श्रीगणेशाय नमः
आतां असो हें वत्साहरण ॥ कृष्ण बलदेव आपण ॥ वृंदावना गेले गोपजन ॥ खेळावयासी ॥१॥
तेथें देवद्रुमाचे तळीं ॥ छाया देखोनि सीतळी ॥ महीये घालोनि कांबळी ॥ बैसले सकळ ॥ ॥२॥
तेथें बलदेवाचे चरण ॥ कृष्णदेव चुरी आपण ॥ हें रामावतारींचें उत्तीर्ण ॥ जाणती संत ॥३॥
तंव गोप ह्नणती गा कृष्णा ॥ चला प्रवेशों तालवना ॥ पक्क फळांचिया भोजना ॥ मेळवों आह्मी ॥४॥
मग धांवले वेगें सकळ ॥ ताडझाडींत गोपाळ ॥ फळें भक्षोनि क्रीडारोळ ॥ करिती एकमेक ॥५॥
तंव तो आला धेनुकासुर ॥ सवें वृषभांचा परिवार ॥ महाथोर निशाचार ॥ कपटवेषी ॥६॥
तेणें देखोनि बळिभद्र ॥ धांवत आला सत्वर ॥ लत्ता हाणितसे सहस्त्र ॥ गोपाळांवरी ॥७॥
देखोनि कोपला बळिभद्र ॥ मग चरणीं धरिला असुर ॥ ताडावरी आपटोनि सत्वर ॥ चूर्ण केला ॥८॥
आणि त्याचा जो परिवार ॥ तो कृष्णें वधिला सत्वर ॥ तेथोनि राम आणि श्रीवर ॥ आले मंदिरा ॥९॥
पुढें कोणे एके काळीं ॥ गाईगोप मिळोनि सकळी ॥ संगें नसतां वनमाळी ॥ चरती पैं ॥१०॥
तीं उदकालागीं माध्यान्हकाळीं ॥ गेलीं यमुनेचि जळीं ॥ प्राशन करितां भूमंडळीं ॥ पडती गोपवत्सें ॥११॥
तेथें कृष्ण आला धांवत ॥ पाहे तंव तीं पावलीं मृत्य ॥ मग होवोनि विस्मित ॥ विचारित मनीं ॥१२॥
कीं नित्यनित्य यमुनातीरीं ॥ उदक घेती समग्री ॥ तरी आजि काय रात्रिभीतरीं ॥ जाहलें यांसी ॥१३॥
येथें सौभरी ॠषीचें स्थान ॥ मग दुष्ट कां पां जीवन ॥ जीवांसि होतसे पतन ॥ उदकस्पर्शे ॥१४॥
मग अभिमंत्रोनि जीवन ॥ कृष्णें त्यावंरी केलें सिंचन ॥ तैं निद्रिस्थापरी उठोन ॥ बैसले सर्व ॥१५॥
परी खेळतां चेंडुफळी ॥ चेंडु पडिला यमुना जळीं ॥ हे श्रीभागवतीं नाहीम बोली ॥ व्यासदेवाची ॥१६॥
मग वेधोनि कळंबावरीं ॥ उडी टाकितसे श्रीहरी ॥ धांडोळिली कालिंदी सत्वरी ॥ पाताळगामिनी ते ॥१७॥
तंव तेथेम कश्यापाचा सुत ॥ काळिया नामेम विख्यात ॥ फणा असे मिरवित ॥ एकोत्तरशतें ॥१८॥
तो गरुडाचेनि भेणें ॥ रमणकद्वीप सोडिलें तेणें ॥ सौभरीचेनि वरदानें ॥ आला तेथें ॥१९॥
मग ह्नणे जन्मेजय ॥ एक असे जी संदेह ॥ काळिया केवीं जाहला निर्भय ॥ यमुनेमाजी ॥ ॥२०॥
मुनि ह्नणे गा भारता ॥ यमुनेचिया जलजातां ॥ गरुड भक्षी नित्य बहुतां ॥ मत्स्यादिकांसी ॥२१॥
