एकनाथी भागवत - श्लोक १२ व १३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


देवानामोक आसीत्स्वर्भूतानां च भुवः पदम् ।

मर्त्यादीनां च भूर्लोकः सिद्धानां त्रितयात्परम् ॥१२॥

अधोऽसुराणां नागानां भूमेरोकोऽसृजत्प्रभुः ।

त्रिलोक्या गतयः सर्वाः कर्मणां त्रिगुणात्मनाम् ॥१३॥

मागील श्लोकाचे अंतीं । भूर्भुवःस्वर इति ।

यापरी त्रिलोकी श्रीपती । जाण निश्चितीं बोलिला ॥६३॥

तेंचि पुढील श्र्लोकार्था । पाताळलोक होय चौथा ।

तो मृत्युलोक एकात्मता । जाण तत्त्वतां व्याख्यान ॥६४॥

इंद्रादि सकळ देवांसी । स्वर्ग निजमंदिर त्यांसी ।

यक्षरक्षभूतगंधर्वांसी । निवासासी अंतरिक्ष ॥६५॥

जेणें पाविजे निजमोक्षासी । जेथूनि गमन लोकांतरासी ।

ते कर्मभूमी मनुष्यासी । निजभाग्येंसीं भूर्लोक ॥६६॥;

त्रिलोकीवरतें जाण । सिद्ध वोळंगती आपण ।

तें सिद्धांचें सिद्धिस्थान । वसतें जाण निरंतर ॥६७॥

अतळ वितळ सुतळ । रसातळ महातळ ।

तळातळ आणि पाताळ । अधःसंख्या सकळ पाताळा ॥६८॥

सप्तपाताळीं अधिकारमेळू । अतळीं वसे मयपुत्र बळू ।

प्रतापें अतिप्रबळू । दैत्यमेळू समुदाय ॥६९॥

वितळीं वसे हाटकेश्वरु । जो उमाकांत कर्पूरगौरु ।

जेथिले हाटकनदीचा पूरु । सुवर्णसंभारुप्रवाही ॥१७०॥

सुतळीं महावैष्णव बळी । ज्याचा द्वारपाळ वनमाळी ।

प्रर्‍हादही त्याचिजवळी । वैष्णवकुळीं नांदत ॥७१॥

त्रिपुर भेदूनि शंकरु । रसातळीं स्थापिला मयासुरु ।

तो मायालाघवी महावीरु । सपरिवारु वसताहे ॥७२॥

महातळीं कद्रूसुत । जे विषधर क्रोधयुक्त ।

ते सर्प जाण समस्त । तेथ नांदत निजवासें ॥७३॥

तळातळीं नांदती दानव । निवातकवची वीर सर्व ।

फणिमुख्य राजगौरव । रचना अपूर्व ते ठायीं ॥७४॥

सातवे पाताळीं वसती नाग । शतसहस्त्र फणिगणभोग ।

वासुकिप्रमुख अनेग । पद्मिनीभोग भोगिती ॥७५॥

स्वर्गी रंभा उर्वशी सुंदरी । कां पाताळीं पद्मिणी नारी ।

त्यांच्या सौंदर्याची थोरी । लोकांतरीं वाखाणे ॥७६॥

त्या तळीं तीं शतयोजनांवरी । शेष वसे सहस्त्रशिरी ।

ज्याच्या निजांगावरी । निद्रा करीं मी भगवंत ॥७७॥

त्याहूनि तळीं आत्यंतिक । अंधतामिस्त्रादि महानरक ।

त्याहीतळीं कूर्म देख । आवरणोदक तयातळीं ॥७८॥

ज्यांचा स्वर्गभोग होय क्षीण । अधोभोगाचें उरे पुण्य ।

तेणें पुण्यानुक्रमें जाण । सप्तपाताळीं जन जन्मती ॥७९॥

ज्याचे गांठीं पाप चोख । तो भोगी नाना नरक ।

ऐशी त्रिलोकी देख । चतुर्मुख स्वयें रची ॥१८०॥;

ज्यांसी निष्कामता नाहीं चित्तीं । जे स्वप्नीं न देखती विरक्ती ।

त्यांसी त्रिलोकीवरती गती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥८१॥

