मंडपदेवतांचे उत्थापन होईपर्यंत वर्ज्य करण्याची कृत्ये - नान्दीश्राद्ध केल्यानंतर मातृकांचे विसर्जन होईपर्यंत दर्शश्राद्ध, सांवत्सरिकश्राद्ध, शीतोदकाने स्नान, अपसव्य, स्वधाकार, नित्यश्राद्ध, ब्रह्मयज्ञ, अध्ययन, नदीचे उल्लंघन, सीमोल्लंघन, उपवासव्रत, श्राद्धभोजन, ही सर्वथा सपिंडांनी मंडपदेवतांचे विसर्जन होईपर्यंत करू नयेत. येथे स्वधाकराचा जो निषेध सांगितला आहे त्यावरून स्वधाकारविशिष्ट जो वैश्वदेव त्याचाही निषेध सांगितला. या ठिकाणी सपिंड तीन पुरुषपर्यंत घ्यावे असे पुरुषार्थचिंतामणीमध्ये सांगितले आहे. अभ्यंग, आशौच, विवाह, पुत्रजन्म आणि सर्वमांगलिक कार्ये याचे ठिकाणी गोपीचंदन लावू नये. या कार्यामध्ये भस्मधारण देखील करीत नाहीत. जननाशौचामध्ये भस्म व गोपीचंदन ही निषिद्ध आहेत. मृताशौचामध्ये भस्म धारण करावे.