उपनयनाला जो काल सांगितला त्या कालीच समावर्तन करावे असे पुष्कळ ज्योतिषि ग्रंथामध्ये सांगितले आहे. यावरून अनध्याय, प्रदोषदिवस, मंगळवार व शनिवार, पौष व आषाध हे मास आणि दक्षिणायन ही समावर्तनाला वर्ज्य करावी. मार्गशीर्ष महिन्यामध्ये विवाह करणे असल्यास दक्षिणायनात देखील समावर्तन करावे. नाही तर, "एक दिवस देखील द्विजाने अनाथाश्रमी राहू नये" या निषेधाचा अतिक्रम होतो. दुसरे ग्रंथकार म्हणतात, मौजीचा उक्त काल समावर्तनाचाही काल होय, असे तूलवचन कोठे आढळत नाही; याकरिता तीन रिक्ता तिथि (४, ९, १४) पूर्णिमा, अमावास्या, अष्टमी, प्रतिपदा एवढ्या तिथि वर्ज्य करून बाकीच्या तिथीचे दिवशी; शुक्लपक्षी; शेवटच्या पाच तिथि वर्ज्य करून कृष्णपक्षी; गुरुशुक्रांचा अस्त, दिनक्षय, भद्रा, व्यतीपात इत्यादि दोष नसता; शुभवारी समावर्तन करावे. या ठिकाणी प्रदोष, सोपपदा तिथि वर्ज्य करणे आवश्यक नाही असे सांगतात. पुष्य, पुनर्वसु, मृग, रेवती, हस्त, अनुराधा तीन उत्तरा, रोहिणी, श्रवण, विशाखा आणि चित्रा ही नक्षत्रे श्रेष्ठ होत. ही न मिळाल्यास मौजीला सांगितलेली नक्षत्रे घ्यावी. क्वचित मंगळवार व शनिवार हेही घ्यावे असे निर्णयसिंधूमध्ये सांगितले आहे.