जे न करितीचि माझी भक्ती । जे नायकतीचि माझी कीर्ती ।

जे माझें रामनाम नुच्चारिती । भवबंधपंक्तिच्छेदक ॥८२॥

त्यांसी पुनः पुनः स्वर्गलोक । पुनः पुनः भोगिती नरक ।

पुनः पाताळ मृत्युलोक । नानायोनीं दुःख भोगिती ॥८३॥

जे त्रिगुणगुणी सदा सकाम । जे सर्वदा करिती सकाम कर्म ।

त्यांसी त्रैलोक्याबाहेरी निर्गम । त्रिगुणधर्म निघों नेदी ॥८४॥

सांगीतली पाताळविवंचना । आतां ऐक स्वर्गरचना ।

लोकीं लोकांतरगणना । समूळ जाणा सांगेन ॥८५॥

रविचंद्रप्रभा जेथवरी । तेथवरी पृथ्वीची थोरी ।

तळीं पाताळ स्वर्ग वरी । लोकलोकांतरीं निवास ॥८६॥

पायीं चालिजे तो भूलोक जोडे । येथूनि सूर्याऐलीकडे ।

भुवर्लोकींची थोरी वाढे । तेथ वस्ती घडे यक्षरक्षगंधर्वां ॥८७॥

भुवर्लोकाहीवरी । सूर्यलोकाची वाढे थोरी ।

पृथ्वीपासूनि लक्षावरी । जाण निर्धारीं रविलोक ॥८८॥

वायूपासूनि चक्राकारीं । रविचंद्रतारालोक कुसरी ।

खेवणोनियां तयावरी । काळ सूत्रधारी भवंडीत ॥८९॥

त्या काळाहीवरी माझी सत्ता । माझेनि भेणें काळू तत्त्वतां ।

क्षणलवनिमिषावस्था । अधिकन्यूनता होऊं नेदी ॥१९०॥

नवल काळचक्रगती । मासां रवि चंद्र समान होती ।

सूर्याआड चंद्रासी गती । जाण निश्चितीं दिनद्वयें ॥९१॥

ते आमावास्याप्रतिपदेसी । चंद्र चंद्रमंडळीं सावकाशीं ।

सुर्यसमभागें गमन त्यासी । तें या लोकांसी दिसेना ॥९२॥

इतुक्यासाठीं ते दिवशीं । जीवें जित्या चंद्राशीं ।

नष्टत्व स्थापिती ज्योतिषी । तें या लोकांसी सत्य माने ॥९३॥

रवि चंद्र एकासनीं । सर्वथा नव्हती गमनीं ।

लक्षांतरें वसती दोन्ही । मंडळसमानीं मासांतीं गती ॥९४॥

रविआड गती ज्या ग्रहासी । त्याचा अस्त सांगे ज्योतिषी ।

सत्य माने या लोकांसी । तो ग्रहो दृष्टीसी दिसेना ॥९५॥

दृष्टिसृष्टीचा जो न्यावो । तो ज्योतिषशास्त्रीं सत्य पहा हो ।

न दिसे त्याचा अस्तभावो । दिसे तो पहा हो पूजिती ॥९६॥

अभ्राआड ग्रहण झालें । देखिलें तेथें पर्व फावलें ।

न दिसे ते देशीं नाहींच झालें । येणेंही बोलें वर्तती ॥९७॥

रविचंद्रांहूनि आरती । राहुकेतूंची असे वस्ती ।

ते जैं मंडळाआड येती । तैं ग्रासिलें म्हणती रविचंद्रां ॥९८॥

राहु सूर्या गिळिता साचें । तैं तोंड जळतें राहूचें ।

मंडळीं मंडळ आड ये त्याचें । हें सर्वग्रासांचें संमत ॥९९॥

सूर्य सूर्यमंडळीं राज्य करी । त्याच्या सर्वग्रासाची थोरी ।

ज्योतिषी सांगे घरोघरीं । तें देखोनि नरीं महाशब्द कीजे ॥२००॥

सूर्यसर्वग्रासाचिया गोठी । जगीं एक बोंब उठी ।

शेखीं रवि-राहूंसी नाहीं भेटी । स्पर्शही शेवटीं असेना ॥१॥

ग्रहचक्र वेगें चळतां पाहीं । रविचंद्रादिकां चालणें नाहीं ।

ते निश्चळ निजराज्याच्या ठायीं । न चालतां पाहीं चालती ॥२॥

रविलोकाहूनि वरी । चंद्रलोक लक्षांतरीं ।

चंद्रलोकाहूनि दूरी । लक्षांतरीं तारालोक ॥३॥

तारालोकाहूनि वरी । बुधलोक दों लक्षांतरीं ।

बुधलोकाहूनि वरी । दों लक्षांतरीं शुक्रलोक ॥४॥