मग बोभाइले जळचर ॥ सौभरी तूं परमपवित्र ॥ तुझे असतां आह्मी परिवार ॥ परी गरुड भक्षितो ॥२२॥
मग ह्नणे ऋषेश्वर ॥ योजन एक विस्तार ॥ उदक स्पर्शमात्रें पक्षीद्र ॥ पडेल जाणा ॥२३॥
ऐसें जाणोनि शापवचन ॥ गरुडें वर्जिलें तें स्थान ॥ तंव तें दूतद्वारें ज्ञान ॥ जाहलें काळियासी ॥२४॥
तो जाणोनियां विचार ॥ तेथें येवोनि फणिवर ॥ पुत्रकलत्र सपरिवार ॥ नांदतसे ॥२५॥
असो तेथें आला मुरारी ॥ तो देखिला नागस्त्रीपरिवारीं ॥ शामसुंदर नरकेसरी ॥ बाळवयसा ॥२६॥
जो मदनाचें जन्मस्थान ॥ त्याचें रुप वर्णील कवण ॥ ज्याचे वेद होवोनि बंदिजन ॥ वाखाणिती ॥२७॥
मग त्या बोलती नागिणी ॥ तूं धाकुटा परि सर्वगुणी ॥ तुझीं लक्षणें देखोनि ॥ कृपा आह्मां उपजली ॥२८॥
येथें असे काळिया फणिवर ॥ दारुण तो महा विखार ॥ तुझा करील रे संहार ॥ क्षणामाजी ॥२९॥
तरी नो न मानी उत्तर ॥ तंव धाविन्नले विखार ॥ अष्टांगें वेढिलें शरीर ॥ गोविंदाचें ॥३०॥
परड खोडसे महाडुले ॥ शुद्धनाग सोनसळे ॥ तिडके शेलाटे शंखपाळे ॥ येऊन बाळेम झोंबती ॥३१॥
तयांसहि न मानित ॥ साउमां चालिला श्रीअनंत ॥ तंव देखिला धुंधुवात ॥ काळिया तो ॥३२॥
मग दोघां जाहली समफळी ॥ सर्प आदळिला पायांतळीं ॥ बैसता जाहला वनमाळी ॥ मस्तकावरी त्याचे ॥३३॥
त्यासी एकोत्तरशत फडा ॥ वरी नाचतसे ब्रह्मबांगडा ॥ दर्प हरोनि केला घोडा ॥ कृष्णदेवें ॥३४॥
तंव त्या पावल्या नागिणी ॥ विनविताती कर जोडोनीं ॥ देवा आह्मी तुझिया बहिणी ॥ चुडेदान द्यावें ॥३५॥
तूं गा अनाथाचा नाथ ॥ ऐसा पंवाडा विख्यात ॥ तरी कां वधितां जी कांत ॥ हा संकेत जाणोनी ॥३६॥
प्रभो यासी वधिलियावरी ॥ आह्मी होऊं अपवित्री ॥ तूं आमुचा अससी बंधु जरी ॥ तरी लाज राखावी ॥३७॥
ऐसा स्त्रियानीं दीनवचनीं ॥ प्रार्थिला तो चक्रपाणी ॥ मग देव तयांतें कृपावचनीं ॥ बोलतसे ॥३८॥
काळियासि ह्नणे अनंतु ॥ तूं गा ब्रह्मयाचा पणतु ॥ तरी तुझा करितां घातु ॥ बोल लागेल ॥३९॥
परी तुवां अपराध केला थोर ॥ गाईगोपां वर्तला संहार ॥ आतां येथून जावें सत्वर ॥ क्षणामाजी ॥ ॥४०॥
तंव बोले काळियाराणा ॥ मी भीतसें तुझिया वहना ॥ तो आह्मां ग्रासील कृष्णा ॥ समस्तांसी ॥४१॥
मग ह्नणे नारायण ॥ तवमस्तकीं माझा चरण ॥ तें देखोनियां सुपर्ण ॥ न करी कांहीं ॥४२॥
