एकनाथी भागवत - श्लोक २ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


आसीज्ज्ञानमथो ह्मर्थ एकमेवाविकल्पितम् ।

यदा विवेकनिपुणा आदौ कृतयुगेऽयुगे ॥२॥

जेवीं निजेल्या पुरुषाची छाया । पुरुषातळीं जाय लया ।

तेवीं सविकार गिळोनि माया । ब्रह्म एकल्या एकाकी ॥७२॥

ब्रह्म एकाकी परिपूर्ण । हेंही म्हणावया म्हणतें कोण ।

नाहीं नाम रुप व्यक्ति पूर्ण । ब्रह्मीं ब्रह्मपण स्फुरेना ॥७३॥

तेथ नाहीं युगसंख्या काळ वेळ । नाहीं दिनमान घटिका पळ ।

नाहीं शून्यत्वें शून्य मंडळ । ब्रह्म केवळ परिपूर्णत्वें ॥७४॥

तेथ मी ब्रह्म हें स्फुरे जें स्फुरण । तेंचि मायेचें मुख्य लक्षण ।

तेंचि प्रकृतिपुरुषांचें जन्मस्थान । जावळीं फळें जाण जन्मलीं ॥७५॥

जेवीं कां कवळूनियां कण । निकण कोंडा वाढे आपण ।

तेवीं पुरुषयोगें पूर्ण । प्रकृति जाण थोरावे ॥७६॥

धरुनि गोडपणाचा सांठा । फणसाअंगीं वाढे कांटा ।

तेवीं पुरुषयोगें ताठा । चढला मोठा प्रकृतीसी ॥७७॥

जेवीं कां डोळींचेंचि जळ । गोठोनि डोळां होय पडळ ।

तेवीं ब्रह्मीं मायामळ । करी शबळ शुद्धासी ॥७८॥

पडळ डोळा मंद करी । माया निजानंद आवरी ।

वाढोनि त्याची त्याचिवरी । वेडा करी पुरुषातें ॥७९॥

ऐसें कर्तेनवीण आपसया । कार्यकारण जें आलें आया ।

त्यातें कृतयुग म्हणावया । वेदू लवलाह्या उदेला ॥८०॥

अकार-उकार-मकारेंसीं । वेदू उपजे प्रकृतिपुरुषीं ।

जेवीं उकलल्या बीजासी । प्रथम ये त्यासी तिवणा डिरु ॥८१॥

ते वेदींचा अभिप्रावो । ब्रह्म सत्य माया वावो ।

आपुलेनि अभेदें ब्रह्मभावो । विवेकनिपुण पहा वो जाणती ॥८२॥

ऐसे वेदविवेकें अभेदयोगी । ते कृतादि होत कां कलियुगीं ।

वर्ततां ते सदा अयुगीं । युग त्यालागीं असेना ॥८३॥

कृतयुगादि युगपंक्ती । चराचर नाना व्यक्ती ।

यांसी उपजवी प्रकृती । तिची उत्पत्ती हरि सांगे ॥८४॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP