण देखिला सिंहासनीं ॥ तेथें वरुणादि कर जोडोनि ॥ असती उभे ॥१२॥
ऐसें देखोनियां चरित्र ॥ बाहेर परतले समग्र ॥ तया ब्रह्मानंदें निर्भर ॥ लोक जाहले ॥१३॥
तंव शरदृतूची सीमा लोटली ॥ मग क्रीडा आरंभिली ॥ मधुमाधवी प्रगटली ॥ वनामाजी ॥ ॥१४॥
मधुर आलाप सुस्वर ॥ रुंजी करिती पुष्पीं भ्रमर ॥ प्रगट जाहला नव श्रृंगार ॥ वनामाजी ॥१५॥
संयोगमैथुनी नर नारी ॥ वसंत पूजा घरोघरीं ॥ आनंद वर्तला राउळीं ॥ नंदाचिये ॥१६॥
फाल्गुन पौर्णिमेचे रात्रीं ॥ चंद्र प्रकाशला नक्षत्रीं ॥ तैसाचि कृष्ण निघाला बाहेरी ॥ क्रीडेलागीं ॥१७॥
तेणें वेणूचे नादस्वरें ॥ वेधियेलीम चराचरों ॥ रात्री जाहली विनादिनकरें ॥ आणि तमेंविण ॥१८॥
आणिक त्या यमुनेचें जळ ॥ गतीसि जाहलेम पांगुळ ॥ देवीं दाटलेम अंतराळ ॥ पहावया कौतुक ॥१९॥
पशुपक्षी होकां तरुवर ॥ नादें सर्व जाहले स्थावर ॥ गोकुळींचे चालिले भार ॥ वेणुनादें ॥२०॥
नादें बाळें सोडिती माता ॥ येकी आल्या न जेवितां ॥ येकी आल्या हो नेणतां ॥ भ्रतारासी ॥२१॥
गाईनीं त्यजिलें स्ववत्सां ॥ पवन निरोधला दशदिशां ॥ मग नाच मांडिला समरसा ॥ गोपिकांसी ॥२२॥
स्वर्गीहूनि गंधर्व किन्नर ॥ अप्सरादि विद्याधर ॥ दिव्यांगना येती सुंदर ॥ कृष्णदर्शनासी ॥२३॥
मीनलिया स्वर्गागना ॥ मानविया त्या गोपकन्या ॥ परि जालिया कृष्णदर्शना ॥ सुखी होती ॥२४॥
त्यांहीं मनोभावें सुरस ॥ मांडिलें वसंतपूजेस ॥ आरंभिला नृत्यरस ॥ कृष्णानुरागें ॥२५॥
दोनी जोडलिया अंगना ॥ मध्यें वेढिलें नंदनंदना ॥ ऐशा मांडिल्या रचना ॥ मंडपाकार ॥२६॥
जैसा सूर्य असे मंडलाकारी ॥ तो प्रतिबिंबे घटसहस्त्रीं ॥ प्रकाश पाहतां निर्धारी ॥ एकचि तो ॥२७॥
तैसा कृष्णलीलाविस्तार ॥ वृंदावनीं मनोहर ॥ दावितसे चमत्कार ॥ वेगळेपणें ॥२८॥
गोपी दहासहस्त्रमिता ॥ सकल कृष्णातें इच्छिती स्वतां ॥ मग रुपें जाहला धरिता ॥ पृथकाकार ॥२९॥
त्या गोपींचे करमेळीं ॥ दोहीं भुजीं तो वनमाळी ॥ ऐसी स्वेच्छें रचिली मंडळी ॥ असंख्यात ॥२३०॥
मध्यें असे आपण उभा ॥ जाणों मृगमदाचा गाभा ॥ वेणुवाद्याचे आरंभा ॥ जाहली विश्रांती ॥३१॥
तेणें वोळलें आनंदजळ ॥ वोलावलें स्तनयुगुळ ॥ कुंकुममिश्रित केवळ ॥ जाहलें कुचद्वय ॥३२॥
वदताती सप्तस्वर ॥ सामगायनविचार ॥ दाविती छंद परिकर ॥ सप्त मूर्छना भेद पैं ॥३३॥
वोडव तांडव संपूर्ण ॥ ग्रामत्रयांचें उच्चारण ॥ देशमार्गे विवरण ॥ गतीसहित ॥३४॥
हावभाव कळा कटाक्ष ॥ पूर्ण जाहलें रतिसुख ॥ परी तृप्ती नव्हतां दुःख ॥ पावती गोपी ॥ ॥३५॥
लास्य तांडव प्रेरण ॥ चौसष्टहस्तांचें लक्षण ॥ तें दावितसे आपण ॥ गोपिराज ॥३६॥
तंव सत्व सर्प आणि नुकुळ ॥ वैरें विसरलीं गा सकळ ॥ ऐकोनियां क्रीडारोळ ॥ गोविंदाचे ॥३७॥
गाई व्याघ्र मृग मयूर ॥ रीससांबरें आणि सूकर ॥ नावें विसरलीं पूर्व वैर ॥ गोविदाचेनि ॥३८॥
ऐसी क्रीडा ऐकोनि क्षितीं ॥ देवांसह आला सुरपती ॥ मातली सारथी ऐरावती ॥ अंतराळीं ॥३९॥
उभय जोडोनियां कर ॥ कृष्णासि करिती नमस्कार ॥ खड्र आणि शोभे छत्र ॥ मेघडंबर जया ॥२४०॥
तंव अग्निदिशेचा राव कृशान ॥ सप्तजिव्ह मेषवाहन ॥ तो कुंकुमवद नवर्ण ॥ रत्नदीप्ती ॥४१॥
यम नामेम दक्षिणापती ॥ जया पाश काळदंड हातीं ॥ महिष शोभे काळमूर्ती ॥ वाहन जया ॥४२॥
तंव आला नैऋत्यनृपवर ॥ जया वाहन शोभे सूकर ॥ तो कर जोडोनि नमस्कार ॥ करी गोविंदासी ॥४३॥
पश्विमेचा राव वरुण ॥ जळाधीश मृगवाहन ॥ करसंपुटें जोडोनि श्रीकृष्ण ॥ नमिला तेणें ॥४४॥
वायव्यकोणींचा राजा पवन ॥ जो सगुणरुपी सवाहन ॥ तेणें नमिला श्रीकृष्ण ॥ कर जोडोनियां ॥४५॥
उत्तरेचा सोमनृपवर ॥ जया मृगवाहन परिकर ॥ तेणें नमिला श्रीवर ॥ कर जोडोनियां ॥४६॥
ईशान्येचा राजा ईशान ॥ दशभुज पंचवदन ॥ आयुधें सहित शोभे वाहन ॥ वृषभ जयासी ॥४७॥
पाशुपत त्रिशूळ डमरु ॥ शंख चक्र कपाळवरु ॥ पिनाक हातीं आणि अहिहारु ॥ नागपाश जया ॥४८॥
ऐसे अंतरींहूनि स्तविती ॥ जयजयाजी कमळापती ॥ आह्मीं आतां होतों क्षितीं ॥ गोपाळ तुझे ॥४९॥
आतां असो हे क्रीडा केली ॥ कडिये घेतली एक बाळी ॥ तये घेवोनि गेला वनमाळी ॥ गोपिकांतुनी ॥२५०॥
तिये नेतां वृंदावनी ॥ तंव ती चढली साभिमानी ॥ कीं मीच एक आहें कामिनी ॥ सकळां माजी ॥५१॥
जातां देखिला एक तरु ॥ तो पुष्पीं आला वोतभारु ॥ मग तयेनेम प्रार्थिला शारंगधरु ॥ पुष्पालागीं ॥५२॥
कृष्णें ते उचलोनि खांद्यावरी ॥ उभी केली तरुपुष्पपत्रीं ॥ तंव फारचि जाहला शरीरीं ॥ गर्व तयेसी ॥५३॥
पुष्पें घेवोनियां त्वरें ॥ चाल ह्नणतां मुरहरें ॥ गर्वी गर्वे न देतां उत्तरें ॥ कोपला हरी ॥५४॥
तो गर्व जाणोनि मुरारी ॥ ते सांडिली वनांतरी ॥ तंव त्या आल्या समग्री ॥ गोपी तेथें ॥५५॥
तयेसि संभ्रमें पुसती सकळा ॥ केवीं चुकलीस गे गोपाळा ॥ मग ते घेतसे थांडोळा ॥ वनामाजी ॥५६॥
कष्टें करितसे धांवा ॥ ह्नणे कां रुसलासि देवा ॥ मी भुललें प्रपंचमावा ॥ मनीं गर्व धरियेला ॥५७॥
सांडोनिया पतिपुत्र ॥ गृहव्यापार जो सर्वत्र ॥ तो टाकोनि देखावया चरित्र ॥ आल्यें तुझें ॥५८॥
ऐशा सकळ होवोनि खेदक्षीण ॥ मनीं चिंतिती कृष्णचरण ॥ मग दीधलें देवें दर्शन ॥ प्रत्यक्षरुपें ॥५९॥
सकळा गेल्या लोटांगणी ॥ विनविताती कर जोडोनी ॥ कीं आह्मी अनुसरलों तुझ्या चरणीं ॥ तरी कां अव्हेर करिसी गा ॥२६०॥
चतुर्थप्रकारें असे भजन ॥ तयामाजी तूं कवण ॥ आह्मांसि पाहतां कृतघ्र ॥ होसि निरुतां ॥६१॥