इकडे वर्तला कल्लोळ ॥ ह्नणती जळीं बुडाला गोपाळ ॥ गोपानीं कथिलें सकळ ॥ गोकुळीं वृत्त ॥४३॥
तंव जाहला हाहाःकार ॥ यशोदे दाटला गहिंवर ॥ सवें घेवोनि बळिभद्र ॥ आली यमुनेसी ॥४४॥
जाळीं टाकिती धीवर ॥ एक पाहती उभयतीर ॥ जळीं जाऊं ह्नणती समग्र ॥ महानदीच्या ॥४५॥
थोर होतसे वळसां ॥ यशोदा विसरली मानसा ॥ दृष्टी दिसे दाहीदिशां ॥ अंधार तयेसी ॥४६॥
पालवीं झांकिलासे माथा ॥ आक्रोशें बोभाइली माता ॥ आतां कैं भेटसी अनंता ॥ मागुता मज ॥४७॥
मग संकल्पिलें शरीर ॥ कॄष्णाविण हें अपवित्र ॥ आतां नकोरे मंदिर ॥ कृष्णाविणें ॥ ॥४८॥
अंग टाकिलें भूमंडळीं ॥ जैसी चंडवातें कर्दळी ॥ नातरी कमळिणी होय व्याकुळी ॥ जळेंविण ॥४९॥
पुत्रशोकाचेनि दुःखें ॥ बोलों आदंरिलीं पातकेम ॥ जयासि घडती असंखकें ॥ जन्मांतरींची ॥५०॥
जयांसि घडे ब्रह्मद्वेष ॥ तयाची कधी न वाढे वंश ॥ तीम पुत्रेविण उदास ॥ मातापितरें ॥५१॥
जो गाई हेम रत्नेम चोरी ॥ गुरुकुळाची निंदा करी ॥ पतिवंचक जे नारी ॥ तये घडे पुत्रशोक ॥५२॥
जे कां करिती पक्तिभेद ॥ परदोषांचा अनुवाद ॥ शिवविष्णूसी भेदाभेद ॥ ते पुत्रदुःख भोगिती ॥५३॥
परोपकारा समान पुण्य ॥ परपीडे समान पातक जाण ॥ तैसें दुःख पुत्रशोकाहून ॥ आणीक नाहीं ॥५४॥
ऐशा दुःखाचेनि भारें ॥ यशोदा दाटली गहिंवरें ॥ मग खुणाविलें बळिभद्रें ॥ कृष्णाप्रती ॥५५॥
आतां गा न करीं रळी ॥ माता होतसे व्याकुळी ॥ तंव तो निघाला वनमाळी ॥ भुजंगासहित ॥५६॥
देखतां जाहला जयजयकार ॥ सकळां भेटला श्रीकरधर ॥ मग पाठविला फणिवर ॥ समुद्रतीरासीम ॥५७॥
आनंदले व्रजजन ॥ तंव जाहला अस्तमान ॥ तेथें नाहीं सकळां भोजन ॥ रात्रदिवस ॥५८॥
अंधारें दाटलीसे रजनी ॥ तंव तो आला दावाग्नी ॥ निद्रेमाजी न देखती कोणी ॥ तंव अग्नी प्रज्वळला ॥५९॥
ज्वाळा धडकल्या गगनीम ॥ उठती मग खडबडोनी ॥ मार्ग पाहती चोहींकडोनी ॥ तंव अग्नीनें व्यापिलें ॥६०॥
घाबरोनि बोलती कृष्णासी ॥ काय करावें या अग्नीसी ॥ मग कृष्ण ह्नणे त्यांसी ॥ तुह्मी नेत्र झांकावे ॥६१॥
तेव्हां पसरोनियाम वक्त्र ॥ अग्नी ग्रासिला समग्र ॥ तया देवाधिदेवाचें चरित्र ॥ न कळे कवणा ॥६२॥
जंव गौळी नेत्र उघडिती ॥ तंव देखिला श्रीपती ॥ अग्नि लागला हे जाहली भ्रांती ॥ तयांलागीं ॥६३॥
असो समई उदेला दिनकर ॥ आनंदला व्रज परिवार ॥ समवेत घेवोनि नंदकुमर ॥ आले गोकुळीं ॥६४॥
