वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेत्यहं त्रिवृत् ।
तन्मात्रेन्द्रियमनसां कारणं चिदचिन्मयः ॥७॥
अहंकार अतिदुर्धर । गुणानुसारें त्रिप्रकार ।
गुण अहंता दृढ संसार । गुणविकार तो ऐसा ॥१५॥
प्रथम अहंभावो सात्त्विक । झाला अंतःकरणद्योतक ।
तोचि देवताविकारजनक । यालागीं वैकारिक बोलिजे त्यासी ॥१६॥
अहंकार जो राजसू । तो ज्ञानकर्मेंद्रियप्रकाशू ।
वांछी रजतेजविलासू । यालागीं तैजसू बोलिजे ॥१७॥
तामसाहंकाराची सिद्धी । सूक्ष्म भूतांतें उत्पादी ।
यालागीं म्हणिजे तो भूतादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥१८॥
नवल अहंकाराची थोरी । सचेतना अचेतन नोवरी ।
स्वयें लग्न लावी प्रीतीवरी । चिदचिद्ग्रंथी पुरी पाडूनी ॥१९॥
चिन्मात्रस्वरुपता जीवासी । लग्न लावी जड देहेंसीं ।
’ओं पुण्या’ एकात्मतेसी । कर्ता ज्योतिषी अभिमान ॥१२०॥
जीव ज्ञानस्वरुप चोखडा । तो करोनि जड मूढ वेडा ।
दृढ घाली हाडांचे खोडां । तो हा धडफुडा अहंकारु ॥२१॥
तोचि सात्त्विक आणि राजस । होऊनि तिसरा तामस ।
त्रिविध विकारीं बहुवस । वाढवी असोस संसारु ॥२२॥