मिळोनियां दैत्यगण । ज्याच्या चरणां येती शरण ।

नित्य घालिती लोटांगण । तो शुक्राचार्य जाण दैत्यगुरु ॥५॥

शुक्रलोकाहूनि दों लक्षांतरीं । भौमलोक वसे अंबरीं ।

भौमलोकाहूनि दों लक्षांतरीं । देवगुरु करी निजवासू ॥६॥

ज्याचे चरण वंदिती देख । इंद्रचंद्रवरुणादि अर्क ।

नित्य येती आवश्यक । तो बृहस्पतिलोक गुरुचा ॥७॥

त्याहीवरी लक्ष दोनी । सूर्यसुत वसे शनी ।

लक्षांतरें तेथूनी । सप्तऋषिजनीं निवासू ॥८॥

सप्तऋषींची ऋषिपंक्ती । तेथेंचि वसे अरुंधती ।

यावरी वसे अमरावती । इंद्रसंपत्तीसमवेत ॥९॥

जेथ अंगें वसे इंद्र जाण । ऐरावती आरोहण ।

पार्षदगण मरुद्गण । सुरसेना जाण जयाची ॥२१०॥

उच्चैःश्रवा वारु जाण । कल्पतरुंचें उद्यान ।

कामधेनूंचें गोधन । नंदनवन क्रीडेसी ॥११॥

जेथींच्या पायर्‍या चिंतामणी । रंभा उर्वशी विलासिनी ।

अष्टनायिका नाचणी । ज्याच्या रंगणीं नांदती ॥१२॥

येणें वैभवें अमरावती । इंद्र तेथील अधिपती ।

येथूनि स्वर्गाची समाप्ती । त्रैलोक्य निश्चितीं या नांव ॥१३॥;

आतां त्रैलोक्याबाहेरी । एक लक्ष योजनांवरी ।

भक्तकृपाळू श्रीहरी । ध्रुवमंडळ करी कृपेने ॥१४॥

त्रिलोकीं होतां प्रलयकाळ । ध्रुवासी कदा नव्हे चळ ।

तो सर्वदा अचळ । यालागीं अढळ ध्रुवपद ॥१५॥

पृथ्वीपासोनि कोटि योजन । महर्लोक वसे जाण ।

तेथ वसती कल्पायु जन । तें वसतिस्थान तयांचें ॥१६॥

तेथूनि कोटि योजनें देख । वरुता असे जनोलोक ।

तेथ वसती सनकादिक । ऊर्ध्वरेते देख महायोगी ॥१७॥

तेथूनि दोन कोटि अधिक । वसताहे तपोलोक ।

तेथील निवासी आवश्यक । वैराजदेव देख तपस्वी ॥१८॥;

तपोलोकाहूनि देख । चौकोटी उंच अधिक ।

तेथ वसताहे सत्यलोक । तेथील नायक चतुरानन ॥१९॥

तेथ मूर्तिमंत चारी वेद । मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध ।

मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध । तपही विशद मूर्तिंमंत ॥२२०॥

गायत्री मूर्तिमंत तेथ । वाचा मूर्तिमंत वर्तत ।

दया मूर्तिमंत नांदत । योग मूर्तिमंत ब्रह्मसदनीं ॥२१॥

तेथ अग्नि तिनी मूर्तिंमंत । ते एकरुपें त्रिधा भासत ।

सत्य सत्यलोकीं मूर्तिमंत । असत्य तेथ असेना ॥२२॥

ते लोकीं वसते कोण लोक । जे गायत्रीमंत्रजापक ।

जे ब्राह्मणतीर्थप्राशक । जे यागउपासक निष्काम ॥२३॥

जे ब्राह्मणकार्यी निमाले । जे गोसंरक्षणीं जीवें गेले ।

जे परोपकारार्थ वेंचले । ते पावले सत्यलोक ॥२४॥

जे निष्काम द्विजां भजले । जिंहीं निष्काम द्विज पूजिले ।

जिंहीं निष्काम द्विज भोजिले । ते पावले सत्यलोक ॥२५॥

जे कृपाळू दीनार्थ देख । जे कृपाळू बंधमोचक ।

जे सत्यवादी सात्विक । ते सत्यलोकनिवासी ॥२६॥

जे परापवादीं मूक । परदारानपुंसक ।

जे परद्रव्या पराङ्‌मुख । ते सत्यलोकनिवासी ॥२७॥

ऐसी सत्यलोकींची स्थिती । तेथींचा ब्रह्मा अधिपती ।

ब्रह्मसृष्टि याहीवरती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥२८॥;