मागुती कोणेएके काळीं ॥ भांडरिवटाचिये तळी ॥ गोपाळ मिळोनि सकळी ॥ खेळताती ॥६५॥
तंव प्रलंब नामें दैत्य येक ॥ तेणें धरिला गोपाळवेष खेळावया गोपां सन्मुख ॥ पातला तो ॥६६॥
डाव आणित आपणावरी ॥ ह्नणे बैसारे मजवरी ॥ तंव वोळखिला दुराचारी ॥ बळदेवें तो ॥६७॥
ऐसें जाणोनि त्याचे खांदीं ॥ बळदेव बैसला विनोदीं ॥ तंव दैत्य निघाला संधी ॥ पाहोनियाम ॥६८॥
जाणोनि तो दुष्ट असुर ॥ बळदेवें घातला महा भार ॥ भूमीं दाटोनि निशाचार ॥ मध्येंच मोडिला ॥६९॥
आणिक कोणे एके अवसरीं ॥ गोधनें चारितां मुरारी ॥ गोवर्धनाने पाठारीं ॥ घेवोनि आला ॥७०॥
मग जाहला संध्यावेळ ॥ गाई आणि गोपाळ सकळ ॥ टाकोनियां नदीचें पाळ ॥ अवघे गोठणीं बैसले ॥७१॥
तंव संवर्त नामेम दैत्यजाती ॥ तयाची असे अग्निमावशक्ती ॥ तेणें वणवा लाविला वनाप्रती ॥ देखती गोपाळ ॥७२॥
अग्नीचा भोंवता पडिला वेढ ॥ गाई आक्रोशें फोडिती हंबरडा ॥ गोपाळ येवोनि कृष्णापुढां ॥ काकुळती करिती ॥ ॥७३॥
मग कृष्णें उघडोनि वदन ॥ सकळ अग्नी केला प्राशन ॥ तें देवाचें विंदान ॥ देखिलें गोपाळीं ॥७४॥
रात्री सागती घरोघरीं ॥ कृष्णें केली नवलपरी ॥ वणवा लागला डोंगरीं ॥ तो मुखीं गिळियेला ॥७५॥
मागुती कोणे एके अवसरीम ॥ गौळियांच्या मिळोनि कुमरी ॥ जावोनि यमुनेचिये तीरीं ॥ पूजिती गौरी ॥७६॥
वाळुवेची करोनि गौरी ॥ पूजा मांडिली नानोपचारीं ॥ गीत नृत्य मंगल वाजंत्रीं ॥ जयजयकार वर्तला ॥७७॥
मग निघाल्या जलकेली ॥ वस्त्रें ठेवोनि यमुनेपाळीं ॥ इतुक्यांत आला वनमाळी ॥ लपत तेथें ॥७८॥
उदकीं नग्न होत्या कुमरी ॥ जळ सिंचित एकमेकींवरी ॥ तें देखोनियां पूतनारी ॥ नवल करी तेधवां ॥७९॥
त्यांचिये वस्त्रांतें घेवोन ॥ कदंबीं केलें आरोहण ॥ तंव त्या पोरी खेळोन ॥ वस्त्रें घेऊं पातल्या ॥८०॥
वस्त्रें न दिसती तीरीं ॥ मग भयभीत जाहल्या नारी ॥ वस्त्रें विचारीती येरयेरीं ॥ काय जाहलीं ह्नणोनी ॥८१॥
ह्नणती न देखिले नरनारी ॥ तरी काय नेलीं जळचरीं ॥ किंवा पक्षियें अंबरीं ॥ नेलीं काय ॥८२॥
मनुष्याचें नोहे कारण ॥ हें देवाचें वाटतें विंदान ॥ आतां घरीम जावें आपण ॥ कैसेपरी ॥८३॥
वरी येवोनि पाहती ॥ जंव मनुष्याचा मार्ग गंवसिती ॥ तंव पाउलें देखिलीं अवचितीम ॥ कदंबातळीं ॥८४॥
