श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णाय नमः ।
ॐ नमो सद्गुरु विश्वरुप । विश्वा सबाह्य तूं चित्स्वरुप ।
तुझें निर्धारितां रुप । तूं अरुप अव्यय ॥१॥
चराचर जें सावेव । ते तुज अरुपाचे अवेव ।
जीवशीव हे तुझी माव । अद्वयवैभव पैं तुझें ॥२॥
धृतपुतळी दिसे साकार । घृतपणें ते निराकार ।
तैसा तूं अव्यय अक्षर । जगदाकार भाससी ॥३॥
ठसावलें जें दिसे जग । निर्धारितां तुझें अंग ।
अंग पाहतां तूं अनंग । अनंगाचा माग तुजमाजीं नाहीं ॥४॥
देखिजे तें तूं नव्हसी । नव्हे तें तूंचि होसी ।
होणें न होणें नाहीं तुजपाशीं । ऐसा तूं जगासी जगद्गुरु ॥५॥
शब्द तुजहोनियां दूरी । तूं शब्दा सबाह्य अंतरीं ।
बोलका तूं चराचरीं । वेदशास्त्रीं तूं वक्ता ॥६॥
उंसापासून गोडी दिसे । उंसा सबाह्य गोडीचि असे ।
गोडियेमाजीं ऊंस नसे । वेदांसी तुज तैसें सौजन्य ॥७॥
वेदांचा वक्ता तूंचि होसी । वेदीं प्रतिपादिजे तुम्हांसी ।
शेखीं वेदांसी नाकळसी । निःशब्दवासी गुरुराया ॥८॥
जेवीं कां निःशब्द अनाहतध्वनी । असे ध्वनिमात्रीं मिळूनी ।
तो अनाहत वाजविजे जनीं । ऐसें नाहीं कोणी वाजंत्र ॥९॥
तेवीं तूं वेदांचा वक्ता । सकळ शास्त्रां युक्तिदाता ।
परी वेदशास्त्रार्थसंमता । तुज तत्त्वतां न बोलवे ॥१०॥
म्हणों तूं केवळ निःशब्द । तंव निःशब्द आणि सशब्द ।
हाही मायिक अनुवाद । तूं एवंविध न कळसी ॥११॥
तूं न कळसीचि तत्त्वतां । ऐशिया युक्तींचा तूंचि विज्ञाता ।
ज्ञाताचि हें जंव स्थापूं जातां । तंव अज्ञानता असेना ॥१२॥
जेथ अज्ञानता नाहीं । तेथ ज्ञातेपण कैंचें कायी ।
हो कां मुख्यत्वें नोवरी नाहीं । तैं नोवरी पाहीं म्हणे कोण ॥१३॥
ज्ञाता ना अज्ञाता । तूं बोलता ना नबोलता ।
तूं बहु ना एकुलता । तुझी अलक्ष्यता लक्षेना ॥१४॥
तूं निःशब्द निर्विकार । तू निगुण निरहंकार ।
हेंही म्हणतां पडे विचार । तूं जगदाकार जगदात्मा ॥१५॥
जगदाकारें तूं प्रसिद्ध । तेथ कोणाचें कोणा बाधे द्वंद्व ।
पर नाहीं मा परापराध । अतिविरुद्ध कोणासी ॥१६॥
यापरी सद्गुरुनाथा । तुझे चरणीं द्वंद्वसमता ।
तेणें समसाम्यें निजकथा । श्रीभागवता चालविसी ॥१७॥;
तेंचि श्रीभागवतीं । बाविसावे अध्यायाअंतीं ।
उद्धवें पुशिलें निजशांती । द्वंद्वसमाप्तिउपावो ॥१८॥
उद्धवें प्रश्न केला वाड । जेणें ब्रह्मज्ञानाची पुरे चाड ।
तो श्रीशुकासी लागला गोड । तेणें पुरे कोड परीक्षितीचें ॥१९॥
ऐकोनि उद्धवाची प्रश्नोक्ती । शुक सुखावला आनंदस्फूर्ती ।
तो म्हणे सावध परीक्षिती । तुष्टला श्रीपती उद्धवासी ॥२०॥
ब्रह्मज्ञानाची निर्वाणस्थिती । ते जाण पां मुख्यत्वें शांती ।
ते उद्धवें पुशिली अतिप्रीतीं । तेणें श्रीपती संतोषला ॥२१॥
तो शांति आणि निवृत्ती । सांगेल चौं अध्यायोक्ती ।
ऐक राया परीक्षिती । ते मी तुजप्रती सांगेन ॥२२॥
ऐकें पांडवकुलदीपका । कौरवकुळीं कुलतिलका ।
तूं शांतीसी अधिकारी निका । निजात्मसुखा साधकू ॥२३॥
साधावया ब्रह्मप्राप्ती । तूं त्यक्तोदक श्रवणार्थीं ।
यालागीं शांति आणि निवृत्ती । ऐक नृपती हरि सांगे ॥२४॥
तेविसावे अध्यायीं निरुपण । दुर्जनीं क्षोभविलें मन ।
त्या मनासी ये क्षमा पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण सांगेल ॥२५॥
भिक्षुगीतसंरक्षण । तें मनोजयाचें लक्षण ।
प्रकृतिजयाचें निरुपण । सांगेल संपूर्ण चोविसावा ॥२६॥
सांगोनि त्रिविध त्रिगुण । परी लक्षविलें निजनिर्गुण ।
हें गुणजयाचें निरुपण । सुलक्षण पंचविसावा ॥२७॥
सव्विसावा अध्यावो येथ । तो धडधडीत विरक्त ।
सांगोनियां ऐलगीत । स्त्रियादि समस्त विषयत्यागू ॥२८॥
गुण विषय प्रकृति मन । या चहूंचें समाधान ।
चहूं अध्यायी विशद जाण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥२९॥
यापरी परीक्षितीस जाण । करोनियां सावधान ।
श्रीशुकयोगींद्र आपण । कथालक्षण निरुपी ॥३०॥;