प्रकृतिर्ह्मस्योपादानमाधारः पुरुषः परः ।
सतोऽभिव्यञ्जकः कालो ब्रह्म तत् त्रितयं त्वहम् ॥१९॥
ब्रह्मावेगळी माया । सर्वथा न ये आया ।
ते ब्रह्माधारें वाढोनियां । गुणकार्या वाढवी ॥७६॥
मायानियंतें ब्रह्म आपण । यालागीं यासी पुरुषपण ।
पुरुषाची प्रिया माया पूर्ण । प्रकृति अभिधान या हेतू ॥७७॥
ब्रह्माहून पुरुष भिन्न । हें सर्वथा मिथ्या वचन ।
ब्रह्म पुरुष नामाभिधान । एकासीचि जाण आलें असे ॥७८॥
माया प्रक्रृति अभिधान । दोहीं नांवीं मायाचि पूर्ण ।
आविद्यक दावी कार्य भिन्न । अविद्या जाण या हेतू ॥७९॥
माया ब्रह्मींची शक्ति जाण । तेही ब्रह्मेंसीं असे अभिन्न ।
वेगळी नव्हे अर्धक्षण । सदा सुलीन ब्रह्मेंसीं ॥४८०॥
जेवीं शूरांची शौर्यशक्ति पूर्ण । शूरांहोनि नव्हे भिन्न ।
तेवीं ब्रह्मीं मायाशक्ति जाण । असे सुलीन सर्वदा ॥८१॥
माया ब्रह्मीं असतां जाण । क्षोभेंवीण नव्हे सर्जन ।
मायाक्षोभकू काळ पूर्ण । काळास्तव जन जन्मती ॥८२॥
ब्रह्मींची सत्ता तो काळ जाण । प्रकृति क्षोभवूनि आपण ।
दावी उत्पत्ति स्थिति निदान । तो काळही अभिन्न ब्रह्मेंसीं ॥८३॥
जेवीं रायाच्या राजपुत्रासी । राजाचि दमूं शके त्यासी ।
तेवीं झालें जें प्रकृतीचे कुशीं । तें निजसत्तेसी निर्दळी ॥८४॥
विवेकदृष्टीं पाहतां जाण । काळ परमात्मा दोन्ही अभिन्न ।
प्रकृति पुरुष काळ जाण । तिहींसी एकपण या हेतू ॥८५॥
ब्रह्ममाया-काळसंबंध । हे तिनी मूळींचि अभेद ।
दिसे जो व्यावहारिक भेद । तोही अबद्ध मिथ्यात्वें ॥८६॥
वस्तु एकलीचि आपण । प्रकृति-पुरुष काळरुपें जाण ।
अखंडत्वें दावितां पूर्ण । तो मी श्रीकृष्ण परमात्मा ॥८७॥
उत्पत्तीपूर्वीं मी ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीचें मी ब्रह्म आदिकारण ।
स्थितिकाळीं मी ब्रह्मरुपें जाण । एकीं अनेकपण स्वयें दावीं ॥८८॥
स्वलीला सृष्टीचे प्रांतीं जाण । प्रळयीं उरें मी ब्रह्म परिपूर्ण ।
तेचि अर्थीचें निरुपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥८९॥;