कालो मायामये जीवे जीव आत्मनि मय्यजे ।
आत्मा केवल आत्मस्थो विकल्पापायलक्षणः ॥२७॥
पुरुषाची पूर्ण क्षोभकता । तोचि काळ बोलिजे तत्त्वतां ।
उत्पत्ति-स्थिति-प्रलयांता । तिनी अवस्था काळाच्या ॥५७॥
तिनी अवस्था लोटल्या ठायीं । काळासी कर्तव्यता नाहीं ।
तो उपजत व्यापारें पाहीं । जीवाचे ठायीं सामावे ॥५८॥
अचेतनीं चेतविता । जडातें जो जीवविता ।
यालागीं जीवू ऐशी वार्ता । जाण तत्त्वतां पुरुषाशी ॥५९॥
प्रकृतीचेनि योगें जाण । शुद्धासी बोलिजे जीवपण ।
पुरुषू हेंही अभिधान । त्यासीच जाण बोलिजे ॥५६०॥
करितां प्रकृतिविवंचन । केवळ मृगजळासमान ।
दिसे परी साचपण । सर्वथा जाण असेना ॥६१॥
मृगजळामाजीं जो पडे । तेथ जळ नाहीं मा तो कोठें बुडे ।
तेवीं प्रकृति नसतां जोडे । वाडेंकोडें जीवत्व कोणा ॥६२॥
जळीं बुडालें दिसे व्योम । सत्य मानणें तो मूर्खधर्म ।
तैसें रुप नाम गुण कर्म । हा मिथ्या भ्रम मायिक ॥६३॥
प्रकृतिकाळींही जाण । सत्य नाहीं जीवपण ।
तेही अर्थींची निजखूण । उद्धवा संपूर्ण अवधारीं ॥६४॥
स्वयें अवलोकितां दर्पण । दर्पणामाजीं दिसे आपण ।
तरी आपुलें वेगळेपण । स्वयें आपण जाणिजे ॥६५॥
तेवीं प्रकृतिधर्म करितां । जरी दिसे प्रकृतिआंतौता ।
तरी मी प्रकृतीपरता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥६६॥
दिसे व्योम जळीं बुडालें । परी तें नाहीं वोलें झालें ।
तेवीं प्रकृतिकर्म म्यां केलें । नाहीं माखलें ममांग ॥६७॥
यापरी करितां निर्वाहो । प्रकृतीचा झाला अभावो ।
तेव्हां जीवशिवनांवें वावो । जीव तोचि पहा हो परमात्मा ॥६८॥
जीवाचें गेलिया जीवपण । सहजेंचि उडे शिवपण ।
दोघेही आत्मत्वें जाण । होती परिपूर्ण पूर्णत्वें ॥६९॥
जीवासी निजस्वरुपआठवो । या नांव जीवाचा परब्रह्मीं लयो ।
परमात्मा अज अव्ययो । अविनाश अद्वयो अनंत ॥५७०॥;
ब्रह्मीं स्फुरेना । तेथ ’मी तूं’ म्हणे कोण ।
परमानंद परिपूर्ण । उरे जाण उद्धवा ॥७१॥
ऐसा परमानंद म्हणसी कोण । तो मी अज अव्यय श्रीकृष्ण ।
आनंदस्वरुप तो मी जाण । मजवेगळें स्थान असेना ॥७२॥
ज्या स्वानंदा नांव श्रीकृष्ण । तें तुझें स्वरुप उद्धवा जाण ।
तेथ नाहीं गा मीतूंपण । परम कारण उर्वरित ॥७३॥
उद्धवा जीवाचा जीव मी श्रीकृष्ण । मज तुज नाहीं वेगळेपण ।
यालागीं जीवाची हे निजखूण । परम कारण सांगीतलें ॥७४॥
जगाचा आत्मा श्रीकृष्ण । त्या माझा आत्मा तूं उद्धव पूर्ण ।
हें ऐकोनि श्रीकृष्णवचन । उद्धव जाण गजबजिला ॥७५॥
कृष्ण मज म्हणे आपुला आत्मा । परी मी नेणें कृष्णमहिमा ।
अगाध लीला पुरुषोत्तमा । ते केवीं आम्हां आकळे ॥७६॥
नाथिलेंचि उद्धवपण सांडितां । कृष्ण निजधामा जाईल तत्त्वतां ।
ते न साहवे अवस्था । सखेदता सप्रेम ॥७८॥
हे उद्धवाची अवस्था । कळों सरली श्रीकृष्णनाथा ।
तेचि अर्थीची हे कथा । शब्दार्थता निरुपी ॥७९॥