एक भजतयासी भजती ॥ एक नभजतयाही अनुसरती ॥ परि भजतयासी न भजती ॥ ते उदास पैं ॥६२॥
भजतयासी उदासपण ॥ ते जाणावे गा कृतघ्र ॥ मग बोलिला संतोषूना ॥ कृष्णदेवो ॥६३॥
ह्नणे अखंड माझिये ध्यानीं ॥ तनमनधनप्राणार्पणां ॥ आसनीं भोजनीं शयनीं ॥ विसर न पडावा ॥ ॥६४॥
असो ऐसी हे सप्त अहोरात्री ॥ न कळे स्वर्ग ना धरित्री ॥ आनंदें पूर्ण कालिंदी तीरीं ॥ जाहलें चराचर ॥६५॥
मग स्वर्गा जाती देवांगना ॥ आणि गोकुळीं गोपांगना ॥ नमस्कारोनि कृष्णचरणां ॥ आपुलीं स्थानें पावती ॥६६॥
किती गौळिये होवोनि विस्मित ॥ ह्नणती हें काय अद्भुत ॥ सुपरिमळ कैंचा येत ॥ गोकुळभरी ॥६७॥
शब्द मांदळांचे वाजती ॥ गीतध्वनी ऐकिजेती ॥ अरिष्ट कीं आनंदस्थिती ॥ तें कल्पवेना ॥६८॥
नंदाचे मनीं विस्मय होत ॥ जरी रामकृष्ण खेळत ॥ तरी ते देखे निद्रिस्थ ॥ स्वसेजेसी ॥६९॥
गोपाळ आपुले ठाई ह्नणती ॥ कैंची मंगळतुरे वाजती ॥ स्त्रियांचे शब्द ऐकिजेती ॥ हे तंव कैचे ॥२७०॥
भाव तरी ऐसा गमत ॥ कोणी दैवत येथें खेळत ॥ तरी गौळियां कैंचे जीवित ॥ नासतील गोधनें कीं ॥७१॥
केउतें कपट केलें देवा ॥ हा काय दिसतो देखावा ॥ कोण लागेल प्रार्थावा ॥ देवदैवत ॥७२॥
आतां सुचित्त न दिसे निकें ॥ अवघे शरण चला अंबिके ॥ जे कृपेनें दुरितें असंख्यें ॥ शके वारुं ॥७३॥
गोकुळीं अरिष्टें बहुत उठलीं ॥ पैल ते अतिवृष्टी जाहली ॥ ते कृष्णें आपण चुकविली ॥ गोवर्धनावरी ॥७४॥
नेणों कैसे मेघ उठिले ॥ वारे असंभाव्य सुटले ॥ गारांचे सडे पडिले ॥ गोवर्धनीं या ॥७५॥
ऐसीं दुस्तरेम ऊठती ॥ जरी इष्टदेवता होय जागती ॥ तरी स्तुति करावी समस्तीं ॥ अंबिकेची ॥७६॥
तेवेळां अंबायात्रेसि चालिले ॥ गौळी गोपाळ पालणिले ॥ बैल गाडे शकट सजिले ॥ समस्तांनीं ॥७७॥
रुद्रपावनतीर्था आले ॥ सरस्वतीचें स्त्रान केलें ॥ अंबिकादर्शन घेतलें ॥ मग आले बिर्हाडा ॥७८॥
भोजनोत्तर समय रजनी ॥ नंद निजला असे शयनीं ॥ तों अजगर एक येउनी ॥ पाई झोंबला नंदाचे ॥७९॥
जंव तेणें पाय आंसुडिला ॥ तंव सर्प ग्रासूं लागला ॥ कृष्णा धांवरे ह्नणे वहिला ॥ आक्रोशत ॥२८०॥
कृष्णें आर्त शब्द ऐकिला ॥ क्षणामाजी धाविन्नला ॥ येवोनि सर्प हाणितला ॥ चरणघातें करोनी ॥८१॥
सर्पदेहाची निवृत्ति जाहली ॥ नरदेहमूर्ती उभी ठेली ॥ दोनी करसंपुटें जोडिली ॥ केले प्रणम्य ॥८२॥
ह्नणे जयजयाजी मुकुंदा ॥ जय माधवा परमानंदा ॥ तुझेनि फिटली देहबाधा ॥ शापाची ते ॥८३॥
मग त्यातें कृष्ण पुसत ॥ तूं कोणरे सांग निश्वित ॥ तुज सर्पयोनी जाहली प्राप्त ॥ कवणें गुणें ॥८४॥
तो ह्नणे मी सुदर्शन ॥ पूर्वील गंधर्वपती जाण ॥ अंगिराॠषी नग्न देखोन ॥ हांसलों त्यासी ॥८५॥
त्या ऋषीचिंया शापवचनें ॥ सर्प जाहलों तेणें गुणें ॥ तो आजी उद्धरलों चरणें ॥ तुझेनि देवा ॥८६॥
मग तो कृष्णें आश्वासिला ॥ येरु प्रदक्षिणूनि नमी तेवेळां ॥ नंदादिकां विस्मय जाहल ॥ कृष्णलीला देखुनी ॥८७॥
मग सकळ गौळी निघाले ॥ गोकुळासी त्वरें आले ॥ अंबिकादर्शनाचे पूर्ण जाहले ॥ मनोरथ तयाचें ॥८८॥
मग कोणे एके अवसरीं ॥ गंगाकलिंदीचे तीरीं ॥ विनोदकीडा खेळे मुरारी ॥ गोपालांसी ॥८९॥
क्रीडा मांडिली श्रीहरीं तव गंधर्वकन्या सुंदरी ॥ अप्सरा आणि विद्याधरी ॥ वोळगें येताती ॥२९०॥
तंव शंखचूड नामें गुह्यक ॥ तो कुबेराचा असे सेवक ॥ आणि कंसासुराचा विशेष ॥ मित्रचरी ॥९१॥
तो कुबेराचा शापदग्ध ॥ नाचतां चुकला तालछंद ॥ ह्नणोनि राक्षस जाहला मतिमंद ॥ शंखचूड तो ॥९२॥
मग तो चरित्र पहावया आला ॥ तेथें नवलावो देखिला ॥ देवकन्येसि असे मीनला ॥ कृष्ण खेळे ॥९३॥
ऐसेम देखोनि कोपला असुर ॥ पहा हो केवढा मनुष्याचा धीर ॥ स्वर्गोगनांचा तरी बडिवार ॥ खेळती यासी ॥९४॥
तरी आधीं यातेंच चाळवूं ॥ मग या स्त्रियांसि शिक्षा लावूं ॥ शेवटीं दोघांसि मार्ग दावूं ॥ यमपंथाचा ॥९५॥
शंख चूडाचा उद्यम ॥ न विचारितां पराक्रम ॥ जैसा देखतां एक यम ॥ प्राणी होय व्याकुळ ॥९६॥
ह्नणोनि गर्जत धाविन्नला ॥ पुढां येवोनि उभाठेला ॥ जैसा अवचितां उदेला ॥ धूमकेतू ॥९७॥
स्त्रियांसि सुडासुडी करुनी ॥ अवध्या निघाला घेउनी ॥ परि तयालागीं देखुनी ॥ हांसे कृष्ण ॥९८॥
दैत्य ह्नणे हा धीटमनाचा ॥ भयधाक न घरी आमुचा ॥ तरी आतां याचे मनाचा ॥ पुरवूं कोड ॥९९॥
दैत्य अंगावरी लोटला ॥ तो कृष्णें धरुनि आपटिला ॥ मारोनि मणी काढिला ॥ दिव्य त्याचा ॥३००॥
मग स्वर्गा गेल्या देवांगना ॥ कृष्ण आला वृंदावना ॥ आनंद जाहला त्रिभुवना ॥ कृष्णलीला देखतां ॥१॥
गोकुळीं नित्य विनोदें ॥ दर्शना येती गोपिका आनंदें ॥ कृष्णसुखसंगमवेधें ॥ भुलल्या सर्व ॥२॥
ऐसें वर्ततां गोकुळीं ॥ अरिष्ट नामेम महाबळी ॥ कंसें पाठविला तये वेळीं ॥ समस्त गौळी वधावया ॥३॥
तेणें दृष्टीं पाहोनि हरी ॥ घालूं पाहे मुखभीतरीं ॥ तंव धांवला मुरारी ॥ चरण धरी मागुती ॥४॥
भोवडिले वेढे सात ॥ तेणेंचतो जाहला प्रेत ॥ मग तें सर्व जाहलें श्रुत ॥ कंसासुरासी ॥५॥
इतुक्यांत येऊनि नारदमुनी ॥ कंसासि प्रबोधिती वचनीं ॥ तें कथिजेल पुढिलिये वर्णनीं ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥६॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ श्रीकृष्णलीलाप्रकारु ॥ पंचमोऽध्यायीं कथियेला ॥३०७॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