ब्रह्मांडाहूनि वेगळा । कैलास निर्माण करी भोळा ।

वैकुंठ रची घनसांवळा । हे लोक स्वलीळा निर्मित ॥२९॥

होतां ब्रह्मांडा घडामोडी । वैकुंठ कैलास न लगे वोढी ।

तेथील वस्तीची अभिनव गोडी । हरिहरभक्त फुडी जाणती ॥२३०॥

तेथ नाहीं काळाचें गमन । नाहीं कर्माचें कर्मबंधन ।

तेथ नाहीं जन्ममरण । हें भक्त अनन्य पावती ॥३१॥

वैकुंठकैलासरचना । सांगतां मन मुके मनपणा ।

ते लोकींची लोकलक्षणा । ऐक विचक्षणा सांगेन ॥३२॥

सकळ ब्रह्मांडाबाहेरी । माया आवरणाभीतरीं ।

वैकुंठ कैलास हरहरीं । स्वलीलेकरीं निर्मिजे ॥३३॥

सकळ जीवां सुखकरु । कैलासीं वसे शंकरु ।

जो कां पार्वतीपरमेश्वरु । जो योगेश्वरु योगियां ॥३४॥

जटाजूटी गंगाधर । पिनाकपाणी पंचवक्त्र ।

कर्पूरगौर गोक्षीर । अभयवरदकर निजभक्तां ॥३५॥

त्रिमात्रातीत त्र्यंबक । त्रिपुटीत्रिपुर त्रिपुरांतक ।

त्रिविधतापउच्छेदक । तिनी लोक सुखकारी ॥३६॥

नागभूषणीं शोभे लीला । रुद्राक्षयुक्त रुंडमाळा ।

नीळकंठ जाश्वनीळा । भस्मोद्धूलिधूसर ॥३७॥

त्रिशूळडमरांकित कर । त्रिनेत्र व्याघ्राजिन अंबर ।

रामनामीं अतितत्पर । करी निरंतर जपमाळा ॥३८॥

सहस्त्रबाहु बळिपुत्र बाण । श्रृंगी भृंगी चंडी पार्षद पूर्ण ।

साठी सहस्त्र रुद्रगण । कात्या त्रिशूळ जाण झेलती ॥३९॥

गणेश स्वामिकार्तिक । नंदी पंचमुख षण्मुख ।

वीरभद्र सेनानायक । जेणें लाविली सीक दक्षासी ॥२४०॥

भूत प्रेत पिशाचक । महाप्रथम ज्याचें सैन्यक ।

अवघे शिवांकित देख । शिवनामघोष गर्जती ॥४१॥

शंभु शिव शूली शंकर । उमाकांत कर्पूरगौर ।

भव भर्ग भवानीवर । कपर्दी ईश्वर महादेव ॥४२॥

हरहरशंकरनामोच्चारीं । धाकें कळिकाळ पळे दूरी ।

शिवनामें गर्जे सदा गिरी । गिरीश राज्य करी ते ठायीं ॥४३॥

जेथ शिवनामाचा उच्चार । तेथ सुखेंसीं तिष्ठे शंकर ।

भक्तकृपाळू ईश्वर । भोळा निरंतर भावार्थ्यां ॥४४॥

निजदासांचे त्रिगुण वैरी । छेदावया सदा त्रिशूळ करीं ।

निजडमरुच्या गजरीं । पापाची उरी उरों नेदी ॥४५॥

कैलासीं तृण तरु समस्त । पशु पक्षी जे जे तेथ ।

ते अवघेचि शिवांकित । सर्वरुपें समस्त शिवू नांदे ॥४६॥

यापरी ब्रह्मांडाबाहेरी । शिवू स्वलीला निर्माण करी ।

नेमूनियां कैलासगिरी । भवू राज्य करी भवानीशीं ॥४७॥;