जंव पाहिलें वृक्षावरी ॥ तंव देखिला श्रीहरी ॥ लज्जेनें जळाभीतरीं ॥ जावोनि दडाल्या ॥८५॥
मग बोलती येरयेरी ॥ हा येथें कैचा आला वैरी ॥ जावोनि सांगेल आमुच्या घरीं ॥ ताडणातें करवील ॥८६॥
उदकामाजी आकंठवरी ॥ अवयव लपविती सुंदरी ॥ झणीं हो देखेल बाहेरी ॥ ह्नणोनियां ॥८७॥
मग येती काकुळती ॥ वस्त्रें द्यावीं जी श्रीपती ॥ आह्मां वडिल कोपती ॥ काय मग करावें ॥८८॥
आह्मीं पराव्या असतां नारी ॥ दृष्टीं अभिलाषितोसि जरी ॥ तरी सांगों तुझे घरीं ॥ थोर अवस्था करोनी ॥८९॥
नातें गोत्र न विचारिसी ॥ रळिया करिसी आह्मासी ॥ सामर्थ्यपणें न लेखिसी ॥ हें बरवें नव्हे ॥९०॥
तुज नाहीं आपपर ॥ धर्माधर्म कुळगोत्र विचार ॥ यातायाती कुळाचार ॥ तुज नाहीं कदापि ॥९१॥
ऐसें बोलती त्या चतुर ॥ तंव हांसोनि बोले शारंगधर ॥ ह्नणे आधीं निघा बाहेर ॥ मग वस्त्रें देईन मी ॥९२॥
तुह्मी तरी अपराधी नारी ॥ वस्त्रें सांडोनि यमुनातीरीं ॥ हिंडतसा जळाभीतरीं ॥ भय नाहीं कोणाचें ॥९३॥
तुमचा देखिला अन्याय थोर ॥ त्याचा दंड करणें साचार ॥ तरी सूर्यासि करा नमस्कार ॥ कर जोडोनी ॥९४॥
मग त्या विचारिती सकळा ॥ कीं हे मात जाईल गोकुळा ॥ आणिक उपाय न देखों डोळां ॥ कृष्णा शरण रिघावें ॥९५॥
सकळीं करा गे प्रणाम ॥ न सांडावें हें वचन ॥ जरी जाईल आपुला प्राण ॥ तरी प्रगट न करावें ॥९६॥
मग त्या निघती बाहेरी ॥ अवयव झांकिती दोनीकरीं ॥ तयांसि ह्नणे मुरारी ॥ दोनी कर जोडावे ॥९७॥
देहभाव सांडिल्या विण ॥ नाहीं पातकासी पुरश्वरण ॥ लटिकें बोलेन तरी आण ॥ यशोदेची ॥९८॥
मग त्या जोडोनियां कर ॥ सूर्यासि करीती नमस्कार ॥ कृष्णें वस्त्रें अलंकार ॥ दीधले सकळ ॥९९॥
कुमारी आल्या गोकुळा ॥ टाळ्या पिटीती सकळा ॥ आठविती कृष्णलीला ॥ आनंदोनि निर्भर ॥१००॥
राया यापरी प्रति दिनीं ॥ पंवाडे खेळे चक्रपाणी ॥ तो देवाधिदेव शिरोमणी ॥ ब्रह्मादिकां दुर्लभ ॥१॥
आतां याचिये पुढील कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ तें ऐकावें संत श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥२॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ कृष्णलीलाविचारु ॥ चतुर्थोऽध्यायींकथियेला ॥३॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