आतां वैकुंठींची स्थिती । ऐक सांगेन तुजप्रती ।

जे ऐकतां चित्तवृत्ती । स्वानंदस्फूर्ती वोसंडे ॥४८॥

उंस गाळूनि काढिजे सार । त्याची आळूनि कीजे साकर ।

तिचेही नाना प्रकार । करिती नानाकार अतिकुशळ ॥४९॥

तेवीं चैतन्यचि निश्चितें । मुसावूनि श्रीभगवंतें ।

वैकुंठ रचिलें तेथें । निजसामर्थ्यें नांदावया ॥२५०॥

स्वलीला सगुण साकार । सुकुमार अतिसुंदर ।

घनश्याम मनोहर । मूर्ति चिन्मात्र चोखडी ॥५१॥

शंख चक्र पद्म गदा । चारी भुजा सायुधा ।

डोळे लांचावले आनंदा । सगुण गोविंदा देखोनी ॥५२॥

मुकुट कुंडलें मेखळा । कांसे पिंवळा सोनसळा ।

कौस्तुभ झळके गळां । आपाद वनमाळा शोभत ॥५३॥

चरणींची गंगा अतिपुनीत । जे जगातें पवित्र करीत ।

ते माथां वाहे उमाकांत । निजस्वार्थ देखोनी ॥५४॥

त्या श्रीहरीचें पदद्वंद्व । वानितां मुका झाला वेद ।

अगम्य हरीचें निजपद । महिमा अगाध श्रीहरिचरणीं ॥५५॥

पाहतां मुकुंदाचें श्रीमुख । फिकें झालें जी पीयूख ।

डोळ्यां झालें परम सुख । धन्य श्रीमुख हरीचें ॥५६॥

ज्याचें निमेषार्ध देखिल्या मुख । हारपे कोटि जन्मांचें दुःख ।

त्रिलोकीं न माय हरिख । धन्य श्रीमुख हरीचें ॥५७॥

ज्याचा देखिलिया वदनेंदू । बाधूं न शके द्वंद्वबाधू ।

चढता वाढता परमानंदू । स्वानंदकंदू जगाचा ॥५८॥

जयाची विक्षेपभ्रुकुटी । रची ब्रह्मांडें उठाउठी ।

ज्याचे रोमकूपीं ब्रह्मांडें कोटी । तो हरि वैकुंठीं नांदत ॥५९॥

ज्याची झालिया कृपादृष्टी । अहंकाराची विरे गांठी ।

दुसरें दिसों नेदी सृष्टीं । तो हरि वैकुंठीं नांदत ॥२६०॥

जया दादुल्याचें नाम । निर्दाळी गा मरणजन्म ।

समूळ उपडी कर्माकर्म । तो पुरुषोत्तम नांदत ॥६१॥

ते वैकुंठीं पाहतां साचार । अवघे चतुर्भुज नर ।

घनश्याम पीतांबरधर । शंख चक्र अवघ्यांसी ॥६२॥

अवघ्यांचें एक स्वरुप । अवघे दिसती एकरुप ।

जेथ हरि नांदे स्वयें सद्रूप । तेथ कोणी कुरुप दिसेना ॥६३॥

तेथ नाहीं आधि व्याधी । नाहीं विषयवार्ता उपाधी ।

स्त्रीपुरुषां समान बुद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥६४॥

तेथ नाहीं तहानभूक । नाहीं कामक्रोध द्वंद्वदुःख ।

नाहीं जन्ममरण निःशेख । ऐसा वैकुंठलोक नांदत ॥६५॥

लक्ष्मीनें करावें अवलोकन । यालागीं कष्टती सुरगण ।

ते लक्ष्मी अंगें आपण । करी संमार्जन वैकुंठीं ॥६६॥

ते वैकुंठीं जगन्नाथ । उद्धरावया निजभक्त ।

स्वलीला असे नांदत । दीनकृपायुक्त दयाळू ॥६७॥

अंतीं नाममात्र घेतल्यासाठीं । उद्धरल्या जीवकोटी ।

तो स्वामी श्रीविष्णु वैकुंठीं । दीनकृपादृष्टी नांदत ॥६८॥

जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ ।

पढिये पंचम पुरुषार्थ । तो हरि नांदत वैकुंठीं ॥६९॥

लोकलोकांतरगणना । ब्रह्मांडसंख्या अवघी जाणा ।

वैकुंठकैलासरचना । समूळ विवंचना सांगीतली ॥२७०॥

लोक सांगीतले भिन्न भिन्न । तेथील प्राप्तीचे कोण जन ।

ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थी निरुपण अवधारीं ॥७१॥

महर्जनतपः-सत्यलोक । वैकुंठरचना अलोलिक ।

तेथील प्राप्तीचे कोण लोक । ते यदुनायक सांगत ॥७२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP